प्रतिबिंब
भाग १
शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही चार महिने होऊन गेलेले. वकिलाचे दहादा फोन येऊन गेले. पण यशच्या कामाच्या व्यस्ततेने फुरसत मिळत नव्हती.
शेवटी वकिलाने आता आला नाहीत तर सर्व सरकारजमा होईल आणि नंतर काहीच हाती लागणार नाही असे निकराचे सांगताच जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यशच्या मते तसेही तिथे जुन्या पुराण्या वास्तुशिवाय काही नव्हतेच.
वकिलास सांगून विकून टाकावे असे त्याने बोलूनही दाखवले, पण जाताना सासऱ्यांनी दहा वेळा जाईस एकदा तरी शिवपुरी जाऊन यावे मग जो वाटेल तो निर्णय घ्यावा असे परोपरीने कळवळून सांगितलेले तिच्या मनातून जाईना. शेवटी तिने कसेतरी यशला तयार केले आणि जाण्यासाठी दोघे निघाले तर होते. काही अंतर गेल्यावर यशला सतत कामाचे फोन येऊ लागले मग जाईने गाडीचे चक्र हाती घेतले. गुगलभाऊ हाताशी होतेच त्यामुळे फारसा प्रश्न नव्हता. गाडी चालवताना नेहमीप्रमाणे जाईची तंद्री लागली.
सात वर्षांपूर्वी उच्च शिक्षण घेऊन जाई नोकरीसाठी अर्ज करू लागली. बहुतेक मुलाखतींमधे निवड व्हायचीच पण हिला काही ना काही खटकायचे. मग एक दिवस यशच्या फर्ममधून मुलाखतीसाठी बोलावणे आले. जाई मुलाखतीसाठी गेली ती नोकरीत रुजू होऊनच परत आली. तिच्या डॅडना आश्चर्यच वाटले. पण फार वाट पहावीच लागली नाही. बोलघेवड्या जाईच्या तोंडून नेहमीप्रमाणे दिवसभराचा वृतांत ऐकतानाच फर्मपेक्षा फर्मवाल्यानेच तिच्या मनी घर केले आहे हे त्या चाणाक्ष पित्याच्या लगेच ध्यानी आले. नोकरी सुरू झाली. प्रथमदर्शनी आकर्षणाचे रोजच्या सहवासाने प्रेमात आणि पुढे दोन वर्षांनी विवाहात रुपांतर झाले तेव्हा हे होणे अटळच होते असे त्या दोघांना ओळखणाऱ्या सर्वांनाच वाटले. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा यश आणि नाजूक, आकर्षक, स्मार्ट जाई एकमेकांना अगदी अनुरूप होते.
रावसाहेब मोठा तालेवार माणूस. संस्थानिक पुत्र असूनही आधुनिकतेची कास धरत, स्वत: शहर तसेच गावी दोन्हीकडे वास्तव्य ठेवत, संस्थानाच्या शेतजमिनीतून सोनं पिकवून दरवर्षी उत्पन्नात भरच घालत गेले. पण मग यशची आई अर्ध्या संसारातून अवघ्या चार दिवसाच्या तापाचे निमित्त होऊन गेली. यश तेव्हा शहरात हॉस्टेलमधे राहून शिकत होता. रावसाहेबांनी हळूहळू इथला गाशा गुंडाळून शहरात कायमच्या वास्तव्यासाठी जाण्याची तयारी सुरू केली. यशचे शिक्षण संपल्यावर त्याने शहरातच ऑफीस थाटले आणि लेकासह रावसाहेब शहरी कायमचे स्थायिक झाले. यशच्या लग्नानंतर अनेकदा रावसाहेबांनी सुचवूनही आज जाऊ उद्या जाऊ असे करत जाईस शिवपुरीस नेणे राहूनच गेले. यशची ते करण्याची निरीच्छा आईच्या अकाली जाण्याने असावी असा जाईचा कयास होता. म्हणून तिनेही कधी फार आग्रह धरला नाही. रावसाहेब एकटेच वर्षातून एक दोन वेळा जाऊन तिथली व्यवस्था लावून येत. सहा महिन्यांपूर्वी अचानक त्यांना पक्षाघात झाला आणि ते ही थांबले. अवघ्या दोन महिन्यात, उंचापुरा माणूस होत्याचा नव्हता झाला. शहरी औषधोपचार, प्रेमळ सून असे असूनही रावसाहेबांनी मनानेच जगण्याची इच्छाच सोडून दिल्यामुळे की काय जीवनज्योत मालवलीच. परंतु या दोन महिन्यात कित्येक वेळा त्यांनी जाईस शिवपुरी जाऊन येण्याबद्दल बजावून बजावून सांगितले. सासऱ्याची ही अंतिम इच्छा पूर्ण करायचीच असे तिने मनोमन ठरवले.
समोर आगगाडीचे बंद फाटक लागले तशी जाईने गाडी थोडी अलिकडेच थांबवली. उतरून दोघांनी चेहऱ्यावर पाणी मारून, थर्मासमधील कॉफी आणि सॅंडविचचा समाचार घेतला.फोनची रेंज नसल्याने यशचे काम आपसूकच थांबले. त्याने चक्राची सुत्रे आपल्या हाती घेतली. तासाभरात शिवपुरीची हद्द लागली. जाई कुतुहलाने बाहेरचा परिसर न्याहाळू लागली.
लहानसंच पण टुमदार गांव. जवळपास सगळीच धाब्याची घरं. क्वचित काही दुमजली. बहुतेक सर्व घरांना कोयनेलची कुंपणं. दाराशी छोटी मोठी फुलांची झुडपं. बहुतेक सगळ्या घरांना जरा भडक रंगानीच रंगवलेलं. भिंतींवर घरातील स्त्रियांनी वेलबुट्टी रंगवलेल्या. रंग जरा भडक असले तरी रंगसंगती आकर्षक, त्यामुळे उठून दिसणारी. दरवाजे ठराविक कमानीवाले. एकंदरच तो घरांचा वेगळा बाज जाईला अतिशय आवडला. पाहता पाहता गाडी वाड्याच्या दारात पोहोचली. वाडा कसला एक छोटेखानी किल्लाच तो. चारी बाजूंनी बाहेरून उंच भिंत बांधून घेतलेली. या भिंतीतच समोरच्या बाजूला तीन माणूस उंचीचा भलामोठा दरवाजा आणि त्यातच एक लहान दिंडी दरवाजा. गाडी दरवाजापाशी आली. वकिल आणि शिवा, त्यांचा जुना नोकर बाहेरच थांबलेले. गाडी बाहेरच लावावी असे वकिलाने सुचवले कारण एवढा मोठा दरवाजा एकट्या शिवाला या वयात उघडणे शक्य नव्हते. शिवाने मग दिंडी दरवाजा उघडला. उघडताना त्याचा कर्र कर्र आवाज झाला. एखाद्या हॉरर फिल्मचे शुटींग मस्त होईल इथे असे जाईला वाटले.
"छोटे धनी, दिवानखाना, अन् खालच्या झोपायच्या खोल्या, काल साफ करून घेतल्यात. रखमा यिल यवड्यात मंग गरम गरम भाकर अन् सुकं पिटलं घ्या जिवून. दमला असाल, वाईच इसरांती ग्या. दुपारच्यानं मंग वाडा दावतो फिरून. किल्ल्या आनलासा न्हवं?"
यशने मान डोलावली. या शिवाच्या खांद्यावर बसून लहानपणी अनेकदा गावचक्कर मारल्याचं त्याला आठवत होतं. शिवाचंही आता वय झालं होतं. पाठीत वाकला होता चांगलाच. त्याने शिवाची, घरच्यांची विचारपूस केली, तेवढ्यानेच शिवा गहिवरला. उद्या येतो असं सांगून वकील निघून गेला. "मी हाय हितंच भाईर" असं म्हणून या दोघांना दिवाणखान्यात सोडून तो बाहेर गेला. भलामोठा चौरसाकृती दिवाणखाना. दिवाणखान्याची रचना वेगळीच होती. त्यात तीन ठिकाणी वेगवेगळी बैठकीची व्यवस्था होती. एके ठिकाणी सागवानी दिवाण, गाद्या लोड तक्के असा साधारण १०-१५ लोकांना बसता येईल असा जामानिमा, तर एकीकडे चक्क गाद्यागिरद्यांची, भारतीय बैठक. समोर जाजम, जिथे एकाच वेळी २५-३० माणसे बसू शकली असती. एका कोपऱ्यात जिन्याच्या बाजूला एक गोल टेबल, चार कोरीव काम केलेल्या खुर्च्या, अशी कोझी तीनचार जणांसाठीची सोय. ‘इथे बसून रोज आपले सासू सासरे दुपारचा चहा पीत असतील का?’ जाईच्या मनात विचार आला. जमिनीवर जुना गालिचा पसरलेला होता. त्यातली धूळ मात्र नाकाला जाणवत होती. भिंतींचाही रंग उडाला होता. पूर्वीच्या काळी त्यावर सोनेरी वर्खाचे नक्षीकाम असावे असे वाटत होते.
सगळ्यात लक्ष वेधून घेत होत्या त्या पूर्वजांच्या मोठमोठ्या तसबिरी. अगदी यशच्या खापरपणजोबांपासून सर्वांच्या तसबिरी होत्या. आधीच्या चित्रकाराने काढलेल्या, तर नंतरच्या छायाचित्रांच्या. एका भिंतीवर नवराबायकोच्या तरुणपणीच्या आणि दुसऱ्या भिंतीवर फक्त पुरुषांच्या म्हातारपणीच्या. जाईला मोठंच नवल वाटलं. ‘म्हणजे राण्यांनी म्हातारं झाल्यावर फोटोच नाही काढायचे की काय? फक्त तरुणपणीचेच काय फोटो? एका भिंतीवर प्रत्येक कुटुंबाचा फोटो, तो ही राण्या तरुण, आणि मुले तान्ही असतानाचा. गम्मतच आहे मोठी.’ तिने शिवाला बोलावून नावं विचारून घेतली फोटोतील व्यक्तींची.
“ह्ये भाऊसाब पयले राजे, मंग ह्ये अप्पासाब, ह्ये दादासाब आन् ह्ये रावसाब तुमचे सासरे, ह्ये धाकले धनी”
असं म्हणून त्याने एका कौटुंबिक फोटोतील लहान मुलाचा फोटो दाखवला. जाईला हसू आलं. मग यश बाहेर गेला अंगणात आणि जाई बसली त्या नक्षीदार खुर्चीवर. अशाच बसत असतील या राण्या. तेवढ्यात जिन्यावर लक्ष गेलं तिचं. एक गोरीपान, मोठाल्या डोळ्यांची, टोपपदरी लुगडं नेसलेली, नाकात मोरणी, डोळ्यात काजळ, कपाळावर मोठं कुंकू, पायात पट्टया, एकंदर नखरेल बाई उभी होती. जिन्याच्या कठड्याच्या पट्ट्यांमधून हिच्याकडे एकटक बघत. 'रखमा असावी का ही?' जाई मनात म्हणाली. जाई हसली पाहून तिच्याकडे पण ती नाही हसली. एकटक पहात राहिली. डोळे भावरहीत. तेवढ्यात दार उघडून यश आत आला म्हणून जाई मागे वळली. तेवढ्यात ती गेली. अरे एवढ्यात कुठे गेली? जिना चढण्याचा आवाजही नाही. मग शिवा आला, त्याच्या पाठोपाठ एक बाई आली. लगबगीने किचनकडे जात "बेगिनी भाकरी पिठलं बनवतु, भुका लागल्या असतील न्हवं?" म्हणाली. अरे म्हणजे ही रखमा, मग ती कोण?
"शिवा, सफाईसाठी कोणी बाई आली आहे का माडीवर"
"नाय बा, आनी, माडीला कुलुपच हाय न्हवं का" जाई, विचारात पडली.
"नाही, नाही, एक बाई गेली ना वर आत्ताच. जिन्यात पाहिली मी तिला. चल बघुया, असेल वरच". शिवा एकदम दचकल्यासारखा झाला.
"अवं नाय वो वैनीसाब, मोटे मालक जाताना कुलुप लावून गेलते. कोन उगडंल? किल्लीच न्हायतर". तिला शिवाचाच संशय आला.
"चल माझ्याबरोबर बघू आपण" असं म्हणून ती तरातरा जिने चढू लागली. शिवा “अवं थांबा अवं थांबा” म्हणेपर्यंत वर पोहोचलीसुद्धा. जिन्यातून वर गेल्यावर उजव्या हाताला एक मोठा दरवाजा होता. त्याला बाहेरून भला मोठा कडी कोयंडा होता, भलं मोठं कुलुपही लावलेलं होतं. जाईला सर्वात आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा त्या दारावर, कुलुपावर भरपूर जाळ्या, जळमटं, धूळ, साठलेली दिसली. कित्येक महिन्यात तिथे कोणी आलंही नसावं कारण जमिनीवर साठलेल्या धुळीत तिला फक्त स्वत:च्या पायांचे ठसे उमटलेले दिसले. जाई भरभर जिना उतरून खाली आली. तिला शिवा काहीतरी खालच्या आवाजात यशबरोबर बोलताना दिसला. हिला पाहून दोघेही गप्प झाले.
"अरे कुठे गेली ती? वाड्यात बघ असेल इथेच. फार वेळ नाही रे झालेला". जाई जरा वैतागूनच म्हणाली.
शिवाला काय बोलावं कळेना. मग यशने खूण करताच तो जाई आणि यश सोबत वाड्याच्या खालच्या खोल्या, मागचे पुढचे अंगण, सगळे फिरून आला. ती बाई कुठेच नव्हती.