वाढला टक्का मिळेल मुक्का !
विलासपूर नावाचे एक गाव. गाव तसे मोठे होते. गावात नगरपालिका होती. नगराध्यक्ष होते. तसेच नगरसेवकही होते. सहा महिन्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. गावातील पुढारी आणि बरेचसे नागरिक गावाच्या नावाप्रमाणेच विलासी होते. कदाचित पूर्वजांच्या विलासी वृत्तीमुळे गावाला विलासपूर हे नाव मिळाले असावे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत फार कमी म्हणजे बारा टक्केच मतदान झाले होते. निवडून आलेले नगरसेवक जेमतेम दहा-वीस मतांनी जिंकून आले होते. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. निकालानंतर विलासपूर गावामध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांची 'सब घोडे बारा टक्के ' ही कविता फारच गाजत होती. पानटपरी, हॉटेल, न्हाव्याच्या दुकानात, सार्वजनिक ठिकाणी कवितेतील एकच ओळ 'सब घोडे बारा टक्के ' वाजवल्या जात होती. अनेकांनी आपल्या भ्रमणध्वनीवर ही ओळ 'रिंगटोन' म्हणून निवडली होती. दहा बारा लोक एकत्र जमले की कुणीतरी दुरून तिच ओळ जोरात ओरडून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कुण्या एका पक्षास बहमुत न मिळाल्यामुळे घोडेबाजार तेजीत होता परंतु सर्वत्र एक अविश्वासाचे वातावरण होते. आत्ता खरेदी केलेला नगरसेवक तासाभरानंतर आपल्याकडे राहील का नाही याची शाश्वती नव्हती. सारे कसे गोंधळाचे वातावरण होते. सर्वच नगरसेवकांकडे संशयाने पाहिले जात होते. निवडून आलेल्या अपक्ष नगरसेवकालाही नगराध्यक्ष होण्याची संधी होती, तसे डोहाळे प्रत्येकालाच लागले होते. नगराध्यक्ष निवडीला दोन दिवस उरलेले असताना विलासपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची आणि विलासपूरमधील प्रतिष्ठीत व्यक्तींची एक बैठक बोलावली. ही बैठक कायदेशीर होती की नाही हा भाग निराळा! त्या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले,
"ही बैठक विलासपूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत नगरीचा नेता निवडला जाईल की नाही अशी शंका आहे. समजा निवडून आलाच तर तो कारभार कसा करेल? बहुमत नसलेल्या नेत्याची अवस्था एखाद्या भरकटलेल्या जहाजाप्रमाणे होऊ शकते. काही दिवसांनंतर त्या नगराध्यक्षावर लोकशाहीच्या मार्गाने अविश्वास ठराव मंजूर करून त्याला बाजूला केले जाऊ शकते. पुन्हा तीच अस्थिरता निर्माण होणार नाही कशावरून? त्यासाठी मग एकच पर्याय शासनाजवळ उरतो तो म्हणजे बरखास्तीचा! पुन्हा निवडणुका होणार. त्यावेळी तरी परिस्थिती बदलेल ह्याचा विश्वास काय?"
"पण साहेब, दुसरा काहीही मार्गही दिसत नाही. आपण म्हणता ते बरोबर आहे. पुन्हा निवडणुका म्हणजे सारेच काही नव्याने आले. शिवाय आजची परिस्थिती बदलेल अशी कोणतीच आशा दिसत नाही." विलासपूरचे एक जुने जाणते नेते म्हणाले.
"ते तर आहेच पण महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीसाठी होणारा शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च! आधीच राज्यात आणि त्यातही आपल्या जिल्ह्यात फार मोठा दुष्काळ आहे."
"साहेब, पुन्हा निवडणुका न घेता दुसरा एखादा उपाय आहे का?" दुसऱ्या एका नेत्याने विचारले.
"आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावली आहे. जेवढे नगरसेवक निवडून आले आहेत त्या प्रत्येकाला समसमान काळ नगराध्यक्ष करावयाचे.... पाच वर्षे भागिले नगरसेवक संख्या याप्रमाणे. कुणाला एक दिवस जास्त नाही की एक दिवस कमी नाही..."
"पण साहेब, कामकाजाचे काय? यामुळे गोंधळ माजणार नाही का?" कुणीतरी विचारले.
"आता गोंधळ होणार नाही असे तुम्हाला वाटते का? राहिला प्रश्न विकास कामांचा तर आपण तुम्हा-आम्हा सर्वांची एक समिती नेमूया. पाच वर्षे आणि विलासपूरच्या समस्यासमोर ठेवून आराखडा तयार करून देऊया. त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी कार्य केले तर विलासपूरचे रुप पालटून जाईल. आपण पंधरा मिनिटांनी पुन्हा भेटूया." असे सांगत जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात गेले.....
"साहेब म्हणतात ते बरोबर आहे..." चर्चेअंती सर्वांचे असेच मत पडले. त्याप्रमाणे सारी व्यवस्था झाली. चिठ्ठ्या टाकून प्रत्येकाचा कालावधी ठरविण्यात आला. त्याप्रमाणे साडेचार वर्षे कारभार विविध नगराध्यक्षांनी पाहिला. अनेकांचा कार्यकाळ 'विलासी' म्हणून नोंदल्या गेला. काही नगराध्यक्षांची कारकीर्द तर वर्तमानपत्र आणि वाहिन्यांवर 'विलासपूरचे विलासी नगराध्यक्ष!' अशा मथळ्यांनी गाजली...
पाहता पाहता पाच वर्षांचा अवधी संपत येत असताना विलासपूरला नगरपालिका निवडणुकांचे वेध लागले. शासकीय कार्यक्रमही जाहीर झाला. राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहाने कामाला लागले परंतु मतदारांमध्ये अत्यंत निरुत्साह होता कारण नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा, लोकसभा यासारख्या निवडणुका झाल्या असल्यामुळे लोक तीच तीच आश्वासने, त्याच त्याच घोषणा, तेच तेच आरोप-प्रत्यारोप ऐकून कंटाळले होते, त्यांना त्याच त्याच गोष्टींचा वीट आला होता. अपप्रचाराने एवढी खालची पातळी गाठली होती की, विलासपूरचा विलासी नागरिकही तसे आरोप ऐकून केवळ कंटाळलाच नव्हता तर प्रचंड संतापला होता. देशाच्या आजी-माजी पंतप्रधानांवर होणारे आरोप एकवेळ राजकारणाचा भाग म्हणून समजले तरीही अत्यंत खालच्या स्तरावर झालेली टीका मतदारांना आवडली नव्हती. गलिच्छ राजकारणाचा जनतेला वीट आला होता, घृणा वाटत होती. तेच तेच ऐकून कसे मळमळल्यासारखे वाटत होते. त्यामुळेच मतदार राजकारणापासून दुरावत होते. चार भिंतीच्या आत राजकीय गप्पांना, राजकारणी लोकांबद्दल बोलण्यास ऊत येत असला तरीही मतदान म्हटलं की, मतदार चार हात दूर सरकत होते. विलासपूरच्या सर्वच राजकारण्यांना मतदारांचा निरुत्साह, उदासिनता आणि अलिखित असा बहिष्कार पाहून संभाव्य उमेदवारांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे धाबे दणाणत होते, पायाखालची वाळू सरकत होती, जीव टांगणीला लागत होते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या धुरीणांच्या एकामागोमाग एक बैठका होत होत्या. संभाव्य उमेदवारांची चर्चा मागे पडून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर कसे काढावे याच विषयावर प्रामुख्याने चर्चा होत होती.
"अहो, बाहेर काढणे अवघड नाही. पैसा फेकला तर सहकुटुंब निघतील...."
"मागच्या वेळी का कमी पैसा वाटला? काय झाले? इनमीन बारा टक्के मतदान...."
"अहो, अनेक कुटुंबातील मतदारांनी प्रत्येक उमेदवाराकडून वाटेल तेवढ्या नोटा दाबल्या पण शेवटी जे करायचे तेच केले."
"हो ना. अंधारात घेतल्या कागदी नोटा, शेवटी दाबले बटन नोटा....खूप जणांनी असेच केले."
"यावेळी तर अजून एक मोठ्ठा प्रॉब्लेम निर्माण झालाय."
"तो कोणता?"
"अहो, मतदानाच्या दिवसाच्या दोन दिवस आधी आणि मतदानाच्या नंतर दोन दिवस अशा एकूण पाच दिवसांच्या सलग सुट्ट्या आल्या आहेत.
"लागली वाट! 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!'..."
"मी काय म्हणतो दहा कुटुंबामागे दोन कार्यकर्ते नेमावेत. त्यांच्यावर त्या दहा कुटुंबातील एकूण एक
मतदार बाहेर काढण्याची जबाबदारी सोपवावी...."
"कार्यकर्ते? लै भारी! सायंकाळी दारू आपली पिऊन रात्री विरोधकाकडे जाऊन कोंबडीवर ताव मारणारे असे आजचे कार्यकर्ते?"
"पण सुट्टी असल्यावर कार्यकर्ता काय चौकटीवर डोके आपटणार आहे काय?"
"मतदानाची तारीख ठरवताना हे अधिकारी लोक काय झोपा काढत असतील की मुद्दाम करतील असतील?"
"मुद्दामच करीत असणार तसे. मतदान कमी झाले तर अधिकाऱ्यांचाच त्रास वाचतो ना? मला तर वाटते सरळ न्यायालयात जावे, सारे काही समजावून सांगावे आणि तारीख बदलण्याची विनंती करावी."
"काही फायदा होत नाही. लोकसभा, विधानसभेच्यावेळीही अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आली होती. नेते न्यायालयातही गेले होते. न्यायालयाने सरळ नकार दिला."
"मला असे वाटते, मतदान कितीही होवो पण झालेले मतदान आपल्याच उमेदवारांना पडले पाहिजे. त्यासाठी मतदान घ्यायला आलेल्या साहेबांना हाताशी धरून त्या ईव्हीम मशिनसोबत छेडछाड करून.... "
"अरे, बाबा, छेडखानी करायला ती का बाई आहे? दिसली चांगली बाई धर हात, कर छेडछाड. ती इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. आपल्या साहेबांच्या कंपनीत बनवलेल्या लाइटच्या मीटरमध्ये छेडछाड करणे सोपे ते आपण नेहमीच करतो. पण या बाईसोबत....ईव्हीएम सोबत छेडखानी नाही करता येत."
"का नाही करता येत? मशीन ती मशीनच. जर लाईटच्या मशीनीतला भरधाव पळणारा काटा जाग्यावरच थांबवता येतो तसेच या मशीनचेही असले पाहिजेत."
"जमायचे नाही. लाईटचे मीटर ते मीटरच आणि ईव्हीएम ती ईव्हीएमच. तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का, विद्युत मीटर म्हणजे जणू कार्यकर्त्यांच्या बायका आणि ईव्हीएम मशीन म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या बायका.....मला सांगा कुणासोबत छेडछाड करणे सोपे जाते?"
"काहीही बरळू नका. येऊन जाऊन बायका! एक कलमी कार्यक्रम! तुमच्या अशाच विचारसरणीचा फटका मतदानाच्या दिवशी बसतो. काही तरी ठोस उपाययोजना जमते का बघा." एक महिला तावातावाने म्हणाली.
"मी काय म्हणते, मतदान घ्यायला जे अधिकारी येतात ना त्या साऱ्या बायकाच बोलवल्या तर ?" एक महिला नेता म्हणाली.
"बायकांना बोलवायला का हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे का? आपल्या हाती काय आहे? म्हणे बायकाच बोलवू?" दुसरी महिला तावातावाने म्हणाली. दोन्ही महिला एकाच पक्षात असूनही त्या एकमेकींना नेहमीच पाण्यात पाहायच्या, एकमेकींचा मुद्दा खोडून काढायच्या. दोघींमधून विस्तव आडवा जात नसे अशी परिस्थिती होती.
"मी काय म्हणतो ह्यांच्यात तसा दम आहे... म्हणजे यांच्या बोलण्यात तसा दम आहे. विधानसभा निवडणुकीत असा प्रयोग काही मतदान केंद्रावर झाला आहे. तिथले सारे कर्मचारी महिलाच होत्या. एक पण साहेब आला नव्हता."
"मलाही वाटते की, असाच काही तरी भन्नाट प्रयोग केला तर मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल."
"काही तरी भन्नाट करायचं म्हणजे पुन्हा बाईकडेच जावे लागेल. म्हणजे तसेच काही तरी वेगळे करावे लागेल."
"आपण मतदान करणारांना मुका देऊया...."
"इतकी मुकी माणसे आणायची कुठून? त्याचा उपयोग काय?"
"मुका हो मुका.....च...च...चुंबन..... क...क....किस...किस!"
"शेम! शेम!!शेम!!! मी या विचाराचा आणि या फालतू माणसाचा निषेध करते, धिक्कार करते."
"मी तर आज रात्रीच पक्षश्रेष्ठींकडे जाते... म्हणजे आज रात्रीच्या गाडीने निघते आणि या महाशयांना पक्षातून कायमचे निलंबित करायला लावते."
"काही फरक पडत नाही. एक तर तुमच्या सौंदर्याला आजकाल.... म्हणजे तुमच्या शब्दाला आजकाल तेवढी किंमत नाही, असली तरीही तुमच्या समाधानाकरिता मला काही दिवसांसाठी निलंबित करतील आणि मग काही दिवसात पुन्हा वाजतगाजत पक्षात घेतील. कसे आहे, पक्षश्रेष्ठींना भलेही तुमची गरज असेल पण पक्षाला माझी गरज आहे... माझ्या जातीच्या मतांची गरज आहे."
"असे किती मतदार तुमच्या मागे आहेत हो?"
"ते जाऊ देत. ही अशी आपली आपसातील भांडणे पक्षाला मतदारांपासून दूर नेत आहेत. तुम्ही घ्या हो ते चुंबन....म्हणजे तुमची चुंबकीय आयडिया सांगा...."
"हो. हो. सांगा. असला दम तर आपणही घेऊया मुका.... म्हणजे प्रयोग करून पाहूया."
"ठीक आहे. ऐका तर....." म्हणत त्या पुढाऱ्याने हलक्या आवाजात स्वतःची कल्पना मांडली. एक-दोघांनी विरोध केला परंतु रंगलेल्या चर्चेत त्यांचाही विरोध मावळला. उपस्थित असलेल्या महिलांपैकी एका महिलेने विचारले,
"ही झाली तुम्हा पुरुष मतदारांची सोय. कदाचित यामुळे पुरुषांचे मतदान वाढेल पण आपल्या शहरात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांना कसे घराबाहेर काढणार? आय मीन महिलांना कसे मतदानासाठी बाहेर काढणार?"
"त्यांच्यासाठीही 'मुका' योजना आखता येईल की?"
"नाही. महिलांच्या बाबतीत मुका योजना न्यायकारक ठरणार नाही."
"मग असे करुया की, जो आपल्या घरातील एकूणएक महिलांकडून मतदान करुन घेईल आणि तसा पुरावा सादर करीन त्या बहाद्दराला तशी 'मुका' संधी देण्यात येईल."
"अजून असे करुया, ज्या पुरुषाने घरातील जास्तीत जास्त महिला मतदारांना केंद्रावर नेऊन मतदान करवून घेतले त्या महिलांच्या संख्येप्रमाणे जास्तीत जास्त मुका घेण्याची संधी मिळेल."
"म्हणजे? समजले नाही. सरळ स्पष्ट करून सांगा...."
"समजा एखाद्या पुरुष मतदाराने त्याच्या घरातील तीन महिलांचे मतदान करवून घेतले तर त्याला त्याबदल्यात मुका घेण्यासाठी तीन कुपन मिळतील."
"मला वाटते या योजनेचा फायदा होईल. नक्कीच होईल. शिवाय हा विलक्षण प्रयोग आपण प्रथम राबवत असल्यामुळे कदाचित उद्या सर्व जिल्ह्यात कायपण राज्यात आणि देशातही हा चुंबन प्रयोग अंमलात आणल्या जाईल. या अभिनव प्रयोगाचे निर्माते आपण असल्यामुळे आपला सर्वत्र बोलबाला होईल कदाचित आपणास इतरत्र बोलावतील..."
"आणि आपणास तिथेही मुक्याची संधी मिळेल. छान! छान!!"
दोन-तीन दिवसांनी प्रमुख वाहिन्या, वर्तमानपत्र आणि सामाजिक संदेशवहनाच्या माध्यमातून सर्वत्र एक बातमी, एक संदेश पोहोचला.... 'मतदान करा. शाई लावलेल्या बोटासह स्वतःची सेल्फी दिलेल्या क्रमांकावर टाका. एका सेकंदात तुम्हाला एक ओटीपी आणि एक पत्ता येईल. त्या पत्त्यावर, त्याच रात्री जाऊन ओटीपी दाखवा आणि दाखवलेल्या खोलीत जाऊन आवडेल 'तिचे' चुंबन घ्या....'
सर्वत्र साधक-बाधक, दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा सुरू झाली. टीका टिप्पणी झाली. आचारसंहिता सुरू होती. आचारसंहितेशी प्रतारणा झाली म्हणजेच आचारसंहिता भंग झाली असे आक्षेप घेण्यात आले. ती अफलातून योजना सादर करणारे एकच समजावून सांगत होते, पोटतिडकीने सांगत होते,
" भंग व्हायला आचारसंहिता काय मातीची मूर्ती आहे की काय? तुमचे आपले बरे असते आपण काही करायचे नाही. कुणी केले तर भंग झाला, छेडछाड झाली असा गळा काढायचा. आम्ही काहीही गुन्हा केला नाही. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून एक प्रयोग केला आहे. यास तुम्ही भंग म्हणा, प्रलोभन म्हणा, मतदारांना विकत घेणे म्हणा किंवा अजून काही म्हणा पण आम्ही जे करणार आहोत ते प्रामाणिकपणे, लोकशाही वाचवण्यासाठी करत आहोत. बरे हा प्रयोग आम्ही करतोय म्हणजे मते आम्हालाच मिळतील याचीही शाश्वती नाही. मतदान कुणालाही होऊ देत पण मतदानाचा टक्का वाढेल याच तळमळीने आम्ही ही योजना आणतोय...." अशीच बाजू निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली. ती आयोगाने ग्राह्य धरली. ओरडणारी मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली. योजनेची तीच खरीखुरी बाजू योजनेच्या पक्षकारांनी न्यायालयासमोर बंद खोलीत मांडली.तिथेही ओरडणारांना सणसणीत चपराक बसली आणि बिच्चारे गाल चोळत परतले. योजना अंमलात आणणारे तो स्वतःचा फार मोठा विजय समजून उत्साहाने कामाला लागले होते. विलासपूरनगरीत ठिकठिकाणी मतदानापेक्षा, उमेदवारापेक्षा मुका या पर्यायाचीच जास्त चर्चा रंगत होती. नव्याने स्थापन झालेल्या एक पक्षाने तर निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी चक्क 'मुका घेणारे जोडपे' या निवडणूक निशाणीची मागणी केली. आयोगाने ती मागणी फेटाळताच तो पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून न्यायालयाने त्यांच्या मागणीला मान्यता दिली. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत आपलाच विजय झाला असे समजून त्या पक्षाने शहरात जागोजागी, गल्लोगल्ली, मोक्याच्या ठिकाणी आमची निवडणूक निशाणी 'मुका घेणारे जोडपे' असे फलक लावले. काही ठिकाणी अशाही चर्चा रंगल्या. एक जण दुसऱ्याला म्हणाला,
"काय मग मतदान करणार का?"
"तर मग हा प्रश्न झाला काय? मतदान करणार नि मुका घेणार. तुझे काय?"
"तोच तर प्रश्न निर्माण झाला आहे ना, काय झाले, मी मुंबईला नोकरीला होतो. दोन ठिकाणी नाव नको म्हणून मी इथले मतदान रद्द केले. आता नोकरीही गेली नि मुकाही गेला."
"अरे, नाराज होऊ नको. एक मस्त आयडिया आहे माझ्याजवळ?"
"ती कोणती?"
"अरे, कुणाच्याही नावावर मतदान कर की. मुका काय किंवा त्यापुढील योजना आणली ना तरीही शंभर टक्के मतदान होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तू एखाद्या मेलेल्या माणसाच्या नावावर मतदान कर नि घे..."
"नको रे बाबा! त्या मृत्म्याला कळले की, मी त्याची रसरशीत संधी हिसकावून घेतली आहे तर तो भूत होऊन माझ्या छाताडावर बसेल आणि माझे मुक्यावर मुके घेत राहील." तो माणूस म्हणाला आणि सारे हसत असताना दुसरा माणसाने विचारले,
"तुम्हाला काय वाटते बायका मतदानासाठी आणि तीही अशी ऑफर असताना घराबाहेर पडतील?"
"अरे, बायकांच्या मतदानाचे तर नावच घेऊ नका. त्यांनी नवऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावू दिला तरी खूप झाले."
"बरोबर आहे. तुम्हाला सांगतो माझी बायको महासंशयी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती मला मतदान करुच देणार नाही."
"मी काय करणार आहे, सांगू का? मी की नाही मतदानाच्या दोन दिवस आधी बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडतो."
"मी दररोज सकाळी लवकर उठतो तेव्हा बायको ढाराढूर झोपेत असते. ती संधी साधून ती उठण्याच्या आधी मी माझ्या घराला बाहेरून कुलूप लावून माझा मतदानाचा हक्क बजावणार, सेल्फी टाकून ओटीपी आणि पत्ता येताच सरळ त्या पत्त्यावर जाऊन तोही हक्क बजावणार."
"का एवढी घाई? बायको उठायच्या आधी मतदान करणे हे ठीक आहे पण नंतर कशाला गडबड?"
"तुम्हाला माहिती नाही हो. मी मतदान करून आलो हे समजताच माझी बायको लाडीगोडी करत माझा मोबाईल ताब्यात घेईल आणि मग आलेला ओटीपी आणि पत्ता दोन्ही डिलीट करून टाकेल. बाब्याही गेला नि दशम्याही गेल्या अशी अवस्था होईल."
"काही तरी मार्ग काढायला पाहिजे राव. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही."
मतदानाचा दिवस जवळ येत होता. मतदारांच्या चर्चेत मतदान नव्हते तर मुका पर्याय जास्त चर्चिला जात होता. काही उमेदवार वेगवेगळी आमिषे दाखवत होती पण मतदार बधत नव्हता. तो एकमेव पर्याय कसा कॅश करता येईल, बायकोला न कळू देता ती संधी कशी साधता येईल हाच विचार करत होता........ मतदानाच्या आदल्या दिवशी एक चमत्कार घडला. विलासपूरच्या गल्लोगल्ली, घरोघरी महिलांच्या बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये एक अभूतपूर्व असा निर्णय झाला. माध्यमांसमोर, घरी नवऱ्यांसमोर साऱ्या बायकांनी जाहीर केले की, विलासपूरच्या एकूणएक महिला मतदान करणार आहेत. 'लेडीज फर्स्ट' याप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्ही मतदान करणार. मिळालेला ओटीपी आणि पत्ता नवऱ्यांकडे फॉरवर्ड करणार. तशा आल्हाददायी घोषणा ऐकून नवरे मंडळीची अवस्था 'स्वर्ग चार बोटे उरला' आणि 'चारो उँगलिया घी मे...' अशी झाली.
मतदानाचा दिवस उजाडला. विलासपूरनगरीतील एकूणएक बायका भल्यापहाटे उठल्या. जणू संक्रांतीच्या हळदीकुंकवाला जावे तसा श्रुंगार करून घराबाहेर पडल्या. गल्लीतल्या बायकांनी दोन दोन, तीन तीन गट केले. आपापल्या गल्लीतून बाहेर पडण्याची शक्यता असणारे सारे रस्ते, साऱ्या वाटा त्यांनी बंद केल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी बैठा सत्याग्रह, ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रत्येक गल्लीतल्या मिळून शेकडो महिलांनी शहरात असलेल्या एकूणएक मतदान केंद्रांना घेराव घातला. अशारीतीने एकाही मतदान केंद्रावर एकाही पुरुषाला जाता येऊ नये ह्याची चोख व्यवस्था आणि काळजी शहरातील बायकांनी घेतली. विविध पक्षातील महिला या आंदोलनाचे जागोजागी नेतृत्व करीत होत्या. मतदानासाठी निघालेल्या पुरुष मतदाराला गल्लीच्या बाहेर तर सोडा पण घराबाहेर पडता येऊ नये याची दक्षता, खबरदारी घेत होत्या. बहुतांश बायकांनी घराबाहेर पडताना आपापली घरे कुलूपबंद करून एकप्रकारे नवऱ्यांना घरात कोंडून ठेवले होते, डांबले होते.
दुपारचे बारा वाजले. विलासपूर शहरातील कोणत्याही मतदान केंद्रावर एकही मतदान नोंदवल्या गेले नव्हते. सारे पुरुष मतदार गोंधळले होते. बावरले होते. कुणी संतापले होते. कुणी चिडले होते. कुणी वेड्यागत आपापल्या घरात चकरा मारत होते तर काही पुरुष भयभीतही झाले होते. कुणाला काहीही समजत नव्हते. कोंडलेल्या पुरुषांमध्ये केवळ सामान्य मतदार नव्हते तर विलासपूरचे नेते आणि निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवारही होते. पिंजऱ्यात कोंडलेल्या पशूप्रमाणे सर्वांची अवस्था झाली होती. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे झाडून साऱ्या पुरुषांचे भ्रमणध्वनी ताब्यात घेऊन, दूरध्वनीची जोडणी कापून महिला घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे पुरुषांना कुणाशीही संपर्क साधता येत नव्हता. अशी महत्त्वाची बातमी प्रसार माध्यमापासून कशी काय लपून राहणार. दुपारचे बारा वाजेपर्यंत झाडून साऱ्या वाहिन्यांचे, वर्तमानपत्राचे प्रतिनिधी विलासपूर शहरात दाखल झाले आणि दुसऱ्याच क्षणी महिलांच्या अनोख्या कामगिरीची बातमी गल्ली ते दिल्ली आणि थेट परदेशात पोहोचली. शासकीय अधिकारी मतदान होऊ द्या अशी विनंती
महिलांना करीत होते परंतु महिला कुणाचेही ऐकत नव्हत्या, कुणालाही दाद देत नव्हत्या. त्या बातम्या ऐकून जिल्हा, राज्य आणि केंद्रातील विविध पक्षाचे नेते खडबडून जागे झाले. त्यांनी विलासपूरच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु एक तर संपर्क होत नव्हता आणि झालाच तर फोन बायकांजवळ असल्यामुळे त्या तो फोन उचलून त्यांना सडतोड उत्तर देत होत्या. जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेते विलासपूरमध्ये दाखल झाले. प्रत्येकाने विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या महिलांच्या भेटी घेतल्या. शेवटी ज्या पक्षाने 'मतदानानंतर मुका' ही अफलातून योजना जाहीर केली होती त्या पक्षाच्या जिल्ह्यास्तरावरील नेत्यांनी बॉंडपेपरवर तशी कोणतीही योजना राबवणार नसल्याचे लेखी लिहून दिले आणि त्यावर जिल्हाधिकारी यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करताना असा प्रकार होऊ देणार नाही अशी लेखी हमी दिली. तेव्हा बायकांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि पुरुषांना 'मोकळे' केले.
त्या प्रकारानंतर विलासपूर शहरात एक्कावन्न टक्के असे प्रचंड मतदान झाले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुष उमेदवार वगळता एकाही पुरुष मतदाराने मतदान केले नाही. एक तर बायकांनी कोंडले हा अपमान अनेकांना सहन झाला नाही त्यामुळे ते मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. काही मतदार बायकांचा आक्रस्ताळेपणा बघून प्रचंड भयभीत झाले होते त्यामुळे भीतीपोटी ते घराचे कुलूप काढले तरीही घराबाहेर पडलेच नाहीत. झालेले जवळपास सारे मतदान बायकांनी नोंदवून पुरुषांना बायकी हिस्सा दाखवला होता....
नागेश सू. शेवाळकर,