१७. नकळत... remaining
मग थोडं जेवण करून ते सर्व गच्चीवर जमले . निळ निळ आभाळ चटक चांदणं रात्र , चंद्राची कोर उमललेली , दाट झाडीत लुकलुक चमकणारे काजवे , मध्येच कितीतरी दुरून प्रवास करत येणारी वाऱ्याची झुळूक सोबत मोगऱ्याचा सुगंध लेवून आली ... असा मनमोहक देखावा पण त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं तर कुमार जागा झाला असेल काय ? हा विचार ते करत होते मग न राहवून त्यांनी आकाशला फोन करून विचारलं पण त्यांची निराशा झाली ...
मग पुन्हा एकदा सर्व कुमार आणि त्याच्यासोबत शेवटी कधी , काय बोलणं झालं हे सांगत होते ... त्याच्या आठवणी तो तिथं नसून असल्याचं भासवत होत्या आणि तो सोबत असतांना काय काय मज्जा मस्ती केली ते आठवून ते पुन्हा एकदा ते सारं काही जगत होते .... बराचवेळ हे असं सुरु असता मध्येच वास्तवाची जाणीव झाली की चिंतेची लहर चेहऱ्यावरचे सारे भाव बदलत होती ... कुमारबद्दल बोलता बोलता नकळत सुजित त्याच्या डायरीबद्दल बोलून गेला आणि सर्व काहींक्षणासाठी तिथंच थांबलं ... तिघे त्याला विचारायला लागले कोणती डायरी ? कुमारने डायरी लिहिली ? त्याने तुला कधी दाखवली आणि आम्हाला कसं माहित नाही ? .....
प्रश्नाचा भडिमार सुरु झाला तसं आता काही लपविण्यात अर्थ नाही हे लक्षात घेऊन सुजितने त्यांना ती डायरी कशी मिळाली ते सांगितलं आणि त्यालाही आधी डायरीबद्दल काहीच माहिती नव्हती हे हि सांगितलं .... मग काय तिघे ती डायरी वाचायची म्हणून त्याला ती डायरी मागायला लागले पण इकडे येतेवेळी नळकत बॅग तिथंच राहिली होती ...
मग त्याने उद्या सकाळी तिथं गेल्यावर मी ती डायरी तुम्हाला देईन पण एक वचन तुम्ही मला द्यायला हवं ते म्हणजे मी हे डायरीचं गुपित उघड केले हे कुमारला माहीत होता कामा नये ... जर आपण कितीतरी दिवसांपासून मित्र असून कुणालाच त्या डायरीबद्दल कुमारने सांगितलं नाही तर त्यात जे काय त्याने लिहिलं ते त्याच्या नजरेत गुपित राहिलेलं ठीक असेल ... त्यावर एक मत होऊन तिघांनी होकार दिला , सुजितने तर संपूर्ण डायरी वाचली होती ... या तिघांना मात्र आता झोप येत नव्हती की कुमारने नेमकं त्या डायरीत काय लिहिलं असेल ...? त्यांनी सुजितला खूप विचारलं पण त्याने " स्वतः वाचण्यात जी गोष्ट आहे ती माझ्या तोंडून ऐकण्यात नाही " असं बोलून टाळलं...
तरी खूप विनवण्या केल्याने सुजितने काही किस्से त्यांना सांगितले आणि ते ऐकत असता रात्रीचे बारा वाजले त्यांना कळलं नाही ... मग ते सर्व कुमार सोबत असताना घालवलेले क्षण आठवत झोपी गेले ... मनात कुठेतरी दोन भावना ... एक चिंतेची कि उद्या ऑपरेशन आणि दुसरी म्हणजे ती डायरी वाचायला मिळेल .....
इकडे दवाखान्यात जेवण तर कुणीच केलं नाही घरून आणलेले टिफिन अजून तसेच होते मग एकमेकांना समजून सांगत ते कसेतरी थोडं थोडं जेवून खुर्चीवर बसले . झोप येत नव्हती म्हणून ते जुन्या आठवणी ताज्या करत कुमार बद्दल बोलत वेळ घालवत होते , असंच होत जीवनात नेमकं जेव्हा आपण नजरेआड झालो कि सर्वांना आठवण येते , सोबत नसल्याची खंत वाटते , जाणीव होते ....
यावेळी त्याच्या कुटुंबियांची आणि मित्रांची स्थिती अशीच झाली होती , डोळे जड होत पण तरी कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही ... मग आधी प्रशांत , आकाश झोपले ..... जवळ जवळ मध्यरात्र उलटली तेव्हा कुमारचे आई वडील आणि सुजितचे वडील ... आता उद्या सकाळी ऑपरेशन होईल आणि कुमार बरा होईल अशी अपेक्षा मनात ठेवून यांना झोप लागली . ती रात्र तेवढी बाकी होती , उद्याची सकाळ एक नवीन दिवस , नवीन वळण घेऊन येणार आहे ... दुःखाचा सागर तरून सुखाचा किनारा लाभणार ... हि आशा त्यांच्या मनात घर करून होती . पण वास्तविक पाहता निराशा हि मनात असलेल्या एका आशा , अपेक्षापेक्षा उत्तम ... कारण ती येते त्या वेळेपुरते दुःख देते आणि आपल्याला कालांतराने त्या निराशेचा विसर पडतो पण आशेचं तसं नाही जोपर्यंत ती आशा पूर्ण होत नाही तोपर्यंत मन ती आशा , अपेक्षा पूर्ण होईल असं मानून प्रत्येक क्षणाला त्याभोवती आणखी गुरफटत जाते ...
याक्षणी कुमारच्या कुटुंबियांची आणि मित्रांची अवस्था अशीच काहीशी झाली होती , ते सर्व आस लावून होते की उद्या एकदाच ऑपरेशन झालं की सर्व ठीक होईल अगदी आधी होत तसं ... आपण हेच मानून असतो की आपण जे काय विचार करून ठेवलं ते तसंच होईल पण काही गोष्टी आपल्या हाती नसतात हेच खरं .....
चंद्र आणि चांदण्यांना निरोप देऊन रात्र संपून सूर्यकिरनांनी पहाटेच सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत केलं ... तो दिवस उजाळला , कुमारचे आई वडील पहाटेच उठून ICU बाहेर दाराजवळ त्याला पाहत होते . मनात कित्येक विचार आणि भावना उचंबळत होत्या , कुमारला आज एकदा नवीन जन्म मिळणार आहे असं त्यांना वाटून गेलं ... अगदी काही वेळात त्याच्या बालपण पासून ते आताच तो क्षण सारं कसं नजरेसमोर उमटत होतं ... सुजितचे वडील , प्रशांत आणि आकाश सूद्धा जागी झाले , बाकीचं सर्व आटोपून त्यांनी चहा घेतला ... तर ७ :३० वाजलेले ... ऑपरेशन ची तयारी
सुरु झाली ... इतक्यात अनिरुध्द , आर्यन , सुजित आणि ऋतुराज तिथं आले ... डॉक्टर वैद्य , जिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर आणि नर्स यांनी कुमारला तपासून ऑपरेशन थिएटर मध्ये आणले . त्याला समोरून घेऊन जात असतांना त्यांच्या पापण्या नकळत जरा ओलसर झाल्या ... त्याला आत नेलं तेव्हा ऑपरेशन थिएटरचं दार बंद करून लाल दिवा सुरु झाला तेव्हा बाजूच्या भिंतीवर लावलेलं घड्याळं ठोका देऊन ८:०० वाजले अस सांगत होत ...
कुमारचं आत ऑपरेशन सुरु झालं तसं बाहेर वाट पाहत बसलेले त्याचे आई वडील , मित्र यांना वेळ जणू काही जागीच थांबून आहे असं वाटत होतं ... पण त्याला आत जाऊन जवळपास एक तास झाला होता , इतक्या वेळ कुणीच काही बोललं नव्हतं ... वेळ तशी होती की तिथं शांतता पसरली होती , पण काहीच न बोलता अस शांतता दाखवत असलेलं मन हे वरवर स्थिर राहून आत खोल पाण्यात खळबळ सुरु असलेल्या नदीच्या पात्रासमान असतं....
मग अचानक त्या डायरीबद्दल मनात विचार आला म्हणून आर्यन ने हळूच सुजितला विचारलं की ती डायरी तू आम्हाला देणार होता ती कुठे आहे ? हे त्या चौघांनी ऐकलं आणि एकसाथ सुजीतकडे नजरेनं इशारा करत ऋतुराज आणि अनिरुध्द यांनी तेच विचारलं ...
त्यावर काही न बोलता सुजितने समोरच खुर्चीवर ठेवलेल्या बॅगकडे बोट दाखवून त्यांना इशारा करत त्यामध्ये डायरी असल्याचं सांगितलं ... मग हळूच उठून आर्यनने ती बॅग इकडे आणली आणि उघडून पाहिली तर त्यात काहीही नसल्याचं त्याला कळलं ... पुन्हा सुजितला बॅग रिकामी असल्याचं त्याने इशाऱ्याने म्हटलं , मग सुजितने स्वतः ती बॅग हाती घेतली आणि आत पाहिलं पण जी डायरी त्यात नाही ती कितीही शोधली तरी मिळणार कशी ???
मनातच विचार करत सुजितने कपाळाला हात लावला ... डायरी बॅगमध्येच तर ठेवली होती मग यांत नाही तर गेली कुठं ... ? असा विचार करत असता त्याच्या एक चूक झाली हे लक्षात आलं .... स्वतःशीच तो पुटपुटला जे झालं ते योग्य कि अयोग्य ..? नकळत चूक झाली का माझ्याकडून ...? तर आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज यांच्याही मनात प्रश्न आल्यावाचून राहिला नाही ... की डायरी बॅगमध्ये नाही तर मग आहे तरी कुठं ...? सुजित इथं नसतांना आणखी कुणाला तर ती मिळाली नाही ना ...? अशी शंका हि एका क्षणासाठी त्याच्या मनात येऊन गेली ... आता सुजितच काय झालं त्या डायरीचं हे सांगेल या अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होते ... तर सुजित कसल्यातरी विचारात मग्न झालेला ....