Hanuman Jyanti in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | हनुमान जयंती

Featured Books
Categories
Share

हनुमान जयंती

हनुमान जयंती

राम नवमी नंतर आठ दिवसांनी हनुमान जयंती असते .
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.

हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात .

सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करतात .

नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) देतात.
त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात .

हनुमानाला रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करतात.

या पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करतात .

काही ठिकाणी या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

महाराष्ट्रात हनुमानाला मारुती सुद्धा म्हणतात.
महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात.
या दिवशी हनुमानाला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे व नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.
हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता.
तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या.

अंजनी व पवन यांचा पुत्र हनुमान
जन्म झाल्यावर दिसलेले उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे या समजुतीने हनुमानाने बाल हनुमानाने आकाशात उड्डाण करून सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहीत सर्व देवांना काळजी वाटू लागली .त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.
त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.

पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला.
रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले.
या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी मान्यता आहे.
जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे हनुमान हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने महाकवी तुळशीदासने हनुमानाला शोधून काढले.

हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारत युद्धदरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून होता.

चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी हनुमान जयंती साजरी हॊतॆ.

हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा एक देव म्हणजे मारुती!

हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष हनुमानाला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात.

शनिवारी न चुकता हनुमानाला तेल घातले जाते आणि रुईच्या पानाची माळ वाहिली जाते आणि अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात .
लग्न न होणार्‍या कुमारिकेने ब्रह्मचारी हनुमान उपासना करावी असे जे सांगितले जाते.
हनुमान चिरंजीव आहेत अशी श्रद्धा आहे .
बलोपासने साठी मुले हनुमानाची उपासना करतात .

प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात.
मात्र हनुमान प्रत्येक अवतारात निराळा असतो.
हनुमान सप्तचिरंजिवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.
मनोजवं मारुततुल्य वेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजम वानर युथ मुख्यं
श्रीराम दुतं शरणं प्रपद्ये ..