Dand ki bhurdand in Marathi Comedy stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | दंड की भुरदंड!

Featured Books
Categories
Share

दंड की भुरदंड!

* दंड की भुरदंड! *
शहरातील एक मध्यवर्ती भाग! त्या भागाला शहराचा आत्मा 'हर्ट ऑफ द सिटी' असे समजण्यात येत असे. नगरातील फार मोठी बाजारपेठ असल्यामुळे ती वसाहत सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत कायम गजबजलेली असे. धावपळ ही तेथील नित्याचीच बाब. नुकतेच बाप्पाचे आगमन झाले होते आणि महालक्ष्मीचा सण तोंडावर होता. कोणताही सण म्हटलं की, त्या भागातील गर्दी आटोक्यात आणणे फार मोठे कठीण काम होते. तिथे पोलिसांची तुकडी कायम तैनात असे परंतु शेवटी गर्दी ती गर्दीच! तिला ना चेहरा असतो ना कुणी नेता असतो. त्यादिवशी सुट्टी होती त्यामुळे सकाळपासूनच खरेदीची झुंबड उडाली होती. गर्दीतून वाट काढताना नाकीनऊ येत होते...
त्याच बाजाराच्या दिशेने एका स्कुटीवर एक जोडपे जाण्याची तयारी करीत होते. नवरा केव्हाच तयार होऊन बसला होता पण बायकोचे काही आटोपत नव्हते. बरे काही बोलण्याचीही सोय नव्हती. एक शब्द बोलावा तर तो हजार शब्द घेऊन एखाद्या स्कायलॅबप्रमाणे परत येऊन शरीरावर कोसळण्याची भीती होती. तितक्यात नवऱ्याच्या भ्रमणध्वनीवर कुणाचा तरी कॉल आला. नवऱ्याने खिश्यातून मोबाईल काढला. त्यावर त्याच्या बहिणीचे नाव दिसताच त्याने लगबगीने तो उचलला आणि त्याने विचारले, "काय झाले ताई? का फोन केलास?" "अरे, तुला काय सांगू, माझ्या सोनुल्याला कुणीतरी किडनॅप केले आहे?" " किडनॅप केलेय? कशासाठी?" " काही माहिती नाही. एवढेच फोनवर म्हणाले की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. पटकन दहा हजार रुपये घेऊन गांधी चौकात या..." "ताई, एक मिनिट. तुम्हाला या आधी कुणाची धमकी किंवा तुमचे कुणाशी कडाक्याचे भांडण किंवा आपल्या बछड्याचे कुण्या मुलीशी काही भांडण..."

"अरे, काय बोलतोस तू हे? त्याचे वयच ते काय? आत्ता तर सोळावे लागलेय त्याला..."
"ताई, आपला सोनुला भाऊजींची मोटारसायकल चालवतो ना?"
"हो. एवढा मस्त चालवतो ना. रस्त्यावर एवढे खड्डे असूनही त्याच्या मागे बसून गेले ना की, पोटात एवढुसाही खड्डा तर पडतच नाही पण पोटातले थेंबभर पाणीही हलत नाही. आज तुझे भाऊजी सुट्टी असल्यामुळे मित्राच्या बाईकवर गेलेत. त्यांची गाडी घेऊनच गेलाय तो..."
"मग हरकत नाही. ताई, किडनॅप वगैरे काही नाही. पोलिसांनी पकडलय त्याला. त्याचे लायसन्स नाही ना म्हणून. आजकाल नवीन कायदा आलाय. बरे, घाबरू नकोस. गांधी चौकात जा. तिथे आपला बछडा आणि पोलीस असतील..."
"अरे, बाबा, दहा हजार मागत आहेत. कुठून आणू? तुझ्या भावोजींचाही फोन लागत नाही. माझ्या जवळ एवढी रक्कम कुठली आलीय..."
"अग, दहा बिहा काही लागत नाहीत. पोलिसांच्या हातावर शे-पाचशे टिकव आणि आण सोडवून आपल्या बछड्याला..." असे सांगत त्याने फोन बंद केला. बायकोने सारे ऐकले होते तरी सारे वर्तमान तिला ऐकवून त्याने स्वतःचे कर्तव्य पार पाडले आणि हसत म्हणाला, "अग, पाच-सहा वर्षात ताईच्या पिल्लाला कुणाच्या तरी ओढणीला बांधावेच लागेल... असे काय पहातीस त्याचे लग्न करावेच लागेल तेव्हा त्याच्या सासऱ्याला सांगावे लागेल..."
"काय सांगणार?"
"आमच्या सोन्याला गाड्या बदलण्याचा आणि त्याही जुन्या गाड्या बदलण्याचा भयंकर नाद आहे.."
"बरे. असे सांगून काय मिळणार?"
"कसे आहे, आता नवीन वाहन कायदा लागू झालाय. पोलिसांच्या हातात जणू कोलीत आलेय. भरमसाठ दंड लावतात. सोन्या ज्या गाड्या विकत घेतो ना, त्या गाडीचे कागदपत्रे वगैरे काहीच नसते. सोन्याल्या पकडले तर त्याच्या सासऱ्याने सासरा जिवंत आहे तोपर्यंत लागणारा दंड किंवा भुरदंड हुंडा म्हणून भरावा. कशी वाटली माझी कल्पना?" असे विचारत तिच्या हसण्यात हसणे मिळवत त्याने गाडी सुरू केली. नेहमीप्रमाणे नवरा गाडी चालवत असताना बायको पाठीमागे बसून जणू गाडीचे सारथ्य करीत होती.
"अरे, हळू चालव की. बघ केवढ्या मोठ्या खड्ड्यातून गाडी घातली ती. कंबर लचकली की माझी."
"अग, मग ती लावणी म्हण की, 'बाई माझी कंबर लचकली ग बाई माझी कंबर लचकली. गाडी गेली खड्ड्यातून हिसका बसला जोरात नि बाई माझी कंबर लचकली' ...."
"व्वा! इथे माझ्या कंबरेत मरणाच्या वेदना होत आहेत आणि तुला लावणी सुचते नाही का?"
"अग, मग करु काय? एक खड्डा चुकवायला गेले तर दहा खड्ड्यातून जावे लागते. माझ्याही हाताच्या बोटापासून ते पार मान, खांदा, पाठ सारे अवयव ठणकतात..." "खरे की काय? जेव्हा पाहावे तेव्हा आपल्याच त्रासाचे रवंथ! जसे काय या दुनियेत एकटा तुच दुःखी, पीडित आहेस. पण 'खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे?' अशी अवस्था मात्र निश्चितच आहे. बरे, आज जरा गर्दी जास्त दिसते का रे?" "अग, उद्या महालक्ष्मी आहेत. आज सुट्टी आहे. गर्दी तर होणारच खरेदीसाठी. पण ही गर्दी काही वेगळीच आहे." असे म्हणत त्याने दुचाकीचा वेग कमी केला. अपघात झाला असेल तर बायकोच्या नजरेत ते दृश्य पडू नये म्हणून त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि 'आत्ता आलो' असे सांगून तो त्या स्थळी पोहोचला. पाहतो तर काय एक मोटारसायकलस्वार रस्त्याच्या बरोबर मधोमध असलेल्या एका खड्ड्यात पडला होता. कुणीतरी म्हणाले की, पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला आणि समोर हात आडवे करून उभे राहिलेल्या पोलिसांना चुकवत तो खड्ड्यात पडला. खड्ड्यात गाडीसह अडकलेला चालक पोलिसांना म्हणत होता,
"साहेब, बाहेर तर काढा हो. कंबर आणि पाय ठेचून निघालेत हो. हे हेल्मेट तर दिसतेय ना? म्हणजे तो दंड होणार नाही. गाडी चालवण्याचा परवाना आहे. विम्याची कागदपत्रे आहेत. परवाच्या दिवशीच विमा काढलाय. गाडीची ओरिजिनल कागदपत्रे आहेत. नो एंट्री घुसलो नाही. मोबाईलवर बोलत नव्हतो त्यामुळे तोही चार्ज तुम्ही लावू शकत नाहीत. प्रदुषणाचे प्रमाणपत्र आहे. फक्त सीटबेल्ट लावला नव्हता..."
ते ऐकून फौजदार सहकाऱ्याला म्हणाला,
"अरे, सीटबेल्ट न लावता गाडी चालवतोय. बघ बरे चार्ट, किती दंड लावावा ते..." तो सहकारी हसत साहेबांच्या कानात म्हणाला,
"साहेब, दुचाकी आहे, सीटबेल्ट नसतो..."
"च्यामारी! या नवीन कायद्याने डोक्याचा पार भुग्गा झालाय. काढा त्याला वर आणि सोडून द्या."
तितक्यात तीन-चार मोटारसायकली त्या पोलिसांना अगदी खेटून गेल्या. विशेष म्हणजे एकाही चालकाने हेल्मेट घातले नव्हते. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मोटारसायकलवर तीन तीन लोक बसले होते. ते पाहून एकाने पोलिसाला विचारले,
"साहेब, हे असे कसे? यांना का अडवले नाही."
"अहो, बघितले नाही का, त्या गाड्यांना सत्ताधारी पक्षाचे झेंडे लावलेले होते. मग कसे अडवणार?"
"हे तर छानच आहे की, हजार, पाच हजार, दहा हजार दंड भरण्यापेक्षा पाच-पन्नास रुपयाचा एक झेंडा विकत घेऊन लावा आणि कितीही नियम मोडा..."
तो संवाद ऐकणारा दुचाकीस्वार हसतच पत्नीकडे आला. घडलेली सारी हकीकत सांगून म्हणाला,
"अग, आपणही म्हणजे मी हेल्मेट घातले नाही. समोर पोलीस असले..." तो बोलत असताना त्याला अडवून बायको म्हणाली,
"मी असताना कशाला घाबरता? कोण अडवेल आपल्याला. आणि अडवलेच ना तर मी अशी ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील. पुरुष पोलिसांची काय ताकद आहे मला अडवण्याची..." ती मोठ्या फुशारकीने सांगत असताना अचानक समोर शिट्टी वाजवत आलेल्या पोलिसाने त्याला थांबण्याचा इशारा केला. कचकन ब्रेक लावत तो गाडी थांबवत असताना त्या पोलिसाने त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्याची बायको खाली उतरली. तशी एक महिला पोलीस धावत आली आणि ती त्या पोलिसाच्या आणि त्या बाईच्या बरोबर मध्ये उभी राहिली. तसे त्या बाईने तिच्याकडे आश्चर्याने आणि प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तशी ती महिला पोलीस म्हणाली,
"आजकाल पोलिसाने गाडी अडवली की, पुरुष चुपचाप उभे राहतात आणि त्याच्यामागे बसलेली बाई पोलिसांच्या अंगावर धावून, चवताळून जाते म्हणून..." तिकडे पोलिसाने रागाने विचारले,
"ओ तुम्हाला दिसत नाही का? इथे एक तरफी वाहतूक आहे ते..."
"नो एंट्री आहे? कधीपासून? मी तर काल इथे चार-पाच वेळा आलो की." चालकाने आश्चर्याने विचारले
"तुम्ही चार-पाच वेळा या नाही तर हज्जारदा या. तो बघा दोन्ही बाजूंनी लावलेला 'नो एंट्री'चा फलक. अर्थात कंट्री मारलेल्याला नो एंट्री फलक दिसेलच कसा?"
"साहेब, काहीही बोलू नका हं. मी कधीच पित नाही..."
"समजेल. तेही समजेल. तुमचे लायसन्स दाखवा..." पोलिसाने तसे म्हणताच स्कुटी चालकाने खिशात हात घातला आणि लगेच बायकोकडे बघत म्हणाला,
"बघ. तुझ्या गडबडीत मी दुसरीच पॅन्ट घालून आलो..."
"जशी पॅन्ट घातली तसे लायसन्स का नाही घेतले? म्हणे तुझ्यामुळे झाले. स्वतःची चूक माझ्यावर ढकलायची सवय बंद करा..." बायको बोलत असताना तो पोलीस जोरात म्हणाला,
"हे बघा, तुमची भांडणे, वादावादी घरी करा. एक तर तुम्ही एकेरी वाहतूक विभागात आलात. पिऊन आहात. लायसन्स नाही. बरे, गाडीचे कागदपत्रे दाखवा..."
"साहेब, सारी कागदपत्रे आहेत पण घरी विसरलेल्या पाकिटात आहेत..."
"हेल्मेट कुठ आहे? का तेही पाकिटात विसरलात?"
"आहे. हेल्मेटही आहे. पण बायकोच्या... साहेब, समजून घ्या ना. तुमचेही लग्न झालेच असेल ना. बायकोसोबत खरेदीसाठी जायचे म्हणजे किती टेंशन येते ते..."
"हे बघा. वेळ गमावू नका. आम्हाला काही एकच बायको नाही... हे बघा तुमचे टेंशन मला आले... मला म्हणायचे की, आम्हाला एकच काम नाही. तरीही तुम्हाला सांगतो, ना आम्हाला सण असतो ना वार असतो. चोवीस तास असे शिट्टी वाजवत फिरतो. खरेदी बिरेदी बिचारी बायकोच करते. तुम्ही नो एंट्री शिरलात, पिलात, लायसन्स नाही, कागदपत्रे नाहीत, हेल्मेटही नाही. बरे, गाडीचा, तुमचा विमा तरी केलाय का?"
"त्याचे काय आहे साहेब, आठच दिवसांपूर्वी गाडीचा विमा संपलाय... उद्या करणार आहे?"
"अहो, आम्हाला माहिती आहे की, हा उद्या कधीच येणार नाही... आणि त्यात अशा टपऱ्या वाहनांच्या मालकाचा उद्या कधीच येणार नाही..." असे म्हणत पोलीस हातातील डायरीत नोंद करताना पुटपुटला, 'नो एंट्री, कंट्री पिऊन, लायसन्स, कागदपत्रे, हेल्मेट आणि विमाही केलेला नाही...'..." तो पुटपुटत असताना तिथे आलेला दुसरा एक पोलीस महिला पोलिसाला म्हणाला,
"काय पण लोक झालेत ना?"
"काय झाले? कुणी आडमुठ्या भेटला का?"
"समोरच्या बाजूला उभ्या केलेल्या कारला मी पाचर मारली होती. नंतर दुसऱ्या एका चालकाला गंडा घालून मी परत तिकडे गेलो. पाहतो तर काय ती चार चाकी गाडी तिथे नव्हतीच..."
"अरे, तू पाचरच बरोबर मारली नसेल..." पहिला पोलीस म्हणाला
"मग तुम्ही काय केले?" महिला पोलिसाने विचारले
"ऐका तर. गाडी नव्हती पण मी ज्या चाकाला पाचर मारली होती ते टायर खोलून पाचरसह तिथे पडले होते आणि एक चिठ्ठी ठेवली होती..."
"चिठ्ठी? काय लिहिले होते त्यात?"
"त्यात लिहिले होते की, नवीन नियमानुसार मला हजारो रुपये दंड होईल. ह्या दंडाच्या रकमेत नवीन टायर येईल. हे जुनाट टायर दंड म्हणून स्वीकार करावा. नवीन टायर घेणारांसाठी गौरी गणपती निमित्ताने भरपूर सुट देताहेत. मी तिकडेच जातोय..." तो पोलीस सांगत असताना स्कुटी चालक म्हणाला,
"बरोबर आहे की, त्याचे..." तसा त्याची नोंद घेणारा पोलीस दरडावून म्हणाला,
"अहो, आम्हाला ज्ञान शिकवू नका. आधी स्वतः कडे बघा. तुमच्या गुन्ह्याचा पाढा वाचतो एकदा. ऐका... नो एंट्री, पिलात कंट्री, नो लायसन्स, नो पेपर्स, नो इन्शुरन्स, नो हेल्मेट..." तो पोलीस सांगत असताना ती महिला पोलीस अचानक म्हणाली,
"हा... हा माणूस गाडी वळवताना मोबाईलवर बोलत होता? का हो, पाकीट घरी विसरले तसे मोबाईल का नाही विसरलात? तुम्हाला सांगते, ही माणसं एखादेवेळी बायको कुठे विसरतील पण मोबाईल विसरणार नाहीत..." त्या चालकाच्या बायकोकडे बघत तिने विचारले,
" हो की नाही हो ताई?"
"हो... हो... बरोबर आहे. बाईलवेडे आणि सोबत मोबाईलवेडे... " ती बाई म्हणाली आणि आपण काही तरी भलतेच बोलून गेलो हे समजताच तिने जीभ चावली.
"विनोद जाऊ देत. पण साहेब, मी काय म्हणतो? चूक झाली तर माफ करा ना. बिगर पावतीचे सांगा काही तरी..."
"लाच देण्याचा प्रयत्न करताय? गेला तो जमाना. हा न्यू इंडिया आहे म्हटलं न्यू इंडिया! तुमच्या गुन्ह्यात अजून एकाची भर पडलीय... लाच देण्याचा प्रयत्न..." असे म्हणत स्कुटीला मागून पुढून पाहात तो पुढे म्हणाला, "व्वा! गाडीच्या दोन्ही नंबरप्लेटवरील एकही अक्षर आणि अंक ओळखू येत नाही. का हो, तुमच्या गाडीचा नंबर किती आहे?"
"एम...एम...ए...ए..."
"बायकोला बोलावता? ए..ए..करून? ते घरी? बरे पोल्युशन तरी आहे का?"
"ते काय असते? अच्छा! अच्छा! प्रदुषण प्रमाणपत्र? साहेब, बाकी काही नाही तर तेच कसे असणार हो?"
"म्हणजे मला वेड्यात काढता? ठीक आहे. चालान करतोय. भरा..."
"किती होतील हो?" चालकाने दीनवाणे विचारले
"सांगतो की. आधी गुन्ह्याचे रवंथ करतो... नो एंट्री, पिऊनी कंट्री, लायसन्स विसरूनी, कागदपत्रे घरीच ठेवूनी, हेल्मेट न घालूनी, मोबाईलवर बोलूनी, लाच देऊ करूनी, प्रदुषण पसरवूनी, नंबरप्लेटची अक्षरे जिरवूनी, हुज्जत पोलिसाशी घालूनी, चालान करा म्हणतो तोंड वर करुनी..."
"व्वा! क्या बात है। सुंदर कविता आहे की..." तो स्कुटी चालक अनवधानाने म्हणाला
"छान आहे ना कविता? ऐकली ना? मग आता कविता ऐकल्याबद्दल रुपये एकवीस हजार मानधनापोटी जमा..."
"अहो, शुभ आकडा आलाय की..." पत्नी हलकेच म्हणाली.
"अग, मला आकडा यायची वेळ आहे आणि तुला शुभ वाटतेय... साहेब, आजकाल एवढी नगदी रक्कम कुणी बाळगेल का? तुमच्याकडे तरी आहे का? स्वतःची हं? दंड वसूल केलेली सोडून?"
"समोर बघा. एक सोडून दहा एटीएम आहेत एका रांगेत. आणा काढून..."
"साहेब, हसावे की रडावे? अहो, मी पाकिटच आणले नाही तर एटीएम कार्ड कसे असेल?"
"खरेदी करायला निघालात ना? दुकानदाराला काय दात पाडून देणार आहात?"
"कशाची खरेदी हो? सहज पाणीपुरी खावी म्हटलं... तेवढे पैसे आहेत माझ्याकडे..." ती स्त्री म्हणाली.
"बरोबर आहे. नोटबंदी झाली तेव्हा लक्षात आले होतेच. बायका किती रक्कम नवऱ्याला चोरून ठेवतात ते. असे करा. एटीएमच्या बाजूला जी खोली दिसतेय ना, तिथे प्रत्येक बँकांचे प्रतिनिधी बसलेत. तुम्ही तिथे जा. तुम्हाला भराव्या लागणाऱ्या भुर्दंडाची रक्कम तातडी कर्ज म्हणून मान्य होईल. बँक ताबडतोब ती रक्कम आरटीओच्या खात्यावर जमा करेल. ती पावती आणून द्या आणि हो जाताना हे डबडं... तुमची गाडी घेऊन जा. त्या बोळीत लावा. चाबी द्या गाडीची ... नाही तर द्याल घराची! पावती दाखवा. चाबी न्या. मग गाडी घेऊन जा..."
"साहेब, चाबी नाही हो. ढकल स्टार्ट आहे. ही अशी..." म्हणत चालकाने गाडी ढकलली. एक दोन आचके घेत गाडी सुरू झाली. तसा पोलीस म्हणाला,
"जा. बाबा, जा. कर्ज घे. दंड-भुरदंड भर. तेवढी पावती तरी दाखव आणि गाडी घेऊन जा."
"बरे साहेब. ये ग तू त्या एटीएमच्या बाजूच्या खोलीत..." असे म्हणत तो स्कुटीवर बसून निघाला.
त्याच्या पाठोपाठ त्या बोळीत पोहोचलेली असताना त्या बोळीच्या विरुद्ध बाजूला मोठ्ठा गोंधळ ऐकू आला. रस्त्यावरचे सारे लोक तिकडे पळाले. वाहतूक पोलिसही तिकडे धावल्याचे पाहून त्याच्या बायको विचारले, "काय झाले हो?"
"काय माहिती?..." नवरा सांगत असताना बाजूने जाणारी एक व्यक्ती म्हणाली,
"काही नाही हो. पोलिसांनी एका स्कुटीवर जाणाऱ्या बाईला चक्क दहा हजार रुपये दंड लावलाय. त्या बाईने स्वतःची बाईकच पेटवायचा प्रयत्न केला आहे..." ते ऐकून ती बाई म्हणाली,
"अरे, आपण मागे ही गाडी विकायला काढली होती. किती रक्कम येत होती रे?"
"अग, शेवटची मागणी सहा हजार रुपये होती. सात-आठ वर्षे झाली गाडीला..."
"अहो, सात-आठ हजाराच्या गाडीसाठी एकवीस हजार रुपये भुर्दंड भरणार?"
"मग काय करणार?"
"मी काय म्हणते, गाडीची चाबी पोलिसांजवळ नाही. कागदपत्रं, लायसन्स असे काहीही त्यांच्याजवळ नाही. झालेच तर त्यांनी गाडीचा नंबरही माहिती नाही आणि उद्या महालक्ष्मी येत आहेत. या बाईच्या रुपाने आपल्यासाठी दुसरी लक्ष्मीच धावून आलीय..."
"तुला काय म्हणायचे आहे?"
"आपण सध्या पोलिसांच्या नजरेत नाहीत. सारे पोलीस तिकडेच पळालेत. ही बोळ सरळ अशी दुसऱ्या बाजूला निघते. रस्ता साफ है। तिथून घर गाठूया..."
"च्यायला! काय डोके चालते ग तुझे?"
"माझी आरती घरी गेल्यावर ओवाळा. आधी ही ढकलस्टार्ट गाडी सुरू करा..." बायको म्हणत असताना नवऱ्याने गाडी सुरू केली. बायको पटकन गाडीवर बसली. एखादे विमान चालवावे अशा थाटात त्याने ती स्कुटी पळवली आणि घर गाठले...

नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१