Mastermind - 1 in Marathi Detective stories by Aniket Samudra books and stories PDF | मास्टरमाईंड (भाग-१)

Featured Books
Categories
Share

मास्टरमाईंड (भाग-१)

मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली.

तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या त्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली.

“साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला

“व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला

त्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट रिकामे सापडले. त्याने शेजारी कोण आहे हे त्या बसमधील दिव्यांच्या मंद प्रकाशात पहाण्याचा प्रयत्न केला.

शेजारी साधारणपणे पंचविशीतील एक तरूणी डोळे मिटुन बसली होती.

हॅन्डबॅगमधील शाल त्याने बाहेर काढली आणि अंगाभोवती लपेटुन तो आसनस्थ झाला. बाहेरील गारठ्यापेक्षा गाडीमध्ये काकणंभर उब जास्त होती.

थोड्या वेळातच गाडीने पुन्हा वेग घेतला. खिडकीतुन बोचरा वारा आतमध्ये येत होता. त्या तरूणीचे केस त्या वाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर पिंगा घालत होते. थंडी सहन होईना तसं नाईलाजस्तव ‘तो’ ‘तिला’ म्हणाला, “कृपया खिडकी जरा बंद करता का? फार थंडी वाजते आहे.”

तिने त्याच्याकडे न बघताच खिडकी बंद केली आणि परत झोपी गेली.

गाडीमधील दिवे आता बंद झाले होते. बहुतेक सर्व प्रवासी सुध्दा निद्रीस्त झाले होते. गाडीचा आवाज, मधुनच वेगाने जाणाऱ्या ट्रकचे आवाज, त्यांच्या दिव्यांचा प्रकाश, कुठल्याश्या थोड्याश्या उघड्या राहीलेल्या खिडकीच्या फटीतुन येणाऱा वाऱयाचा आवाज सारे कसे एका लयीत चालले होते.

गाडीमध्ये आता चांगलीच उब निर्माण झाली होती. तो सुध्दा शरीराभोवती शाल घट्ट ओढुन झोपी गेला.

तिन चार तास झाले असतील त्याला झोप लागुन, इतक्यात त्याला अचानक जाग आली ती त्याच्या हाताला झालेल्या कुणाच्यातरी थंडगार स्पर्शाने. त्याच्या हातावर शेजारील तरूणीचा हात होता.

त्याने एकवार तिच्याकडे बघीतले. ती अजुनही झोपलेलीच होती. थंडीमुळे तिचे हात गारठलेले होते. कदाचीत झोपेतच उब मिळवण्यासाठी ..

त्याने हळुवार तिचा हात उचलुन कडेला ठेवला.

थोड्यावेळाने पुन्हा त्याच्या बोटांना तिच्या थंडगार हाताचा स्पर्श झाला. त्याने डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले. ती अजुनही झोपलेलीच होती.

त्याने आपला हात बाजुला घेतला.

काही क्षणांनंतर पुन्हा तोच थंडगार स्पर्श. त्याने पुन्हा तिच्याकडे बघीतले. शेजारुन जाणाऱ्या एका वाहनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि एक सेकंद तो दचकलाच.

‘ति’ त्याच्याकडेच बघत होती.

म्हणजे हे स्पर्श जाणुन-बुजुन होते तर..

ह्यावेळेस तो मागे हटणार नव्हता. त्याने आपला हात तिच्या हाताखाली सरकवला. तिच्या हाताची बोटं त्याच्या गरम-उबदार हाताभोवती गुंफली गेली.

तो थंडगार स्पर्श त्याच्या अंगावर एक थंड लाट पसरवत होता. त्याचा हात आपसुकच शरीरातील उब तिच्या हाताला देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता.

थोड्या वेळाने तिने हाताची पकड सैल केली. तिने त्याच्या तळव्यावरील हात सोडला होता आणि तिची बोटं त्याच्या मनगटावरुन दंडापर्यंत नाजुकपणे फिरत होती.

तो स्पर्श त्याच्या अंगावर काटा आणत होते. त्याची कानशिलं गरम झाली होती. इतकी गरम की त्याने आपला दुसरा गरम हात कानावर ठेवला तेंव्हा तो सुध्दा त्याला थंडगार जाणवला.

तो सुखाच्या आधीन झाला होता. गाडीला बसणारे हादरे, खाचखळगे कश्याचीही जाणीव त्याला होत नव्हती. तिच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायु उत्तेजीत झाला होता.

अचानक गाडीला कसला तरी जोराचा हादरा बसला आणि विचीत्र आवाज करत गाडी कडेला येऊन थांबली.

गाडीचा ऍक्सेल तुटला होता.

गाडीतले दिवे लागले तशी त्याची तंद्री भंगली. त्याने आपला हात बाजुला केला.
क्लिनरने गाडीत येऊन घोषणा केली, ‘गाडी दुरुस्त व्हायला बराच वेळ लागेल’

अर्धवट जागे झालेले लोकं पुन्हा झोपी गेले तर बाकीचे ‘बिडी-काडी’ साठी खाली उतरले.

शेजारील तरुणी बाहेर पडली. बाहेर पडताना तिच्या शरीराचा त्याला झालेला स्पर्श त्याच्या अंगावर विजेची एक लहर सरकवुन गेला. तिच्या शरीराला येणारा मंद सुगंध त्याच्या सर्व सेन्स ना उद्दीपीत करुन गेला.

तो खिडकीतुन वाकुन ती तरुणी कुठे जात आहे हे पाहु लागला.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला थोडं दुर काही दिवे लुकलुकत होते. ‘सुजीत लॉज’ ट्युबलाईटच्या प्रकाशात त्या बोर्डावरील अक्षरं त्याने वाचली.

तिने एकवार वळुन त्याच्याकडे पाहीले, काही क्षण आणी पुन्हा मागे नं बघता ती चालु लागली.

त्याच्या मनामध्ये चलबिचल चालु झाली. तो उठुन उभा राहीला.

‘अंदाजे किती वेळ लागेल हो?’ त्याने क्लिनरला विचारले.

‘तासभर तर नक्कीच’

‘बरं मी आहे इथेच..’ असं म्हणुन तो तिच्या मागोमाग चालु लागला.

हवेत प्रचंड गारठा होता परंतु वारं मात्र थांबलेले होते. झाडं स्तब्ध होती. त्याने आकाशात नजर टाकली. चंद्र ढगांच्या आड गेला होता. आभाळ भरुन आले होते जसं काही कुठल्याक्षणी त्याच्या अंगावर कोसळेल.

ती अजुनही मागे न बघता चालत होती.

दिव्यांच्या प्रकाशात त्याची नजर तिच्या सर्वांगावरुन फिरत होती. सुडौल बांधा, शरीराला योग्य ठिकाणी योग्य आकार त्याचे लक्ष रोखुन धरत होती. तो ओढल्यासारखा तिच्या मागे चालला होता.

ती लॉजमध्ये गेली आणि तेथील काऊंटरला जाऊन उभी राहीली.
कान-टोपी, मफलर गुंडाळलेला काऊंटरवरचा इसम तिला पाहुन कष्टाने उठला.

“भैय्या, माझी बस बंद पडली आहे आणि एक दोन तासांत सुरु होईल असे वाटत नाही. माझी तब्येतही ठिक नाहीये. काही तासांपुरती रुम पाहीजे होती.” लांबवर बाहेर बंद पडलेल्या बस कडे बोट दाखवत ती तरूणी म्हणाली.

त्या इसमाने ड्रावरमधुन एक किल्ली काढली आणि तिच्यासमोर फेकली. तिची अधीक माहीती लिहीण्यासाठी त्याने समोरचा रजिस्टर समोर ओढले तेवढ्यात त्याची नजर दरवाज्याच्या अंधुक
प्रकाशातुन आत येणाऱ्या त्या तरूणावर पडली. तो इसम स्वतःशीच हसला. त्याने पुन्हा रजिस्टर बंद करुन टाकले आणि चेहऱ्यावर पांघरूण ओढुन तो पुन्हा झोपी गेला.

ति जिन्यांवरुन वर जाऊ लागली. तो सुध्दा तिच्या मागोमाग वर गेला.

‘१०३’, ती दारापाशीच उभी होती. तिने आपल्याकडील चावीने दार उघडले.

दोघंही आतमध्ये आल्यावर त्याने दार लावुन टाकले. उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात तो प्रथमच तिला पहात होता. तिच्या डोळ्यामध्ये.. काहीतरी, कसलीतरी अनामीक ओढ होती, इतकी की त्याला शरीरामध्ये असलेला आत्मा शरीर फाडुन तिला भेटायला बाहेर पडेल असं वाटत होतं. त्याचा घसा कोरडा पडला होता. छाती धडधडत होती. तिने हात पुढे केला..
—————————————————————————-


“चला… बसा गाडी मध्ये.. आले का सगळे??” क्लिनरने एकवार आवाज देत सगळीकडे नजर टाकली.निघण्यापुर्वी एकदा त्याने सगळी लोकं मोजली.. आसन क्रमांक D५-६ रिकामे होते.

“आता..हे कुठे गेले…?” त्रासीक होत क्लिनर परत खाली उतरला. आजुबाजुला सर्वत्र शोधंल कुठंच सापडेना..

‘अरे ते मगाशी त्या लॉज कडे जाताना दिसले होते.. बघा तिकडे आहेत का!’, एका प्रवाश्याने माहीती दिली.

क्लिनर शिव्या हासडत लॉज मध्ये गेला. काऊंटर वरचा गाढ झोपेत होता.

“आईचा घो.. मेला काय हे?’ क्लिनरने गदागदा हलवुन त्याला जागं केलं..
“इथे एक तासाभरापुर्वी कोणी आलं का?” क्लिनरने ‘त्या’ प्रवाश्याचे वर्णन केले.

‘हो, ते आले होते साहेब आणि एक बाई पण होत्या त्यांच्या बरोबर, वरतीच आहेत बघा रुम नं. १०३’ जिन्याकडे हात दाखवत त्याने परत डोक्यावरुन पांघरुन ओढले..

‘घ्या.. तिथे अंधारात आम्ही तडफडतोय आणि हे इथे चाळे चालले आहेत..’

क्लिनर तडफडत दोन-दोन पायऱ्या चढत जिना चढुन वर गेला. रुम नं १०३ मधील दिवा चालुच होता.

‘ओ साहेब.. झालं असेल तर चला, गाडी तयार आहे..’ क्लिनरने दारावर थाप मारत आवाज दिला.

आतुन काहीच आवाज, हालचाल नव्हती.

‘ओ साहेsssssब’, चलताय का? का जाऊ देत गाडी?’

‘ओ मॅडम.. येताय का? का जाऊ.. शेवटचे विचारतो आहे!’, क्लिनर निघण्याच्याच तयारीत होता.

‘मरा च मायला.. जातो मी..’ म्हणुन क्लिनर जायला लागला

त्याच वेळेस वैतागलेला काऊंटर वरचा पोऱ्या वर आला. ‘काय झालं? कश्याला केकाटंतयं? जा नं नसेल यायंच त्यांना’

त्याने हळुच दाराला कानं लावुन पाहीला. आत मधुन कसलाच आवाज येत नव्हता, नाही कसली हालचाल जाणवत होती.

त्याने सुध्दा दोन – तिनदा दार वाजवुन बघीतले. मग मात्र त्याला शंका यायला लागली.

‘आयला.. गेले काय पळुन मी झोपलो होतो तेंव्हा?’

‘असे कसे जातील? गाडी तर इथेच आहे!!’, क्लिनर

‘काही तरी गडबड आहे’ म्हणत तो पोऱ्या खालुन रुमची दुसरी किल्ली आणायला पळाला.

लांबुन गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकु येत होता.

पोऱ्याने आणलेल्या किल्लीने रुम उघडली. समोरचे दृष्य बघुन दोघांचाही श्वास रोखला गेला. क्षणभर आपण पाहातोय ते खरं आहे का दुसरं काही हेच त्यांना कळेना.

समोरच्या बेडवर अर्धनग्नावस्थेत त्या तरूणीचे प्रेत पडले होते. तिच्या शरीराची चिरफाड केली होती. जशी एखादी उशी फाडुन टाकली असावी…

[क्रमशः]