मुक्ता
"मुक्ता, चांगलं स्थळ आहे बघ हे जोश्यांच. लग्नानंतर कळू देत सारं." मोहिनी
"आत्या, तुला सांगितलं न एकदा. हे असं लपवाछपवी करुन मला लग्न नाही करायचं ते" मुक्ता
"अगं, तु तरी समजवून सांग ग प्रिती या पोरिला. आता २९ची पूर्ण होईल ती." मोहिनी
आई-बाबांकडे रागाने बघत मुक्ता पुस्तक घेऊन आत निघून गेली. आत्या प्रिती आणि महेशला समजवून सांगायचा प्रयत्न करत होती. एकदा लग्न होऊन जाऊ दे, मग मुक्ताचा प्रॉब्लेम सांगा. जोशी विचारांनी पुढारलेले आहेत."
"समजा आपल्यालाच ही गोष्ट लग्नानंतर समजली असती तर, काय झालं असतं. त्यांनी सोडून दिलं असतं का आपल्या मुक्तेला" आत्या
या विषयावर आत्या बोलण्याचं थांबत नाही बघून मुक्ता आतून आली.
"आत्या, मला तुझी काळजी कळतेय ग. आपल्याला आधी कळलय न, मग कशाला लपवून ठेवायचं. समजा माझ्या लग्नाला उशिर झालाच तर बिघडल काय?" मुक्तानी आत्याचा हात हातात घेत म्हंटलं
"आणि खरच जर हे जोशी विचारांनी पुढारलेले असतील आणि मी त्यांना खरच पसंत असेल तर ते मला माझ्या या उणीवेसकट स्विकारतील ना ग" मुक्ता
तिचं असं बोलणं मोहिनी आत्याला रुचलं नसलं तरी ते खरं असल्यामुळे ती शांतपणे आपल्या समंजस भाचीकडे बघत राहिली.
"तुम्ही तिघं गप्पा करा. मी आलेच. तुमच्यासाठी खायला करते मस्त" मुक्ता
"अरे महेश, प्रिती, काय सांगू या जोष्यांना" मोहिनी
"खरं तेच सांगा वन्सं" प्रिती
"ती म्हणतेय ते आई-बाप या नात्याने आपल्याला पटत नसलं तरी खोटं बोलून किंवा माहिती लपवून नाती निभवता नाही येत गं" महेश
"आयुष्यात कुठल्याही नात्याची सुरवात विश्वासावर अवलंबून असते, तोच फसवा असेल तर नातं टिकणार नाही वन्सं" प्रिती
"सांगते फोनकरुन." मोहिनी नाराजीनेच म्हणाली
"आई-बाबा येत्या शनिवारी मी माझ्या मित्र-मैत्रीणींसोबत कळसूबाईला जाणार आहे." मुक्ता
"काळजी नको करु आई. मी ठीक आहे आता." मुक्ता
"एकदम कळसूबाईला म्हणजे... नंतर नाही का जाता येणार" प्रिती
"अग आई, हे बघ माझे बक्षीस, मेडल्स....." मुक्ता
"आय एम बॉर्न ट्रेकर. माझा जन्मच सगळे गड किल्ले सर करायला झाला आहे ग." मुक्ता
"एका अपघाताने खचायचं नाही. बाबा, तुम्हीच सारखे सांगायचे न". मुक्ता
"अगं, झेपेल का तुला? मी म्हणत होते अजून तीनचार महिन्यानी ट्रेकला गेली तर चालणार नाही का?" प्रिती
"कधीतरी सुरवात करायची. आई, सुट्टीही संपत आली आहे. एकदा ऑफिस सुरु झाल्यावर निदान तीनचार महिने मला सुट्टी घेता येणार नाही ग." मुक्ता
"जाऊ दे ग तिला. तिचं पॅशन आहे ते. आणि समजा काही त्रास झालाच तर पुण्याला मावशीकडे जाईल ती. मी कळवतो माधुरी आणि माधवला." बाबा
"तुम्ही पण ना. या पॅशनमुळेच तिची ही अवस्था झाली आहे." प्रिती चिडून म्हणाली
"तेच पॅशन तिला जगण्याचं बळ देईल." बाबा
"आई, डॉक्टरांनी सांगितलं न मी एकदम ठिक आहे ते. ट्रेकची परवानगी घेतली आहे मी त्यांची. आणि हो इतके जण माझ्या सोबत आहेत न." मुक्ता
"तेव्हा पण होते न सगळे तुझ्यासोबत, काय झालं? व्हायचं तेच झालं न शेवटी." प्रिती
"तू आपल्या बाबांसारखी हट्टी आहेस बघ. ऐकायचं नाही म्हणजे नाही. मी कोण सांगणारी?" प्रिती डोळे पुसत म्हणाली
"या ट्रेकच्या नादा पायी मनोज या घरापासून दुरावला. या पोरीनी पहिला ट्रेक केला ना तेव्हाचपासून मी तुम्हाला सांगत होते. या घरात माझं कोणी ऐकेल तर शपथ" प्रिती
"आई, मनोज काकांनी जे केलं ते त्यांच्या दृष्टीने योग्यचं होतं. प्रॉब्लेम आजोबांना होता." मुक्ता
"बाबा तुम्ही आजही गप्पच बसणार आहात का?" मुक्तानी रागानं बाबांकडे बघत म्हंटलं
"या घरात मी सोडून सगळेजण योग्य तेच करतात." प्रिती
"आई, विषयांतर करु नकोस. मी या ट्रेक ला जाणार आहे. आणि मनोजकाकाचं म्हणशील तर अपघातात एक पाय गेला म्हणुन जन्मभर तेच दुख: गोंजारत बसायच नव्हतं त्याला. सो त्याने मनालीचं माउंटेनियरींग इनस्टित्यूटची नोकरी स्विकारली." मुक्ता
"आई, तुला माहिती का त्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी काकाचं नाव किती आदरानं घेतात ते." मुक्ता
"आई, खरतर मलाही त्या संस्थेत ट्रेनींगसाठी जायचं आहे. काकाचा ब्लॉग वाचला न की स्फूर्ती येते बघ." मुक्ता
"अहो, तुम्ही तरी या पोरीला समजावून सांगा." प्रिती
दारावरची बेल वाजली आणि तिघंही बोलता बोलता स्तब्ध झालेत.
"मी बघते." मुक्ता उठत म्हणाली
"कोण आहे ग?" बाबा
"कुरिअर आहे. आईचं ऑनलाईन शॉपिंग." मुक्ता
क्षणाचाही विलंब न करता उत्सुकतेनं मुक्तानं पार्सल फोडलं. थोड्यावेळापूर्वी झालेल्या वादावादीचा कुठलाच राग तिच्या चेहर्यावर दिसत नव्हता.
"कोण म्हणेल ही २९ वर्षाची घोडी आहे ते" प्रिती
"आई, रंग मस्त ग साडीचा. तू दुसरी ऑर्डर कर. मी अभयदादाच्या लग्नात हीच साडी नेसणार." मुक्ता
"मी काय म्हणते मुक्ता..." प्रितीने सुरवात करायच्या आधीच महेशनी तिला दम दिला.
"बस्स. प्रिती, काहिही बोलू नकोस. मुक्ता या ट्रेकला जाणार आहे. हे नक्की" महेश
महेशचा कणखर आवाज ऐकून प्रिती एकक्षण बघतच राहिली.
"मी स्वयंपाकाचं बघते" नाराजीच्या स्वरात प्रिती म्हणाली
"हॅलो, मानसी... शनिवारी किती वाजता कुठे भेटू या ग? फोनवर मुक्ता बोलत होती
"बाबा मी आलेच फोनवर बोलून" मुक्तानी खुणेनं सांगितलं
रोज रात्री चर्चेत पार पडणार जेवण आज शांततेत पार पडलं. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं.
"आता मलाच बोलणं सुरु करावं लागेल का? प्रिती टेबल आवरतांना म्हणाली
"आई,
"बाबा, मला कळतय, तुमची घालमेल, आईची तळमळ" मुक्ता
"मुक्ते, कसं आहे न. आईचं काळजी करणं सहाजिक आहे. हा अपघात तु पचवला असला तरी एक आई म्हणुन तिच्या वेदना समजून घे." बाबा
मुक्ता स्तब्ध झाली. तिला तो दिवस आठवत होता. ती ट्रेकसाठी प्रतापगडावर गेली होती. उतरणीचा सरळ सरळ रस्ता होता. हसत खेळत सगळे उतरत असतांना नीरवचा पाय घसरला. त्याच्या धक्यानी गौरी आणि ती दोघीही जोरात घरंगळत खालच्या बाजूला गेल्या. ती एका खडकावर जोरात आदळली आणि पोटाला जब्बर मार बसला. त्यात गौरीही तिच्यावर जोरात आदळली.
या अपघातात तिचं गर्भाशयाला इजा झाल्यामुळे काढून टाकण्यात आलं होतं. ती कधीच आई होऊ शकणार नव्हती. जवळपास वर्ष होईल या अपघाताला. ती सावरली होती. तिने सत्य स्वीकारले होते. आई बाबा मात्र अजूनही या धक्यातून सावरले नव्हते.
लग्नासाठी अनेक स्थळं सांगून येत होती. तिच्या आई न होऊ शकण्याने सगळीकडून नकार येत होता.
आई कायम तिच्या ट्रेकला यासाठी दोषी धरायची. नेमकं हेच तिला कळत नव्हतं. जर अपघात होणे हे तिचं प्रारब्ध होतं तर ती ट्रेकवर नसतांनाही तो झालाच असता. आईला हे कसं समजवून सांगायचं ते तिला कळत नव्हतं.
"मुक्ते, जा तू ट्रेक ला. मी समजवून सांगतो आईला. आणि हो, तुला जेव्हा जमेल तेव्हा मनालीच्या इंस्टीट्यूटमध्ये ट्रेनींगला नक्की जा." बाबा
"बाबा, खरच" मुक्ता
"हो ग मनु. मनोज, तुझा काका. त्यालाही खूप आवड ट्रेकची. त्याने अनेक ट्रेक केलेत. त्याचा अनुभव मी ऐकायचो तर अंगावर काटे यायचे. मलाही इच्छा व्हायची एखादा ट्रेक करुन बघावा. असाच ट्रेक करतांना एक अपघात झाला. त्यात त्याचा एक पाय गेला. माझ्या बाबांनी तेव्हा त्याला दम दिला. तो आयुष्यात कधी हे ट्रेक करणार नाही. मनोजने ऐकलं नाही. खूप कष्ट केले त्यानी. मग मनालीच्या माउंटिनीआरींग इंस्टिट्यूटमध्ये त्याला ऑफर आली. तिथे तो ट्रेनर मह्णून रुजू झाला. स्वत:च्या अनुभवावर त्यानं त्यावर पुस्तकं लिहिलं. ब्लॉग तर वाचतेस तू त्याचा. ट्रेकचा चालता बोलता विश्वकोश आहे तो. मार्कोपोलो म्हणायचो मी त्याला." महेश
"एक काम करशील मुक्ते." महेश
"बोला ना बाबा." मुक्ता
"लद्दाखचं स्टोक कांगडी सर करायचं मनोजचं स्वप्न तू पूर्ण करशील?"
"खूप काठीण ट्रेक आहे तो बाबा. आय प्रॉमिस, मी स्टोक कांगडी एक दिवस नक्की सर करणार" मुक्ता
"आई, आई ग. मला कळतय तुला काय वाटतय या क्षणी. ऐक ना. मी कधीच आई होऊ शकणार नाही हे सत्य मी स्वीकारलं आहे.
याच कारणासाठी आजही अपल्या समाजात लग्न केले जातात. खरं काय ते कळल्यावर प्रत्येक स्थळाकडुन नकारच येणार आई. मग हा भावनांचा खेळ आपण कशाला मांडायचा. कदाचित कोणी येईलही माझ्या आयुष्यात जो मला स्वीकारेल. तो पर्यंत मला मुक्त होऊन जगू दे." मुक्ता
एवढं मोठे दुख सहजतेने पेलणारी मुक्ता बघून प्रितीचं हृदय कळवळून निघालं. कदाचित येईलही कोणी तिच्या आयुष्यात, तिच्यासारखा समंजस.
"जा मुक्ते. घे झेप आकाशात. मी आहे." प्रिती मनात म्हणाली
विनीता देशपांडे