कोजागिरी पौर्णिमा
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.
या दिवशी करायच्या या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास करतात .
रात्रीच्या वेळी तुपाचे 101 किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावतात.
सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप-साखर मिश्रित खीर व मिष्टान्न भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात
या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्रचे पाठ करतात.
उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे.
पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते.
दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची उपासना केली जाते.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.
ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.
या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा.
या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे.
पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात,
घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.
यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात.
नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी असते .
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून, को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. या कारणामुळे या व्रताचे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडले.
निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी
जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले
असे म्हणतात की या दिवशी शंकर पार्वती जोडीने आकाशात भ्रमण करीत असतात व को जागर्ति असे विचारत असतात .
त्यावेळेस जागे असणार्या माणसाला इच्छित सर्व प्राप्त होते .
या दिवशी सगळीकडे सर्वजण आपले आप्तेष्ट नातेवाईक शेजारी पाजारी यांच्या सोबत उंच गच्चीवर किंवा मोकळ्या पटांगणात एकत्र जमतात ,
चंद्र दर्शनानंतर एकत्रित आटीव दुधाचा सोबत अल्पोपहाराचा स्वाद घेतात .
व मध्यरात्रीपर्यंत गप्पा गोष्टी गाणी यात घालवून आनंद साजरा करतात .
हल्ली मोठमोठी अपार्टमेंट असल्याने तेथील लोक एकत्रित एखादी गाण्याची मैफल वा इतर कार्यक्रम आयोजित करून जागरण करतात .
घराघरातून अश्विनी पौर्णिमेदिवशी प्रथम चंद्राची पूजा करून त्याला ओवाळले जाते व त्यानंतर घरातील पहील्या अपत्याला ओवाळून काहीतरी ओवाळणी द्यायची प्रथा आहे .
आजकाल घरोघरी एक कींवा दोन मुले असल्याने सर्वानाच ओवाळले जाते .
कोजागिरी पौर्णिमेची कथा अशी सांगतात
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता.
ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती.
ती ब्राह्मणाच्या गरिब स्वभावामुळे दररोज त्याला त्रास देत असे .
संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे.
पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे .
एकदा श्राद्ध करताना पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून ब्राह्मणाच्या पत्नीने एका विहिरीत फेकून दिले.
पत्नीची अशी वागणूक पाहून दुःखी मनाने व कंटाळून ब्राह्मण जंगलात निघून गेला .
जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे काही नागकन्या भेटल्या .
त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती.
नागकन्यांनी त्या कष्टी ब्राम्हणाला पाहिले व त्याच्या उदासीनतेचे कारण विचारले
ब्राम्हणाने आपली कर्मकथा सांगितली तेव्हा
नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले.
ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले.
या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य परत सुखाने संसार करू लागले.
कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.
मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.
हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.
राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात.
धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.
हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.
ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.
कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात.
बंगालीलोकतांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.