chandani ratra - 12 in Marathi Love Stories by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | चांदणी रात्र - १२

Featured Books
Categories
Share

चांदणी रात्र - १२

काही जुन्या आठवणींमुळे वृषालीचं मन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर आणण्यासाठी कटू आठवणींच्या जागी सुखद आठवणी पेरणं गरजेचं होतं. पण जोपर्यंत वृषालीच्या मनाचे दरवाजे बंद होते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. तसेच तिच्या घराण्यात मनोविकाराने ग्रासलेली ती काही पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या आज्जीला देखील नैराश्याचे झटके बऱ्याचदा येऊन गेले होते. पण तरीदेखील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे वृषालीच्या मनावर झालेली जखम इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा ओली व्हावी याचं उत्तर मात्र खुद्द डॉक्टरांकडे देखील नव्हतं. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी मनुष्याचं मन इतकं गूढ आहे की ते पूर्णपणे ओळखणं विज्ञानाला सुद्धा अजून शक्य झालेलं नाही.
राजेश, मनाली आणि संदीपने वृषालीच्या डॉक्टरांची भेट घेतली. राजेशने त्यांना त्यांच्या आणि वृषालीमध्ये फुलत गेलेल्या नात्याबद्दल सर्वकाही सांगितलं. हे ऐकून डॉक्टरांनी राजेशला एक कल्पना सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजेश एकटाच वृषालीच्या घरी गेला. त्याने वृषालीच्या आईवडिलांना सर्वकाही सांगितलं नाही. तिला सहज भेटायला आलोय असं सांगितलं व तो वृषालीच्या खोलीत गेला. बेडच्या कोपऱ्यात वृषाली गुढग्यात पाय दुमडून बसली होती. आपण आलोय हे वृषालीला समजावं म्हणून राजेशने घसा खाकरला. पण वृषालीने मान देखील वळवली नाही. तिची नजर कालप्रमाणेच कुठेतरी शून्यात पाहत होती. चेहेऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. जागरणामुळे डोळे सुजल्यासारखे वाटत होते. राजेशला तिची ही अवस्था पाहवत नव्हती. तो तिच्या समोर बसला. “वृषाली” राजेशने वृषालीला हाक मारली. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तिची निर्विकार नजर पाहून राजेश अस्वस्थ झाला होता. पण त्याने चेहऱ्यावरचं हसू ढळू दिलं नाही. तो पुढे बोलू लागला, “वृषाली, तुला आठवतो का तो दिवस! मी कर्वे उद्यानातून बाहेर पडलो. समोरून तू येत होतीस. अचानक तू माझ्याकडे पाहून हसू लागलीस. मला कळेना तू का हसतीयेस म्हणून मी समोरच्या गाडीच्या आरशात पाहिलं तर माझ्या डोक्यावर पडलेली पक्ष्याची विष्टा मला दिसली व मीही हसू लागलो. तुला माहितीये का की हसताना तू किती छान दिसतेस! माझ्यासाठी फक्त एकदा हास!” असे बोलून राजेशने वृषालीचा हात आपल्या हातात घेतला. त्या थंड पडलेल्या हातात जिवंतपणाची कोणतीच जाणीव नव्हती. राजेश अजूनच अस्वस्थ झाला व तिच्या खोलीतून बाहेर आला. वृषालीची आई राजेशला काहीतरी विचारणार होती पण राजेशचा चेहरा पाहूनच तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. राजेशही काही न बोलता तिथून निघाला.

पुढचे तीन दिवस राजेश वृषालीच्या घरी जात होता, तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होता. पण वृषालीवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिसऱ्या दिवशी मात्र काही वेळासाठी का होईना वृषालीने राजेशच्या नजरेला नजर दिली. काही क्षणांसाठी राजेशला तिच्या नजरेत जिवंतपणा जाणवला. त्यामुळेच त्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला व नैराश्याने ग्रासलेल्या त्याच्या मनात उत्साहाची पालवी फुटली. चौथ्या दिवशी राजेश पुन्हा वृषालीच्या घरी गेला. त्याने वृषालीच्या आईला तिच्याबद्दल विचारलं. फारसा काही बदल नाही पण थोड्या वेळासाठी तिचा चेहेरा हसरा दिसत होता हे सांगताना वृषालीच्या आईच्या चेहेऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. हे ऐकून राजेशला बरं वाटलं. तो वृषालीसमोर बसला. नेहमीप्रमाणे आजदेखील त्याने वृषालीसमोर सर्व सुखद आठवणींचा पाढा वाचला. पण काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र राजेशचा संयम सुटला. तो उद्वेगाने बोलू लागला, “का छळतीयेस मला वृषाली. का माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतेस. तुला मी नाही पाहू शकत असा. काहीतरी बोल. नाहीतर मला थोबाडीत मार पण अशी शांत बसू नकोस. मला तू हवियेस वृषाली, मला तू हवियेस.” एवढे बोलून राजेशने अश्रूंना वाट मोकळी केली. बऱ्याच वेळानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रूंचा सागर आटल्यावर त्याने डोळे पुसले व वृषालीकडे पाहिले. वृषालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही क्षणात तिच्या चेहेऱ्यावरील भाव बदलले व ती हुंदके देऊ लागली. राजेशने तिचं डोकं त्याच्या छातीला टेकवलं व तिच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागला.

इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच वृषाली जिवंत असल्याची जाणीव राजेशला झाली होती. बराच वेळ वृषाली मनसोक्त रडत होती. इतक्या दिवसांचं नैराश्यच जणू अश्रूंनी धुतलं गेलं होतं. राजेशचा जीव भांड्यात पडला. वृषाली आपल्यापासून कायमची दुरावणार ही भीती त्याच्या मनातून नाहीशी झाली होती.

X X X X X X

आता वृषाली पूर्णपणे बरी झाली होती. इतक्या दिवसांनंतर ती आज पहिल्यांदाच कॉलेजला जाणार होती. राजेशचं वृषालीच्या घरी येणं जाणं चालूच होतं. मागील काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांच्यातलं नातं आणखीनच घट्ट झालं होतं. वृषालीच्या घरी तर सर्व समजलं होतं व तिच्या आईवडिलांची त्यांच्या नात्याला मूक संमती सुद्धा होती. राजेश मात्र वृषालीबद्दल त्याच्या घरी अजून काहीच बोलला नव्हता. तसही लग्न, संसार आशा गोष्टींसाठी त्याला अजून बराच वेळ होता. आणि अजून त्याने वृषालीला प्रपोज देखील केलं नव्हतं. अर्थात तिचं उत्तर काय असेल हे राजेशला माहिती होतं. त्याला फक्त एकच चिंता होती. राजेशचे आईवडील तसे पारंपरिक विचारांचे होते. त्यामुळे अंतर जातीय विवाहाला ते संमती देतील का याबद्दल त्याच्या मनात शंका होती. पण या सर्व गोष्टींसाठी अजून बराच वेळ होता. पहिलं त्याला कॉलेजची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं गरजेचं होतं. एकदा ग्रॅज्युएट झाला की मग नोकरी. तशी त्याला पोटापाण्यासाठी नोकरी करायची काहीच गरज नव्हती. पण त्यालाच स्वतःला सुरुवातीची काही वर्षतरी नोकरी करायची होती.

वृषाली कॉलेजात पोहोचली. एवढ्या दिवसांचा आभ्यास आता तील भरून काढायचा होता. अर्थात राजेश मदतीला असल्यामुळे वृषालीला तशी काळजी नव्हती. त्याची शिकवणी सुद्धा पुन्हा सुरू झाली होती. आता परीक्षा तोंडावर आली होती. संदीपचा तर रात्रंदिवस जागून आभ्यास सुरू होता. राजेशला स्वतः पेक्षा वृषालीचीच जास्त काळजी होती. आधीच या आजारपणामुळे तिचा बराच वेळ गेला होता. आणि तसाही राजेश मुळातच जास्त हुशार होता. थोडा वेळ आभ्यास केला तरी त्याला चालायचं. अभ्यासात फार पटापट वेळ जात होता. पाहतापाहता परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. पहिला पेपर मॅथसचा असल्यामुळे वृषालीला फार टेन्शन आलं होतं. पण राजेशने जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात तिची चांगली तयारी करवून घेतली होती. त्यामुळे तिला पेपर अपेक्षेपेक्षा चांगला गेला. तसेच पुढचे सर्व पेपर चांगले गेले. राजेश आणि संदीपचा तर प्रश्नच नव्हता. वर्गातल्या पहिल्या चार मुलात त्यांचं नाव असणारच होतं.
परीक्षा संपताच राजेशच्या वडिलांनी त्याला गावाला बोलावलं. शेतीची कामे सुरू होणार होती. तसे त्यांच्या शेतावर बरेच कामगार होते पण राजेशने पण जरा शेतीकडे लक्ष द्यावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. खरंतर शेतात काम करायला राजेशला फारसं आवडायचं नाही. पण त्याला जबाबदारीची जाणीव होती. तसेच वडिलांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे असं तो समजायचा. आईवडिलांना, गावातल्या मित्रांना भेटून देखील आता बरेच दिवस झाले होते. पण आता महिनाभर तरी वृषालीला भेटता येणार नाही याचीच त्याला खंत होती. त्याने गावाला जायच्या आधी वृषालीची भेट घेतली व तो गाडीत बसला. गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसताच नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्याचं मन गावात जाऊन पोहोचलं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा तो असाच घरी गेला होता तेव्हा घडलेल्या चमत्कारिक प्रसंगाची आठवण त्याला झाली. अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित होते.

गाडी गावात पोहोचली. यावेळी संपत राजेशला नेण्यासाठी बसस्टँडवर येऊन थांबला होता. बसमधून उतरताच राजेश संपतच्या मागे बसला. त्याने संपतला विचारलं, “काय संपत काका कसे आहात? आणि घरी सगळं ठीक आहे ना?” “म्या एकदम झाक अन घरचे पन एकदम मस्तायत बगा.” संपतने नेहमीप्रमाणेच हसत हसत उत्तर दिलं. थोड्याच वेळात ते वाड्यावर पोहोचले. राजेशची आई दारातच उभी होती. मुलगा येणार म्हणून ती फार खुश होती. तिने दोघांना हातानेच दारात थांबायची खूण केली व आतून ती भाकर घेऊन आली व तिने राजेशची दृष्ट काढली. राजेश येणार म्हणून त्याचे वडील देखील घरीच थांबले होते. राजेशला पाहताच त्यांच्या धीरगंभीर चेहेऱ्यावर किंचित हास्याची लकेर उमटली. त्यांनी राजेशकडे कॉलेज, परिक्षा वगैरेची चौकशी केली. बराच वेळ बापलेकांच्या गप्पा चालू होत्या. मग आईने जेवण तयार असल्याची घोषणा केली व त्यांच्या गप्पा थांबल्या. आज कितीतरी दिवसांनी राजेश आईच्या हातचं खाणार होता.

जेवण आटोपल्यावर राजेश त्याच्या वडिलांबरोबर शेतावर गेला. त्याच्या वडिलांनी त्याला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. आजचा दिवस आराम करून राजेशला उद्यापासून कामाला लागायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश शेतावर पोहोचला. थोडावेळ काम केल्यावर त्याला वृषालीची आठवण आली. त्याने तिला फोन लावला. आपण शेतात काम करत असल्याचं त्याने वृषालीला सांगितलं. तिला फार कौतुक वाटलं व राजेशचा हेवादेखील वाटला. तिचं आत्तापर्यंतचं सारं आयुष्य शहरात गेलं होतं. त्यामुळे तिला शेतीबद्दल फारशी माहिती नव्हती. पण तिच्या मनात ग्रामीण जीवनाबद्दल कुतूहल मात्र होतं. एखादा दिवस तरी एखादया खेड्यात राहण्याची, चुलीवरची गरम गरम पिठलं भाकरी खाण्याची तिला इच्छा होती.

संध्याकाळ होताच शेतीची कामे संपली व राजेश नदीकडे गेला. सूर्य अस्ताला आला होता. आकाशात सर्वत्र केशरी रंगाची उधळण करणाऱ्या मावळत्या सूर्याच्या गोळ्याकडे पाहून राजेशला फार छान वाटे. संध्याकाळचं हे गूढरम्य वातावरण त्याला आवडायचं आणि मग त्याचं कवीमन जागं व्हायचं. क्षितीजाच्या एका टोकावर सूर्य मावळताच दुसऱ्या टोकावर उगवणाऱ्या चंद्राकडे पाहून मावळणारा सूर्य चंद्राला काय म्हणेल याची तो कल्पना करी-

चंद्रा, या अवकाशावरचं माझं राज्य आता संपलं
सारं अवकाश तुझ्या शितलतेने भारून टाक
मी पुन्हा येईनच हा अंधकार दूर करायला
आता उद्या भेटूयात याचवेळी, शुभरात्री

अशा काही ओळी राजेशच्या मनात घर करत. मावळत्या सूर्याचा निरोप घेऊन राजेश परत वाड्यावर आला. रात्रीचं जेवण आटोपल्यावर राजेशने बराच वेळ आईबरोबर गप्पा मारल्या. अर्थात सर्वकाही त्याने आईला नाही सांगितलं. वृषालीबद्दल राजेशने एक शब्द देखील काढला नाही. कारण आईची प्रतिक्रिया काय असेल याचा राजेशला अजून अंदाज आला नव्हता. मात्र राजेशने एक असा प्रश्न विचारला जो त्याच्या आईला बिलकुल अपेक्षित नव्हता. राजेश त्याच्या आईला म्हणाला, “आई, आपल्या घराण्यात पूर्वी कोणी अंतरजातीय विवाह केला आहे का?” त्याच्या आईला काय बोलावे तेच कळेना. थोडा विचार करून ती म्हणाली, “नाही, पण तू का विचारतोयस?” “अगं मी आपलं सहज विचारलं, आपल्या घरण्याबद्दल माहिती असावी म्हणून.” राजेशला जे सुचलं ते तो बोलला. यावर त्याची आई काहीच बोलली नाही. राजेशचं धाडस अजुन वाढलं. “आई, अंतरजातीय विवाहबद्दल तुझं काय मत आहे?” त्याने विचारलं. आता मात्र राजेशच्या आईच्या मनात वेगळीच शंका आली. ‘हा अचानक असा का विचारतोय? कुणाच्या प्रेमात तर पडला नाही ना?’ असा विचार तिच्या मनात येऊन गेला. मनात आलेला विचार ती बोलली नाही. “माझं मत काहीका असेना. मला कोण विचारतं या घरात.” असं थोड्या नाराजीच्या सुरात ती बोलली. यावर राजेशने काहीच प्रतिक्रिया न देता तो विषय तिथेच थांबवला.

क्रमशः