Mitra my friend - 13 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | मित्र my friend - भाग १३

Featured Books
Categories
Share

मित्र my friend - भाग १३

जरा दूरचं होतं ते ठिकाण , तरीसुद्धा पोहोचला. त्याचवेळेला पावसाने सुरुवात केली... काय यार हा पाऊस... नको त्यावेळेला नको त्या ठिकाणी येतो, वैताग नुसता. विवेकला पाऊस तसा आवडायचा नाहीच. पावसातला चिखल, चिकचिकपणा.. अजिबात आवडायचा नाही. आजही ऐनवेळेला येऊन विवेकला अडचणीत आणलं त्याने. तरी केशव भेटेल म्हणून त्याने पावसाचा राग आवरता घेतला. विवेक त्याच्या घरी पोहोचला. केशवनेच दरवाजा उघडला. " पटकन आत ये. " विवेकला आतमध्ये घेतलं. आजूबाजूला कोणी नाही बघून दरवाजा बंद केला केशवने.

" आई... दोन चहा घेऊन येते का ? " केशवने आईला बाहेरून आवाज दिला. आणि विवेकला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन आला. घर मोठ्ठ होतं. विवेक बघत होता.

" इकडेच राहणार का ? " विवेकचा पहिला प्रश्न

" काय ? " केशवला समजला नाही प्रश्न.

" म्हणजे इकडेच राहणार का.. कायमचं " ,

" नाही... हे भाडयाने घेतलं आहे... इकडचं काम झालं कि सोडणार हे घर.. बाकी ... तू कसा इथे... " ,

" तुलाच भेटायला आलो आहे... ",

" मला ? मुंबईवरून मला भेटायला आलास... एवढं काय काम आहे माझ्याकडे.. पण मी दिल्लीला आहे हे कोणी सांगितलं.. " बाहेर पावसाने छानपैकी सुरुवात केली होती...

" माझं काम नव्हतं... प्रियासाठी आलो... " प्रियाचं नावं ऐकताच केशव जरा वेगळ्याच प्रश्नार्थक नजरेने विवेककडे बघू लागला.

" प्रियाचा काय संबंध.. ",

" काय संबंध म्हणजे .. ती तुला भेटायला मुंबईत गेली होती. तिथे भेटला नाहीस म्हणून तुझ्या घरी, साताऱ्याला गेलो.. तिथे कळलं तू दिल्लीला आहेस.. म्हणून तिच्यासोबत दिल्लीला आलो. " ,

" काय वेडं -बीड लागला आहे का तुला.. तिला इथे आणायची काय गरज होती... इकडे एकतर किती tension चालू आहेत.. त्यात तिची भर नको... " या वाक्यावर मात्र विवेक संतापला.

" प्रिया काय tension आहे का.. कधीपासून तुला भेटायचा प्रयन्त करते आहे ती.. किती प्रेम करते तुझ्यावर.. तिचं घरीसुद्धा सोडलं तुझ्यासाठी तिने.. ",

" काय गरज होती... तिला घेऊन जा परत तिच्या घरी... मला नाही भेटायचं तिला.. " केशव जागेवरून उठला. केशवची आई चहा घेऊन आली. विवेकचा मूड नव्हता तरी चहा घेतला. थोडावेळ शांततेत गेला.

" आता थेट विचारतो... काय झालंय नक्की ... का पळतो आहेस तू.. " विवेकच्या या प्रश्नावर मात्र केशव चकित झाला.

" बोल.. मला जास्त काही माहित नाही.. पण एवढं माहित आहे कि तू काहीतरी चुकीची कामे करतो आहेस... प्रिया किती हट्टी आहे हे तुलाही माहित आहे.. तिला पुन्हा इकडून घेऊन जायचे असेल तर तिला खरं सांगावे लागेल... बोल केशव.. " केशव गप्प.

थोडयावेळाने बोलला तो... " मी सरकारी नोकरीत होतो.. सुरूवातीला छान सुरु होतं. नंतर मला "आतमध्ये" काय गोष्टी सुरु असतात ते समजलं. त्यातून पैसेही जास्त मिळतात तेही कळलं. खूप पैसे.. मलाही मोह झाला. पैसे घेऊन कामे करायचो. काही confidential गोष्टी बाहेर सांगायचो.. त्याचे पैसे वेगळे आणि जास्त... हे जे बघतो आहेस ना... ते त्या पैशाने.. अशीच एक फाईल मी बाहेर दिली.. यावेळेस ते माझ्यावर उलटलं.. पोलीस मागे लागले. ज्यांच्याकडून पैसे घेतले... त्यांची नावे बाहेर येऊ नये म्हणून तेही मागे लागले. जीवाला धोका होता म्हणून मुंबईतून घरी आली.. पूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीला आलो.. हि कथा आहे.. आता नको आहे काही.. भीती वाटते सर्वांची.. ",

" मग प्रियाला माहित आहे का हे.. ",

" नाही.. तिला कशाला सांगू.. ",

" अरे !! पुन्हा तेच... तुमच्या दोघांचं प्रेम आहे ना... " केशव हसला त्यावर.

" तिचं असेल... माझं नाही... " , बाहेर पावसाचा जोर वाढला होता.

" काय बोलतो आहेस तू.. " विवेक पुन्हा संतापला.

" कॉलेजच्या गोष्टी, कॉलेज संपल्यावरच मी संपवल्या.. प्रिया फक्त मैत्रिण आहे.. फक्त मैत्रीण म्हणून तिचे फोन उचलायचो... नाहीतर तशीही ती irritating आहे. " विवेक उठला आणि केशवची कॉलर पकडली.

" हो.. तुला राग येणारच... best friend ना तिचा.. सॉरी.. पण मी फक्त मैत्री ठेवली... तिला माझ्यात गुंतण्याचे काही कारणंच नव्हतं. तिलाही ते कळायला हवे होते. तिच्याशी बोलणं सोडून दिलं तेव्हाच... तिला मुद्दाम टाळायचो मी.. तिच्या आई-वडिलांचा पत्ता नाही... काकांकडे वाढलेली, जॉब सुद्धा साधा.. मी सरकारी नोकरीत.. माझ्या घरी तिला पसंत केलीच नसती... तसही आता माझं लग्न होणार आहे.. घरच्यांनी मुलगी बघितली आहे.. so.. तिला आणलेस इथपर्यंत... पुन्हा गावाला घेऊन जा... काय.. " केशवने विवेकचे हात कॉलरवरून काढले. पावसाने अचानक सुरुवात केली तसा बंदही अचानक झाला. " आणि तुझ्या माहिती साठी सांगतो... पासपोर्टचे काम सुरु आहे.. ते झालं कि भारताबाहेरच जाणार कायमचा.. " विवेक काय बोलणार या सर्वांवर ... केशवचे ते बोलणे ऐकून निघाला परतीच्या वाटेवर.

हॉटेलवर आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. संदीप आणि प्रिया त्याचीच वाट बघत होते. विवेक जरासा भिजलेला. थंडीने कुडकुडत होता. संदीपने लगेच जेवणाची व्यवस्था केली. विवेक या वेळात पूर्णपणे शांत होता. जेवण झाल्यावर विवेक त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता. प्रिया त्याच्या रूममध्ये आली आणि बाहेर जोरदार वीज चमकून गेली. विवेक खिडकीतून बाहेर बघत राहिला. पाऊस पुन्हा सुरु...

" विवेक !! " प्रियाने हाक मारली.

" हम्म " विवेक तिच्याकडे बघत नव्हता.

" केशवला भेटायला गेला होतास ना.. संदीपने सांगितलं मला ... आधी सांगितलं असतं तर मीही आले असते " विवेक त्यावर काही बोलला नाही.

" चल ना.. आत्ताच जाऊ त्याला भेटायला.. मी तयारी करते... " प्रिया जाण्यास वळली.

" उद्या जाऊ... डोकं जड झालं आहे माझं.. " ,

" उद्या नको.. आताच जाऊ... " प्रिया जवळ येऊन विवेकचा हात ओढू लागली.

" प्लिज प्रिया... हट्ट करू नकोस.. उद्या जाऊ... " विवेक शांतपणे म्हणाला.

" नाही... आत्ताच जायचे आहे मला... चल ना रे... " विवेक आधीच वैतागला होता, त्यात प्रियाचा हट्ट.. संतापला.

" बोलतो आहे ना तुला उद्या जाऊ... कळत नाही का... कशाला हट्ट करतेस... " प्रियाचा हात झटकला त्याने. प्रियाला हे नवीन होते.. असा कधीच विवेक आधी वागला नव्हता....

" मला आताच भेटायचे असेल तर... " प्रियाचाही आवाज वाढला.

" पण त्याला , तुला भेटायचं नसेल तर... !! " विवेक केवढ्याने ओरडला... बाहेर सुद्धा मोठा आवाज झाला विजेचा.. प्रिया ऐकतच राहिली विवेक काय बोलला ते, क्षणासाठी पाणी आलं डोळ्यात तिच्या...

" आणि उद्या निघतो आहे आपण मुंबईला... " ,

" का... भेटायचं का नाही त्याला... तू तुझ्या मनाचं काही सांगतो आहेस... मी त्याला भेटणारच आहे... ", बाहेर तुफान पाऊस सुरु झालेला...

" प्रिया... ऐक... केशवला नाही भेटायचं तुला.. ",

" गप्प रे... असं काही नसेल... तुलाच भेटायला देयाचे नसेल मला, केशवशी... " यावर काय बोलणार विवेक... खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस बघत उभा राहिला...

" तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहे... " ,

" तुला न्यायचे नसेल तर राहूदे... मी जाईन... केलेस तेव्हढे उपकार खूप झाले.. " प्रिया रागात काहीही बोलली. "उपकार" हा शब्द ऐकून विवेक आणखी संतापला.

" उपकार ??? काय बोलते आहेस तू.. उपकार केले तुझ्यावर... तुला माहीत तरी आहे का केशव काय करतो ते..कुठून एवढे पैसे आणतो... पगार किती आणि पैसे किती कमवतो... चुकीच्या मार्गाला लागला आहे तो... " विवेक पट्कन बोलून गेला.

" खोटं आहे हे... केशव नाही करत काही तसं ... ",

" तुला माहित होतं ना हे ... ",

" हो.... पण त्याने कधीच सोडलं ते काम... आता नाही करत... प्रेम तरी करतो ना माझ्यावर तो... ",

" तुला माहित होतं तरी मला सांगितलं नाही तू.. सोडून दे त्याचा विचार... त्याच्या मागे पोलीस लागले आहेत, म्हणून असा पळतो आहे सगळीकडे...आणि प्रेमाचे बोलतेस... त्याने फक्त तुला मैत्रीण मानलं... केशव नाही बरोबर तुझ्यासाठी... विसरून जा त्याला... " यावर प्रिया खवळली.

=========== क्रमश : ================