" काय वेडं -बीड लागलं आहे का तुला... काय करत होतीस... भूत शिरलं आहे का अंगात.. " विवेक वैतागला होता.
" अरे सोडून दे रे ती कंपनी.. एवढं काम करतोस... सुट्टी देऊ शकत नाही तुला.. काय करायची असली कंपनी... " ,
" सोडून दे काय... आता गेलो तरी उभं करणार नाही बॉस... ऐकलंस ना काय बोलला... कायमची सुट्टी घे... तुझ्यामुळे.. थँक्स... " विवेकने हात जोडले आणि बसची वाट बघू लागला. बस स्टॉप वर दोघेच.. जाऊ का ऑफिसमध्ये.. बॉसला सॉरी बोलू ... नाहीतर नको.. डोकं गरम असेल अजून... इतक्यात बस आली. दोघांना जागा भेटली. प्रियाला तशी झोपच आली होती. गाडीत बसल्या बसल्या पेंगू लागली. हळूच विवेकच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली. प्रियाकडे नजर टाकली. कशी लहान मुलासारखी झोपली आहे.. अशीच असायची कॉलेजमध्ये पण.. बिनधास्त एकदम... मनात आलं ते करणारी... पण बदलली नंतर खूप.. केशव आल्यापासून... किती प्रेम करते त्याच्यावर... विवेकचे विचार संपत नव्हते. एकदाचे आले घरी.
दुपारचे जेवण वगैरे आटपून दोघे झोपी गेले. संध्याकाळी , संदीप आला तेव्हा प्रथम विवेकला जाग आली.
" काय रे... कुठे होतास दिवस भर.. जेवलास तरी का ? " ,
" भरपेट जेवून आलो.. तू नको काळजी करुस... " संदीप रिलॅक्स होता अगदी.
" आणि तिकीटे ? ... विमानाच्या तिकिटाचे काय... ",
" हो... मिळतील... उद्या दुपारची .. तेच विचारायला आलो... चालतील का.. जरा जास्त पैसे द्यावे लागतील... समाजलाव काय.. " ,
" जास्त म्हणजे किती ? ",
" तिकीटाची किंमत वेगळी आणि त्याचं कमिशन वेगळं... चालेल तर सांग...तसं त्याला जाऊन सांगावं लागेल आता... " विवेक पुन्हा विचार करू लागला. दिल्लीला तर लवकरच जावं लागेल... जाऊदे पैसे गेले तर... प्रियासाठी करावं लागेल...
" ठीक आहे.. ... जाऊन सांग त्याला ... परंतु पैसे नाही आहेत आता... पैसे सकाळीच ,बँक उघडल्यावर... चालेल ना त्याला... " ,
" यार .. काय तू... पैसे काय पळून चालले आहेत का... दे उद्या... मी तिकीट घेऊन येतो.. " ,
" थँक्स संदीप.. ",
" you have to.... " म्हणत संदीप पुन्हा निघून गेला.
संदीप येईपर्यंत प्रिया जागी झाली होती. विमानाची तिकीटे बघून किती आनंद झाला तिला. विवेकला तर गच्चं मिठी मारली तिने. डोळ्यातून आनंदाश्रू... विवेकलाही गहिवरून आलं. पण दाखवलं नाही त्याने.. थोडयावेळाने ,जेवायला बाहेर गेले तिघेही.. छान गप्पा करत जेवण झालं. घरी आल्याबरोबर, विवेकने जरुरीचे सामान घेतलं. पहिल्यांदा जात होते ना विमानाने... तर तशी तयारी करूनच झोपायची तयारी केली. प्रिया आत, बेडरूममध्ये झोपली. विवेक आणि संदीप ,बाहेर हॉल मध्ये..
" थँक्स संदीप... तुझ्यामुळे आज मोठ्ठ काम झालं माझं.. ",
" you have to... that is that.... ",
" असं का विचित्र बोलतोस मधे मधे... ",
" असंच रे... मज्जा येते.. समोरच्याला आवडते .. ",
"असं आहे तर.. आणि संध्याकाळ पर्यंत कुठे भटकत होतास... ",
" केशवसाठी... त्याच्या- माझ्या ओळखीचे आहेत ना मुंबईत... त्याची आणखी माहिती मिळाली.. " विवेकला आनंद झाला.
" तुला माहिती आहे का... दिल्लीला कुठे आहे केशव ते.. ",
" पूर्ण माहिती नाही... पण आहे... तिथे गेलो कि जरा शोधावं लागेल.. ... समाजलाव काय " ,
" किती मदत झाली तुझी.. मला कसा जमलं असतं हे... ",
" मदत... मदत आमच्यावेळेला करायचे.. आता कसली मदत... " ,
" हो रे... निदान प्रियासाठी तरी... थँक्स ",
" हा तेच... तेच विचारायचे होते... तुला कशी भेटली प्रिया... आणि कुठे... काय गडबड आहे.. लास्ट टाईम पण काहीतरी आत्महत्याचं बोलला होतास... नक्की काय " ,
" थांब.. थांब.. सांगतो.. " विवेकने आत वाकून पाहिलं... प्रिया झोपली होती.
" प्रिया मुंबईत केशवला भेटायला आली होती... त्यांचे आधी काय झालं ते माहित नाही मला.. ती आत्महत्या करत होती.. तेव्हा नशीब, मी होतो तिथे... तिला थांबवलं उडी मारण्यापासून... ",
" एक प्रश्न आहे.. ",
" काय ? ",
" पूर्ण मुंबईत तुलाच कशी दिसली हि.. कि आधीच प्लॅन केला होतास तू.. ",
" काय बोलतो आहेस तू.. मी तिथे असंच गेलो होतो तर प्रिया उडी मारण्याच्या तयारीत होती.. रात्रीची गोष्ट हि... कोणीच नव्हतं तेव्हा तिथे... ",
" तेच तर... तूच कसा तिथे होतास.. म्हणजे देवानेच तुला पाठवलं असेल, खास प्रियासाठी... बरोबर ना.. " विवेक काहीच बोलू शकला नाही... याला काय सांगू... मी सुद्धा जीव देयालाच गेलो होतो...
" एवढं का करतो आहेस प्रियासाठी... ",
" मैत्रीखातर... " ,
" नाही... माझीही मैत्रीण आहे... पण तुझा एवढं तरी केलं नसतं मी... यावरून जरा संशय आला मला.. ",
"कसला ? ",
" प्रिया तुला आवडते ना.. ",
" गप्प रे... दारू पिऊन आलास का ",
" मला काय माहिती नाही.. तुला लहानपणापासून आवडते ती... तू तिला propose सुद्धा करणार होतास... केशव मुळे राहून गेलं.. हे तू मला एकदा बोलला होतास कॉलेजमध्ये.. तुला आठवत नसेल... मला चांगलं लक्षात आहे.. ",
"तसे काही नाही ... झोप चल... उद्या जायचे आहे ना लवकर... " विवेकने विषय बदलला.. आणि विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला.
" एक सांगायचे होते... फक्त ऐक, काही विचारू नकोस.. ",
" सांग " विवेकने आहे तसं उत्तर दिलं.
" काहीतरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे केशव.. म्हणून तो असा पळतो आहे..",
" म्हणजे ? ",
" केशव काहीतरी चुकीची कामे करतो आहे.. त्यातचं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असं वाटते.. नक्की नाही, तरी वाटते... कदाचित प्रियाला ते कळलं असेल.. म्हणून घाबरून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा... तो फक्त मुंबईत भेटला नाही, म्हणून ती स्वतःला संपवेल.. अस मला वाटतं नाही... फक्त हे तिला सांगू नकोस... मी काही सांगितलं ते .. झोप आता... " कहानी मे twist... विवेकला आणखी माहिती हवी होती... परंतु संदीप म्हणाला ना, विचारू नकोस म्हणून... तो झोपी गेला.
=========== क्रमश : ================