मैथिली पण घरी आली आता मात्र तिला लग्नाचा क्षीण जाणवत होता. आणि आजपासून आदिती पण नसणार ह्याच ही दुःख खूप होत तिला. क्षणाक्षणाला तिची आठवण येत होती. पण थकव्यामुळे तिला कधी झोप लागली तिला कळलं ही नाही. दुसऱ्या दिवशी ती सकाळी थोडं उशिराच उठली त्यामुळे तिला खूप फ्रेश वाटत होतं. एव्हाना ती कालच विहान सोबतच भांडण विसारलीही होती. ती होतीच मुळात तशी म्हणजे राग ही लवकर यायचा आणि शांतही तितक्याच लवकर व्हायची. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळी मनात काहीही ठेवत नव्हती. त्यामुळेच ती स्वच्छंदी जगायची. इकडे विहान मात्र अगदी विरुद्ध त्याला स्वतःचा फार अभिमान होता. आणि कुणाचंही न ऐकणारा माझंच खर म्हणणारा आणि मैथिलीने केलेला अपमान तर तो विसरणं शक्यच नव्हतं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी रोखठोक भेटलं होत. त्याला तीच नाव अजूनही माहिती नव्हत. 'विहान तू काल आदितीची बहीण बघितली का?', त्याच्या आई ने विचारलं. 'आई, मी मुली बघायला नव्हतो गेलो आणि मी मुळात भारतात फक्त आणि फक्त दुष्यंत च्या लग्नासाठी आलो होतो हं!', तो म्हणाला. 'अरे हो किती दिवस असे दुसऱ्यांचेच लग्न attend करणार. आपलं पण बघा काहीतरी.', त्याची आई म्हणाली 'आणि ह्या वेळेस तर मी तुझं ऐकणार नाहीच अजिबात आणि मुळात तू आता पुढंचे 3 महिने इथेच आहे ह्या 3 महिन्यात तर मी जमावणारच.' त्याची आई म्हणाली. 'आई यार!! नको ना सुरू होऊ. नाहीतर मी निघून जाईन हा', विहान वैतागून म्हणाला. 'हे बघ उगाच चिडू नको मी काही तुझं ऐकणार नाही. तू मैथिलीला भेटून घे एकदा. मला तर खूप आवडली ती. मी आदितीच्या आईशी बोलले तस. त्या बोलणार आहेत तिच्या आईवडिलांना.', 'बर अजून बोलल्या नाही ना त्या बोलल्यावर बघू.', तो म्हणाला. 'कुठली मैथिली काढली आई ने काय माहिती, मला तर लग्नामध्ये अशी कुठली मुलगी पहिल्याचं आठवत नाही शिवाय त्या झाशीच्या राणीच्या.. तिनेच डोकं खराब केलं सगळं.', तो मनातच विचार करत होता.
'वहिनी विहान खरच खूप चांगला मुलगा आहे, शिवाय दुष्यंतचा मामेभाऊच आहे आणि आपल्याच नात्यातला. आता तर काय हरकत आहे मैथिलीसाठी बघायला. त्याच्या आई वडिलांना आपली मैथिली इतकी आवडली की त्यांनी लगेच मागणीच घातली. तो तसा scotland ला असतो पण खास लग्नासाठी भारतात आला आहे आणि सध्या 3 महिने इथेच राहणार आहे.', 'हो तुमचं सगळं खरं आहे ताई पण मला मैथिलीशी बोलावं लागेल. ती तर सध्या लग्नाला नाहीच म्हणतिये.', 'अहो तिला काय कळतं, ती नाहीच म्हणणार. तुम्ही तयार करा ना तिला. इतक सुंदर ठिकाण पुन्हा नाही मिळणार ना आणि हवं तर एकदा त्याला भेटून तर घे म्हणा आणि भेटल्यावर त्याला मैथिली नाही म्हणूच नाही शकणार.', तिची आत्या समजून सांगायचा प्रयत्न करत होती. 'आणि मी दादाला पण बोलते त्याला पण आवडेलच.', 'तरीही मी एकदा मैथिलीशी बोलून बघते' तिची आई म्हणाली. 'बर तुम्ही बोला. मी निघते. मला बरेच काम आहेत', असं म्हणून तिची आत्या निघाली. 'आई आज आत्या आली होती ना ग!', मैथिलीने विचारलं. 'हो आल्या होत्या, आताच गेल्या.', तिची आई म्हणाली. 'इतक्या सकाळी सकाळी काय काम काढलं होत तिने आणि लगेच गेलीही मला न भेटता.' 'अग मैथिली बस 2 मिनटं', तिच्या आईने तिला जबरदस्तीने बसवलं आणि फोन बाजूला ठेव तू आधी.'हो ग आई, तू बोल, आहे माझं लक्ष तुझ्या बोलण्याकडे. तुला अस वाटत की माझं फक्त फोन मधेच असत लक्ष, पण अस नाही.' 'बर ऐक! आत्या आली होती न तर ती सांगत होती की दुष्यंतचा मामेभाऊ scotland ला असतो खूप हुशार आहे आणि पॅकेज पण चांगलं आहे.' तिची आई बोलत होती. 'किती कौतुक असत गं तुम्हाला दुसऱ्यांच्या मुलांचं. आम्ही पण जाऊ एक दिवस', मैथिली म्हणाली. 'हो गं! तू जाणारच त्यात मला शंकाच नाही पण बघ म्हणजे तुला आताही चान्स आहे', तिची आई म्हणाली. 'म्हणजे? आई स्पष्ट बोल ग. मला काही कळत नाही आहे तुला काय म्हणायचं', ती फोन मध्ये बघूनच बोलत होती. 'म्हणजे आत्या अस म्हणत होती की त्याच्यासाठी ठिकाण बघणं चालू आहे तर त्याच्या आई वडिलांना तू आवडली.' 'काय!!!आई आपलं ठरलं आहे हा सध्या हा विषय नको म्हणून. का तू आत्त्याच्या बोलण्यात आली?', आता मात्र मैथिली चिडलीच. 'मी नाहीच म्हंटल. अग तुझी इच्छाच नाही म्हणून सांगितलं, पण मला काय वाटत की एकदा भेटून घे म्हणजे आत्याला वाईट वाटायला नको ग!', तिची आई तिला म्हणाली. 'आई हवं तर मी बोलते आत्याला, पण मी ह्या भानगडीत च पडणार नाही.', मैथिली म्हणाली. 'ते तू आणि आत्या बघ पण आत्याला वाईट वाटेल ग तू नाही भेटलीस तर. माझं म्हणणं काय आहे की तू फक्त भेट. लग्न तर करायचंच नाही पण भेटायला काय हरकत आहे आणि नाही आवडला तर नाही म्हण म्हणजे बघ ना कुणीही दुखावल्या जाणार नाही आणि मुळात आपल्यालाच लग्न करायचं नाही पण तरीही मला वाटत तू भेटावं.', तिची आई बोलत होती. मैथिलीला तिच्या आईच बोलणं पटलं, 'आता आपण भेटलो नाही तर कायमच आपल्याला ऐकावं लागेल आणि असंही नाही म्हणायचं, तसही नाहीच म्हणायचं, मग भेटून नाही म्हणायला काय जातंय', तिने विचार केला. 'okk मी रेडी आहे भेटण्यासाठी!', ती म्हणाली. तिच्या आईचा तर विश्वासच बसत नव्हता की ही इतक्या लवकर तयार कशी झाली. तिला वाटलं होतं की खूप पापड बेलावे लागतील मैथिलीला तयार करायला. पण तिने चक्क भेटायला हो म्हंटल आणि तेही आढेवेढे न घेता. थांब हा मी आत्याला कळवते. तिची आई उत्साहाने फोन करायला उठली. मैथिली मात्र एकदम relax होती तिने अजिबात टेन्शनच नाही घेतलं. तिच्या डोक्यात प्लॅन फिक्स होता भेटायचं आणि नाही म्हणायचं. उगाच कोणाला दुखवायचं नाही म्हणून ती तयार झाली होती. 'अरे नाव पण नाही विचारलं आपण त्याच. ज्याला मी reject करणार', 'आई ए आई' तिने आवाज दिला. 'काय ग? का ओरडतीये?', 'ओरडत नाही आहे, आवाज दिला तुला. बर काय नाव म्हणालीस त्या मुलाचं?', मैथिली ने विचारलं. 'काहीतरी विहान अस म्हणाली बघ आत्या.', 'विहान कुठे तरी ऐकलं हे नाव कुठे बर..', मैथिली डोक्याला ताण देऊन बघत होती पण तिला काही आठवलं नाही. 'जाऊद्या कोणीही का असेना विहान मिहान मला तरी काय करायच. शेवटी नाहीच म्हणायचं.'