chandani ratra - 11 in Marathi Love Stories by Niranjan Pranesh Kulkarni books and stories PDF | चांदणी रात्र - ११

Featured Books
Categories
Share

चांदणी रात्र - ११

रात्री सात वाजता संदीप, मनाली आणि वृषाली कॉलेजात पोहोचले. वृषालीने मनालीला राजेशबद्दल विचारलं. तो ठीक असल्याचं मनालीने सांगितलं. तसेच आता फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे असा सल्लाही तिने वृषालीला दिला.

एकूण चार मुलं आणि चार मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. होस्टने घोषणा करताच पहिला स्पर्धक विक्रांत स्टेजवर आला. तो किशोर कुमारचं ‘पल पल दिल के पास’ हे गाणं गाणार होता. त्याने हातात माईक धरला व गाणं गायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे सूर चुकत होते. त्याची देहबोली पाहून त्याला स्टेजवर गायची फारशी सवय नसावी असं वाटत होतं. गाण्याच्या उत्तरार्धात त्याने स्वतःला सावरलं. गाणं संपलं. सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला. सुरुवातीला त्याचा सूर जरी हलला असला तरी पुढे त्याने जो सूर पकडला तो शेवटपर्यंत सोडला नाही.
पुढचं गाणं अफसाना नावाच्या मुलीने गायलं. तिने लुटेरा चित्रपटातलं “सवार लू” हे गाणं गायलं. अफसानाचा आवाज अतिशय गोड होता व तिची तयारी सुद्धा चांगली होती. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिच्या गाण्याला दाद दिली. आता संदीपची वेळ होती. तणाव त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मनालीने नजरेनेच त्याला धीर दिला. संदीप स्टेजवर गेला. त्याने “खमोशिया” गाणं गायला सुरुवात केली. स्टेजवर जाऊन एवढ्या लोकांसमोर गाणं गायची संदीपची ही पहिलीच वेळ होतं. त्याने आज बराच वेळ प्रॅक्टिस केलं होतं. गाणं वरच्या पट्टीत असल्यामुळे गाताना त्याला दम लागत होता. त्यामुळे त्याचे सूर वारंवार हलत होते. गाणं संपलं. मनालीच्या चेहेऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती पण ती संदीपला काही बोलली नाही. वृषालीचं मात्र कशाकडेच लक्ष नव्हतं. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. संदीपचं गाणं संपताच होस्टने वृषालीच्या नावाची घोषणा केली आणि ती स्टेजवर गेली. तिने डोळे मिटले. राजेशचे शब्द तिला आठवले व तिने पूर्ण लक्ष गाण्यावरच केंद्रित करायचं ठरवलं. वृषालीने “मेहेंदीच्या पानावर” हे गाणं गायला सुरुवात केली. तिचा आवाज तर सुंदर होताच पण ती एखाद्या सराईत गायिकेसारखं गात होती व सर्वजण मंत्रमुग्ध होऊन तिच्या गायनाचा आस्वाद घेत होते. गाणं संपताच वृषालीने डोळे उघडले व समोरचं दृश्य पाहून ती भारावून गेली. सर्व श्रोते उभे होते व टाळ्यांच्या कडकडाटाने पूर्ण सभागृह दुमदुमलं होतं.
वृषालीनंतर पुढच्या स्पर्धकांनी आपापली गाणी सादर केली व स्पर्धेची सांगता झाली. रात्रीचे नऊ वाजले होते. वृषाली, मनाली व संदीपने घरी जाण्याआधी हॉस्पिटलमध्ये जाऊन राजेशला भेटण्याचं ठरवलं. ते राजेशच्या वॉर्डमध्ये पोहोचले. अजूनही राजेश बेडवर आडवा पडला होता. त्याच्या गुढग्याभोवती एक कापडी पट्टी बांधली होती. फाटलेले लिगामेंट बदलण्यासाठी सर्जरी करावी लागणार होती. राजेशचे आईबाबा बाजूलाच खुर्चीवर बसले होते. राजेशने सर्वांची ओळख करून दिली. वृषालीचं गाणं फार छान झाल्याचं मनालीने राजेशला सांगितलं. “वृषाली जिंकणार यात काहीच शंका नाही. तुझ्या घरी जेव्हा पहिल्यांदा मी तिचं गाणं ऐकलं होतं तेव्हाच मला तिची तयारी समजली होती.” राजेश मनालीला म्हणाला. वृषाली नुसतं हसली. थोडावेळ गप्पा मारून मनाली, संदीप आणि वृषाली तिथून निघाले.

X X X X X X

स्पर्धा संपून आता बरेच दिवस झाले होते. राजेशच्या पायाची सर्जरीसुद्धा झाली होती. तो आता त्याच्या गावी होता. अजून त्याला आधाराशिवाय चालायला डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती. आईकडून लाड करून घ्यायची आयती संधी मात्र त्याला मिळाली होती. घरात सध्या फक्त राजेशच्याच आवडीचे पदार्थ बनत होते. इतके दिवस कॉलेज बुडाल्याने राजेशला परीक्षेची काळजी वाटत होती. वार्षिक परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली होती. घरी राजेशचा आभ्यास सुरू होता. पण मनासारखा आभ्यास होत नव्हता.

मागच्याच आठवड्यात मनाली, वृषाली आणि संदीप राजेशच्या गावी येऊन त्याला भेटले होते. अपेक्षेप्रमाणे गायनाच्या स्पर्धेत वृषालीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. राजेशला वृषालीला खूप काही सांगायचं होतं. पण का कोणजाणे त्याला शब्दच सुचत नव्हते. वृषाली मात्र फार खुश दिसत होती. जाता जाता ती राजेशला म्हणाली होती, “केवळ तुझ्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले.” तिला आपल्याला अजूनही काही सांगायचंय पण ती सांगत नाहीये हे राजेशला जाणवलं. कदाचित संदीप आणि मनालीसमोर तिला बोलता येत नसेल हा विचार राजेशच्या मनात आला होता.

एकाच जागी बसून राजेश आता कंटाळला होता. अजून एक महिना त्याला हे सहन करायचं होतं. त्याला आपण कधीएकदा परत कॉलेजला जातोय असं वाटत होतं.

संदीपचा आभ्यास जोरात सुरू होता. प्रेमाच्या आघाडीवर देखील तो बराच पुढे गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मनालीला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या व मनालीने देखील क्षणाचाही विलंब न करता त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. ते दोघेही राजेश परत यायची वाट पाहत होते. वृषालीचं तर राजेशशी फोनवरून रोज बोलणं व्हायचं. राजेशच्या गावी बऱ्याच वेळा फोनला रेंज नसायची. त्यामुळे एखादा दिवस जर फोन करता नाही आला तर राजेश अस्वस्थ व्हायचा.

दिवसांमागून दिवस जात होते. परीक्षा अवघ्या महिन्यावर आली होती. आता राजेशला आधाराशिवाय चालता येत होतं पण अजून काही दिवस डॉक्टरांनी थोडंच चालायला सांगितलं होतं. तसेच डॉक्टरांनी दिलेले व्यायाम देखील राजेशला करावे लागत होते. आपण कधीएकदा पुण्याला जातो असं राजेशला झालं होतं. त्याच्या आईवडिलांना मात्र त्याची काळजी वाटत होती. पण एवढे दिवस कॉलेज बुडालं होतं त्यामुळे आता अजून जास्त उशीर करून चालणार नव्हतं. खरंतर परिक्षेपेक्षा त्याला अजून एका गोष्टीची जास्त काळजी वाटत होती. काही दिवसांपासून वृषालीने त्याचा फोन घेणंच बंद केलं होतं. तिला नक्की काय झालय हेच त्याला कळत नव्हतं. त्याच्या मेसेजनासुद्धा तिने रिप्लाय दिला नव्हता. याबद्दल त्याने मनालीला विचारलं. पण तिला देखील तसाच अनुभव आला होता. वृषाली मनालीचे कॉल्स देखील घेत नव्हती. आज ती कॉलेजला सुद्धा आली नव्हती.

X X X X X X

राजेशला भेटून वृषाली पुण्यात आली व घरी पोहोचली. अचानक तिला सुमितची आठवण झाली. सुमितला झालेला अपघात व आता राजेशचा अपघात या दोन घटनांची तुलना तीचं मन तिच्या नकळत करत होतं. आता ती जुन्या कटू आठवणींमध्ये पूर्णपणे हरवून गेली होती. तो दुर्दैवी प्रसंग जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला……..वृषाली आणि सुमित जागृतीच्या घरातून बाहेर पडले. दोनच्या आत त्यांना स्टँडला पोहोचायचं होतं. सुमित गाडी खूप वेगात पळवत होता. पण मधेच एका रस्त्याला बरच ट्राफिक होतं. तिथेच त्यांची पंधरा मिनिटं गेली. वृषालीने घड्याळात पाहिलं. थोडाच वेळ बाकी होता. तिने सुमितला गाडीचा वेग अजून वाढवायला सांगितलं. त्यांच्या उजव्या बाजूने एक ट्रक जात होता. ट्रकवाल्याने डाव्या बाजूच्या इंडिकेटर दिला व ट्रक अचानक वळला. सुमितची गाडी ट्रकवर आदळली. एका क्षणात सुमित गतप्राण झाला. त्याचं डोकं ट्रकवर आदळून फुटलं होतं…………वृषालीला नुसत्या आठवणीनेच अंगावर काटा आला. तिच्या मनातील अपराधीपणाची भावना पुन्हा जागी झाली. ‘माझ्यामुळेच सुमित मेला. मी सांगितल्यामुळेच सुमितने गाडीचा वेग वाढवला.’ हे विचार वारंवार तिचं मन कुरतडू लागले. तिने किती जरी प्रयत्न केला तरी हे विचार तिच्या मनातून जातच नव्हते. ती जेव्हा राजेशशी फोनवर बोलायची तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना तिचं मन रूळावर यायचं. एरवी मात्र तिची अवस्था बिकट असायची. कॉलेजमध्ये सुद्धा तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. तिथे देखिल हेच विचार तिच्या मनावर कब्जा करायचे.

वृषालीच्या आईला देखील समजत होतं की आपली मुलगी उदास असते, स्वतःच्याच विचारात हरवल्यासारखी वाटते. खूप वेळ विचारल्यानंतर वृषालीने तिचं मन आईसमोर मोकळं केलं. “आता मला जगावसच वाटत नाही.” या तिच्या शेवटच्या वाक्यानंतर तिच्या आईला धक्काच बसला. आता तर वृषालीने कॉलेजला जायचंपण सोडलं होतं. तिच्या खोलीत ती कुठेतरी शून्यात पाहत असल्यासारखी एकटक पाहत बसायची. मध्येच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे. तिच्या आईवडिलांना तिची ही अवस्था पाहवत नव्हती. मानसोपचार तज्ञाचे उपचार सुरू होते. पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता.

X X X X X X

राजेश इतक्या दिवसांनंतर आज कॉलेजला आला होता. कॉलेजमध्ये वृषाली कुठेच दिसत नव्हती. कॉलेज सुटल्यानंतर राजेशने मनालीला वृषालीबद्दल विचारलं. दोन दिवसांपासून वृषाली कॉलेजला आली नसल्याचं मनालीने त्याला सांगितलं. तसेच तिचा फोन बंद असल्याचंही तिने राजेशला सांगितलं. राजेशला तिची फार काळजी वाटत होती. वृषालीला नक्की काय झालंय ते समजण्याचा आता एकच मार्ग होता.

राजेश, मनाली आणि संदीप वृषालीच्या घरी पोहोचले. वृषालीच्या आईने दरवाजा उघडला. तिच्या चेहेऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वृषालीच्या आईने त्या तिघांना सर्वकाही सांगितलं. आता त्यांना तिच्या नैराश्यामागचं कारण समजलं होतं. आता तिघे वृषालीला भेटण्यासाठी तिच्या खोलीत आले. वृषाली बेडवर बसली होती. ती फारच अशक्त दिसत होती. ती समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत होती. तिच्या चेहेऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. तिने मनाली, संदीप आणि राजेशकडे पाहिले पण काहीच संबंध नसल्याप्रमाणे तिने नजर पुन्हा भिंतीकडे वळवली. राजेशसाठी हा धक्का होता. “वृषाली” राजेशने वृषालीला हाक दिली. पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. राजेशला काय करावं तेच कळत नव्हतं. त्याने पुन्हा वृषालीला हाक मारली पण पुन्हा तेच. आता मात्र राजेशचा संयम सुटला. तो पुढे गेला व वृषालीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवू लागला. वृषालीने एकदा राजेशकडे पाहिलं पण तिच्या नजरेत ओळखीची कोणतीच खूण नव्हती. संदीप पुढे गेला व त्याने राजेशला मागे ओढला. राजेशच्या डोळ्यातून निघालेला अश्रूचा थेंब त्याच्या गालावर विसावला. संदीप आणि मनालीने ओढतच राजेशला त्या खोलीबाहेर आणलं. थोड्यावेळाने राजेश भानावर आला. काहीही करून वृषालीला या आवस्थेतून बाहेर काढायचं त्या तिघांनी ठरवलं होतं.

क्रमशः