भाग ७ - दुख्खद वार्ता
प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.
शास्ताखानाची मोहीम फत्ते झाली होती. चारपाचशे मुघल कापले गेले होते तर पाच पन्नास मावळे कामी आले होते. पण शास्ता खानाला जीवानिशी मारता आले नाही, म्हणून राजे जरा विचारात पडले होते. कारण, अजून जर खान थांबला तर मात्र स्वराज्यातील जनतेला होणार त्रास कसा थांबवावा? दुसऱ्या दिवशी जखम दरबारामध्ये खानाच्या छाप्यामध्ये कामी आलेल्या मावळ्यांची नावे वाचून दाखवली जात होती. शिवा पांढरेचं नाव ऐकताच येसाजी कंकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पथकातील तरबेज अन हरहुन्नरी मावळा म्हणून तो सगळ्यांना परिचित होता.
दोन दिवस होत आले होते. छाप्यामध्ये बेपत्ता किंवा कामी आलेल्या मावळ्यांच्या यादीतले रोज दोन चार दोन चार मावळे गडावर परतत होते. येसाजी, तानाजी त्यांना पाहून आनंदित होत होते. पण येसाजींना शिवा बद्दल काहीच खबर मिळत नव्हती. तिसऱ्या दिवशी गडावर खबर मिळाली कि, 'शास्ताखान पुणे सोडून निघून चालला आहे.' राजांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वराज्य शास्ताखान नावाच्या कळीकाळाच्या मगरमिठीतुन सहीसलामत सुटलं. आजही सात आठ मावळे गडावर जखमी अवस्थेत दाखल झाले होते. येसाजींनी सगळ्यांची विचारपूस केली अन त्यांना उपचारासाठी पाठवून आराम करण्यास सांगितले. मावळ्यांकडे शिवाबद्दल विचारपूस केली, मात्र त्यांनाही शिवाबद्दल काहीच कल्पना नव्हती.
सदरेवर येसाजींनी शिवाबद्दल राजांच्या कानावर घातलं.
"राजं... तीन दिवस झाले. शिवाबद्दल काही खबर नाही. त्याच्या घरच्यांना..."
राजे शांत स्वरात म्हणाले, "हम्म.. आम्हीही तोच विचार करतो आहोत."
"येसाजी, शिवाच्या गावी लागलीच खबरगीर पाठवा. अन त्याच्या कुटुंबियांना गडावर बोलावून घ्या.",
"जी राजं...", येसाजींनी राजांना मुजरा केला अन सदर सोडली. घोडेस्वार शिवाच्या गावाकडे दौडू लागला.
शिवाची खबर मुढाळ गावात वाऱ्यासारखी पसरली. साऱ्या गावावर शोककळा पसरली होती. शिवाच्या घरी तर त्याच्या आईचे रडून रडून वाईट हाल झाले होते. पाटलांच्या घरी खबर मिळाल्या पासून पारू तर गप्प झाली होती. पाटलांनी स्वतः शिवाच्या आईबापासाठी घोडा गाडीची व्यवस्था केली होती. शिवाय स्वतः पाटील, पारू, पारूची आई अन चार पाच माणसं बरोबर घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजगडाच्या वाटेने पाटलांचा जथ्था मार्गक्रमण करू लागला.
आदल्या दिवशी पाटलांच्या पाहुण्यांच्या घरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे गडावर पोहोचले. शिवाच्या घरची मंडळी आली आहेत, हे समजताच राजांनी आपलं कामकाज थांबवलं. त्यांना सदरेवर येण्यासाठी सांगावा पाठवला. येसाजी कंक आधीपासूनच सदरेवर हजर होते. शिवाचे आई बाप, पाटील अन त्यांचं कुटुंब यांनाच राजांसमोर सदरेवर घेऊन जाण्यात आलं. सदरेवर येताच राजांनी त्यांना जवळचा आसनावर बसवले.
"शिवाने खूप मोठा पराक्रम केला. स्वराज्याच्या सेवेसाठी, आमच्या साठी त्याला वीर मरण आलं. आम्हालाही खूप दुःख झालं. आमच्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या, जीव देणाऱ्या मावळ्यांना पाहून कधी कधी वाटतं, उगाच आम्ही या स्वराज्याचा अट्टहास धरून बसलो आहोत. आई बाबा... कोण म्हणतो तुमचा शिवा गेला? हा काय तुमच्या समोर तुमचा शिवा उभा आहे." राजे झटकन शिवाच्या आई बाबा समोर गुडघ्यांवर बसले.
"आजपासून या शिवाजीलाच तुमचा शिवा समजा...", बोलता बोलता राजांच्या डोळ्यांत अश्रू दाटले अन राजांनी झुकून शिवाच्या आईचे पाय धरले.
राजांचे हे रूप पाहून शिवाच्या आई बापाला गहिवरून आले. राजांना उठवत शिवाचा बाप म्हणाला, "न्हाय रं.. न्हाय माझ्या राजा.. आरं तु हाय म्हणून आमच्या सारखी माणसं सुखानं दोन घास खात्यात. न्हायतर, हि मुघली लांडगं आमचं लचकचं तोडाय बसली व्हती. सवराज्यासाठी आणखी शंभर पोरं बी द्यायला, ह्यो पांढरे धनगर माग फूड नाय बगणार...!!", राजांचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते. राजांनी येसाजींना खूण करताच, दोन हुजरे हातात चांदीची तबके घेऊन आले. राजांनी स्वतःच्या हाताने एक तबक बाबांच्या हाती दिलं. त्यामध्ये सोनेरी मूठ असलेली तलवार अन मानाची वस्त्र होती. तर दुसरे तबक कि ज्यामध्ये साडी चोळीची वस्त्र होती, राजांनी शिवाच्या आईकडे दिले.
राजे म्हणाले, "येसाजी, शिवा तुमच्या पथकात होता. त्याच्या कुटुंबियांना कळू द्या त्याचा पराक्रम."
येसाजींनी घडलेला प्रसंग सान्गायला सुरुवात केली.
क्रमशः