बघता -बघता संध्याकाळ झाली. रात्रीचे ८ वाजले होते, तेव्हा विवेक घरी आला.बऱ्याच वर्षांनी एवढा निवांत वेळ मिळाला होता त्याला. बघतो तर प्रिया अजूनही त्याच्या घरीच... रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झालेली. त्यात प्रियादेखील मदत करत होती. हिला काय बोलू आता... स्वतःच घर सोडून आली आहे....त्याचं काहीच नाही, ठेवणार कुठे हिला.. विवेक आत आला आणि काहीतरी खूण करून त्याने प्रियाला बाजूला बोलावलं.
" काय चालू आहे तुझं ? ",
" मस्त बेत आहे तुझ्यासाठी... सॉलिड जेवण बनवलं आहे तुझ्यासाठी ..... ",
" जेवणाचे नाही विचारलं... तुझ्या राहण्याची सोय काय...... आता तर रात्र पण झाली.. " तेव्हा प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडला, घाबरली.
"खरंच रे... दिवसभर लक्षातच आलं नाही.. काय करूया.... " .
" एकचं पर्याय आहे... तुझ्या घरी जा.... " ,
" नाही... अजिबात नाही.. गेले तरी काका उभे करणार नाहीत.. एवढी काय काय बोलली त्यांना.. " प्रिया नाराजीच्या स्वरात बोलली.
" तरीसुद्धा तिथेच जावं लागेल... मी येतो सोबत... चल.. " विवेक निघाला पण प्रिया जागच्या जागी उभी...
" आता आलास ना... परत कुठे निघालास . " आईने आवाज दिला.
" प्रियाला घरी सोडून येतो... "
"जेवून जाईल ना ती " आई बाहेर येत म्हणाली. " पहिली कशी एक दिवस आड घरी जेवायला यायची... आता तू नसतोस तर हि फिरकत सुद्धा नाही इथे... आज जेवूनच पाठवणार तुला.. " झाली परत पंचाईत... आईला खरं सांगू का प्रियाबद्दल... नको राहूदे.. परत काही वाईट वाटायला नको प्रियाला...
रात्री जेवून वगैरे पुन्हा गप्पा रंगल्या , विवेकच्या मुंबईच्या गोष्टी... प्रियाच्या वायफळ गप्पा... लहानपणीच्या आठवणी.. रात्रीचे १२ वाजले तरी सुरूच गप्पा...
" आता गप्पा पुरे... झोपा सगळ्यांनी... " विवेकचे वडील घडाळ्यात बघून बोलले.
" प्रिया.. तू थांब आज इथेच.. एवढ्या रात्रीची नको जाऊस घरी... " विवेकची मोठी बहीण म्हणाली.
" कशाला राहू दे.. मी सोडतो घरी तिला... जागा कुठे आहे आपल्याकडे तिला ठेवायला.. " विवेक मधेच बोलला.
" तुला काय अडचण रे... एवढ्या वर्षांनी भेटली मैत्रीण... राहू दे ना तिला.. आणि पहिली जागा नव्हती घरात... आता नाही.. तू जा तुझ्या खोलीत... प्रिया आमच्या सोबत झोपेल... " प्रियाला बरंच झालं. विवेककडे वेडावून दाखवत , त्याच्या बहिणीसोबत दुसऱ्या खोलीत गेली.
विवेक तिच्याबद्दल विचार करत झोपी गेला. रात्री कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली. बाकी सर्व गाढ झोपेत.. कसला तरी आपटण्याचा आवाज येत होता... विवेक वरच्या खोलीतून खाली आला. दरवाजा उघडा... हवा सुटली होती ना, दरवाजा आपटत होता, त्याचा आवाज होता तो...दरवाजा उघडा ठेवून झोपले कि काय... काय माणसं आहेत.. म्हणत दरवाजा बंद करायला विवेक पुढे आला. घरासमोरचं , काही अंतरावर एक विहीर होती. रात्रीचं स्पष्ट दिसत नसलं तरी विहिरीच्या कठडयावर कोणीतरी उभं आहे असा भास त्याला झाला. कुतूहलाने विवेक बाहेर आला. विहिरीकडे निघाला. जसा विहिरीजवळ आला, तसं त्याला दिसलं. प्रिया होती ती... बापरे !!!...... " थांब प्रिया !! " विवेक जोराने ओरडला. प्रियाने मागे वळून पाहिलं, हसली... हाताने " ta - ta " केलं आणि सरळ विहिरीत उडी मारली. विवेक धावतच विहिरीजवळ पोहोचला... प्रियाला बघू लागला.. खालचे काहीच दिसत नव्हतं. विवेक आणखी वाकून बघू लागला. अचानक आपल्या मागे कुणीतरी आहे, असं विवेकला वाटलं. मागे पाहिलं त्याने. केशव !!... केशवचं होता तो.. अजून एक आवाज आला... " समाजलाव काय ? " संदीप सोबतीला... दोघांनी मिळून विवेकला पकडलं आणि तसंच विहिरीत ढकलून दिलं.
विवेक खडबडून जागा झाला. आजूबाजूला बघू लागला. घामाघूम झालेला. आपण आपल्या खोलीत आहोत, जिवंत आहोत, हे समजायला जरा वेळ लागला. काय भयंकर स्वप्न होते , विवेकने स्वतःला आरशात पाहिलं. सगळे अवयव नीट आहेत ना, ते तपासलं. जरा नॉर्मल झाला आणि अंघोळीसाठी खाली आला. अंघोळ वगैरे करून आईला बघत बघत किचन मध्ये आला.
" उठलास बाळा.. पोहे केले आहेत.. ",
" छान ... आणि बाकीचे कुठे गेले... आवाज नाही कुणाचा.. " विवेक कानोसा घेत म्हणाला.
" देवळात गेल्या पोरी.. अनघा कामाला गेली.. तुला पण घेऊन जाणार होत्या.. मीच बोलले.... झोपू दे... ",
"अनघा एवढ्या लवकर जाते कामावर... " विवेक पोहे खात म्हणाला.
" लवकर ? ... घड्याळात बघ... म्हणे लवकर... " आई हसत हसत दुसऱ्या कामाला लागली.
च्यायला !! ११ वाजले... एवढा वेळ झोपलो... मुंबईत तर ११ ला अर्धा दिवस संपलेला असतो ऑफिसमध्ये.. विवेक मनोमन हसला त्यावर.. तेव्हाच सकाळचं स्वप्न , प्रिया , केशव आणि प्रामुख्याने संदीपची आठवण झाली. उरलेले पोहे पटापट खाऊन , आईला सांगून तो संदीपकडे निघाला. जाता -जाता विहिरीत डोकावून पाहिलं. आणि पुढे गेला.
वाटेतच प्रिया आणि मोठी बहीण भेटल्या. प्रियाला घेऊन तो संदीपकडे पोहोचला. अनघा होती दुकानात.
" तू काय करतेस इथे ? " विवेकचा प्रश्न..
" दादा !! विसरलास... मी जॉबला आहे इथे.. ",
" सॉरी.. लक्षात नाही राहीलं.. एखादी चांगली नोकरी बघ ना ... इथे काही होणार नाही.. " विवेक अनघाला समजावत म्हणाला.
" चांगली नोकरी ??.. आमच्यावेळेला असायची चांगली नोकरी ... समाजलाव काय... " ,मागून संदीपचा आवाज आला. याचे परत सुरु होण्याआधी याला बाहेर घेऊन जाऊ. मनात म्हणत संदीपला घेऊन बाहेर आला.
"बोल... काही माहिती आहे मिळाली का केशव बद्दल... " विवेक...
" हो ... माझ्याकडे माहिती आहे.. बाकीच्यांनी अजून माहिती पुरवली. केशव कूठे आहे हे कळलं. " संदीप हळू आवाजात बोलला. त्यावर प्रिया टाळ्या वाजवू लागली.
"गप ग जरा.. त्याचं बोलणं पूर्ण होऊ दे.. केशव कूठे आहे संदीप ",
" keshav is going Delhi that is.... " संदीप इंग्लिश मध्ये बोलला. काय बोलतो हा माणूस...
" सरळ बोल रे... " ,
" you have to... ", संदीप बोलला.
"काय ? " विवेक विचारात... प्रिया हसू लागली.
" काय जोक करतात रे तुम्ही... " प्रिया किती हसत होती. ... you have to...म्हणजे काय... काय चाललंय यांचे...
" केशव दिल्लीला गेला आहे.. " संदीप प्रियाकडे बघत म्हणाला. तसं तिचं तोंड एवढंसं झालं.
" तुला रे नीट बोलताच येत नाही का... " संदीपला विवेक ओरडला.
"तुला इंग्लिश समजत नाही ,त्यात माझी काय चूक... शिकून घे ना.. सोपी असते... समाजलाव काय.. " काय बोलू याला....
" केशव दिल्लीला का गेला... ",प्रियाचा प्रश्न..
" ते त्यालाच माहित... ",
"आता रे ... काय करायचं... ",
" काय म्हणजे... मी जाणार मुंबईला.. तू तुझ्या घरी... संपला विषय.. आजच संध्याकाळी निघतो मुंबईला... " विवेक खुशीने म्हणाला.
" अजिबात नाही हा.. तू बोलला होतास... केशवची भेट घडवून आणीन.. तू असा मला एकटीला सोडून जाऊ शकत नाही.. " प्रियाने विवेकचा हात पकडून ठेवला.
" हि काय जबरदस्ती आहे... केशव दिल्लीला गेला, तुला तुझ्या घरी आणून सोडलं... मी कशाला थांबू आता.. ",
" जबरदस्ती आमच्यावेळेला होयाची... आता कसला काय... " संदीप मधेच बोलला.
" तू गप्प रे... काय बोलतोस ते तुला तरी कळते का.. " विवेक...
"you have to..." संदीपचा त्यावर रिप्लाय... पागल आहेत दोघेही..
" हात सोड प्रिया... लोकं बघत आहेत... ",
" बघू दे... तुला यावंच लागेल माझ्याबरोबर.. ",
" कुठे ? " प्रिया विवेकचा हात ओढत होती, विवेक तिच्यापासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता.. आणि संदीप शेजारीच उभा राहून , त्यांची "रस्सीखेच" बघून मज्जा घेत होता.
" दिल्लीला... केशवला शोधायला... " प्रिया म्हणाली.
"दिल्ली " हे नावं ऐकताच क्षणभर विवेकची ओढाओढ थांबली. दोघे एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले.
" हट् !! " पहिला विवेक जागा झाला.
=========== क्रमश : ================