स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडला. संदीप व राजेश मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषाली सुद्धा तिथे आल्या. स्पर्धेची वेळ झाली. सर्व स्पर्धक आपापल्या जागी उभे होते. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्वांनी पोजिशन घेतली. राजेशने वृषालीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली व राजेशमध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. रेफरीने दुसरी शिट्टी दिली व सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. राजेश वाऱ्याच्या वेगाने धावत होता व एकेकाला मागे टाकत होता. आता अगदी थोडं अंतर बाकी होतं. राजेशच्या पुढे एकच मुलगा होता. राजेशचे पाय आता घाईला आले होते पण तरीही तो पूर्ण ताकदीनिशी धावत होता. आता राजेश आणि तो मुलगा एका रेषेत धावत होते. अखेरीस राजेशने फिनिश लाईन ओलांडली. राजेश केवळ एका सेकंदाच्या फरकाने जिंकला होता. संदीप, वृषाली आणि मनालीने एकच जल्लोष केला. राजेश खूपच दमला होता. कालसारखं आजदेखील वृषालीने सँडविच आणलं होतं. थोडावेळ विश्रांती घेतल्यावर राजेशने सँडवीचवर ताव मारला. राजेशचं लक्ष वृषालीकडे गेलं. ती आपल्याकडे कौतुकाने पाहत आहे हे राजेशला जाणवलं. त्याने वृषालीला विचारलं, “गाण्याची तयारी झाली का?” “सुरू आहे. पण जरा टेन्शन आलंय.” वृषाली काळजीच्या सुरात म्हणाली. “अगं टेन्शन कशाला घेतेस. मी आहे ना!” राजेश उत्साहात बोलून गेला. मनाली आणि संदीप एकमेकांकडे पाहून हसले. राजेश आणि वृषालीतलं प्रेम फुलताना पाहून त्यांनाही बरं वाटलं. “मला खात्री आहे, तूच जिंकशील. तू गातेसच तशी.” राजेश पुढे म्हणाला. राजेशच्या बोलण्यामुळे वृषालीच्या मनातील स्वतः बद्दल वाटणारी शंका दूर झाली.
आज स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. राजेश आणि संदीप नेहमीप्रमाणे आज देखील मैदानावर जरा लवकरच पोहोचले. राजेशने वार्मअप केला. स्पर्धा सुरू व्हायला केवळ पाचच मिनिटे बाकी होती. मनाली आणि वृषाली आजून पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे राजेश थोडा अस्वस्थ झाला. रेफरीने पहिली शिट्टी वाजवली व सर्व धावपटूंनी पोजिशन घेतली. राजेशने संपूर्ण मैदानावर एकदा नजर फिरवली. त्याला वृषाली आणि मनाली कुठेच दिसल्या नाहीत. रेफरीने दुसरी शिट्टी वाजवली. राजेशने धावायला सुरुवात केली, पण नेहमीसारखा आज त्याला उत्साह वाटत नव्हता. मनात वारंवार वृषालीचेच विचार येत होते. सुरुवातीला राजेश पहिल्या स्थानावर होता. पण जणू पायातील ताकदच नष्ट झाल्याप्रमाणे हळूहळू मागे पडत होता. निम्मं अंतर पार करेपर्यन्त तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला होता. त्याचं आज धावण्यात लक्षच नव्हतं. त्याच्या मनात नुसता वृषालीच्या नावाचा जप सुरू होता. त्याने धावताधावताच गेटकडे वळून पाहिलं आणि त्याच्या जीवात जीव आला. वृषाली आणि मनाली गेटमधून आत येताना त्याला दिसल्या. आता त्याच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली आणि त्याच्या पायांची गती वाढली. पाहता पाहता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या पुढे आता एकच मुलगा होता. पण अंतर फारच कमी बाकी होती. त्याने पायांवर आजून जोर दिला व पूर्ण ताकदीने तो धावू लागला. आता शेवटचा टप्पा बाकी होता. राजेश त्या मुलाच्या बरोबरीने धावत होता. पाय प्रचंड दुखत होते पण दुखण्याकडे लक्ष द्यायला आता राजेशकडे वेळ नव्हता. तो फिनिश लाईन क्रॉस करणार इतक्यात त्याचा डावा पाय मुडपला व राजेश खाली कोसळला. त्याच्या पायातून प्रचंड कळा येत होत्या. वृषाली धावतच राजेशजवळ आली. त्याच्या गुढग्याची वाटी सरकली होती. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याला असं तडफडताना पाहून वृषालीचं काळीज कळवळलं. तिचे डोळे देखील पाणावले. ती राजेशच्या पाठीवरून हात फिरवत होती. मनाली, संदीप व इतर मुलं, रेफरी सगळे पाहतायत याचंदेखील तिला भान राहीलं नाही. वृषालीचा स्पर्श होताच थोड्यावेळासाठी राजेश सुखावला.
कॉलेजचे डॉक्टर काहीवेळातच तिथे पोहोचले. त्यांच्या बरोबर आलेल्या माणसांनी राजेशला उचललं व स्ट्रेचरवर ठेवलं. ते त्याला डॉक्टरांच्या रूममध्ये घेऊन गेले. तिथे प्राथमिक उपचार करून ते राजेशला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार होते. संदीप, मनाली आणि वृषाली निराश मनाने आपापल्या घरी गेले. वाटेत कोणच काही बोललं नाही. संदीपने जाण्याआधी राजेशच्या वडिलांना फोन करुन त्याला झालेल्या अपघाताबद्दल कळवलं होतं. ते दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचणार होते.
वृषाली घरी पोहोचली. तिला फार थकल्यासारखं वाटत होतं. राजेशच्या काळजीने तिचं मन मलूल झालं होतं. तिच्या आईने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. पण ते खायची देखील इच्छा तिला होत नव्हती. वृषालीचं काहीतरी बिनसलय हे तिच्या आईलाही जाणवलं. तिने वृषालीला तसं विचारलं पण वृषाली काहीच न बोलता तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजाला आतून कडी लावली. वृषालीच्या आईला तिची काळजी वाटत होती. सुमितच्या मृत्यूनंतर आज ती पहिल्यांदाच असं विचित्र वागत होती.
काही केल्या वृषालीच्या मनाचा अस्वस्थपणा कमी होत नव्हता. तिने मनालीला फोन लावला व घरी बोलावलं. थोड्याच वेळात मनाली पोहोचली. राजेशला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं तिला मनालीकडून समजलं. तसेच संदीपसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं मनालीने वृषालीला सांगितलं. “आपण आता लगेच निघू आणि हॉस्पिटलला जाऊ. मला राजेशची फार काळजी वाटतेय.” वृषाली मनालीला म्हणाली. “अगं तुला राजेशची अवस्था पाहवणार नाही आणि तसही संदीप तिथे आहेच. राजेशचे आईवडील सुद्धा दुपारी तिथे पोहोचतील.” मनाली वृषालीला म्हणाली. “राजेशला आत्ताच माझी सर्वात जास्त गरज आहे. मला त्याला भेटायलाच हवं. तू नाही आलीस तर मी एकटी जाईन.” वृषाली म्हणाली. ती आता कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने राजेशच्या पाठिवरून हात फिरवताच काही क्षणांसाठी राजेश वेदना विसरला होता आणि हे वृषालीलाही जाणवलं होतं. ती आता कोणाचच ऐकणार नव्हती. वृषाली तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने गाडीची चावी घेतली व घराबाहेर पडली. मनालीसुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर आली. वृषालीच्या आईला काही समजायच्या आत त्या गाडीवरून हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या.
हॉस्पिटलमध्ये राजेश बेडवर झोपला होता. संदीप त्याच्या बाजूला बसला होता. डॉक्टरांनी दिलेल्या स्टेरॉईडमुळे वेदना कमी झाली होती पण त्यामुळे राजेशला चांगलीच गुंगी आली होती. त्याला सारखा तो स्पर्धेचा क्षण आठवत होता. अंतिम क्षणी झालेल्या अपघातामुळे राजेशला ती स्पर्धा जिंकता आली नव्हती. त्यामुळे राजेश नाराज झाला होता. पण वृषालीचा स्पर्श आठवताच त्याच्या मनातील नाराजी कुठल्या कुठे पाळली होती. ‘आपलं वृषालीवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम वृषालीचं आपल्यावर असेल का?’ हा प्रश्न कायम राजेशच्या मनात यायचा. पण आता या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं. ते प्रेम राजेशला वृषालीच्या नजरेत दिसलं होतं तिच्या स्पर्शात जाणवलं होतं.
राजेशला आता चांगलीच भूक लागली होती. त्याने डोळे उघडले. समोर संदीप उभा होता. सकाळपासून तो तिथून हालला नव्हता. राजेशने संदीपला बाहेरून खाण्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं. संदीप बाहेर निघणार तितक्यात वृषाली आणि मनाली तिथे पोहचल्या. वृषालीने राजेशकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. पण दोघेही काहीच बोलले नाहीत. वृषालीला खूप काही बोलायचं होतं पण तोंडातून शब्दच निघत नव्हते. राजेशचीही तीच अवस्था झाली होती. त्यांचा नजरांचा खेळ मात्र अजूनही सुरूच होता. जणू ते नजरेनेच संवाद साधत होते. शेवटी मनालीनेच या चमत्कारिक शांततेचा भंग केला. “तुझं सँडविच देणार आहेस की नाही त्याला का मी खाऊ?” मनाली वृषालीला म्हणाली आणि सगळेच हसले. वृषालीने तिच्या हातातील पिशवीतून एक डबा काढला व राजेशच्या हातात दिला. राजेशने डबा उघडला व तो वृषालीला म्हणाला, “तू पण घे ना थोडंसं. सकाळपासून तू पण काही खाल्लं नसशील ना!” वृषाली काही बोलायच्या आतच मनाली चेष्टेत म्हणाली, “अच्छा! फक्त वृषालीलाच! आम्हाला नाही देणार का?” आणि पुन्हा एकदा सगळे हसले.
खाऊन झाल्यावर राजेशला जरा बरं वाटलं. तो वृषालीला म्हणाला, “गाण्याचं प्रॅक्टिस चांगलं कर. तू जिंकल्यावर आम्हाला पार्टी पाहिजे.” वृषालीचा चेहेरा गंभीर झाला. “मी स्पर्धेत गाणं नाही गाणार.” ती म्हणाली. तिच्या या घोषणेमुळे सर्वांनाच धक्का बसला. वृषाली पुढे म्हणाली, “गाणं गायची मला इच्छाच राहिली नाही.” आपल्याला झालेल्या अपघाताचा वृषालीवर एवढा परिणाम होईल असं राजेशला वाटलं नव्हतं. “मूर्खपणा करू नकोस वृषाली, तू एवढं छान गातेस. मी लवकर बरं व्हावं असं जर तुला वाटत असेल तर तू आज स्पर्धेत नक्की गाशील.” राजेश वृषालीला म्हणाला. आज पहील्यांदाच तो एवढ्या अधिकाराने वृषालीशी बोलला होता. आता वृषालीचा नाईलाज होता, ती काहीतरी बोलणार तेवढ्यात डॉक्टर आत आले व त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितलं. मनाली, वृषाली आणि संदीप बाहेर आले. बाहेर येताच मनाली म्हणाली, “थोड्या वेळात राजेशचे आई-बाबा पोहोचतील. तोपर्यंत मी इथे थांबते. तुम्हाला दोघांना आज रात्री स्पर्धेत गायचय. तुम्ही घरी जाऊन तयारी करा.” मनालीचा निरोप घेऊन वृषाली आणि संदीप आपापल्या घरी निघाले. घरी पोहोचल्यावर वृषालीने तिच्या आईला राजेशला झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं. तिच्या बोलण्यावरूनच वृषाली राजेशच्या प्रेमात आहे हे तिच्या आईला समजलं पण ती काही बोलली नाही.
क्रमशः