नवा प्रयोग...
पांडुरंग सदाशिव साने
८. मोहनगाव
मुलांना घेऊन मालती जंगलात गेली होती. मुले झाडावर चढत होती. तेथील त्या प्रचंड वटवृक्षांच्या पारंब्यांना धरून वर जात होती. कोणी फुले गोळा करीत होती. कोणी फुलपाखरांना धरीत होती.
मालती एका शिलाखंडावर बसली होती. तेथून समोरची शेते दिसत होती. बाग दिसत होती. ओसाड जमीन लागवडीखाली आली. तेथे मळे फुलले. परंतु माझे जीवन? मी अशीच का राहणार? घनश्याम का लग्न करू इच्छित नाही? मी त्यांना कसे विचारू? माझ्या मनातील वेदना कोणास सांगू? तिचे डोळे भरून आले. तिला आईची आठवण आली. ती तेथे डोळे मिटून बसली होती. तो तिच्याजवळ हातात फुलांची माळ घेऊन घना उभा होता. तिने डोळे उघडले तो समोर घना! ती उठली. दोघे समोरासमोर उभी होती.
“मी माझी माळ आणली आहे; तुझी कधी होणार?” तो म्हणाला.
‘मी अश्रूंची माळ रोज गुंफीत असते. आताही तीच गुंफीत होते.” ती म्हणाली.
“मालती—”
“काय?”
“तू माझी जीवनसखी होणार ना?”
“मी कधीच झाली आहे. परंतु मी तुमच्या जीवनात अडगळ होऊ इच्छित नाही. माझी कीव नका करू.”
“तू माझे हृदय जिंकले आहेस. सेवेने, त्यागाने, कष्टाने. मी कीव नाही केली. मी सखारामजवळ काल रात्री बोलत होतो. त्याची संमती आहे. यंदा वसाहतीचा दुसरा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्या वसाहतीचे मोहनगाव म्हणून नाव ठेवायचे आहे. ह्या समारंभाच्या वेळेस आपण विवाहबद्ध होऊ. चालेल ना?”
“मी युगानुयुगेही वाट पाहीन.”
“मी जाऊ?”
“काम असेल तर जा.”
घना तिच्याकडे प्रेमाने बघून गेला. त्याने दिलेली माळ तिने गळ्यात घातली, हृदयाशी धरली. ती नाचू-गाऊ लागली, ती मुलांत मिसळली. तीही पारंब्या धरून वर चढली. तिने झोके घेतले. जणू तिचे हृदय अमित आनंदलहरींवर नाचत होते.
वसाहतीच्या नामकरणाचा समारंभ थाटाने व्हायचा होता. अधिक धान्य पिकवा मोहिमेत या प्रयोगाला बक्षीस मिळले. तेथे केवळ धान्यच नव्हते पिकत, तर नव-मानवता पिकत होती. पंडित जवाहरलाल नेहरू तेथे येणार होते. परंतु त्यांचा अमेरिकेचा दौरा निघाल्यामुळे त्यांनी शुभेच्छा पाठवल्या.
जयप्रकाश येतील का? घनाने त्यांना पत्र पाठवले. त्यांनी यायचे कबूल केले. सर्वांना आनंद झाला. तीन दिवसांचा कार्यक्रम होता. नाटक, खेळ, वनभोजन, -- नाना प्रकार होते. घनाच्या ज्या नाटकाला बक्षीस मिळाले होते, -- “खरा प्रयोग अर्थात खरी संस्कृती” हे नाटक करण्याचे ठरले. नाटकाच्या तालमी होऊ लागल्या. मंडप-उभारणीचे काम सुरू झाले. एकाने पडदे रंगवले. त्यांच्यात नाना कलावंत होते, नाना कसबी लोक होते.
सखारामचा भाऊही घरदार विकून या वसाहतीत रहायला आला. दादा, वैनी, जयंता, पारवी यांना पाहून मालती आनंदली.
“आते, तुझे लग्न?” पारवी हसून विचारी.
“होय बाळ.” मालती तिचा पापा घेऊन म्हणे.
“माझ्या भावलाभावलीचेही त्याच वेळेस लावू, चालेल?”
“हो, चालेल.”
सुंदरपूरच्या मित्रांना आमंत्रणे गेली. कामगारांच्या युनियनमार्फत कामगारांना, विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांना पत्रे गेली. सुंदरदास शेठजींनाही आमंत्रण पाठवण्यात आले. आणि आश्चर्य हे की – मी येतो म्हणून त्यांचे पत्र आले! रामदासने सेवा दलाचे पथक उभारले. पाहुण्यांसाठी छोट्यामोठ्या झोपड्या बांधण्यात आल्या. सर्वत्र आनंद होता. प्रसन्नता होती. आणि दिवस आला. सुंदरदास आले. जयप्रकाश नि प्रभावतीदेवी दोघे आली. त्यांचे थाटाने स्वागत करण्यात आले. अमरनाथ आला होता. त्याने जयप्रकाशांना सारे नीट दाखवले. पुढच्या योजना निवेदिल्या. सुंदरदासही सारे बघत होते.
मुस्लिम निर्वासितांची गोष्ट त्यांना सांगण्यात आली.
“येथे सारे मानव म्हणून नांदत आहेत. मुसलमान असोत की इतर कोणी—आपण आधी मानव आहोत, ही गोष्ट सारे ओळखतात. आकाशाचा घुमट ज्याला आहे अशा मशिदीत वा मंदिरात इच्छेनुरूप जो तो प्रार्थना करतो.” घना सांगत होता.
भोजनाला सारे तेथलेच पदार्थ होते. तेथलीच केळी आणि तेथल्याच रताळ्यांचे पीठ कणकेत मिसळून केलेल्या पोळ्या फारच रुचकर लागत होत्या.
“रताळी उकडून ती वाटून तो गोळा कणकेत मिसळला तर पोळी अधिकच छान होते.” मालती म्हणाली.
जयप्रकाश मंदमधुर हसले.
रात्री नाटक होते.
जयप्रकाश बसले. प्रभावतीदेवी आहेत. सुंदरदास आहेत. आसपासच्या गावचे लोक आहेत. घनाने आतापर्यंत जे झगडे केले तेच या नाटकात होते. सुंदरदास जणू स्वत:तेही जीवन त्यात पाहात होते.
नाटकाच्या शेवटी नायक म्हणतो, “हा आमचा नवा प्रयोग, ही आमची नवी संस्कृती.”
आणि वधुवरे स्टेजवर आली. घना नि मालती उभी होती. मालतीचे वडील भाऊ म्हणाले, “माझी बहीण मालती व घना विवाहबद्ध होत आहेत. ईश्वर साक्षी आहेच. तुम्ही सारे सज्जन साक्षी आहात. या उभयतांना आशीर्वाद द्या. या दोघांचा संसार सुखाचा, सेवामय कृतार्थतेचा होवो.”
टाळ्यांचा कडकडाट झाला. पुष्पवृष्टी झाली. जयप्रकाश आशीर्वाद देताना म्हणाले, “येथील वसाहतीला मोहनगाव म्हणून नाव देण्यात येत आहे. गाधीजींचे नाव मोहनदास म्हणून हे नाव. त्यांच्या शिकवणीप्रमाणे तुम्ही जात आहात. देशात जातीयता आहे, तुम्ही मानवता शिकवीत आहात. देशात अन्न कमी आहे, तुम्ही रात्रंदिन श्रमून ओसाड जमीन लागवडीखाली आणीत आहात. राष्ट्राला जे जे आज हवे आहे, राष्ट्राचे जीवन अन्तर्बाह्य निरोगी नि सुखी होण्यासाठी ज्याची ज्याची म्हणून जरूर आहे, ते ते सारे तुम्ही निर्मित आहात. सहकारी शेती शेतकरी करील की नाही, कोणी शंका घेतात. येथे सक्ती न करता तुम्ही आपण होऊन तो प्रयोग करीत आहात. ज्याच कल्याण आहे, फायदा आहे, ते मनुष्य आज ना उद्या करीलच करील. आपण कर्तव्य करीत राहावे.—आणि हा सुंदर आदर्श विवाह! ना गाजावाजा, ना काही. मालती-घनश्याम! त्यांची धडपड ऐकून पवित्र वाटले. असाच प्रयोग चालवा. खरी संस्कृती निर्माण करा. जय हिंद!”
***