" ऑफिसचा पत्ता कुठे दिला त्याने... कुठे शोधणार त्याला.... हे, इथे शहरात सगळं नवीन... घाबरून गेले.. तहान-भूक लागलेली, एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबले.. तर चोरांनी कधी सामान नेलं ते कळलंच नाही.. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर बोलतात कसे ,, लक्ष ठेवायला काय होते तुम्हाला... सामान , पैसे सगळं गेलं.. रडत बसले एका झाडाखाली तर चार-पाच मवाली, नालायक मुलं गोळा झाली भोवती.. काय काय बोलत होते माझ्याकडे बघून.. शी !! नशीब एका माणसाने त्यांना हटकलं तसे ते पळून गेले.. मलाही ओरडले ते... जाणार कुठे.. संध्याकाळ होतं आलेली.... चालता चालता दूरवर समुद्र किनारा दिसला.. गावी, माघारी घरी जायचा मार्गच नव्हता. त्यात हि सगळी tension मी स्वतःच ओढवून घेतली होती. काका बोलत होते.. केशव तुला विसरला असेल, त्याला कोणीतरी वेगळी भेटली असेल शहरात... त्याचा विचार सोडून दे... काकांचे ऐकलं असतं तर बरं झालं असतं , असं वाटते आता .... केशव तर भेटला नाही आणि गावात परतणं शक्य नाही. डोकं फिरलेलं होतंच... समुद्र बघितल्यावर आत्महत्येचा विचार आला मनात... ",
"म्हणजे तू संध्याकाळ पासून तिथे होतीस ... वेड -बीड लागला आहे का तुला.. " विवेक उडालाच ते ऐकून...
" मग काय... हिंमतच होतं नव्हती उडी मारायची.. तेव्हा उडी मारली असती तर तुला भेटलीच नसती... त्यात तिथे सतत कोणीतरी येत-जायचे... किती गर्दी शहरात... सुखाने मरू पण देत नाहीत शहरात.. रात्र झाली तेव्हा गर्दी कमी होतं गेली... शेवटी कोणी नाही बघून उडी मारणार होते तर तू आलास..." प्रियाने बोलणं संपवलं... विवेक शांतपणे तिच्याकडे बघत होता... " एक सांग.... का वाचवलंस मला.. " ,
" एवढ्या वर्षाची मैत्री आपली... एकेकाळी " माझा Best Friend " अशी ओळख करून देयाचीस कॉलेजमध्ये... तुला थोडीच असं मरु देणार होतो मी.. शहरात आलो तरी तुम्हा कोणाला विसरलो नाही मी.. " ,
" Thanks !! " प्रियाने डोळे पुसले.. आणि छानशी "smile" दिली.
" अडचणी खूप असतात. त्यातून मार्ग निघतो किंवा काढावा लागतो... आपण तुझा प्रॉब्लेम सोडवू.. पण पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही... " प्रियाने होकारार्थी मान हलवली.
" तुझा चष्मा कुठे आहे... ? कॉलेजमध्ये तर लावायचीस... ढापणी होतीस ना.... हाहाहा " विवेकला आठवण झाली...
" ये... ढापणी काय ..अरे अजूनही आहे चष्मा ... पण सामानात गेला ना... तुला काळजी करायची गरज नाही... दिसते मला ... " दोघे हसले. विवेकचं लक्ष पट्कन बाहेर गेलं.. मघाचचे काका... आता पर्यंत चार ते पाच फेऱ्या... विवेकच्या रूमबाहेरून झाल्या होत्या.. अश्याच एका फेरीत, विवेक चपळाई करत दारात आला.
" काय काका ... काही पाहिजे आहे का... ",
" नाही... ते शतपावली करत होतो ना... " काका जरा भांबावत म्हणाले.
" काय झालं तिचं... अजूनही रडते आहे का... " काका आत डोकावत म्हणाले.
" मला बघायचे आहे का तुम्हाला... घ्या काय ते नीट बघून... " प्रिया पट्कन बाहेर आली. तिला येताना बघून
" नको नको... राहूदे.. " म्हणत पळाले ते.. पळता पळता, एक चप्पलही तुटली.. तशीच तुटलेली चप्पल मागे सोडून, एका चपलेसह घरात पळून गेले.
काकांना तसं पाळताना बघून प्रियाला हसू आवरलं नाही.. किती मनापासून हसत होती ती.. विवेकला ते बघून बरं वाटलं. विवेकला बघताना ,बघून प्रियाने हसू आवरतं घेतलं. " काय बघतोस ? ",
" किती वर्षांनी हे हसू बघतो आहे.. तेव्हा तर किती हसायचीस.. आणि काल रात्री भेटल्यापासून सारखी रडत आहेस.. ",
" हो रे... कळलं, पट्कन थोडी ना सांभाळता येते स्वतःला... येते डोळ्यातून पाणी.. पण तू तेव्हा पण हसवायचा मला.. आता हि तुझ्यामुळे हसले... ",
" चल ... आता जेवूया आणि झोपूया.. उद्या आपण केशवला शोधायचा प्रयन्त करू.. " ,
" एकचं तर बेड आहे ना.. मी कुठे झोपू ? " ,
" मी हॉलमध्ये झोपतो... ते tension नको घेऊस.. फक्त परत जाऊ नकोस आता बाहेर.. खरं सांगतो.. एवढी झोप आली आहे ना... आता कोणी अंगावर पाणी जरी ओतलं ना... तरी जाग येणार नाही .... " प्रिया हसत हसत आत गेली.
प्रिया आणि विवेक ....दोघांची कॉलेजपासूनची मैत्री ...infact, दोघे खूप आधी पासून ओळखायचे एकमेकांना... प्रियाच्या आई-वडिलांचे काय झाले कोणास ठाऊक... परंतु ती अगदी लहान असल्यापासूनच तिच्या काकांकडे राहायची... त्यांनीच तिला सांभाळलं होतं आता पर्यंत... साताऱ्याला शाळेजवळच विवेकचं घर.. त्यात प्रियाचे काका आणि विवेकचे वडील.. कामानिमित्त एकमेकांना ओळखायचे.. त्यामुळे प्रियाचे तसे येणे जाणे असायचे विवेक कडे. शाळेत जरी एका वर्गात नसले तरी कॉलेजमध्ये ११ वी पासून एकत्र एका वर्गात होते. तेव्हापासूनची मैत्री. प्रियाचा स्वभाव... मनमोकळा, हसरा चेहरा , बिनधास्त ... चट्कन राग हि यायचा. विवेक सोबतच जमायचं , असं काही नसलं तरी.. बहुतेक गोष्टी त्यालाच सांगायची.. आठवड्यात तीन - चार वेळेस, दुपारचे जेवण विवेकच्या घरी ठरलेले.. अगदी हक्काने जायची जेवायला.. छान ग्रुप होता त्यांचा.. कॉलेज लाईफ.. अल्लडपणा... प्रेम तर होतेच त्या वेळेत... प्रियाला एक मुलगा आवडायचा... केशव कदम नावं त्याचं.. उंच... दिसायला छान.. बोलणं तर आणखी छान... विवेकला पुढाकार घेयाला लावून प्रियाने केशव सोबत मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होयाला वेळ लागला नाही. छान ना... केशव सोबत प्रेम आणि विवेकसारखा Best Friend... असं होतं प्रियाचं लाईफ...
सकाळ होताच, नाश्ता वगैरे करून.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑफिसला " दांडी " मारून , विवेक... आपल्या Best Friend ला मदत करायला तयार झाला. सर्वात आधी ते , केशवने दिलेल्या पत्त्यावर निघाले. " अरे बाळा !! तो राहत नाही तिथे.. जाऊन आली मी... " प्रियाने लाडात म्हटलं... विवेक हसला त्यावर... नॉर्मल झाली वाटते बया..." अरे बाळा !! " हे वाक्याच्या सुरुवातीला वापरलं कि समोरचा माणूस, मग तो वयाने मोठा असो वा लहान... ऐकतोच.. असा विचित्र पण ठाम विश्वास होता प्रियाला.. कॉलेजच्या दिवसात विवेक हे खूप वेळा ऐकतं होताच, पण कधी कधी कॉलेजच्या सरांना सुद्धा ऐकायला मिळालं होतं प्रियाकडून.... विवेक क्षणात भूतकाळात जाऊन आला...
" पण तिथे विचारपूस केलीस का.. कुठे गेला .. कधी गेला.. " विवेक वर्तमानात येत म्हणाला.
" नाही... मला सुचलंच नाही तेव्हा.. ",
" म्हणून तिथे जाऊन विचारू... माहित आहे ना कुठे जायचे आहे ते.. कि तो पत्ता पण गेला सामानात.. " ,
" पत्ता तर गेला सामानातच ... पण पत्ता लक्षात आहे माझ्या.. त्याच्या भेटीची एवढी ओढ लागली होती ना... पत्ता बरोबर लक्षात राहिला.. " प्रिया पुन्हा हरवून गेली केशवच्या आठवणीत..
" पुरे .. पुरे... वेळ कमी आहे.. " प्रियाने नाक मुरडलं. विवेकला पत्ता सांगितला.. आणि दोघे पोहोचले.
=========== क्रमश : ================