Katha Tulshi VIvahchya in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | कथा तुळशी विवाहाच्या

Featured Books
Categories
Share

कथा तुळशी विवाहाच्या

कथा तुळशी विवाहाच्या

हिंदू धर्मातील प्रत्येक सणा विषयी कथा आहेत ज्या पुराणाशी संदर्भित आहेत .तुळशी विवाह संबंधी असलेल्या काही कथा जाणून घेऊ या

कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते.
तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल.
यावर तोडगा म्हणून एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एका गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला.
ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल.

गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला.
कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता.
तो सूर्याची खूप उपासना करायचा.
सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल.

मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल.तु काहीतरी उपाय कर .
जर किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन.
सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे.
कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले.

कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली.
गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा.
ती वेळ आली आणि अचानक मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली तेव्हा गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला.
नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.

आणखी एक कथा अशी आहे

जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण राक्षस योद्धा होता. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले.
त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता.
श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला होता , ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’
एकदा जालंधराने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

यानंतर पुढे देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस हार पत्करावी लागली . तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले.
त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली होती .
विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले.
ते पाहुन वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले.
वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली.
अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला.
काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडेल व दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल.
त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले.
त्यानंतर लगेच वृंदेने आपला जीव त्यागला.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला याचे वाईट वाटले.
तो दुख्खाने वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला.
विष्णूचे दुखः घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले.
त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न गुणामुळे वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.
भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.
या कथा विवाहाच्या वेळेस सांगितल्या व श्रवण केल्या जातात .