Khandu garunche jyotishshatra in Marathi Comedy stories by Uddhav Bhaiwal books and stories PDF | खंडू गुरूंचे ज्योतिषशास्त्र

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

खंडू गुरूंचे ज्योतिषशास्त्र

उद्धव भयवाळ
औरंगाबाद
खंडू गुरुंचे ज्योतिषशास्त्र
(विनोदी कथा)
"तुमच्या मुलीच्या पत्रिकेत सप्तमेश चंद्र व्ययात आहे, शिवाय शुक्र नीच राशीमध्ये असून सप्तम स्थान दोन पापग्रहांच्या कर्तरीत आहे. त्यामुळे तुमच्या कन्येच्या लग्नाला विलंब होत आहे. पण काळजी करू नका. पुढल्या वर्षी गोचर गुरुचे सप्तमातून भ्रमण होईल, तेव्हा तुमच्या कन्येचा विवाह नक्की होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे." पन्नाशीकडे झुकलेले खंडू गुरु समोर बसलेल्या मुलीच्या वडिलांना आत्मविश्वासपूर्वक सांगत होते. त्यावेळी त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान झळकत होते. खंडू गुरूंच्या घराच्या समोरच्या छोट्याश्या हॉलमध्ये असे दृष्य नेह्मीचेच होते. मुलास नोकरी केव्हा लागेल, मुलीचे लग्न केव्हा होईल, नोकरीमध्ये खूप त्रास आहे तो कधी कमी होईल, नोकरीमध्ये प्रमोशन केव्हा मिळेल, स्वत:चे घर कधी होईल, असे एक ना अनेक प्रश्न घेऊन दूरदूरच्या गावांमधून लोक खंडू गुरुंकडे नेहमीच येत असत. समोरच्या हॉलमध्ये लोक अगदी दाटीवाटीने बसून आपला नंबर केव्हा येतो आणि गुरु आपणास केव्हा बोलावतात याची आतुरतेने वाट पहात असत. कधी कधी तर खंडू गुरु लोकांना पत्रिका ठेवून जायला सांगत आणि नंतर रात्री शांततेने त्या पत्रिकेचा अभ्यास करीत. खंडू गुरु एक नामांकित ज्योतिषी म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. खरे म्हणजे अगोदर खंडू गुरु एक प्रख्यात वकील म्हणून लोकांना माहित होते. वकिलीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यावर कोर्टात त्यांनी काही दिवस वकिली केलीसुद्धा. त्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते जी केस हातामध्ये घेत ती जिंकल्याशिवाय राहात नसत. आपल्या अशिलाला पुरेपूर न्याय मिळवून देण्यासाठी ते आपले कसब पणाला लावीत. पण फार पूर्वीपासून म्हणजे अगदी कॉलेजजीवनापासून असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या प्रेमापोटी म्हणा अगर छंदापोटी म्हणा, त्यांचे मन वकिलीमध्ये रमले नाही. त्यामुळे खंडू गुरूंनी वकिली सोडून ज्योतिष हेच आपले उपजीविकेचे साधन करण्याचे ठरवून टाकले आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातच स्वत:ला गुंतवून घेतले. त्यासाठी त्यांनी ज्योतिषशास्त्रावरची प्रसिद्ध तज्ञांची विविध पुस्तके मागवून त्या पुस्तकांचा खोलवर अभ्यास सुरू केला. ते अगदी तहान भूक विसरून ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासात मग्न होऊन जात. जन्म-कुंडलीवरून भविष्य पाहण्याचा त्यांना छंदच लागला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कुंडल्यांचा खूप अभ्यास केला. आता त्यांच्या पुस्तकांच्या कपाटामधील कायद्याची पुस्तके जाऊन तिथे ज्योतिषाविषयीची पुस्तके विराजमान झाली. हळूहळू त्यांना ज्योतिषी म्हणून प्रसिद्धी मिळू लागली. त्यांना कोणी कधी जर विचारले की वकिलीचा व्यवसाय सोडून ते इकडे कसे काय वळले, तर ते सरळ सांगत, "अहो, कोर्टामध्ये खऱ्याचे खोटे अन् खोट्याचे खरे करून पैसा कमवायचा कोणासाठी? मला एकच मुलगी आहे. तिला आत्ताशी एकविसावं वर्ष चालू आहे. तिच्या शिक्षणाला आणि लग्नाला असा कितीक पैसा लागणार आहे? अन् मग माझं अन् माझ्या बायकोचं पोट भरलं म्हणजे झालं. त्यामुळे मी हा मार्ग निवडला. आणि ज्योतिष या विषयाची मला असलेली आवडही या निमित्ताने जोपासली गेली."
खंडू गुरुंचे अचूक अंदाज, तसेच त्यांचा बिनचूक होरा यामुळे थोड्या अवधीतच ते अॅडव्होकेट खंडेराव कुलकर्णी या नावाऐवजी ज्योतिषी खंडू गुरु म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. भविष्य सांगण्यासाठी त्यांनी दक्षिणाही माफकच ठेवली. एखाद्या अडल्यानडल्याला तर ते काहीही दक्षिणा न घेता भविष्य सांगून त्याचे समाधान करीत. इतकेच नव्हे तर घरी भविष्य पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या पत्नी म्हणजे सर्वांच्या सुलभाताई चहा प्याल्याशिवाय जाऊ देत नसत. चहा पितांना कुणी जर चहाची तारीफ केली तर खंडू गुरुंचे उत्तर ठरलेले असायचे. "अहो, हा चहा साधा नाही. पलीकडेच रस्त्याला लागून माझा लहानपणीचा मित्र संतराम गावकर याचे शेत आहे. त्याच्याकडे पाच सहा म्हशी आहेत. सकाळी सकाळी माझी पत्नी सुलभा किंवा मुलगी अश्विनी तिथे जाऊन, समक्ष उभे राहून ताजे आणि शुद्ध दूध घेऊन येते. जर एखादे दिवशी जाणे झाले नाही तर संतरामचा मुलगा दीपक स्वत: दूध घरी आणून देतो. अशा घट्ट दुधाचा हा चहा आहे. समजलं?" मग प्रत्येकजण चहाचा आस्वाद घेऊन आपापल्या समस्यांची उत्तरे खंडू गुरूंकडून त्यांच्या भविष्यकथनाद्वारे मिळवून समाधानाने बाहेर पडे. या सर्व गोष्टींमुळेच अल्पावधीतच सगळीकडे त्यांच्या भविष्यकथनाचा बोलबाला झाला आणि या क्षेत्रात त्यांचा चांगलाच जम बसला. खंडू गुरूंच्या ज्योतिषविषयीच्या ज्ञानाचा त्यांच्या पत्नी सुलभाताई आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी कन्या अश्विनी या दोघींना खूप अभिमान वाटत असे. अश्विनी तर कॉलेजमधील आपल्या मैत्रिणींजवळ स्वत:च्या बाबांविषयी भरभरून बोलायची. बाबांनी कुणाकुणाविषयी काय भविष्य सांगितले आणि ते कसे तंतोतंत खरे ठरले हे सांगतांना तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असे. खंडू गुरूंच्याजवळ कधी कधी अश्विनी हट्ट करायची. म्हणायची, "बाबा, तुम्ही सर्वांचे भविष्य सांगता. मग माझी जन्मपत्रिका पाहून माझेसुद्धा भविष्य सांगा ना." तेव्हा खंडू गुरु हसून म्हणायचे," अगं पोरी, तुला कशाला हवी तुझ्या भविष्याची चिंता? हा तुझा बाप बसलाय ना तुझं भविष्य घडवायला."
"बाबा, प्रत्येक वेळी तुम्ही असंच म्हणता. जा आता मी तुमच्याशी बोलणारच नाही." असे म्हणून अश्विनी लटकेच रागावून तिथून निघून जात असे. कधी कधी अश्विनीची आईसुद्धा खंडू गुरूजवळ मुलीच्या लग्नाचा विषय काढायची अन् म्हणायची," काय आहे पोरीच्या नशिबात ते पहा ना एकदा. साऱ्या जगाचं भविष्य सांगता अन् स्वत:च्या मुलीबद्दल असे बेफिकीर वागता. कमाल आहे तुमची." तेव्हा खंडू गुरु आपल्या पत्नीची समजूत काढायचे व म्हणायचे, "अग, असं काय करतेस? तुला काय वाटले, मला तिची काळजी नाही? आत्ताशी कुठे तिला एकविसावं वर्ष चाललंय. आता ती सेकंड इयरला आहे. एकदा तिला ग्रॅज्युएट होऊ दे. नोकरी करण्याची हौस असेल तर काही दिवस नोकरीसुद्धा करू दे. नंतर बघ तिच्यासाठी कसा मी राजकुमार शोधून आणतो ते. आपली अश्विनी देखणी आहे. हुशार आहे. तिला तर कुणीही चटकन मागणी घालील. तू कशाला चिंता करतेस? असं थाटात लग्न करू तिचं की, यंव रे यंव." नवऱ्याचे हे बोलणे ऐकले की, सुलभाताई निश्चिंत होत आणि आपल्या कामाला लागत.
दिवसेंदिवस खंडू गुरुंकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच होती. त्यामुळे खंडू गुरुसुद्धा लवकरच उठून स्नान, संध्या, देवपूजा आटोपून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तयार होऊन बसत. फारच गर्दी झाली तर एक दोघांच्या जन्मपत्रिका ते ठेवून घेत, त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप विचारून घेत आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगत. सायंकाळी फुरसतीने मग त्या पत्रिकांचा ते अभ्यास करून ठेवीत.
येणाऱ्या प्रत्येकाला चहाशिवाय जाऊ द्यायचे नाही हा तर खंडू गुरूंचा शिरस्ता होता. पण अलीकडे सुलभाताईंना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली. ती म्हणजे अश्विनी जर सकाळी संतरामच्या शेतात दूध आणायला गेली तर घरी परत यायला बराच उशीर करू लागली. असे बरेचदा घडले. याविषयी सुलभाताईंनी काही विचारले तर अश्विनी प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण सांगायची. कधी 'म्हशीने दूधच लवकर दिले नाही,' तर कधी 'दुधासाठी ग्राहकांची बरीच गर्दी होती,' वगैरे.
एकदा खंडू गुरुंचे एक मित्र राजाभाऊ सायंकाळच्या वेळेस खंडू गुरुंकडे आले. खंडू गुरु त्यांना म्हणाले, "काय राजाभाऊ, फार दिवसांनी इकडे चक्कर मारली."
"हो ना, अनेक दिवसांपासून तुमच्याकडे सहज भेटायला म्हणून याचे ठरवतोय. पण वेळच मिळत नाही. बरे, सकाळच्या वेळी यावे म्हटले तर तुमच्याकडे लोकांची गर्दी असते. त्यामुळे आज मुद्दाम जरा उशीराच आलो." राजाभाऊ म्हणाले.
घरामध्ये पाहून खंडू गुरु पत्नीला उद्देशून म्हणाले, "अग, राजाभाऊ आलेत. काही फराळाची व्यवस्था कर."
"अहो खंडू गुरु, मी काय पाहुणा आहे का? नुसता चहा चालेल." राजाभाऊ म्हणाले.
"असं कसं. इतक्या दिवसांनी आपण दोघे भेटतोय. तसा कसा जाऊ देईन मी तुम्हाला?" खंडू गुरु म्हणाले.
एवढ्यात पाण्याचे ग्लास घेऊन अश्विनी आली.
"काय काका, काय म्हणताय? काकू कशा आहेत? त्यांना नाही आणलं?" अश्विनीने राजाभाऊंच्या हातात पाण्याचा ग्लास देत विचारले.
" काही नाही. ठीक चाललंय. तुझ्या काकूचे हल्ली गुडघे दुखतात. त्यामुळे ती बाहेर कुठे जाण्याचे शक्यतो टाळते. बरं, तुझे कॉलेज काय म्हणतेय?"
"अगदी मस्त. आता मी सेकंड इयरला आहे." अश्विनी म्हणाली.
"छान." राजाभाऊ बोलले.
दरम्यान सुलभाताई हातामध्ये फराळाच्या प्लेट्स घेऊन आल्या. राजाभाऊंशी जुजबी संवाद साधून त्या आत गेल्या. तशी अश्विनीही आत गेली.
"खंडू गुरु, एक गोष्ट बोलू का?" राजाभाऊंनी विचारले.
" हो, हो. अवश्य. त्यात विचारण्यासारखे काय आहे?" खंडू गुरु म्हणाले.
" म्हटलं, अश्विनीसाठी स्थळे पाहायला सुरुवात केली की नाही? आता अश्विनी सेकंड इयरला आहे. वरसंशोधन करता करता वर्ष निघून जाईल अन् अश्विनी ग्रॅज्यूएटसुद्धा होऊन जाईल. त्यासाठी आतापासूनच पाहायला सुरुवात केली पाहिजे असे मला वाटते." राजाभाऊ म्हणाले.
"तिच्या लग्नाची मला अजिबात काळजी नाही. अश्विनी दिसायला सुंदर आहे. कामात आणि अभ्यासात हुशार आहे. तिला तर कुणीही सहज पसंत करील. आणि तसंही अजून तिचं वय कुठं झालंय लग्नाचं?" खंडू गुरु म्हणाले.
"हो, तेही बरोबर आहे. बरं, सहज म्हणून विचारतो. तुम्ही इतक्या लोकांच्या पत्रिका पाहता. अश्विनीची पत्रिका बघितली का? तिचे लग्नाचे योग काय म्हणतात वगैरे?" राजाभाऊंनी विचारले.
"मला आत्ताच त्याची आवश्यकता वाटत नाही; आणि खरं सांगू का? लोकांच्या पत्रिकांपुढे तिची पत्रिका पाहायला मला वेळही नाही आणि तशी आत्ताच गरजही नाही." खंडू गुरु म्हणाले.
"तुम्ही फारच बिझी झालात गुरू." राजाभाऊ म्हणाले.
"ते मात्र खरं आहे." खंडू गुरू म्हणाले.
इतक्यात अश्विनी चहाचा ट्रे घेऊन समोर आली. चहा दिल्यानंतर ती खंडू गुरूंना म्हणाली, " बाबा, सकाळी संतराम काका दुधाचे या महिन्याचे पैसे मागत होते. मी सकाळीच तुम्हाला सांगायचे विसरले. मी आत्ता पैसे देऊन येते."
"अग, सकाळी दूध आणायला जाशील तेव्हा दे ना नेऊन." खंडू गुरु म्हणाले.
"अहो बाबा, मला त्या बाजूला माझ्या मैत्रिणीकडून वही आणायला जायचेच आहे. म्हणून मी आत्ताच जाते." अश्विनी म्हणाली.
"ठीक आहे. लवकर ये. अंधार पडू लागलाय." खंडू गुरु म्हणाले.
"हो,हो," असे म्हणून अश्विनी बाहेर पडली.
थोड्या वेळानंतर राजाभाऊंनीसुद्धा खंडू गुरुंचा निरोप घेतला.
अश्विनीला जाऊन बराच वेळ झाला होता. आता अंधारही बराच पडला होता. अजून अश्विनी घरी आली नव्हती. सुलभाताई अश्विनीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण तिचा मोबाईल बंद होता. सुलभाताई खंडू गुरुंकडे काळजी व्यक्त करीत होत्या. पण खंडू गुरु उद्या त्यांच्याकडे येणाऱ्या एका गृहस्थाच्या मुलीच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करण्यात मग्न होते. ते म्हणाले, " काळजी करू नको. बसली असेल मैत्रिणीच्या घरी."
रात्रीचे नऊ वाजून गेले तरी अश्विनीचा पत्ता नव्हता.
आता मात्र सुलभाताई खंडू गुरूंवर जवळजवळ ओरडल्याच. " ते पंचांग ठेवा गुंडाळून आणि आधी पोरीला शोधा. ती असे कधी करीत नाही. उशीर होणार असेल तर फोन करते. आता तर तिचा फोनही लागत नाही."
बायकोचा अवतार पाहून खंडू गुरूंनी सर्व आवरून ठेवले आणि सुलभाताईंसोबत तेही अश्विनीला शोधण्यासाठी निघाले.
"आधी संतरामला फोन लावून बघतो." असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण संतरामचा फोन एंगेज येऊ लागला. तेव्हा खंडू गुरू म्हणाले, "त्याचा फोन लागत नाही. चल, त्याच्या शेतात जाऊन येऊ."
असे म्हणून घराबाहेर पडू लागताच त्यांचा मोबाईल वाजला.
"अभिनंदन खंडेराव कुलकर्णी."
"अरे संतराम बरं झालं तू फोन केलास. मी तुलाच फोन लावत होतो. अरे, अश्विनी तिकडे आली ना? अन् माझं अभिनंदन कशासाठी?"
"अरे हो, हो. किती प्रश्न विचारशील? अश्विनी आमच्या सोबतच आहे. काळजी करू नको. तू असं कर. ताबडतोब वहिनींना घेऊन गावातील महादेव मंदिरामध्ये ये. सारं सांगतो." संतराम म्हणाला.
"हा संतराम काय बोलतोय, काहीच लक्षात येत नाहीय. सुलभा चल लवकर. त्याने आपल्याला महादेव मंदिरात बोलावलंय." असे म्हणून खंडू गुरू पत्नीसोबत महादेव मंदिराकडे निघाले.
महादेव मंदिरात पोचताच खंडू गुरू आणि सुलभाताईंना जे दृश्य दिसले ते पाहून काय करावे हेच त्या दोघांना सुचेना. संतरामचा मुलगा दीपक आणि खंडू गुरूंची अश्विनी हातामध्ये फुलांचे हार घेऊन एकमेकांसमोर उभे होते. बाजूला संतराम आणि त्याची बायकोही उभी होती. आणखी चार पाच जण तिथे होते. एक भटजीही होते.
" हा काय तमाशा आहे संतराम?" खंडू गुरूंनी संतरामला विचारले. खंडू गुरूंना पाहताच संतराम पुढे आला अन् म्हणाला, " सगळं सांगतो. खंडू ये. वहिनी या इकडून. खंडू आनंदाची बातमी म्हणजे आज आपण एकमेकांचे व्याही होत आहोत. हे बघ रजिस्ट्रार साहेबांनाही इकडेच बोलावून घेतले. दीपकचा आणि अश्विनीचा नोंदणी पद्धतीने आज विवाह होत आहे. त्याचप्रमाणे भटजींनाही बोलावून घेतले मंगलाष्टके म्हणण्यासाठी. म्हणजे वैदिक पद्धतीनेही विवाह होईल. मनामध्ये रुखरुख नको."
"काय? वेडबिड लागलं की काय तुला? काय बोलतोस तू हे? काय गं अश्विनी, काय चाललंय हे? हा म्हणतो ते खरं आहे का? अन् तुला हे कसं काय मान्य झालं? अन् तुला जर दीपकशी लग्न करायचं होतं तर मला किंवा तुझ्या आईला का सांगितलं नाही? हा विवाह आंतरजातीय होत आहे, हे कळत नाही का तुला?" खंडू गुरूंनी रागातच अश्विनीला विचारले.
"अरे तिला काय विचारतो? मला विचार. मीच सांगतो सगळं." संतरामने सांगायला सुरुवात केली.
"तू तर माझा बालपणापासूनचा मित्र आहेसच. पण आता ही आपली मैत्री नात्यामध्ये रुपांतरीत होत आहे, याचा मला आनंद आहे आणि तुलाही तो झाला पाहिजे. त्याचं असं आहे. अश्विनी आमच्याकडे दुधासाठी यायची, तेव्हा दीपक आणि ती बराच वेळ एकमेकांशी बोलत बसलेले मला दिसायचे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळं आहे. मी आधी दीपकला विचारलं. नंतर अश्विनीला विचारून खात्री करून घेतली. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून ते लग्न करू इच्छितात, हे मला समजले. ही गोष्ट मी तुला मागेच सांगणार होतो. पण अश्विनी म्हणाली, 'बाबा या लग्नाला परवानगी देणार नाहीत.' मग मीच तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि आत्ता इथे बोलावलं. अश्विनीला रागावू नकोस."
"असं कसं रागावू नको.? काय ग पोरी तुला लाज कशी वाटली नाही, आम्हाला अंधारात ठेवून हे सारं करतांना?"
" अहो बाबा, मी काही चुकीचं करतेय असं मला वाटत नाही. माझ्या कुंडलीत प्रेमविवाहास पोषक असे ग्रहयोग म्हणजे सप्तमेश शनी पंचमात, शुक्रही पंचमात, राजयोगकारक मंगळ पंचमात आणि प्रमुख योग म्हणजे शुक्र हा नेपच्यूनच्या त्रिकोण योगामध्ये आहे. रवीचा गुरुशी त्रिकोणयोग आहे. शुक्र हा हर्षलच्या केंद्रयोगात असून शनिशीही युती करावयास निघाला आहे. तसेच शुक्र मंगळ समक्रांती योगही नुकताच झाला आहे. ही सर्व आंतरजातीय विवाहाचीसुद्धा ग्रहस्थिती आहे. म्हणजेच प्रेमविवाह तसेच आंतरजातीय विवाह अशी ही एकूण ग्रहस्थिती आहे. म्हणून हे तर होणारच होते." अश्विनी सांगत होती आणि तोंडाचा आ करून खंडू गुरू ऐकत होते. इतर सारे जणही स्तंभित झाले होते.
"अग पोरी, हे सारे तू कुठे शिकलीस?" खंडू गुरूंनी आश्चर्यचकित होऊन अश्विनीला विचारले.
"बाबा, तुम्हाला मी अनेकदा माझी पत्रिका पाहण्याविषयी सांगितलं. पण तुम्ही नेहमी माझे बोलणे हसण्यावारी न्यायचे. मीसुद्धा अधूनमधून तुमची ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचत असे. तुम्ही इतरांच्या पत्रिका पाहून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत, तेही मी अधूनमधून ऐकत असे. एकदा सहज मी माझी पत्रिका समोर ठेवून तुमच्या कपाटातील एक पुस्तक काढले तेव्हा नेमके माझ्या हाती "विवाह कालनिर्णय" हे पुस्तक लागले. त्या पुस्तकातील माहिती आणि माझ्या पत्रिकेतील ग्रहमान वाचत असतांना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझी पत्रिका ही प्रेमविवाहास आणि आंतरजातीय विवाहास पोषक अशा ग्रहमानाची आहे. त्या आधी माझी दीपकशी जवळीक निर्माण झालीच होती; आणि माझ्या पत्रिकेचा अशाप्रकारे अभ्यास केल्यावर माझी खात्रीच पटली की माझा दीपकशी विवाह व्हावा ही परमेश्वराचीच इच्छा आहे."
"ते काहीही असो. हा विवाह मला मान्य नाही. संतराम, एक लक्षात ठेव. मी वकील आहे. माझ्या मुलीला फूस लावली म्हणून मी तुला आणि तुझ्या मुलाला कोर्टात ओढीन. समजलं?" खंडू गुरू तावातावाने बोलू लागले.
"खंडू, तुझी वकिली तुझ्याजवळच ठेव. अश्विनी आणि दीपक हे दोघेही सज्ञान आहेत. "आम्ही आमच्या मर्जीने एकमेकांशी विवाह करीत आहोत" असे ते दोघेही कोर्टात सांगतील. मग कोर्ट काय म्हणेल हे, तू वकील असल्यामुळे मी तुला सांगण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे तू नामांकित ज्योतिषी आहेस. अश्विनीच्या पत्रिकेत प्रेमविवाह आणि आंतरजातीय विवाह आहे, हे तर तुला आता माहीतच झाले आहे. म्हणून म्हणतो, आपण सर्वांनी आनंदाने या परिस्थितीचा स्वीकार करावा आणि या दोघांच्या डोक्यांवर अक्षता टाकून त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत यातच शहाणपणा आहे. काय?"
"ठीक आहे. ठीक आहे. आता माझे बोलणेच खुंटले. चला अंतरपाट धरा. पहिले मंगलाष्टक मात्र मीच म्हणणार." असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला मिठी मारली आणि सर्वजण खळखळून हसले.
********
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००५
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com