नवा प्रयोग...
पांडुरंग सदाशिव साने
५. मालतीचे आगमन
कामगारांची प्रचंड सभा भरली होती.
पगार झाला होता.
काही दिवस रेटणे आता शक्य होते.
पगार हाती पडल्यावर संप – असे मुद्दामच ठरवण्यात आले होते.
परवापासून संप!
चाळी-चाळींतून प्रचार होत होता.
सुंदरपुरात खळबळ होती.
सभास्थानाकडे माणसांची रीघ सुरू आहे. गाणी म्हटली जात आहेत. “हम नहीं हटनेवाले, हम हैं लढनेवाले” अशी ती गाणी होती.
आणि घना आला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बराच उशीर झाला होता, त्याने एकदम सभेला सुरुवात केली. गंभीर, पंढरी, ब्रिजलाल यांची भाषणे झाली.
इतक्यात सभेतून कोणी तरी उठून म्हटले, “मला थोडे बोलायचे आहे.”
गोंधळ सुरू झाला.
“या, तुमचे म्हणणे मांडा. येथे सर्वांच्या विचाराला वाव आहे. या. त्यांचे म्हणणे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या.” घना म्हणाला.
तो मनुष्य आला.
वासुदेवअण्णा त्यांना म्हणत.
ते त्या जिल्ह्यातील नव्हते, दूरचे नगर-सोलापूरकडचे होते. तिकडचे काही कामगार गिरणीकामावर होते. त्यांचा संपाला थोडा विरोध होता. मालकाने कामगारांत भेदनीती अवलंबून फूट पाडायला सुरुवात केली होती. कोणी म्हणत, त्यांना संप फोडण्यासाठी पैसेही देण्यात आले होते.
वासुदेवअण्णा बोलायला उभे राहिले.
“कामगार बंधुभगिनींनो, मी तुम्हांला थोडेसे निराळे सांगणार आहे. संपाच्या भानगडीत आपण पडू नये. तुम्ही पुष्कळसे आसपासचे आहात. तुमची थोडीफार शेतीवाडी असेल. तुमचे सगेसोयरे असतील. संप पुकारून तुम्ही तेथे जाल. आम्ही कोठे जायचे? सोलापूर जिल्ह्यातील आम्ही. शिवाय संप यशस्वी होणार नाही. मालकाचे हस्तक गावोगाव हिंडत आहेत. बेकारांची भरती केली जात आहे. पाच पाच रुपये देऊन नावे नोंदवून ठेवीत आहेत. तुम्ही शांतीने संप करणार. पण या नवीन कामगारांना कोण अडवणार? तुम्ही फंड जमवाल तो दोन दिवस तरी पुरेल का? हे पुढारी जातील निघून, किंवा बसतील तुरुंगात बी क्लासात. वर्तमानपत्रांत त्यांचे नाव येईल. परंतु आपण मातीला मिळू. हे पुढारी अवसानघातकी असतात. आणि समजा, प्रामाणिक असले तरी त्यांची कितीशी शक्ती! पाचदहा हजार रुपये तरी गोळा करु शकतील का? मी तुमच्यातीलच एक आहे. (पैसे खाऊ! मालकांचा बगलबच्चा! असे आवाज होतात.) तुम्ही काही म्हणा; तुमच्या कल्याणाचे मी सांगत आहे. (ओढा त्याला खाली. निमकहराम!—असे आवाज.) मला सांगायचे होते ते सांगून झाले. तुम्हांला योग्य दिसेल ते करा.”
ते गृहस्थ गेले आणि घना बोलायला उभा राहिला. तो म्हणाला, “आपण संपाचा निर्णय घेण्यासाठी जमलो आहोत. मला माझी इच्छा तुमच्यावर लादायची नाही. मला नको नाव, नको किर्ती. तुमची मान उंच व्हावी, हीच एक मला इच्छा. तुम्ही स्वाभिमानाने जगावे अले मला वाटते. तुमच्यावर अन्याय होत आहे ही गोष्ट खरी. अन्यायाचा प्रतिकार करण्यात पुरुषार्थ असतो. तुम्ही माणसे बना. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असेन. मी पकडला गेलो तर माझा मित्र सखाराम कदाचित येईल. नाही तर ब्रिजलाल आहे, पंढरी आहं, कुतुब आहं, धनाजी आहे, रामदास आहे—त्यांच्या मागे जा. खेड्यापाड्यांतून शेतकरी धान्य देतील. काही दिवस तरी तेजस्वी लढा द्या. तुमच्यात तेज आहे ही गोष्ट दिसू दे. माझ्याजवळ तुम्हांला द्यायला पैसे नाहीत ही गोष्ट खरी. मजजवळ हे प्राण आहेत;-- वेळच आली तर हा प्राण पणाला लावीन. मी तुम्हांला अंतर देणार नाही. माझ्या मनात दुसराही एक विचार आहे. जवाहरलाल नेहमी म्हणतात, साहस करावे, नवीन करून दाखवावे. समजा, संप फसला, काही कामावर जाऊ लागले, तरी ज्यांना स्वाभिमानाने जगायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी एक प्रयोग योजित आहे. तिकडे इंदूरकडे माझे एक मित्र आहेत.
तिकडे पडिक जमिनी पडल्या आहेत. आपण जाऊन तेथे वसाहत करू. सर्व धर्मांचे, सर्व जातीचे लोक एकत्र खपू. एकत्र खाऊ. ओसाड जमिनीत श्रम ओतून तेथे नंदनवन निर्मू. इंदूर-माळवा येथून लांब नाही, तुम्हांला येथील घरेदारे सोडून यावे लागेल, परंतु तुम्हांला नीट घरदार आहे तरी कोठे? त्या तुमच्या अंधा-या खोल्या. आपण नवीन जीवन निर्माण करू. एक नवा प्रयोग दुनियेसमोर ठेवू. सहकारी शेती करू. तेथे छोटे उद्योगधंदे उभारू. हिंमत असल्यावर दुसरे काय हवे? काही तर पराक्रम करू. तीनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमधील लोक स्वतंत्रपणे जगण्यासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी जंगले तोडली, वसाहती वसवल्या. साहसाशिवाय वैभव नाही. स्वतंत्र सुखी जीवन जगू. नव-संस्कृती फुलवू. नवा प्रयोग करू. मनात विचार करून ठेवा. येथे यश न मिळाले तर तेथे मिळवू. येथील नागरिकांना दोन शब्द सांगायचे आहेत.
कामगारांचा प्रश्न हा तुम्हा सर्वांचा आहे. समजा, कामगार संपावर गेले तर तुमचा सारा व्यवहार बंद होतो. हॉटेल, पानपट्टीची दुकाने, सिनेमा, किराणा दुकानदार,--सर्वांची विक्री बंद होते. शरीरात कुठेही बिघाड झाला तरी सारे शरीर विकल होते. तुमचे हे समाजशरीर आहे. तुका म्हणे एक देहाचे अवयव—तुम्ही अलग नाही आहात. म्हणून तुम्ही या संपास पाठिंबा द्या. मदत करा. मी आशेने आहे. परंतु सारे कामगारांनीच ठरवायचे आहे. मी कोण? तुम्ही माझे मानता, तोवर मी आहे. मी लादालादी करणार नाही. समजावून सांगणे ही माझी वृत्ती. तुम्हाला संप हवा का? न्यायासाठी लढणार का? जय का पराजय हा सवाल नाही; परंतु आपण न्यायासाठी धडपडलेच पाहिजे. सांगा, तुम्हाला संप हवा? (हो, हो!). ‘हात वर करा.’ (हजारो हात वर होतात.) संप कोणाला नको आहे त्यांना हात वर करावेत. (हात वर होत नाहीत.) मघाचे विरोधक का निघून गेले? का तेही इतरांबरोबर येणार आहेत? काही असो, तुम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे. संपाला मदत हवी. तुम्ही फंडासाठी मदत द्या. सभेनंतर येथे पैसे टाकून जा. सारे काम व्यवस्थित होईल. संपाच्या काळात ज्यांच्या घरी ख-या अडचणी असतील त्यांनी मदत मागावी. लहान मुलांना दूध वाटण्यात येईल. जसजसा संप चालेल तसतशा अडचणी येतील. धान्य उधार मिळेनासे होईल. आम्ही खेड्यापाड्यांतून जे मिळेल ते वाटू. डाळे-मुरमुरे वाटू. तुम्ही निर्धाराने रहा. मी अधिक काय सांगू? जय हिन्द!”
सभेच्या ठिकाणी पाच हजार रुपये जमले. गावातील मंडळींनाही मदत दिली. पार्वतीच्या त्या दिवशीच्या मुदीचा-आंगठीचा लिलाव करण्यात आला. संस्कृती-मंदिरातील एका प्राध्यापकाने ती मुदी दोनशे रुपयांस घेतली. त्या प्राध्यापकाला तिकडे त्या दगडी इमारतीत संस्कृती जणू भेटली नाही; --त्याला या कामगारांत संस्कृती दिसली. ‘तुम्ही थोडे बोला’ लोक त्यांना म्हणाले. शेवटी ते उभे राहिले व हिंदीत बोलले. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा की, ‘संस्कृती तुम्हीच जगाला द्याल. सकल मानवांची अशी संस्कृती आहे कोठे? श्रमणा-याला विश्रांती मिळेल, फुरसतीचा वेळ मिळेल, तेव्हा ना संस्कृतिसंवर्धन तो करणार? राजाजी परवा कोठे म्हणाले, “समाजवादी लोकांना काम नको. यांचेही गादीवर लोळण्याचे ध्येय आहे.’ राजाजींसारखी माणसे असा अपप्रचार का करतात? समाजवादी श्रमाला पवित्र मानतात. परंतु श्रमणा-याला काही तास मोकळीक मिळाली तर जीवनाचे इतर आनंद तो मिळवील. तो ता-यांचा अभ्यास करील, फुलांचा करील. तो संगीत शिकेल. तो चित्रकला शिकेल. तो शास्त्रज्ञ होईल. राजाजींच्या मताचे लोक का चोवीस तास धुळीत काम करत आहेत? वाटेल ते हे लोक बोलतात तरी कसे? असे गैरसमज पसरवण्याचे यांना धैर्य तरी कसे होते? श्रमणारे लोकच समाजवाद चाहतात. ते आळशी बनू इच्छित नाहीत; तर जीवनाच्या विकासासाठी, संस्कृति-संवर्धनात आपणासही भर घालती यावी म्हणून थोडी विश्रांती मागतात. ती खरी अखिल मानवी संस्कृती होईल. श्रमणारेच खरा धर्म देतील, खरी संस्कृती देतील. मानवता, समता, न्याय यांची स्थापना करतील. तुमचा विजय असो.”
सभा संपली. घनाच्या खोलीत काही कार्यकर्ते बराच वेळ सारे ठरवीत होते. सखारामच्या येण्याची सारे वाट पाहात होते.
घना बाबूला म्हणाला: “बाबू, तुला एक महत्त्वाचे काम मी सांगणार आहे. तू इंदूरला जायचे. अमरनाथ म्हणून तेथे शेतकीखात्याचे प्रमुख आहेत. त्यांनीच मागे जाहिरात दिली होती की, कोणाला वसाहत वसवायची असेल तर त्यांनी यावे. इंदूर सरकार त्यांना सारे सहाय्य करील. अमरनाथ माझा मित्र आहे. मी पूर्वी इंदूरच्या कृलेजात शिकत असताना तो तेथे होता. तो पुढे होता. शेतकी कॉलेजातील पदवी त्याने घेतली आहे. अनेक योजना त्याच्या मनात असतात. मी पत्र देईन ते तू त्यांना नेऊन दे. उत्तर घेऊन ये. मी तुरुंगात असलो तर सखारामजवळ दे. लॉकपमध्ये मला भेटता आले तर तेथे येऊन सांग.”
“मी जाऊन येतो.” बाबू म्हणाला.
“खरेच, आपण नवीन वसाहत बनवावी. नवसमाजनिर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. एक प्रयोग सिद्ध झाला की जनतेत आत्मविश्वास येईल. अडचणी येतील, परंतु काही करून दाखवू. येथे मालकापुढे उद्या नाक घाशीत जाण्याची पाळी आली तर त्यापेक्षा खरोखरच तिकडे भूमातेला हसवायला जावे.” पंढरी म्हणाला.
“मी त्या वसाहतीचा नकाशासुद्धा करून ठेवला आहे. मनातील स्वप्ने,--परंतु प्रत्यक्षात येतील तेव्हा खरे.” घना म्हणाला.
शेवटी मित्र गेले. घना एकटाच होता. पुढे कसे होणार याची त्याला चिंता होती. त्याने आपले हस्तलिखित नाटक बक्षिसासाठी पाठवले होते. बक्षीस मिळाले तर किती छान होईल, असे त्याच्या मनात येत होते. सखाराम, मालती,-कोणाचेच पत्र नाही. माझ्यावर का रागावली, का रुसली? माझ्यावर रागावण्या-रुसण्याइतपत त्यांना माझ्याविषयी का आपलेपणा वाटत असेल?
तो अंथरुणावर पडला. तो थकून गेला होता. त्याला झोप लागली. आणि सकाळी उठला तो चांगलेच उजाडले होते.
आज रविवार होता. त्याने विद्यार्थ्यांची सभा सकाळी घेतली होती. आसपासच्या गावी जाऊन त्यांनी मदत गोळा करावी, संप फोडायला बेकारांनी येऊन नये असा प्रचार करावा, हे काम तो त्यांना देणार होता. तो त्यांना शिकवी, त्यांना घेऊन स्वच्छता करी. त्यांचे त्याच्यावर प्रेम होते.
तो घरचे काम आटोपून निघाला. विद्यार्थी धर्मशाळेत जमले होते. त्यांना त्याने सारे सांगितले. मुलांमधूनही तुम्ही मदत गोळा करा. आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणे म्हणजेच शिक्षण, असे तो म्हणाला. मुलांच्या टोळ्या पाडण्यात आल्या. त्यांच्याबरोबर गाणी पत्रके वगैरे साहित्य देण्यात आले.
घना तातडीने निघून गेला, तो दारात पत्र पडले होते. त्याने ते उत्सुकतेने फोडले. सखाराम व मालती दोघांची पत्रे त्यांत होती. दोघे येणार होती. त्याला आनंद झाला. आधार मिळाला. मालतीचे पत्र लहानसेच परंतु सूचक होते:
“प्रिय घनश्याम,
संधी हातची कशी दवडू? शतजन्मांचा उपाशी मनुष्य वाढून आलेले ताट का दूर लोटील? असे क्षण पुम्हा येत नसतात. हा क्षण माझ्या जीवनात क्रांती करो. क्रांती करणारे तुम्ही.
मालती.
आज जाहीर सभा वगैरे नव्हती. कामाची व्यवस्था लावण्यात येत होती. त्या त्या मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून संप-समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांच्यामार्फत सारे काम व्हायचे. ते एक नवीन शिक्षण होते. ज्यांनी उद्या राज्यकारभार हाती घ्यायचा त्यांना शिक्षण मिळायला हवेत. अनुभव हाच खरा शिक्षक. कित्येक वर्षांत मिळणार नाही असे शिक्षण अशा प्रसंगी दोन दिवसांत मिळते. अनुभवाच्या महाशाळेतील महापाठ!
***