अतर्क्य..
हेल्लो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी .
चार पर्यंत पोचते ग प्रिया ..
चार .?..अग इतका का उशीर ?
..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ?
आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग ..
बर बाई आणखी लवकर पोचते ओके ?
आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे
आईला घरी निट सांगून ये तसे ..
हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ?
हा हा हा ...बर बर बाय निधी ..
प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली .
“तुझी मैत्रीण येईपर्यंत आपण थांबु ग ताईच्या साखरपुड्याला .”
आई चेष्टेने म्हणाली
“काय ग आई तु पण ना ... प्रिया म्हणाली
प्रिया आणि निधीची गट्टी सगळ्यांना माहित होती .
शाळेत असल्यापासुन दोघी सतत एकमेका सोबत असत .
तसे त्यांचे स्वभाव मात्र वेगवेगळे होते
त्यामुळे खरेतर पहिली काही वर्षे त्यांची सतत भांडणे होत असत .
निधीचा स्वभाव खुप”आक्रमक “ असायचा
कोणत्याही गोष्टीत “पडती “बाजु घेणे हे ती कधीच स्वीकारायची नाही .
अरे ला कारे करणे हेच तिच्या वागण्यात कायम असायचे .
तसेच ती म्हणेल तीच “पुर्व” दिशा असा तिचा खाक्या असायचा .
तिच्या वडिलांच्या निधनानंतर आईने तिला अगदी लाडात वाढवले होते .
भाऊ बहीण कोणी नसल्याने व आईही नोकरीला असल्याने ती एकटीच वाढली होती व घरी कायम एकटीच राहायची
त्यामुळे तिच्या म्हणण्या प्रमाणे जसे घरी घडत असे तसेच ती बाहेर घडवुन दाखवत असे .
एकदम बोल्ड मुलगी म्हणा ना ..!!!
भीती हा शब्द तिच्या शब्दकोशात नव्हताच मुळी
थोडीशी टोम बोईश वृत्ती होती तिची ..!!
दिसायलाही तशीच बॉयकट ,सावळा रंग , घोगरा आवाज
प्रिया मात्र एकदम वेगळी होती
तिचा स्वभाव थोडा “बोटचेपा” होता .
आणि ती थोडीशी भित्री पण होती
स्वतःचे खरे करणे ,अरेरावी वागणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच .
घरी आजी, आजोबा, काकु, मोठी बहीण असे खुप लोक असल्याने सर्वाच्या कलाने वागण्याचा तिचा मानस असे .
दिसायलाही ती नाजुक ,गोरी .लांबसडक केसांची अशी होती .
शाळेतल्या मुलामुलींच्या किरकोळ भांडणात एकदा प्रिया गोवली गेली होती ..
बरीच जण तिला उगाचच त्रास देऊ लागली होती
काही गोष्टींचा आळ उगाचच तिच्यावर आला होता .
त्यातुन कसे बाहेर पडावे तिला समजतच नव्हते ,तिला फक्त रडु येत होते
अगदी असहाय झाली होती ती
त्यवेळी निधीने पुढे होऊन तिला सावरले होते .
सगळ्या मुलामुलींना “सज्जड “दम दिला होता .
कोणी प्रियाला त्रास दिला तर त्याचीही “खैर” नव्हती हे तेव्हा सगळ्यांना समजले होते .
प्रिया निधीच्या सोबत एकदम सुरक्षित राहिली होती .
या नंतर मात्र त्यांची एकदम घट्ट मैत्री झाली.
आता प्रियाला निधीशिवाय अजिबात करमत नसे .
आपल्या बस्तु,कपडे ,इतर काही गोष्टी त्या एकमेकींच्या पसंतीने घेत असत .
कोलेजला गेल्यावर प्रियाचे पंजाबी सूट,स्कर्ट ,इतर कपडे ,दागिने याची पसंती निधी शिवाय पूर्णच होत नसे .
निधी मात्र कोणतेच दागिने अथवा प्रसाधन कधीच वापरत नसे .
मात्र निधीच्या शर्ट जीन्सच्या पसंतीला प्रिया सोबत असायचीच .
एक शाळा एकच कॉलेज ..आणि आता दोघी द्विपदवीधर होण्याच्या तयारीत होत्या .
आता दोघींना नवरे पण भाऊ भाऊ च बघा असे सारे गंमतीने म्हणत.
पण त्या दोघी म्हणायच्या आम्हाला लग्नच नाही करायचे .
अर्थात ही गोष्ट त्यांच्या घरच्यांनी फार गंभीर पणे घेतली नव्हती म्हणा ..!
प्रियाच्या बहीणीचा रियाचा आज साखरपुडा होता ..
तीच गडबड घरात चालू होती घरात .
दिसायला अतिशय “देखणी” असलेली रिया एका मोठ्या इंजिनियरिंग फर्म मध्ये जॉब करीत होती .
सुदीप, रियाचा भावी नवरा सी ए होता .
नागपूरला एका कॉन्फरन्स साठी गेलेल्या रियाची तिकडे सुदीपशी भेट झाली होती .थोड्या मैत्रीनंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला होता .
दोन्ही घरचे लोक सुशिक्षित व समंजस असल्याने या लग्नाला विरोध व्हायचे काहीच कारण नव्हते
लग्नानंतर रिया पण नोकरी सोडून सुदीप सोबत नागपूरला जायची होती .नुकताच तिने नोकरीचा राजीनामा पण सादर केला होता .
संध्याकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम वेळेत सुरु झाला .
सुदीप आणि त्यांचे आप्तेष्ट कालच येऊन एका हॉटेल मध्ये उतरले होते .
दहा पंधरा माणसे होती सुदिपकडची .
अंगठी घालायचा कार्यक्रम झाला आणि मग जेवणापुर्वी सर्वांच्या ओळखी करून घेणे सुरु झाले ..
प्रिया निधीला घेऊन सुदीपपाशी गेली आणि त्याला म्हणाली ..
जीजू ही पाहिलीत का माझी खास मैत्रीण निधी ..
साडी तर निधी कधीच नेसत नव्हती
पण कधीच पंजाबी सूट सुद्धा न घालणाऱ्या निधीने खास प्रियाच्या आग्रहासाठी तिच्या पसंतीच्या सूटची खरेदी केली होती .
आणि साखरपुड्याला मोजके दागिने सुद्धा घातले होते
पिवळ्या ड्रेस मधली निधी अगदी उत्साही आणि आत्मविश्वासू वाटत होती ..
सुदीपने पुढे होऊन निधीशी हस्तांदोलन केले ..
“ओहो ..आपण का त्या ?खुप ऐकलेय रिया आणि प्रिया कडून तुमच्याबद्दल ..
“शी जीजू अहो जाहो काय ?
फक्त निधी म्हणा न मला ..
बर बुवा ..असे म्हणत सुदीपने आपल्या जवळच्या एका तरुणाला हात धरून पुढे ओढले आणि म्हणाला ..
“समित ये ना पुढे तुझी पण ओळख करून घे आमच्या “साली”बाई आणि त्यांच्या मैत्रिणीशी ..
क्रीम रंगाचा झब्बा आणि सलवार घातलेला समित खूपच उमदा तरुण होता .
“प्रिया तुझी जशी ही खास मैत्रीण आहे तसाच हा माझा जवळचा मित्र बर का ..
हा पण सी ए आहे आम्ही एकत्रच शिकलोय .
नागपूरला स्वतःचे ऑफिस आहे त्याचे ..
आणि समित या आमच्या सालीसासाहीबा आणि ही त्यांची मैत्रीण निधी ..”
गुलाबी रंगाच्या साडीतल्या प्रियाशी समितने “हस्तांदोलन” केले आणि निधीकडे पण बघुन अभिवादनाचे स्मित केले .
प्रियाला पाहिल्यावर समितच्या मनात काहीतरी झंकारले ..!
या कार्यक्रमानंतर एक महिन्यावर लग्न आले .
घरात खुप गडबड चालु होती ..खरेदी , फराळ तयार करणे ,आमंत्रणे ,दागिने घडवणे ..सगळ घर नुसते “बिझी” झाले होते .
आणि एक दिवस रिया आईकडे येऊन म्हणाली
“आई अग सुदीपचा फोन आला होता आत्ता ..
“हो का ?
काय ग बाई ही गोष्ट आम्हाला सांगायचे काय बर कारण?
इतर वेळेस तर कधी आम्हाला काही सांगत नाहीस ..”
आई चेष्टेने म्हणाली ..
“अग आई बातमीच तशी आहे आपल्या प्रियुला सुदीपच्या मित्राने समितने मागणी घातलीय .
मला तर एवढा आनंद झालाय म्हणून सांगु..”रियाचा चेहेरा अगदी खुलला होता .
ही बातमी घरात समजल्यावर सगळ्यांना खुप आनंद झाला .
रियाकडुन त्यांना समजले समितचे स्थळ अगदी प्रियाला “साजेसे “होते
क्रमशः