२२
असे झालेच कसे?
अर्थात
भिंदिची करामत!
प्रेमचा निरोप घेत मी निघाली. नवीन पर्व सुरू होतेय आता आयुष्यात. त्यावर विश्वासच बसत नव्हता. यावेळी मात्र मी स्वतःला नाही काढला चिमटा. कितीही विचार केला तरी काय झाले, कसे झाले ते पचवणे कठीण होते! म्हणजे अगदी मनासारखे झाले तरी पण मनात शंका! स्वामीजी म्हणतात ते खरेय, मनाला शांती म्हणून मिळू देत नाही माणूस! आधी हवे ते मिळत नाही म्हणून आणि आता हवे ते मिळाले .. ते कसे काय मिळाले म्हणून! आज जे घडले, त्याच साठी केला होता अट्टाहास. आता मिळाले तर त्याबद्दल शंका! भिंदि आला, प्रेमला घेऊन आणि मध्येच स्वतःच गुल काय झाला.. हे गौडबंगाल काय असावे? भिंदि मंचरजींचा दोस्त असणे हे खरे, पण प्रेमला त्यानेच आणून सोडावे? त्याला हे सारे ठाऊक असावे .. म्हणजे ती मुलाखत नि बनावट टीव्ही पत्रकार देखील? प्रेमशी जुळलेल्या धाग्याबद्दल हवेत तरंगत होती मी! माझा विश्वासच नव्हता बसत झाल्या गोष्टीवर. आणि माझे मन असले विचार करत होते.. हे झाले खरे.. पण कसे!
जे झाले ते मला स्वस्थ बसू देईना. मिलिंदाला विचारावे तिथेच तर ते शक्य नव्हते. असते तरी प्रेमच्या वेळेतला वाटा ह्या गोष्टीत मी घालवलाच नसता! तेव्हा आता रिकाम्या मला हा चाळा सुचला तर नवल नव्हतेच! त्यामुळे हवेतच उडत निघाली मी. आणि तरंगत घरी येण्याआधी कालिंदीकडे गेली मी संध्याकाळी तीही शेवरीच्या बोंडासारखी! तरंगत! मिलिंदाला थ्यांक्स पण बोलायचे होते आणि काही विचारायचेही होते.
काकु म्हणाली, "अभिनंदन. मिलिंदाने सांगितले सारे."
"हो ना. तुमची कृपा. मिलिंदा कुठेय?"
"तो इतक्यात कसला येतोय .."
"तुला माहितीय काय काय, कसे कसे आणि का झाले ते?"
"मला? नाही गं बाई..म्हणजे काय काय तुमच्यात झाले हे मला कसे असणार ठाऊक.. क्या.. क्यू.. कैसे.. गैरोंको मालूम हो ऐसे कैसे? आणि मी माहिती करून घेणे सभ्यतेला धरून होईल का गं.. आणि कसे म्हणशील तर.. तू ते कसे कसे केलेस ते ही ठाऊक तुलाच.. आणि का झाले विचारशील तर तुझाच हट्ट!"
"वा! काय उत्तर आहे! उगाच नाही तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळायचे! प्रश्न काय नि उत्तर काय! ऐकणाऱ्याला वाटेल हेच बरे उत्तर! हुशार आहेस पोरी! पण मी तुला अशीच सोडेन असे वाटतेय का तुला?"
"नाही .. पकडून ठेवशील! या प्री च्या मगरमिठीतून कोणी वाचू शकलाय कधी? आता प्रेमची पाळी आलीय.. बिच्चारा.. कसा ते मला विच्चारा!"
"गप गं.. ऐक ना.. अगं तिकडे प्रेमला घेऊन कोण आला असेल..? भिंदि!"
"हो का? भिंदि तर कालच येऊन गेला घरी आमच्या!"
"कशाला?"
"कशास काय पुसतेस.. मालिनीला भेटायला!"
"काय सांगतेस. मग?"
"मग काय. सत्य सांगावे लागलेच .. नाही!"
"म्हणजे?"
"ज्याला आधीच ठाऊक आहे सारे.. त्यास अजून काय सत्य सांगावे?"
"म्हणजे?"
हे ऐकून माझा 'आ' वासला जाणे साहजिकच होते. तसा मी तो वासला!
"तो आ वासलेला बंद कर आधी. माशा खूप झाल्यात!एखादी रस्ता चुकून शिरेल आत!"
"मिटते .. पण काय झालेय ते सांगतेस का?"
"काय झालेय? अगं त्या भिंदिने सगळा माग काढून ठेवला होता आपला."
"काय सांगतेस?"
"अगं ती बुरखेवाली सुलताना.. तूच होतीस हेही ठाऊक त्याला आणि तुझ्या प्रेमसाठी चालणाऱ्या चकरा ही."
"कुठून आणि कसे?"
"ते माहिती नाही मला. पण कुठल्यातरी स्टेजला सारे कळले होते त्याला."
"मग?"
"मग काय.. फक्त प्रेम कितपत मानेल याचीच शंका होती. म्हणाला, नगास नग म्हणून त्याच्या जुळ्या भावासही आणले त्याने!"
"म्हणजे पूर्णानंद!"
"आणि एकदा तुम्हाला तुमच्या समोवार मध्ये ही पाहिले आणि वाटले .. मामला जमतोयसे दिसतेय!"
"हुं.. आणि त्याच्याबरोबर तात्याही होते तेव्हा!"
"त्याबद्दल नाही काही बोलला तो. पण परवा आला तर मिलिंदाला विचारलेच त्याने, म्हणाला, मला सारे ठाऊक आहे.. गेल्या काही दिवसांत भेटले नाहीत दोघे हे ही. फक्त कारण ठाऊक नाही! ते कारण सांगितले नि मिलिंदा म्हणाला, मंचरजीना ओळखता तुम्ही .. फक्त प्रेमला त्यांच्या तोंडी दिले की काम फत्ते! तिथल्या तिथे त्याने फोन लावला. मंचरजी म्हणे तुझे काम ते माझे काम! फार पूर्वी मंचरजीसाठी पण अशीच फिल्डिंग लावली होती म्हणे भिंदिनी! आणि भिंदिने स्वतःहून प्रेमला आणायची जबाबदारी घेतली!"
"सांगतेस काय? चेहऱ्यावरून अगदी रूक्ष वाटतो पण आहे मोठा आतल्या गाठीचा!"
"आतली गाठ? पण ती उघडून बसला तो समोर! म्हणाला, प्रेम आहे तसा चांगला .. लक्षात घे.. 'तसा' चांगला!"
"चूप.. उगाच अकलेचे तारे नकोस तोडू.."
"तर हा भिंदि म्हणजे अंतरी ना ना कळा वाटतो.."
"आणि वेश असा बावळा! अगदी फिट त्याला."
"तर भिंदि ने मंचरजीच्या वेळी असलेच काही केले..
वाटत नाही असा असेल तो.."
"हो ना.. दिसते तसे नसते गं.. आणि तुझा प्रेमच बघ.. दिसायला असा पण असले काही करेल असे वाटते का?"
"असले म्हणजे?"
"म्हणजे तुझ्या नादी लागेल वगैरे वगैरे .."
"काकु.. मी रागावलीय आता.. !"
"ते स्वातंत्र्य आहे तुला बरे! वो कहते हैं हमारे वो नहीं है ऐसे.."
"चूप .. मी निघाली. पण मिलिंदाला थ्यांक्स सांग. आणि तुला पण.. तुम्ही आहात म्हणून माझी प्रेमनय्या पार लागली!"
"छान! आभारप्रदर्शन समारंभ उद्या भरवूया. सादर आमंत्रण. आपल्या 'ह्यां'ना आणायला विसरू नका बरोबर.."
"अय्या.. लाज वाटते मला.."
"लाज.. करताना प्रेमवर प्रेम कुठे गेली होती लाज तुझी घोरपडे सुतीणी?"
"आता काकु तू शोभतेस खरी.. काकूबाई!"
घरी यायला निघाली. आजचा दिवस ग्रेट निघाला. इतक्या दिवसांची तपस्या फळाला आली. स्वामीजींची कृपा! सारे सकारात्मक विचारांचे फळ!