१९
हवेत उडते मी
अर्थात
भेटी आणि गाठी!
आज फिर मिलने का इरादा है.. आज फिर जीने की तमन्ना है.. गाफीलपणे मी गुणगुणत असतानाच आई आली मागून.
"काय गं, आज पण जायचेय.. मुक्ताकडे?"
"हुं.. कदाचित!"
"असेच..?"
"नाही गं. तिला कसली मदत हवीय अभ्यासात.."
आई काहीच बोलली नाही. हे संध्याकाळी बाहेर जायचे प्रकरण सोडवायला हवे! हे म्हणायला नि कालिंदीचा फोन यायला एकच गाठ पडली. तिच्याशी बोलता बोलता एक आयडिया सुचली मला! आणि दुपारपर्यत मी मिलिंदाच्या आॅफिसात संध्याकाळी पाच ते नऊ अशा पार्ट टाइम जाॅबला लागले! असा कसा हा जाॅब? हा प्रश्न आताही पडतो, तेव्हाही इतरांना पडला पण प्रेमातुराणां मला नाही पडला! आता मुक्ताकडे न जाता मी मिलिंदाच्या आॅफिसला जायला लागली!
तर त्या दिवशी परत प्रेमला भेटली मी. तिथेच. प्रेम आधीच येऊन बसलेला.
"आज आईस्क्रीम नक्की!"
"होना! नाहीतर उद्यासाठी ठेवूयात?"
मी उद्याच्या भेटीची सोय आताच करीत म्हणाली. तो ही म्हणाला, "चालेल. उद्या मला ही हाफ डे आहे!"
ही त्याची हिंट समजावी का मी? कोण जाणे.
"ही जागा फारच सुंदर आहे."
"हो ना. मी पहिले पुस्तक इथेच बसून लिहिले .."
"एकट्याने?"
मी बोलली नि दचकून त्याने पाहिले.. त्याबद्दल काही न बोलता म्हणाला, "इथे आलो की शांत वाटते. नवीन कल्पना सुचतात.. लिहायला बरे वाटते.. आणि आता तर इथे यायला अजून एक कारण ही मिळालेय.."
"कसले?"
"हे दुसरे.. पुस्तक .. लिहिन मी. मी इथे आलो ना तर तू बोललीस तसा प्रेमात पडलो.. या जागेच्या. तुला सांगू ही जागा, हे टेबल माझे फिक्स. पुस्तक आले ना तेव्हा हाॅटेलवाल्यांनी चहा पाजला मला!"
का कोण जाणे प्रेम बोलताना अडखळताना वाटत होता. सांगायचे एक असावे .. तोंडून शब्द दुसरेच येत असावेत. काही असो. बोलत मात्र होता. घरी आला तेव्हा अगदी गप्प गप्प वाटलेला तो. आता मात्र बोलत होता. कदाचित मला वाटते तेच त्याला वाटते की काय?
"मग आज काय.. टॅक्सीने आलीस की बस ने?"
"मी? बस. टॅक्सी रोज परवडायला नको?"
"पण हे प्रकाशनाचे काम.. आॅफिसचे.."
"हे?"
"नाही म्हणजे तू तात्यांचे काम करतेस.."
हुं.. बुद्धू. तात्यांचे काम? हा कुठला जावईशोध? नाही पण तसे काम तात्यांचेच.. त्यांचाच जावई शोधायचे! पण मी काय पुस्तकासाठी आलीय असे वाटते नि पटते त्याला .. की वेड घेऊन पेडगावला?
"अरे, नाही रे.. खरे सांगू, मी तात्यांना सांगितलेच नाही .."
"का?"
"हं.. असंच.. सरप्राईज!"
"कसले?"
"तुझे पुस्तक!"
"हो का? मग आजतरी चर्चा केलीच पाहिजे!"
"मी तयार होती काल.. तूच म्हणालास! पण माझी हरकत नाही हां आजही तुझा मूड नसेल तर. उद्या आहे.. परवा आहे.."
मनात म्हटले, मनात आणलेस तर जन्मभर आहे.. करू चर्चा हव्या तितक्या.
"लेखनाचा कसा मूड आला पाहिजे हो की नाही?"
"खरंय तुझं. तू समजून घेतेस ना तेवढे कुणीच समजून घेत नाही मला!"
"होतं लेखकराव. होतं असं. सगळ्यांच्याच वेवलेन्थ जमतात असे नाही .. आणि ज्यांच्या जमतात त्यांना कधी सोडू नये! माझे नाही हां.. एका पुस्तकातले वाक्य. पण खरेय की नाही?"
हिंमत करून मी हे बोलली. प्रेमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहात होती मी. एकाक्षणी वाटले, त्याला ही हेच म्हणायचे असावे.. पण बोलत मात्र नाही तो.
वेळ कसा भर्रकन निघून गेला. आजचे आइस्क्रीम उद्यावर ढकलून निघालो आम्ही. एक चहा, एक काॅफी नि भरपूर बोलणे! त्याच्या बाईकवर बसली मागे. आज वाटले कधी त्याच्या अंगावर हात घट्ट टाकून बसेन मी? पण वेळ जवळ येत चाललीय असे मनातून वाटत होते.
प्रेम आता चांगलाच खुलला होता. जवळजवळ दररोज आमची भेट होत होती. पुस्तकाचे काम म्हणावे तर त्यात प्रगती नव्हती. रोज गप्पा. विचारांची देवाणघेवाण! हा शेवटचा शब्द त्याचा. मोठा भारदस्त! पण काही असो. प्रेम मला दिवसेंदिवस अजूनच आवडायला लागला होता. घरी कुणी काही विचारत नव्हते कुठे जातेस म्हणून. ते का विचारत नाहीत याकडे माझे लक्ष नव्हते. माझे लक्ष सारे दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळवर! प्रेमचे विद्रोहीपण बेगडी नव्हते. कित्येक जण प्रसिद्धीपुरता वापरतात हा विषय तसे तर नव्हतेच. उलट प्रसिद्धीपासून दूर पळायचा तो. तो टीव्हीवरच्या मुलाखतीला आला तेही अनिच्छेने नि आमच्या कारवायांमुळे. आधी मी थोड्या चेष्टेने नि थोड्या कुचेष्टेने पहायची त्याचे लिखाण. पण माणूस अगदी शंभर टक्के खरा होता. बाहेर एक आणि आत एक असले काही नव्हते त्याच्यात आणि त्यामुळे तर तो अधिकच आवडत होता मला. त्याच्या वागण्यात ही बराच बदल दिसायला लागलेला. माझ्या इतकीच ओढ त्याला ही असावी असे वाटायचे मला. अजून तो स्ट्राॅबेरी आईस्क्रीमचा मुहूर्त आला नव्हता. दरवेळी उद्यावर ढकलून दुसऱ्या दिवशीच्या भेटीची सोय करायची मी. आणि तो ही हसून मान डोलवायचा. अर्धा रस्ता बाईकने सोडून तो परत जायचा नि त्या धुंदीत मी चालत परत जायची.
अशातच एक दिवस त्याचा तो इंटरव्ह्यू टीव्हीवर आला. कालिंदीने फोन करून कळवले खास.
"लेखकाची मुलाखत .. त्यात काय पहायचे?" आई मला डिवचण्यासाठी की काय म्हणत टीव्हीसमोर बसली. तात्या पण मुद्दाम घरी थांबलेले. कुठे बसावे मला कळेना. माझ्या प्रेमपासून जास्त दूर ही नाही आणि कुणाच्या डोळ्यांवर येईल असे चेहऱ्यावर भावही आणायचे नाहीत. सर्वांना अभिनयाचे प्राथमिक शिक्षण द्यायला पाहिजे शाळेत..
प्रेम बोलला ते जीव तोडून. त्याची मुलाखत रेकॉर्ड केलेली मीच पण त्याच्याकडे पाहता पाहता ऐकायचे राहूनच गेलेले. बोलला छान तो. मुख्य म्हणजे मनापासून बोलतो तो.
"बरा बोलतो नाही.." आई बोलली.
"हुं.. ज्या कुणी मुलीच्या नशिबात असेल तिचे कठीण आहे! असली मुले बनवणे देवाने बंद केले त्यालाही कित्येक वर्षे उलटून गेली!"
मी तंद्रीत त्याला पाहात होते.. आणि आईचा प्रश्न आला..
"तुला बरा वाटतो का गं हा.. नाही म्हणजे तू त्याचे पुस्तक वाचलेलेस.."
"हं.. पुस्तक छान होते.."
"आणि हा?"
"काहीही काय विचारतेस कमलिनी.." तात्यांनी तिला टोचले. कमलिनी म्हणजे माझी आई.
एकूण कार्यक्रम मस्त झाला. भिंदिपण त्याच्या टकलासारखा चमकला थोडा वेळ. पण प्रेमची बात काही औरच! जाता जाता मी कालिंदीकडे गेली. आताच महाबळेश्वरहून आलेली ती. तिच्याकडून ताजी स्ट्राॅबेरी घेतली. आज माझ्या प्रेमचा खास दिवस.
समोवारला पोचली तर प्रेमभोवती मोठा घोळका लोकांचा. आजवर आम्हाला कुणी त्रास देत नव्हते आता हा स्टार झाला जणू! मी पोचली आणि लोक 'मॅडम आई..' 'मॅडमको जाने दो' म्हणून बाजूला झाले. मला लाजल्यासारखे झालेच. पण गेला महिनाभर आम्ही इथे येत होतो. लोकांना काहीतरी वाटणारच. तरीही समंजसपणे सारे बाजूला गेले आपापल्या जागी. प्रेम थोडा वैतागलेला दिसला. त्याला असली प्रसिद्धी नकोशीच होती. पण आता तो काय करणार होता?
तो काही बोलण्याआधीच मी बोलली,
"प्रथम मी काय बोलते ते ऐक.. मग वैताग!"
"बोल बाई.."
"एक, प्रसिद्धी हे अळवावरचे पाणी आहे.. तुझेच वाक्य आहे. आज आहे उद्या कुणी पाहणार नाही. त्यामुळे जे आज आहे त्याकडेही दुर्लक्ष कर. दोन, इंटरव्ह्यू मस्त झाला. तू काय बोलतोस यार. इंप्रेस्ड! तीन, या मुलाखतीने अजून काही लोक वाचतील पुस्तक तुझे .. त्यातल्या एका टक्क्याचे जरी मतपरिवर्तन झाले तर त्यादिवशीची आमची मेहनत फळाला आली. आणि चार .. काही न बोलता या स्ट्राॅबेरी खाऊयात!"
माझ्या बोलण्याने प्रेम अगदी शांत झाला असावा. त्याला काय वाटते हे त्याने न सांगता मला कळावे, त्याचे आश्चर्य वाटले असावे त्याला! पण गेले काही महिने ज्याचा दिनरात्र विचार असेल मनात, त्याच्या मनातले कळले मला तर त्यात काय मोठेसे?
स्ट्राॅबेरी म्हणताच डोळे चमकले त्याचे..
"कालिंदी गेली होती. आजच आली महाबळेश्वरहून. मला स्ट्राॅबेरी इतकी आवडते सांगू .."
"मला देखील! आपल्या आवडी जुळतात हां प्रीती!"
हाच तो क्षण.. सांगावे त्याला, मलाही तू आवडतोस.. आणि मला वाटते तुलाही मी! पण नाही बोलले. त्यासाठी एखादा हळुवार क्षणच हवा. आणि ते आपोआपच तोंडून यावेत शब्द! त्या क्षणाचे पावित्र्य आयुष्यभर ध्यानी रहावे!
स्ट्राॅबेरी पोटभर खाल्ली अाम्ही. प्रेम जरा गंभीर दिसला आज. दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरवून निघालो आम्ही, आजवर स्ट्राॅबेरी आईस्क्रीम उद्यावर ढकलत अालेलो .. बाईकवरून निघालो.. तर रस्त्यात दुरून कोण दिसावेत? भिंदि आणि तात्या! नशीब त्यांनी पाहिले नाही! बाईकवरून उतरताना प्रेम म्हणाला, "उद्या आईस्क्रीम.. तुला काही सांगायचंय मला.. आईस्क्रीम खाता खाता!"
मी निघाले विचार करत, खरंच तात्यांनी पाहिलं नसेल ना? आणि उद्या प्रेम काय सांगणार आहे?