Pritichi Premkatha - 18 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | प्रीतीची 'प्रेम'कथा - 18

Featured Books
Categories
Share

प्रीतीची 'प्रेम'कथा - 18

१८

समोवार

अर्थात

भेट तुझी माझी!

आता कामाला लागावे म्हणजे काय करावे? साधा उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट! तो वापरून पुढच्या हालचाली करायला हव्यात.

सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, "प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले."

"ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय.."

अरसिक! इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय.

"हो ना. कुठवर आले लिखाण? तुम्हा लेखकांचे एक बरे असते, हवे ते घडवा.. नाहीतर बिघडवा! म्हणजे त्या नायक नायिकेस भेटण्याची घटिका कधी भरवताय तुम्ही?"

हा आपला माझा अंदाज होता. आणि खरेतर माझा स्वतःबद्दलचाच प्रश्न होता! पण त्याने प्रेम खूश झाला.

"तुमचा प्रश्न अचूक आहे हो.."

"एक मिनिट हां.. काय आहे तुम्ही मला तुम्ही वगैरे नका म्हणू.. शिक्षणाने नि पात्रतेने मी किती लहान आहे तुमच्याहून.."

"अहो पण, ओळख देख नसताना .."

"अहो.. देख तर आहे.. ओळखपण बऱ्यापैकी झालीय.. मला तूच म्हणाना.. नुसते प्रीती म्हणालात तरी चालेल .. म्हणाल ना.. प्लीज?"

त्या प्लीजने त्याचे हृदय थोडे वितळले असावे. म्हणाला, "तुम्ही म्हणता तर.. तू म्हणतो.. तुला प्रीती! एक आहे तुम्हाला .. तुला.. नाव शोभते हां.. तुझ्या वागण्यात नि बोलण्यात ही प्रीती जाणवते.."

माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. प्रेम असे काही डायरेक्ट बोलेल? की मी आपल्याच मनचे काही ..

पण प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली मी, "शरणकुमार नि साठे! शहरी प्रश्न! पुढे काय करायचे ठरवलेय तुम्ही?"

"हे बघ, हा प्रश्न तसा सोपा नाही प्रीती. मी पहिली दोन पाने लिहिलीत. तुला वाचून दाखवू?"

"फोनवर?"

"हां, तेही खरंच! कुठे तरी भेटायला हवे! आणि साॅरी, ते प्रीती नावाबद्दल बोललो ते रागावली नाहीस ना तू?"

याच्यावर नि रागावणार मी?

"नाही हो.. तुम्ही किती छान बोलता प्रेमानंद! जितके लिहिता सुंदर तितकेच बोलणेही! मला तर बाई हेवा वाटतो?"

"कुणाचा?"

"कुणाचा काय.. तुमचाच."

किती देवदत्त देणगी म्हणणार होते. पण कुणास ठाऊक या विद्रोहकुमारास देव आणि देवाच्या नावाचे ही वावडे असले तर?

"का?"

"का काय..? इतक्या हुशारीचे कौतुक वाटणारच ना कुणालाही. कसं काय जमतं हो तुम्हाला इतके छान लिहायला?"

तो कदाचित तिथे लाजला असावा.. इतक्यात मीच म्हणाली, "नकाच सांगू आता. अापण भेटू ना तेव्हा सांगा! अजून काय काय विचारेन मी तुम्हाला. खरे सांगू लेखक म्हणावा ना असा ओळखीत माझ्या तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि तुम्ही बोलता पण किती सुरेख! कधी भेटूयात?"

"ठरवून सांगतो. तुम्हाला इकडे कुठे यायला जमेल ना?"

"कोणाला? तुम्हाला .. ? की तुला? प्रीती नाव आहे माझे!"

"ओके. साॅरी! तुला जमेल ना इकडे जवळपास यायला .. प्रीती?"

मनात बोलली, तू बोलावलंस तर आताच येते.. तू म्हणशील तिथे!

साळसूदपणे मी म्हणाली, "अर्थात. तुझा जास्त वेळ नाही घेऊ. तुम्ही काय साहित्यिक! लेखकाचा क्षण न क्षण महत्त्वाचा."

"हे तुझे काहीतरीच. पण काय आहे नुकतीच नवीन नोकरी लागलीय.. सुटायला वेळ होतो. तू इकडे आलीस तर इथेच भेटू!"

"ओके. नक्की .. आज येते. सहा वाजता?"

एवढ्या पटकन त्याला वाटले नसेल मी विचारेन.

"आज.. पण तयारी करायला लागेल. मी लिहिलेय.."

"काय आहे आपण जनरल रूपरेषेची चर्चा करूयात. बाकी प्रकरण बाय प्रकरण नंतर .. नाहीतरी हे प्रकरण वाढवायचेच अाहे मला!"

शेवटचे वाक्य त्याला ऐकू जाणार नाही असे हळूच बोलली मी!

"ठीक. तू म्हणतेस तसे. आज ये. इकडे जवळच छान हाॅटेल समोवार आहे. चहा पिऊ नि गप्पा मारू."

"पण ते बसू देतात..?"

"अगं.. आमचा लेखकांचा अड्डा आहे तो. तिथे आम्हाला कितीही वेळ बसू देतात. माझे पहिले पुस्तक तिथेच आकाराला आले.."

"आणि आता दुसरेही!"

पुस्तक येईल तेव्हा येईल, आमचे प्रकरण मात्र आकाराला यायलाच पाहिजे! आगे बढो प्रीती!

दुसऱ्यांदा फोन केला. प्रगती चांगली होती माझी. तुम्ही वरून तू.. आणि प्रीतीबद्दल प्रेम.. आणि आता भेटण्याची तयारी! प्रगती आहे प्रीती! या वेगात दिल्ली आता दूर नाही! फक्त नेहमीप्रमाणे यात काही गोंधळ न होवो म्हणजे झाले.

दुपारी फोन आला तो पूर्णाचा. म्हणाला, "आज रात्री निघतोय. प्रेमला सांभाळून घ्या! मनाचा चांगलाय पण मुद्दाम कधी वाकड्यात शिरतो. आणि एक.. मी तर नकार देईनच गरज पडल्यास.. पण त्याआधी घरात तुमचा नकार कळलाच पाहिजे!"

त्याचे लाॅजिक बिनतोड होते. उद्या त्याच घरात प्रेमानंदशी सोयरीक जोडायला जमले पाहिजे! मला भरून आले. माझ्या या प्रेमकथेसाठी कोण कोण किती विचार करतेय! कालिंदी नि मिलिंदा तर आहेतच.. त्याचा बाॅस पण.. नि आता पूर्णानंद देखील! या सर्वांचे श्रम फळास येवोत नि आईवडलांना चांगला जावई लाभो! स्वामीजी माझ्यासाठी जास्त मागणे नाही! अाणि विचार तर मी सकारात्मकच करतेय ना!

संध्याकाळचे वेध मला दुपारीच लागले. समोवार हाँटेल. तिथे सारे लेखक बसून विचार- मनन- चिंतन- मंथन करतात म्हणे! डांबिस आहे काकु. मिलिंदाला मी सांगितले माझ्या भेटीबद्दल तर मिलिंदाने माहिती दिली मला. तर काकु म्हणते, "तुझे ग तिथे काय काम?" डांबिस! माझ्या प्रेमची मी स्फूर्ती देवता बनेन. तो एकाहून एक पुस्तके लिहिल तेव्हा बोलती बंद होईल तिची! असा राग आला तिचा! पण नंतर वाटले, तिची ही सवयच. येता जाता टांग खेचत राहते. आणि तिने काय कमी मेहनत घेतलीय माझ्या साठी? दुपार अशी हुरहुर वाटण्यात गेली. पण संध्याकाळी काय बोलावे याचा मात्र विचार नाही केला मी. उत्स्फूर्ततेत एक मजा असते म्हणे.

समोवारच्या सभोवार दाट झाडी आहे. मोठी टेबलं. बाजूला गरज पडली तर रिफर करायला पुस्तके. पेन आणि पेन्सिल .. कागद आजूबाजूस पडलेले. हवे ते घ्या. कुणी कुणाला उठवत नाही जागेवरून. मी पोहोचली तर प्रेम आधीच येऊन बसलेला.

"वा! अगदी वेळ पाळतेस तू प्रीती. सहा म्हणजे सहा वाजता आलीस."

"हो. तात्या म्हणतात कुणालाही वेळ दिलेली पाळलीच पाहिजे!"

या पेक्षा थोडी रोमँटिक सुरूवात झाली असती तर बरे झाले असते. पण येताना माझ्या छातीत धडधडत होते. तोंड कोरडे पडलेले. तशी पहिल्यांदाच मी प्रेम बरोबर एकटीने आणि चोराच्या मनात चांदणे असल्याने घरी न सांगता आलेली. त्याच्या पुस्तकाबद्दल बोलायचेय त्याला. मला तर बोलावेच लागेल. काय बोलणार मी? फोनवर चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत.

"बस ना!"

मी बसली. प्रेम तसाच होता. इतके दिवस झोप उडवणारा तो चेहरा मी डोळ्यांत साठवून ठेवत म्हणाली, "लवकरसे आलात?"

"हो. आॅफिस लवकर सुटले. परत तुला बोलावलेले इथे. ही जागा इतकी छान आहे सांगू.."

"खरंय.. बघता बरोबर मी प्रेमात पडलेय.."

"काय म्हणालीस?"

"अहो जागा इतकी सुंदर आहे ना.. तिच्या."

"काय घेणार?"

देशील जे हवे ते..? माझ्या मनात प्रश्न!

"तुम्ही म्हणाल ते.."

"चहा छान मिळतो येथे .."

"चालेल."

मी चहाची दीक्षा घेतलेली उडप्याकडे, ती अशी उपयोगी पडली!

"मग, सापडली ना जागा? म्हटले रस्ता चुकतेस की काय?"

"नाही हो.."

"एक सांगू, तुला वाटते तितका मोठा नाहीये मी.."

"हा विनय.."

"विनय नाही प्रीती.. अगं वयाने.. तू मला अहो जाहो नको करूस.. मला वाटते आपली मैत्री आता झालीय बरीच!"

प्रेमने धक्का दिला मला.

"नाही हो.. म्हणजे तोंडात येत नाही .."

"म्हण पाहू .. तूची बाराखडी.. तू.. तुला.. तुझे.. तुझ्याकडे.. तुझ्यासाठी.. "

"बस बस.. म्हणते.. पण तोंडात बसायला वेळ लागेल.. चालेल .. तुला?"

"आता कसं.. आता आपण एका पातळीवरून चर्चा करू शकतो."

"चर्चा?"

"पुस्तकावर.."

"हां.. इथे आलं की सारं विसरायला होतं नाही? तुझं पहिलं पुस्तक गाजतेय!"

"खरं सांगू.. त्याने काय होतंय्.. तुला वाटेल मी भाव खातो म्हणून, पण लोकांचा ॲटिट्यूड बदलेल तर त्याला काही अर्थ आहे.."

"तसे नसते रे. तू कितीही जीव तोडून लिहिलेस.. कुणी वाचले तरच काही बदल होईल की नाही सांग मला.. जेवढे जास्त वाचतील तेवढा परिणाम वाढेल.."

"कुणास ठाऊक. घे चहा घे.."

"एक विचारू.. इथे आईस्क्रीम मिळते?"

"चहाबरोबर? असेल .. का?"

"मला स्ट्राॅबेरी आइस्क्रीम खायची इच्छा झालीय!"

"इथे ना.. फक्त चहा काॅफी अाणि सँडविच! पण तू म्हणशील तर जाताना खाऊ दुसरीकडे."

पूर्णाचा बाण पूर्णपणे उपयोगी दिसत होता.

"मला काय वाटते बरं का प्रेमानंद, शरणकुमार परिस्थितीस शरण न जाणारा आहे. साठे समजा.. किंवा दुसरी जी कुणी नायिका असेल तिला .."

"मी एक सांगू .. इतक्या वेळा इथे आलोय मी.. आज काही वेगळेच वाटतेय.. तुझी हरकत नसेल तर एक सांगू .."

"हुं.."

"आज पुस्तक सोडून कशावर तरी बोलले तर चालेल?"

माझ्या मनात फुटणाऱ्या लाडवांचा आवाज बाहेर ऐकू येतो की काय.. भीती वाटली मला. फक्त हे फुटणारे लाडू बुंदीचे, रव्याचे की आणखी कसले असतात?

"नाही तुला वाटेल की मी बोलावले पुस्तकाबद्दल बोलायला नि तेच बोलायचं नसेल तर.. तुला.."

"छे छे. माझी कसली हरकत असणारे? परत भेटूच त्या पुस्तकासाठी.. होय की नाही?"

स्वप्नवत वेळ चालला होता. प्रेमने काॅलेजच्या आठवणी सांगितल्या. जातिभेदाने समाज कसा पोखरून काढलाय आणि त्याला त्याच्याबद्दलची पोटतिडिक ही सांगितली. पुस्तकांनी दुनिया बदलेल असल्या भाबड्या विचारांचा नव्हता तो. उलट जातिविरहीत समाज हवा म्हणणारा नायक त्याच्या गोष्टीत दिसतो.. ते त्याचे विशफुल थिंकिंग होते.

"तुला सांगू.. लोक मला चक्रम म्हणतात. मी ते मत बदलण्याच्या फंदात नाही पडत. उलट स्वतःवरच विनोद करतो मी. हा बुरखा उपयोगी पडतो प्रीती.. का कुणास ठाऊक कुणाशी मी बोलत नाही इतके .. तुझ्याशी बोलावेसे वाटते!"

मी स्वप्नात तर नाही ना? मी स्वतःलाच चिमटा काढला.. आणि ओरडली, "आई गं!"

"काय झाले गं?"

"काही नाही .. तू म्हणतोस त्याचा विचार करतेय .. आणि मलाही तुझे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. किती छान बोलतोस तू! उद्या भेटशील परत?"

"भेटूयात ना.. चल आता अाईस्क्रीम खाऊ.."

"नको.. आज माझे पोट असेच भरलेय.. उद्या साठी ठेवू बाकी!"

अर्धा रस्ता त्याच्या बाईकवरून सोडले त्याने मला. घरी आली आणि पाठोपाठ त्याचा फोन.. नीट पोहोचलीस ना विचारायला! एखादे स्वप्न पहावे अशी ती संध्याकाळ. पहिली वहिली. प्रेमबरोबरची. त्याच्या बोलण्याचा विचार करून मी थक्क होत होती. माझा विश्वासच बसत नव्हता असे काही होईल यावर!

आई म्हणाली, "कुठे गं गेली होतीस?"

"कालिंदीकडे.. नाही.. त्या मुक्ताकडे."

"तेच. कालिंदीकडे कशी जाशील.. तीच आलेली इथे!"

"ती? कशाला?"

"अगं ती नसेल.. तिची जुळी बहीण असेल.. हो की नाही गं मने?"

तात्या माझी साक्ष काढत म्हणाले.

मी काही न बोलता आत निघून गेली. त्यानंतर का कोण जाणे.. दोघे हळूच हसल्याचा भास झाला मला.