Pritichi Premkatha - 13 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | प्रीतीची 'प्रेम'कथा - 13

Featured Books
Categories
Share

प्रीतीची 'प्रेम'कथा - 13

१३

शोधू कुठे तुला?

अर्थात

पुनश्च शोध!

पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली.. मला जाग आली तेव्हा स्वप्नात हे गाणे सुरू होते! मी उठली तीच लाजत. आज आता लवकरच निघावयास हवे. प्रेमच्या शोधात आणि प्रेमाच्याही शोधात! लवकर घराबाहेर पडणे गरजेचे, नाहीतर नवीन काही काम काढले आईने तर अडकून पडेन मी. मी तयारीला लागली. पत्ता थोडा दूरचा होता. पण प्रेमासाठी कुणी सात समुद्रापार पण जाऊ शकतात तर हे अंतर तर काहीच नाही! परत आल्यावर म्हणण्याचे गाणे पण निवडून ठेवले मी.. 'इतना तो याद है मुझे की उनसे मुलाकात हुई..'

'सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई..' गात मी निघाली. अर्थातच मरून ड्रेस घालून! लकी साडी कालची. आजचा लकी ड्रेस. आणि मरून पर्स, मरून सॅंडल्स! कुठला भाग लकी निघेल कुणास ठाऊक, म्हणून सारे काही मरून! घरातून निघाली मी. रस्त्यात कालिंदीला भेटायला गेली. काल काहीतरी काम असणार तिचे. आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावला मी. रागावली असेल तर तिचा राग घालवायला हवा. मी तिच्या घरी पोचली तर मिलिंदा निघून गेलेला. काकु होती. मी पहिले 'साॅरी' बोलली तिला नि म्हणाली, "काल घरी कोण होते माहितीय? भिंदि!"

"क्काय?"

"अगं त्याने ऐकला तुझा आवाज! ओळखला पण. जंगली प्राण्यांना आवाजाची समज जास्त असते म्हणतात! इमॅजिन तू आली असतीस आत तर?"

"अगं पण व्हाॅट वाॅज भिंदि डुईंग देअर?"

"काय सांगू तुला रामकहाणी?"

"रामकहाणी सोड.. प्रेमकहाणी ऐकव!"

"तीच तर स्टोरी आहे. कदाचित काल आलेले जगदाळे .. आणि त्यांचा मुलगा.. तोच असू शकेल! म्हणून मी मन लावून खायला दिले कांदेपोहे!"

"हुं. आणि मन लावून हाकलवलेस मला."

"मग काय भिंदिसमोर बसवून पोहे खाऊ घालणार होती तुला? विचार कर.. तू घरात आलीस.. भिंदि समोर.. तुला प्रश्न विचारणार.. कसा काय झालाय इंटरव्ह्यू.."

"अगं, ते जाऊ देत. आज भिंदि तीन वाजता वैतागणार.. त्याचा इंटरव्ह्यू टीव्हीवर येण्याची स्वप्ने पाहात असणार.. बिचारा!"

"हुं. पण या गडबडीत मी आता चाललीय प्रेमला शोधायला. भेटला पाहिजे .."

"भेटेल. मग गा गाणे, दिसला गं बाई दिसला मला बघून गालात हसला!"

"तुझ्या तोंडात तूपसाखर.. श्रीखंडपुरी.. जिलबी मालपुआ.. नाहीतर आमरसपुरी पडो. नाहीतर अमिताभ म्हणतो तसे कॅडबरी चा‌ॅकलेट पडो.."

"अय्या.. किती गोड..!"

"कोण? अमिताभ?"

"होच.. तोही आणि ते ही!"

"ते कोण?"

"अगं चाॅकलेट!"

तो दिसेल ना.. दिसला तर हसेल ना? या विचारात निघाली मी. मनात स्वामींचे सकारात्मक स्मरण करत. स्वामी अरपितानंदांना भक्ती अर्पण केली की फळ मिळाल्यावाचून राहात नाही म्हणतात. ते फळ आता मिळेलच. स्वामींची लीला अगाध आहे! त्यामुळे महाराष्ट्र राज्य लाॅटरीसारखे ते फळ आज नाहीतर उद्या मिळेलच! रस्त्याने चाललेली मी. 'पाऊले चालती प्रेमाचीच वाट' म्हणत!

अर्धा रस्ता आली असेन मी नि समोर आला तो भिंदि! कुठूनही पाठ सोडत नाही हा! मी खाली मान घालून निघणार तर त्यानेच मारली हाक, "शुक शुक.. अहो मिस घोरपडे.."

माझा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न फसेल की काय? फसलाच तो. भिंदिकडे पाहात मी बोलली, "काका, तुम्ही इकडे?"

"मी जवळच राहतो इकडे. तुम्ही इकडे?"

"हो.. मैत्रिणीकडे आलेली."

"हां.. काल ती आलेली तुमची मैत्रीण .. ती कालिंदी .. टीव्हीत असते?"

"कोण कालिंदी?"

"अहो काल आलेली घरी ती? ती मंदाकिनी .. कालिंदीची जुळी बहीण .. तुम्हाला पण तीच वाटली ना? कालिंदीला नाही ओळखत मी. पण का?"

"नाही, माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेली ती. तिचा नंबर असेल तर हवा होता हो."

"नाही काका, ती कालिंदी नाही. मालिनी .."

"मालिनी? तुम्ही आताच मंदाकिनी म्हणालात

हां.. ते आम्ही ठेवलेय.. ती स्वतःला हेमामालिनी समजते ना.. म्हणून आम्ही तिला मालिनी म्हणतो .. आणि गंमत म्हणजे तिचे लग्न ठरलेय त्या मुलाचे नाव आहे धर्मेंद्र!"

"असेल. तिला विचारा ना कालिंदीचा नंबर .."

"मालिनीला? अहो दोघी एकमेकांचे तोंड पण नाही पाहात. जुळ्या आहेत पण भांडतात खूप. एक नंबर भांडकुदळ! काय आहे ना तो धर्मेंद्र आवडायचा कालिंदीला. पण त्याला कळलेच नाही दोहोंपैकी मालिनी कोण नि कालिंदी कोण. त्याने एकीला निवडले ती निघाली मालिनी! कालिंदीने बोलणेच टाकले त्यानंतर तिच्याशी! आता तिला कालिंदीचा नंबर विचारला तर ती भडकेल."

"असे का? पण त्या कालिंदीचा नंबर खरेच नाही तुमच्याकडे?"

"नाही हो काका. ती नकचढी.. टीव्हीवर काय कामाला लागली, स्वतः ला ग्रेट समजते!"

"हो ना. मला पण वाटली ती शिष्ट. आणि तिची ती मुसलमान सहकारी.. तुम्ही ओळखत असाल?"

"मी? कालिंदीलाच नाही ओळखत तर.."

"ते ही खरंच. का कोण जाणे.. तिचा नि तुमचा आवाज एकसारखा वाटतो!"

"काय आहे काका, एकासारख्या एक दिसणाऱ्या दोन जणी असू शकतात.. आवाजाचे काय?"

"हं.. हे ही खरेच!"

"मी निघू काका.. घाईत आहे."

"ठीक. कालचे ते जगदाळे आले होते ना त्यांच्याबद्दल.. जाऊ देत तुम्ही घाईत आहात. मी बोलतो घोरपड्यांशी!"

इतके सारे ऐकून घेतले त्या भिंदिचे.. आणि जे ऐकायचे ते न ऐकताच निघावे लागले मला. घाईत होती ना मी! नको तेव्हा ते मी घाईत आहे वाले वाक्य बोलली मी.

मी निघाली पुढे. प्रेम माणसाला असला खोटेपणा करायला लावते? चोरटेपणा ठीक. आता खोटेपणादेखील? तरी बरे प्रेमचा अजून पत्ता नाही!

पुढे काय काय होईल? कालिंदी म्हणते तसे, आगे आगे देखिए होता है क्या! बस स्टाॅपवर बसची वाट पाहात उभी होती मी. उशीर झालेला बऱ्यापैकी. सगळे त्या भिंदिमुळे! बस आली. इंग्रजीत नाॅट टू मिस द बस असे काहीतरी म्हणतात ना तशी बस नाही झाली मिस माझी!

त्या प्रेमच्या पत्त्यावर पोचले. माझ्या छातीत खरे सांगते, धडधडत होते. मी काय बोलणार नि मी आली ती कशासाठी .. काही ठरवून आली नव्हती मी. काय होईल ते होईल. तशी मी याबाबतीत स्मार्ट आहे. वेळ सावरून घेणे जमते मला चांगले. तिसऱ्या मजल्यावर.. 'त्या तिथे पलिकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे..' म्हणत चढली मी! आणि मला दिसले ते त्या झोपड्याला लटकलेले मोठे टाळे! माझा अपेक्षाभंग झाला म्हणणार नाही मी कारण विशेष अपेक्षा नव्हतीच माझी. फक्त एक झाले, तो पत्ता त्याचाच एवढे तरी नक्की झाले शेजाऱ्या पाजाऱ्यां कडून! तो कधी भेटेल वगैरे कुणालाच पत्ता नव्हता तिथे.

परत माझी वरात परत निघाली. पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवायला हवा! काकुला फोन केला तर म्हणाली, "ये घरी. विचार करूयात!"

विचार करायला माझी कधीच ना नसते! सगळ्यात सोपे ते विचार करणे! हो की नाही?

आज मीटिंग झाली परत प्रेप्रीप्रेबंस ची! मिलिंदा नसल्याने काकुनेच सुरूवात केली. मी तिला आजवरची कथा थोडक्यात सांगितली परत. एखाद्या डिटेक्टीवप्रमाणे तिने ती ऐकली. त्यातले काही डिटेल्स तिला ठाऊक नव्हते तर काही होते. माझी गोष्ट अर्धवट झाली असतानाच ती म्हणाली, "सापडला!"

"कोण?"

"कोण नाही .. काय विचार!"

"विचारते.. काय?"

"उपाय!"

"कशावर?"

"कशावर काय? उपाय असतो तो समस्येवर. क्या है इम समस्या का हल .. भेजा चलाओ तो समजेल आज नहीं तो कल!"

"सांग!"

"ऐक. आताच ऐकले मी. तुझ्या बाबांना मुलाखतीबद्दल ठाऊक आहे.."

"आहे.."

"ते भिंदिला ओळखतात?"

"चांगलेच!"

"त्यांना त्या पुस्तकाबद्दल हे आहे ते ठाऊक आहे?"

"आहे."

"ते तुझ्या प्रेमला ओळखतात?"

"ओळखतात."

"तर मुली, हे बघ.. त्यासाठी आपल्याला तुझ्या बाबांना सांगावे लागेल.. त्याला बोलावून घ्या. अापण जाऊ तिकडे कॅमेरा घेऊन!"

"पण मी बुरखा घालून येऊ?"

"नाही. मिलिंदा येईल. तू तशीच ये. स्वतःच्या बाबांकडे यायला काय प्राॅब्लेम?"

"काहीच नाही!"

"पण बाबांनी भिंदिला सांगितले तर?"

"हे खरेय. पण तू इकडे बुरखा घालून आलीस तर प्रेमशी प्रेमाने कोण बोलणार?"

"हे ही खरेच. एक चान्स तर घ्यायलाच हवा!"

"नाही गं.. मिलिंदाला मी सांगितलेय इतक्यात नको.. एकच तर वर्ष झालेय.."

"काकु.. मी कशाबद्दल बोलतेय .. तू कसला विचार करतेयस?"

काकु लाजली.. गोरीमोरी होऊन गप्प झाली आणि काहीच न झाल्यासारखे विषय बदलत म्हणाली,

"ठरले तर.. तू फक्त टाईम कळव. आम्ही येतोच. बघू पुढचे पुढे. आगे आगे देखिए होता है क्या!"

आता त्यासाठी तात्यांच्या आॅफिसात जाणे आले. शुभस्य शीघ्रम म्हणत मी निघाली. परत भिंदि न दिसो म्हणजे झाले! हे इंटरव्ह्यूच्या निमित्ताने त्याला बोलवायचे आधी सुचायला हवे होते. पण स्वामी म्हणतात ते खरे, 'प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते!' समय से पहले कुछ नहीं होता. आणि 'जब होता है वोही समय होता है..' हे शेवटचे वाक्य .. माझ्या पदरचे.. नाही .. साडी नाही नेसली मी.. तर माझ्या ओढणीचे!