Pritichi Premkatha - 9 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | प्रीतीची 'प्रेम'कथा - 9

Featured Books
Categories
Share

प्रीतीची 'प्रेम'कथा - 9

प्रेमाचा शोध

अर्थात

प्रेप्रीप्रीबंस!

आता पुढे काय करायचे यासाठी आमची 'प्रेमप्रीती प्रीतिबंध समिती' स्थापन झाली! ही मूळ कल्पना माझीच. मागे काकुच्या वेळेस 'कांंकुजोजुस' म्हणजे 'कालिंदीकुंद जोडी जुळणी समिती' स्थापन केलेली मी. त्याची अध्यक्षा मीच होते! रीतसर बैठका घेऊन सारे घडवून आणलेले आम्ही. समिती तर स्थापन झाली परत. बातम्यांच्या भाषेत गठन झाली! बातम्यांची भाषा.. कारण मुकुंदा! तो'ज्वालाग्राही सर्वदा' चॅनेलमध्ये बातमीदार आहे. तर अशी बातम्यांची भाषा बोलतो तो. तो समितीचा अध्यक्ष आणि काकु कार्यवाह! ही समिती ही बाकी समित्यांसारखी! बैठका घेते नि निर्णय घेते..

मुकुंदाने सुरूवात केली, "आपल्या या 'प्रेप्रीप्रीबंस'च्या पहिल्या बैठकीत आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रीतीरंगाचा गहन प्रश्न उपस्थित झालेला आहे. प्रेम आणि प्रीती जुळणी करण्यास काय काय करावे याची उजळणी करण्यास आपण येथे जमलो आहोत. आपल्या सोबत आहेत कार्यवाह कालिंदी आणि प्रत्यक्ष प्रीती. तर कालिंदीताई.."

"क्काय? ताई तुझी मी?"

"न.. नाही .. कालिंदीबाई.. तुमचे काय मत आहे?"

"माझे मत स्पष्ट आहे.. मियाबीबी राजी तो क्या करेगा काजी? पण त्यात जर फक्त बीबी राजी तर काय करेल आजी? एखाद्यास मिया कसे बनवावे याचा आपल्यास अनुभव आहे. तेव्हा तो वापरून पुढे जावे!"

"याचा अर्थ काकु, या मिलिंदास आपली सिक्रेट्स सांगावी लागतील?"

"काय हरकत आहे? आता?"

"कालिंदीबाई, आपल्याला यापुढे पाहणे आहे. यानंतर काय.. जे झाले ते होऊन गेले. विसरून जावे.. आणि एक.."

"काय?"

"एखादा भूतकाळात गाढव निघाला नि फसला म्हणजे पुढचा फसेलच असे नाही!"

"काय म्हणालास?"

"अगं काही नाही.. आमच्या च‌ॅनेल वर जाहिरात येते ना.. म्युच्युअल फंडातील past performance is not a guarantee in present .. तोच नियम बरे!"

"हुं.. घरी ये बघते! गर्दभ!"

"तर तो संदर्भ नंतर बघू. आजचा आपला विषय आहे.. प्रेम का बंधन. थोडक्यात त्या प्रेम नामक इसमास कसे बंधनात अडकवावे.."

"इसम? मिलिंदा.. तुला कुठल्या इसमाच्या मागे ही .. ही प्रीती पडेल असे वाटते?"

"आमच्या बातमीत असतात असेच शब्द! तर प्रेम नामक व्यक्तीस.. कसे बंधनात अडकवावे.. याच्या बद्दल विचार करण्याचा विचार आपल्या मनात आला त्याबद्दल विचार करण्यास आपण जमलो आहोत. तर प्रीती ताई, तुला ताई म्हणू शकतो.. तर तुझा हा प्रेम करतो काय? काय आहे योजना आखताना सारे ठाऊक असल्यास उत्तम!"

"प्रेम.. प्रेमानंद जगदाळे त्याचे नाव. आणि त्याने एक पुस्तक लिहिले आहे.. दुसरे लिहिण्याचे प्राॅमिस दिले आहे! त्याच्या संपादनात मी त्यास मदत करणार असे ठरले आहे!"

"मग घोडे अडले ते कुठे?"

"अडले? मुदलात घोडे कुठे तेच ठाऊक नाही हिला!" काकु म्हणाली नि मी रूमालाने डोळे पुसले. चॅनेलच्या चर्चेत अशाने चांगला टीअारपी मिळतो म्हणे! क्षणभर ही खरी चर्चा नाही हे मिलिंद विसरला असावा कारण मी डोळे पुसल्याचे पाहून त्याच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दिसू लागले! लगेच सावरत म्हणाला, "याचा अर्थ तो लेखक आहे.."

"होय. विनोदी विद्रोही!"

"हा कुठला नवीन जाॅनर? ते असो. तर त्याचा पत्ता लागत नाही. गुगलवर सापडावा इतका तो फेमस नाही. बरे फेसबुक अकाउंट त्याचा?"

"माहिती नाही!"

"एवढी तरी प्राथमिक माहिती हवीच. कालिंदी लवकर सर्च मार.."

कालिंदी तिच्या फेसबुकात फेस घालून बसली. नि मी माझ्या तोंडाला फेस आणणाऱ्या प्रेमबद्दल विचार करत बसली. म्हटले हा विद्रोही.. हा असल्या भानगडीत कसला पडतोय! आणि ते खरेच होते. मागे वाचलेला शब्द आठवला, त्याला हे सारे बूर्झ्वा वाटत असणार! विद्रोहीच तो!

मिलिंदाची ट्यूब पेटल्यासारखा तो एकाएकी ओरडला, "सापडला!"

"माझा प्रेम?"

मी ज्या सुरात विचारले ते ऐकून मिलिंदाला हसू आलेले त्याने कष्टाने दाबून धरलेले मला स्पष्ट दिसले. प्रेमिकांवर ही दुनिया अशीच हसते.. उगाच नाही सिनेमात तिला बेरहम दुनिया म्हणत!

"अगं त्याला शोधण्याचा मार्ग सापडला! ऐक कालिंदी तू देखील .."

"बोल."

"तू आणि ही प्रीती दोघे माझ्या ज्वालाग्राही चॅनेलचे जर्नलिस्ट."

"आम्ही?"

"यस्स! मी तुम्हाला खोटे आयडी देतो. तुम्ही जाऊन त्या पुस्तकवाल्याला भेटा!"

"कोण? प्रेम? तो कुठेय माहिती असते तर..?"

"इतके मलाही ठाऊक आहे. त्या प्रकाशकाला भेटा!"

"आणि?"

"नीट ऐका. तुम्ही टीव्ही पत्रकार म्हटले की तुमचा भाव आपोआप वधारेल.."

"ॲहा रे! जसा काही तुझा वाढतो भाव.."

कालिंदीला गप्प बसवले नसावे! पण सराईतपणे दुर्लक्ष करीत मिलिंद बोलत राहिला ..

"प्रकाशकाला सांगा, त्या पुस्तकाबद्दल चर्चा करायची आहे.."

"मग?"

"त्याला लेखकाशी बोलायचे म्हणून सांगा!"

"मग?"

"मग काय? त्याला लेखकाला बोलवावेच लागेल .. तो स्वतःहून बोलावून घेईल.."

"मग?"

"किती वेळा मग? आता मूग गिळा.. लेखक महाशय आले की पुढे काय करायचे ते.."

"अरे पण तो हिला भेटलाय.. त्याला ठाऊकै ही पत्रकार नाही ते.."

"नाहीतर आम्ही त्याचा पत्ता घेतो.. आणि जातो.."

"तुम्हाला तो देईल असे वाटते? टीव्हीवर यायला लोक काय काय नाही करत? एकवेळ त्या प्रेमला नाही बोलवणार तो पण फक्त त्याला टीव्हीवर येऊ द्यायला तो मदत करेल? इंपाॅसिबल! मला विचार!"

"ओके. म्हणजे त्या प्रकाशकाचा पत्ता मिळवावा लागेल .."

"हं.. त्यात काय! जस्ट गुगल इट! आणि जा त्याच्याकडे."

"ह्या प्रीतीचे काय?"

"ती तर मुख्य आहे की नाही.. एक मिनिट .. प्रीती कॅमेरा मन.. साॅरी कॅमेरावुमन.. ती फिल्म बनवेल.."

"मी नाही.. मी बोलणार .. त्याच्याशी!"

"तू उतावळी नवरी बनून बाशिंग बांधू नकोस डायरेक्ट डोक्याला उगाच. एकदा सावज टप्प्यात आले की शिकारी तूच! आणि तुझे नाव या आॅपरेशन प्रेम मध्ये असेल सुलताना! बुरखा घालून जाशील तू!"

"मी?"

"नाही गं.. मी!"

"तू त्याची खरी फिल्म बनवलीस की किती उपयोगी पडेल बघ. विरहगीत गाताना हाती तसबीर असली की त्यात दर्द भरतो!"

फिल्म! ही गोष्ट उपयोगी खरीच! आणि एकदा तो भेटला की पुढे काय करायचे ते पाहता येईल. घोड्यावर बसायला मुदलात तो घोडा हवा ना समोर!

मी म्हणाली, "कधी जायचेय?"

"लगेच .. तू बुरखा आणलास की लगेच!"

"शुभ कार्य में देर किसलिए! वो कहते है बेकरार है दिल.. हम कहते थे कौन भरेगा बिल!"

"कालिंदी.. काय पण तुझे. तुझे काव्य ऐकून बिलातून.. आय मीन बिळातून उंदीर येईल बाहेर!"