२३) मी एक अर्धवटराव!
त्यादिवशी सायंकाळी आम्ही दोघे जेवायला बसलो होतो. नेहमीप्रमाणे टीव्हीवरील मालिका चालू होत्या. एका वाहिनीवरील एक मालिका एका विशिष्ट आणि रंगतदार वळणावर असल्यामुळे आम्ही दोघेही मन लावून पाहात होतो. प्रसंगी सौ'ची स्थिती अशी होई की, हातातला घास तोंडात टाकताना तो ओठांजवळ तसाच ठेवून किंवा घास चावताना तसाच थांबवून ती तो प्रसंग बघत होती. तितक्यात मला जोरदार ठसका लागला. एका क्षणात ठसक्याने उग्र स्वरूप धारण केले. मला काहीही सुचत नव्हते, डोळ्यात आसवांनी गर्दी केल्यामुळे मला समोरचे काहीही दिसत नव्हते. हातातील आणि तोंडातील घास खाली पडला. घशात खवखव, आग होत होती. नाकातूनही पाणी येत असताना कपाळावर घर्मबिंदू जमा झाले.
"झालं? लागला ठसका? मी म्हणते असा ठसका लागेपर्यंत जेवणाकडे दुर्लक्ष करून मालिका पाहायची काही गरज आहे का? मालिका पाहायचा एवढाच सोस आहे तर मालिका संपल्यावर जेवायला बसायचे. जेवताना टीव्हीच पाहायचा असेल तर हळूहळू जेवायचे. मालिका पाहायचा हट्टाहास, जेवायची गडबड मग ठसका तर लागणारच की. अहो, आतातरी दमाने घ्या. एवढा ठसका लागलाय, डोळे पाण्यांनी गच्च भरून वाहत आहेत तरीही लक्ष त्या टीव्हीवरच! काय सांगावे बाई, या टीव्हीच्या वेडाला. अहो, काय झाले? चुकून भाजीऐवजी ठेच्याचा घास खाल्लात की काय? आयुष्यात पहिला घास लग्नात भरवलात तोही मुठभर ठेच्याचा! तसे तर केले नाहीत ना? पाणी समजून वरण पिले का? अहो, मी काही विचारतेय..."
तिचे ते बोल ऐकून तशाही परिस्थितीत माझ्या मनात विचार आला की, जिथे माझ्या तोंडातून शब्द निघत नाही, माझा प्राण जणू घशात अडकलाय तो एक तर कोणत्याही क्षणी बाहेर पडेल किंवा आतल्या आत गिळल्या जाईल असे असताना माझी बायको माझ्यासमोर अख्खी प्रश्नपत्रिका ठेवतेय. माझ्यावर आग ओकण्याचे सोडून हिने मला पाणी द्यायला हवे ही साधी गोष्ट हिच्या कशी लक्षात येत नाही. शेवटी मी स्वतःच हात लांबवून प्याला घ्यायच्या प्रयत्नात डोळ्यात आलेले पाणी आणि शारीरिक अवस्था यामुळे तो प्याला पडला आणि त्यातले सारे पाणी सांडले.
"झा..ले! सांडलत पाणी? वाढवले माझे अजून माझे एक काम! काय हा वेंधळेपणा! शीः बाई! किती करावे एकटीने?..." असे दरडावत तिने तिचा पाण्याचा प्याला माझ्या हातात दिला... त्यात जेमतेम घोटभर पाणी उरले होते. मी माझ्या ठसक्यावर नियंत्रण मिळविले. मात्र रागारागाने मी टीव्ही बंद केला तसा सौ'चा भडका उडाला.
"झाले समाधान? केला टीव्ही बंद? अहो, काय सांगावे तुम्हाला? मालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून जो सस्पेन्स सुरू आहे तो आज-उद्या संपणार, कदाचित आजच्या भागात त्याचा निकाल लागेल अशी स्थिती असताना तुम्ही चक्क टीव्ही बंद केलात..."
"अग, आत्ता तर तू टीव्हीच्या नावाने खडे फोडत होतीस..."
"म्हणून मग मलाच पाठवा खडे फोडायला? लावा. आधी तो टीव्ही लावा." ती संतापून म्हणाली तसा मी चरफडत टीव्ही सुरू केला पण तोपर्यंत दुसरी मालिका चालू होत असलेली पाहून बायको पुन्हा ओरडली,
"बघा. संपली मालिका. काय मिळाले हो तुम्हाला? काय झाला असेल शेवट? कसे कळावे?"
"अग, ती मालिका रात्री अकरा वाजता पुन्हा सहक्षेपित होते..."
"म्हणजे आता रात्री अकरापर्यंत जागून ती मालिका पाहू? रात्री जागरण करून उद्या आजारी पडू?" तिचे ते बोल ऐकून मीच आवरते घेतले आणि शांत बसून राहिलो...
दिवस दुसरा... तीच सायंकाळची वेळ... जेवणाची आणि मालिका पाहण्याची! दिवसभर लाईट नसल्यामुळे रात्री चुकलेला सस्पेन्स, उर्वरित मालिका पाहायला मिळाली नव्हती त्यामुळे हिचा राग वारंवार अनावर होत होता. मालिका लागली आणि आदल्या रात्री चुकलेल्या भागाची जी रुखरुख लागली होती तो सस्पेन्स या भागात संपण्याची चिन्हे दिसत होती ते पाहून बायको कमालीची आनंदली. तो सस्पेन्स संपणारी दृश्यं समोर उजागर होत असताना अचानक जोराचा ठसका लागला... हिला.. माझ्या बायकोला! तिची परिस्थिती माझ्यापेक्षाही भयंकर होती. काय झाले हे तिला समजत नव्हते तर काय करावे हेही तिला सुचत नव्हते. कदाचित लागलेल्या ठसक्यापेक्षा तिला असे वाटत असावे की, काल नवऱ्याला ठसका लागताच आपण जे आकांडतांडव केले, जी आगपाखड केली तसे तर काही आता नवरा करणार नाही ना? मी इकडेतिकडे पाहिले. नेमके त्याच दिवशी मी पाणी घ्यायला विसरलो होतो. मी धावतच आत गेलो. पाण्याने भरून ठेवलेला प्याला उचलून त्वरेने बाहेर आलो. तोपर्यंत ती थोडी सावरली होती. मी प्याला तिच्या हातात न देता तिच्या तोंडाला लावला. दोन घोट पाणी पिऊन होताच तिने प्याला बाजूला केला.
"सॉरी! आज मी पाणी आणायला विसरलो. असेच होते ग, ठसका का लागला याची त्याक्षणी कारणमीमांसा नाही करता येत. प्रत्येकाच्या अंगात कधी ना कधी ठसका शिरतो म्हणजे ठसका असा सांगून येत नाही..."
"पुरे झाले. तुमचा संयम कालही दिसला आणि आज तो पुन्हा सिद्ध केलात. शिवाय धावपळ करून पाणी आणून स्वतःची समयसूचकता, तत्परता आणि माझ्यावरील प्रेम सारे एकाच झटक्यात दाखवून दिले. मी काय म्हणते, असाच पाण्याचा घोट माझ्या शेवटच्या क्षणी पाजा हो. कसे आहे अर्धवटराव, मी रागावते, आकांडतांडव करते, घर डोक्यावर घेते ही जी काही तुम्ही उघड म्हणा किंवा मनातल्या मनात विशेषणं लावता ना, ती काही तुमची शत्रू आहे म्हणून करीत नाही हो. माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे म्हणून... " ती तसे बोलत असताना आधी तिला आणि नंतर मला अशी ठसक्याची उबळ आली म्हणता की विचारुच नका. तशाच अवस्थेत दोघांनीही शेजारी ठेवलेले प्याले हलकेच उचलले आणि लावले तोंडाला... एकमेकांच्या!
@ नागेश सू. शेवाळकर