Me aek Ardhvatraav - 17 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | मी एक अर्धवटराव - 17

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मी एक अर्धवटराव - 17

१७) मी एक अर्धवटराव!
सकाळचे आमचे कार्यक्रम तसे ठरलेले असायचे. माझे स्नान, पूजा होईपर्यंत नाश्त्याच्या गरमागरम फराळ तयार होत असे. त्यादिवशीही आमचा फराळ सुरू असताना बायको म्हणाली,
"देवपूजेच्या बाबतीत मात्र तुमचा हात कुणी धरू शकत नाही. अगदी नंबर वन पुजेच्या बाबतीत! देवांची मांडणी असेल, त्यांची षोडशोपचार पूजा असेल आणि फुलांनी केलेली आरास असेल सारे कसे बघतच बसावेसे वाटते. जशी देवपूजा व्यवस्थित, मन लावून करता तशी इतर कामांमध्ये मन का नाही लागत हो तुमचे? तिथे का कंटाळा करता हो?"
"मला वाटतच होते की, स्तुतीसुमनाची त्यातही गुलाबपुष्पांची उधळण होत असताना बोचणाऱ्या काट्यांची पाखरण कधी होणार आहे?"
"जे खरे ते खरे! मग स्तुती असो की, टीका..."
"ते जाऊ दे. फेसबुकवर एक उत्कृष्ट संदेश आलाय."
"ते डबडं आणि ते वात्रट संदेश तुम्हालाच लखलाभ! त्या बुकात तुमचा फेस अडकलाय तेच खूप झाले. उगाच मला अडकवू नका."
"अग, वाचू नकोस पण ऐकायला काय हरकत आहे? ऐक... 'पत्नी और पाकिस्तान दोनों कि राशी एक है। क्योंकि दोनो कब जंग छेड देंगे पता नही चलता। दुसरी तरफ हजबंड और भारत कि राशी समान है, क्योंकि दोनोही दुश्मन को सहते रहते है।' आहे का नाही..."
"व्वा! काय सुंदर संदेश आहे! व्वा! लिहिला असेल कुणीतरी..."
"अर्धवटरावाने... माझ्यासारख्या..." मी तिने अर्धवट सोडलेले वाक्य पूर्ण केले. सोबतच आम्हा दोघांचे हसणे एकमेकात मिसळून गेले...
नंतरचा वेळ शांततेत गेला कारण सौभाग्यवती स्वयंपाक घरात होत्या. ती स्वयंपाक अतिशय मन लावून करीत असे. स्वयंपाकात ती जणू अन्नपूर्णा! स्वयंपाक आटोपला तसा तिचा आवाज आला, "अहो, स्वयंपाक झाला आहे. जेवायचे असेल तर ताट, वाट्या घ्या. पाणीही घ्या. मला..."
"कॉकटेल पाणी घेतो. रोजची सवय झाली आहे..." मी म्हणालो आणि स्वतःच्या विनोदावर हसत मी स्वयंपाक घरात गेलो. नित्याप्रमाणे सारे साहित्य आणि फ्रीजमधील पाण्याची बाटली घेऊन आलो. सौभाग्यवतीच्या पुढील आदेशयुक्त आरोळीची वाट पाहात बसलो. तितक्यात अपेक्षित असे वाक्य कानावर आदळले,
"अहो, जेवणाचा सारा पसारा कोण नेणार?"
"तुझा नवरा... अर्धवटराव!..." असे म्हणत मी आत गेलो. माझ्या वाक्यावर बायको मंद मंद हसत असल्याचे पाहून मी वेगळ्याच समाधानात तिने वाढलेली ताटं घेऊन बैठकीत आलो. टीव्हीवर क्रिकेटचा सामना लावून मी पहिला घास तोंडात घेतला आणि जाणवले की, वरणात मीठ फार कमी म्हणजे अगदी नसल्यातच जमा होते. मीठ घेण्याचा विचार मनात शिरताच डॉक्टरांचे बोल आठवले, 'कोणत्याही परिस्थितीत जेवणात वरतून मीठ घ्यायचे घ्यायचे नाही.' डॉक्टरांचे सोडा पण सौभाग्यवतीची करडी नजर असताना मीठ घेणे शक्यच नव्हते. तिचे बोल तोंडी लावण्यापेक्षा गपगुमानं अळणी वरण वरपावे. या हेतूने मी जेवायला सुरुवात केली. तिकडे तिनेही जेवायला सुरुवात केली. दोन- चार घास घेतले न घेतले की तिला ठसका लागला. मी त्वरेने तिथे असलेला पाण्याचा प्याला तिच्या हातात दिला. एक घोट घेतल्याबरोबर जळजळीत नजरेने माझ्याकडे बघत तिने हातातील प्याला दाणकन टेबलावर आदळला. सारे पाणी टेबलावर पसरले. पाठोपाठ ठसका आणि संतापाच्या भरात तिने माझ्या अर्धवट कामांच्या केलेल्या उद्धार आणि सोडलेले वाकबाण यामुळे मला समजले की, तिने सांगूनही मी तिच्यासाठी मिक्स पाणी न आणता फ्रीजमधील थंडगार पाणी आणले होते. ठसक्याचा ठसका, थंडगार पाण्याची कळ आणि माझ्यावरील संताप थोडासा ओसरल्यावर ती,
"अहो, जरा मीठाचा डब्बा आणा ना..."
मी निमुटपणे स्वयंपाक घरात गेलो. पहिल्या वर्गातील मुलाने घोकंपट्टी करून पाठ केल्याप्रमाणे 'मीठाचा डब्बा म्हणजे लाल झाकणाचा डब्बा' असे मनात घोकत मी तो डब्बा उचलून आणला आणि तिच्या हातात दिला तशी ती कडाडली,
"अहो, मी तुम्हाला मीठाचा..."
"मीठाचाच डब्बा आहे ना. लाल झाकणाचा डब्बा म्हणजे मीठ..."
"झाकण पाहण्यापेक्षा आत काय आहे ते पाहू नये का?..." ती रागाने बोलत असताना मी डब्बा उघडून आत बघत म्हणालो,
"अरेच्चा! खरेच की! आत तिखट आहे. असे कसे झाले?"
"अहो, काल सारे डब्बे बाईकडून घासून घेतले. महिनाभर मागे लागले तेव्हा ती काल पावली. घासणे झाल्यावर डब्बे बदलले गेले असतील पण तुम्ही आणताना पाहू नये का? साधी गोष्ट आहे.."
नंतरचा जेवणाचा सोहळा विनातक्रार पार पडला. पुन्हा सारे सामान 'बॅक टू किचन' पोहोचवून मी सोफ्यावर विसावलो. समोर क्रिकेट सामना रंगात आला होता. तितक्यात तिथे पोहोचलेल्या बायकोने काही न सांगता माझ्या हातातील रिमोट खसकन ओढून घेतले. कोणत्याही एका वाहिनीवर क्षणभरही न थांबता ती एकामागोमाग एक वाहिनी बदलत बसली. मी घरातल्या घरात शतपावली करीत असताना बायको रिमोट सोफ्यावर फेकून शयनगृहात निघून गेली. मी सुटकेचा निःश्वास सोडला. मनोमन म्हणालो, 'चला. आता दोन तास आपलेच. फुल टू शांतता!' लगेच मी सामना सुरू केला न केला की आतून आवाज आला,
"अहो, तुम्हाला सामना पाहायचा असेल तर आवाज 'म्युट' करून..."
"हो ग, लग्न झाल्यापासून माझा आवाज म्युटच आहे..."
"टीव्हीचा आवाज म्हणतेय मी. फाजीलपणा पुरे झाला. अहो, इथला पंखा लावा ना..."
सामना रंगात आलेला असताना मला टीव्हीसमोरून बाजूला जावे वाटत नाही पण ...चरफडत मी शयनगृहात गेलो. पंखा सुरू करून दिवाणखान्यात पोहोचलो न पोहोचलो की पुन्हा खडे स्वर कानात शिरले,
"अ...हो, तुम्हाला पंखा एकवर लावायला सांगितला होता. तुम्ही तीनवर लावलाय की चारवर? माझा बर्फ व्हावा अशी इच्छा आहे का?"
ते ऐकून मी दातओठ खात उठलो. आत गेलो. पंखा एकवर करून परतलो. टीव्हीवर पुरते एक षटकही पाहून होत नाही. तोच बाईसाहेबांचा आवाज आला,
"अहो, ओ...ओ... पंखा बंद करा हो. थंडगार वारा नुसता झोंबतोय हो. बघा ना..." झाले. पुन्हा आत गेलो. पंखा बंद करून आलो. काही क्षणातच सौभाग्यवती ढाराढूर झोपल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर मी शांतपणे सामना बघत बसलो अर्थातच आवाज म्युट करुन... बायकोपुढे शरणागती पत्करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. माझ्या स्वभावामुळे दिवसातून एकदा तरी असे काही तरी घडायचे की, मला तिच्यासमोर नमते घ्यावे लागे. अनेकदा मी अशा समयी वातावरण मोकळे व्हावे म्हणून मुद्दाम वेगळीच काही तरी कृती करीत असे आणि मग ती खदखदून हसत असे. काल दुपारची गोष्ट मी नेहमीप्रमाणे सोफ्यावर आडवा पडून टीव्हीवर सिनेमा पाहत असताना बायको आराम संपवून बाहेर आली. मात्र काय बिघडले होते कुणास ठावूक? तिचा रागाने तमतमलेला चेहरा पाहिला आणि काही बोलायला नको म्हणून मी चेहरा वळवला. काही तरी बिनसले होते खास कारण मी तोंड फिरवले तरी ती माझ्या शेजारी बसली तसा माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. मला वाटले, 'झाले. आता आपले काही खरे नाही. शत्रुपक्ष आता समोरून हल्ला करणार.' मी आजूबाजूला पाहिले. बाहेर जाताना डोक्याला बांधावयाचा पांढरा रुमाल शेजारी पडलेला पाहून माझ्या डोक्यात एक विचार आला,'चला. पांढरे निशाण दाखवून शरणागती पत्करावी.' त्याप्रमाणे मी तो रुमाल उचलून पत्नीच्या तोंडासमोर फडकवू लागलो. ते पाहताच दुसऱ्याच क्षणी ती खदखद हसू लागली. तिचे ते लोभसवाणे रुप मला नेहमीच आवडायचे. मी तिच्याकडे बघत असताना मला जाणवले की, तिच्या पोटाचा नगारा असा खालीवर होतोय जसा एखादा व्हॉलीबॉलचा खेळाडू सर्वीस करण्यापूर्वी हातातला चेंडू जमिनीवर आपटून पुन्हा हातात घेतो तसा! त्यामुळे एक झाले की, शयनगृहातून येताना तिचा जो मुड बिघडलेला होता तो माझी शरणागतीची कृती पाहून निश्चितपणे चांगला झाला आहे. हसता हसता ती म्हणाली,
"कम्माल आहे बाई तुमची. कोणत्याही वातावरणात हसं कसं फुलवावं हे तुमच्याकडून शिकावं. आई ग्गं, माय..." मी मात्र नेहमीप्रमाणे हसू फुललेल्या तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो...
@ नागेश सू. शेवाळकर