Me aek Ardhvatraav - 14 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | मी एक अर्धवटराव - 14

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मी एक अर्धवटराव - 14

१४) मी एक अर्धवटराव!
'असून अडचण, नसून खोळंबा' अशीच काहीशी अवस्था प्रिय पत्नीच्या भ्रमणध्वनीमुळे नवऱ्याची होते. बायकोला मोठ्या कौतुकानं स्वतंत्र भ्रमणध्वनी घेऊन द्यावा तर भ्रमणध्वनीवरील साऱ्या गोष्टींची जाणीव करून देणे, तिचा फोन चार्ज नसेल तर चार्जिंगला लावणे, तिने कुठेतरी कानाकोपऱ्यात ठेवलेला भ्रमणध्वनी शोधून देणे. ती एखाद्या कामात विशेषतः स्वयंपाकात किंवा दुपारच्या दीर्घ वामकुक्षीत व्यग्र असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला तर तो इमानेइतबारे तिच्या हातात देणे, हातात देताना तो उचलून (ऑन) देणे ही कामे करावी लागतात म्हणून बायकोचा भ्रमणध्वनी असून अडचणीचा. बरे, बायकोला तिच्या हक्काचा भ्रमणध्वनी नसेल तर मग नवऱ्याचा किती खोळंबा होतो हे मी सांगणे गैरवाजवी होईल. परवाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. मी दिवाणखान्यात माझ्या भ्रमणध्वनीशी खेळत होतो अर्थात हा 'मोबाईलशी खेळणे' शोधही बायकोचाच. सौभाग्यवती स्वयंपाक घरात कार्यरत असताना तिचा भ्रमणध्वनी खणाणला. बायकोच्या भ्रमणध्वनीची घंटी म्हणजे जणू लाऊडस्पीकर! सारी गल्ली जागी होईल पण आपला फोन वाजतोय हे बायकोच्या गावीही नसते. तर तिचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर मेहुणीचे म्हणजे तिच्या बहिणीचे नाव पाहताच मी मनात म्हणालो,
'झाले. आता कमीतकमी अर्धा तास तरी गप्पाष्टकं रंगणार. बरे, न द्यावा तर मुद्दाम दिला नाही म्हणून पुन्हा कांगावा तो वेगळाच.' मी तिचा वाजणारा फोन घेऊन स्वयंपाक घरात प्रवेश केला. म्हणालो,
"अग, तुझ्या बहिणबाईचा फोन आहे..." तशी ती माझ्याकडे वळून खरकटे हात मला दाखवत शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर बसत म्हणाली,
"अहो, बघता काय? फोन उचला, लावा माझ्या कानाला!" मी आज्ञाधारकपणे तिच्या कानाशी लावत फोन ऑन केला. फोन आधीच 'लाऊड' मोडवर होता. बहिणीचा आवाज त्याहूनही लाऊड. कानाला लावताना कसा काय कोण जाणे हिचा कानच माझ्या हाताने ओढल्या गेला. ती अशी किंचाळली म्हणता विचारु नका. माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पाहताना दोघींचे संभाषण चक्क पाऊण तास चालले हो. एका हातात भ्रमणध्वनी घेऊन उभा राहिल्यामुळे माझी काय अवस्था झाली ती काय सांगू? शाळेत असताना कधी मला शिक्षा म्हणून तास संपेपर्यंत बेंचवर उभे राहण्याची किंवा आमच्या काळात प्रचलित असलेली 'कोंबडा' होण्याची शिक्षा मिळाली नव्हती...
भ्रमणध्वनीचा विषय निघालाच म्हणून एक आठवण सांगावीशी वाटते. वरीलप्रमाणेच एक गमतीदार प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. काय झाले, त्यादिवशी माझी पत्नी स्नानाला गेलेली असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर हिच्या वहिनीचे नाव दिसताच मी तो उचललून म्हणालो,
"वहिनी, ती स्नान करतेय. अर्धा तास लागेल. बाहेर आली की, सांगतो तिला."
"भाऊजी, आमच्या नणंदबाई काय महिन्याला एकदा आंघोळ करतात की काय? नाही म्हटलं अर्धा तास लागतो म्हणताय. पण भाऊजी, तरीही त्यांना फोन द्या. अत्यंत महत्त्वाचे काम आहे. अहो, वांग्याचे भरीत करतेय. वांगी शिजायला टाकलीत पण पुढील कृती पाहावी म्हटलं तर पुस्तकच सापडत नाही. नणंदबाईंना विचारावे म्हणते. तुम्ही म्हणता तशी अर्धा तास वाट पाहावी तर वांगी करपून जातील हो. तुम्हाला तर माहितीच आहे, आजकाल वांग्याचे भाव कसे कडाडले आहेत ते. शिवाय अशी अर्धा किलो वांगी करपली म्हणून समजले तर आमच 'हे' माझेच भरीत करून चाटून पुस खातील. तेव्हा प्लीज द्या ना..."
माझा नाइलाज झाला. ते ऐकून मी न्हाणीकडज जात असताना मनाशी म्हणालो, 'बाईसाहेब, भरीत तुमचे कधी होत नाही तर सातत्याने तुमच्या नवऱ्याचे होते. मला का माहिती नाही?'
मी न्हाणीचे दार ठोठावताच बायको आतून गुरगरली,
"आता काय झाले? अहो, दिवसातून एकदाच आंघोळ करते तरीही तुमची लुडबुड..."
"मी काय लुडबुडलो. तुझी वहिनी नको तेव्हा, नको तिथे लुडबुड करतेय. म्हणजे तुझ्या वहिनीचा फोन आहे. तुझी आंघोळ होईपर्यंत त्यांना दम निघत नाही. काय सांगू त्यांना..." मी असे बोलायला अवकाश. धाडकन दार उघडून ही किंचाळली,
"मग हे केव्हा सांगणार? आणा इकडे. मला वाटले तुमच्या बहिणबाईचा फोन आलाय..." असे म्हणत तिने माझ्या हातातून भ्रमणध्वनी खसकन ओढून घेतला. जवळपास अर्ध्या तासानंतर ती बाहेर आली. तिच्या हातातील मोबाईल घेताना मी म्हणालो,
"वहिनींच्या हातचे भरीत खाऊनच न्हाणीच्या बाहेर पडतेस की काय!"
"तुम्ही की नाही..." असे लाजून म्हणत ती शयनगृहात शिरली. काही वेळाने तयार होऊन ती बाहेर आली आणि सरळ स्वयंपाक घरात गेली. मी वर्तमानपत्र हातात घेत असतानाच तिचा फोन वाजला. तिचा भ्रमणध्वनी घेऊन मी स्वयंपाक घरात शिरलो. माझ्या हातातून मोबाईल घेताना तिनज बजावले,
"इथेच उभे रहा. दोन मिनिटांनी पातेल्यात पाणी टाका आणि नंतर वांगी टाका." असे म्हणत ती फोनवर बोलत बाहेर गेली.
"हो जाएगा, मेरे आँका!" असे म्हणत मी आज्ञाधारक विद्यार्थी असल्याप्रमाणे गॅसच्या ओट्याजवळ उभा राहिलो. काही क्षणात फोनवर बोलतच ती आत आली. हाताने चुटकी वाजवत मला खुणावले, 'आता टाका..' आणि लगेच परत बाहेर गेली. ती निघून जाताच मी आठवू लागलो की, आधी वांगी की आधी पाणी? ते म्हणतात ना की, आधी अंडे की आधी कोंबडी अशा परिस्थितीत हिला विचारावे तर ती मोबाईलवर बोलत असताना सांगणार नाही. बरे, एखादे वेळी तिने बोलता बोलता सांगितले तर ते पलिकडून बोलणारास ऐकू जायचे आणि मी स्वयंपाक करतोय ही बातमी फेसबुक, व्हाटस्अप, ट्विटर, मेसेंजर अशा माध्यमातून सर्वत्र पसरायची. शेवटी मनाचा हिय्या करून मी पातेल्यात वांगी टाकली. काही क्षणात ठसका पसरणार अशी चिन्ह दिसू लागली. ठसका बाहेर पसरला तर बायको ठसक्यात आत येईल या भीतीने मी शेजारच्या तांब्यातील पूर्ण पाणी पातेल्यात ओतले. पाणी टाकताना वांग्यांकडे पाहिले ते काळेकुट्ट झाले असल्याचे पाहून मी मनात म्हणालो,
'व्वा! बढिया! नंबर एक काम झाले राव! वांगी काळी पडलीत म्हणजे मस्त उकडलीत. झणझणीत भरीत होणार...' तितक्यात फोनायण संपवून बायको आत आली. हातातील भ्रमणध्वनी फ्रीजवर ठेवत तिने विचारले,
"का हो, केले का सांगितल्याप्रमाणे?"
"तर मग. तू सांगितल्याप्रमाणे आधी वांगी टाकली. दोन-पाच मिनिटांनी तांब्याभर टाणी टाकले. असा ठसका भरू पाहत होता म्हणतेस. खमंग भरीत होईल बघ. माझ्या तोंडाला तर कधीपासून पाणी सुटतेय..." मी भरताची तारीफ करीत असताना ती कडाडली,
"माझ्या डोंबल्याचं भरीत करून खा आता. अहो, पुन्हा तुमची अर्धवट मर्दुमकी गाजवलीत ना? आधी पाणी आणि नंतर वांगी टाका असे सांगितले होते..."
"त्यात काय? विळा भोपळ्यावर पडला काय नि भोपळा विळ्यावर पडला काय चिरल्या जाणार तर भोपळाच. बरोबर ना?"
"वाटलं नव्हतं हो तुमचं आणि घरातील कामाचे असे विळा-भोपळ्याचे नाते असेल म्हणून... चला. आता दुसरे काही तरी उकडावे लागेल. जेवायला उशीर झाला तर हे अर्धवटराव मलाच उकडून फस्त करतील. अहो, परवा तुम्ही कारली आणलीत ना..." ती तशी विचारत असताना कारले म्हणताच माझा चेहरा कडू डग झाला असल्याचे मला जाणवले. मी म्हणालो,
"ए बाई, ती कडू कारली करण्यापेक्षा उपाशी ठेव. तुला कडू कारली का आवडतात ग?"
"का म्हणजे? आवडतात. झाले." ती म्हणाली
"बरोबर आहे म्हणा. कडू माणसाला कडू कारलीच आवडणार म्हणा..."
"अस्सं. पण महाराज, तुम्ही विज्ञानाची पदवी मिळवलीय ना? सजातीय- विजातीय..."
"विज्ञान? सजातीय... विजातीय संबंध काय?"
"आहे. संबंध आहे. विज्ञानाच्या नियमानुसार सजातीय आकर्षण नसते तर विजातीय असते. स्पष्टच सांगायचे तर गोड, मृदू माणसाला कडू कारली आवडतात..."
"म्हणजे माझ्यासारख्या 'कडू' माणसाला कडू कारली आवडत नाहीत. बरोबर?"
"अगदी बरोबर!..." असे म्हणत ती हसायला लागली. तितक्यात माझे लक्ष तिच्या डोक्याकडे गेले. तसे मी आश्चर्याने विचारले,
"अग, काल आणलेला गजरा माळला नाहीस?"
"अय्या! खरेच की! तुमची ही अशी अर्धवट कामे सावरता सावरता काही लक्षातच राहत नाही हो..." असे म्हणत ती आत गेली. तसा मी आनंदलो. मला वाटले, ही आता गजरा माळून येणार. काय सुंदर दिसेल माझी बायको... पण झाले उलटेच. एखादी सिंहीण चवताळून अंगावर यावी तशी बाहेर आलेली बायको किंचाळत म्हणाली,
"अहो, तुम्हाला मी कोण वाटले हो?..."
"कोण म्हणजे.. तू ही मेरी रेखा, तू ही मेरी हेमा..." माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत म्हणाली,
"चांगला मस्त, धुंद करणारा गजरा आणा म्हणाले तर हा कणेरीच्या फुलांचा गजरा आणलात. जुन्या सिनेमातील्या हिरोणी घालत होत्या तसा. घाला आता तुमच्याच गळ्यात..."
"घातला असता ग, पण आज पोळा नाही ना..."
"कम्माल आहे बाई तुमची! एक काम धड येत नाही पण नको तेव्हा फाजील विनोद बरे करता येतात हो..." असे म्हणत ती हसत सुटली आणि मी बिच्चारा पाहत बसलो तिच्या चेहऱ्याकडे!
@ नागेश सू. शेवाळकर