सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या, शाळा एकच, कॉलेज एकचं. फक्त फरक होता तो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा,कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची, मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघीही business management शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी कमालीच्या हुशार. काजल फक्त कमी पडायची ती तिच्या स्वभावामुळे. पण कोमल नेहमीच तिच्या सोबत असायची. तिची bodyguard जणू काही. आता दोघीही मोठया झाल्या होत्या, कोमलचं बिनधास्त वागणं तिच्या मम्मीला थोडं खटकायच. तरीसुद्धा ती काजल सोबत असते, तिची काळजी घेते म्हणून बरं वाटायचं. दोघींची छान मैत्री होती. काजलला बाहेर फिरणं आवडायचं नाही, कोमल तिला जबरदस्ती घेऊन जायची. सोबत त्यांचा कॉलेजचा ग्रुप असायचा. त्यातल्यात्यात राहुल त्या दोघींचाही best friend होता. शाळेपासून एकत्र होते तिघे. कॉलेजमध्ये एकाच वर्गात. त्यानंतर, राहुलने स्वतःचा बिझनेस सुरु केला. बिझी असायचा तो, तरी वेळात वेळ काढून दोघींना भेटायला घरी यायचा. मग तिघे फिरायला जायचे. छान दिवस होते. दोघींच्या नवीन ऑफिसला फेऱ्या सुरु झालेल्या. तिथल्या बिझनेसमधे प्रगती होताना दिसत होती.
एक दिवस, कोमलची तब्येत ठीक नव्हती. म्हणून ती ऑफिसला न जाता घरीच थांबली होती. काजलला driving येत नसल्यामुळे ती पुन्हा ऑफिसच्या बसने गेली होती. संध्याकाळी काजल आलीच ती घाबरीघुबरी झालेली. कोमलला कळलं ते.
" काय झालं ताई… ",काजल तशीच थरथरत होती.पाणी आणून दिलं कोमलने. जरा तिला नॉर्मल होऊ दिलं.
" हं… आता बोल. काय झालं ते…एवढी घाबरलीस ते.",
" दिपेश… ",
" दिपेश…. दिपेशच काय… ",
" दिपेश आला होता… ऑफिस सुटल्यावर… ",
" मग… काही केलं का त्याने… ", कोमल रागात होती.
" काही नाही. फक्त बोलला, तुझ्या बहिणीला सांग… जपून रहायला, माझं आयुष्य बरबाद केलं तिने. तिचं पण आयुष्य असंच करणार मी.",
" त्याच्या तर….एवढी मजल गेली त्याची… तुरुंगातच पाठवते त्याला आता." ,
" नको कोमल… प्लीज… प्लीज. "
" का नको… गप्प बसं तू " आणि कोमल तिच्या पप्पांना घेऊन पोलिस स्टेशन गेली आणि रीतसर तक्रार करून आली. दिपेशला पोलिसांनी एक दिवस तुरुंगात ठेवले आणि नंतर समज देऊन सोडून दिलं. त्यादिवसापासून काजल जरा जास्तच घाबरायला लागली होती. मम्मीला जास्त काळजी वाटू लागली होती.
" मला तर वाटते… काजलचं लग्न करूया आता, नाहीतरी दोघींचं वय झाले आहे लग्नाचे." मम्मीने विषय काढला.
"हे बरोबर आहे. तरीसुद्धा दोघींना पहिलं विचारून घेऊ. love marriage कि arranged marriage… मगच निर्णय घेऊ. ",
"ठीक आहे , जेवताना विषय काढा तुम्ही."
जेवताना पप्पानी विषय काढला.
" हे बघा… तुम्हा दोघींचं लग्नाचं वय झाले आहे. तरी हिने माझ्याकडे विषय काढला. तर तो निर्णय मी तुमच्यावर सोपवत आहे.", कोमल आणि काजल एकमेकींकडे बघू लागल्या.
"लग्न आणि एवढयात ? मला तर अजून खूप काही करायचे आहे. " कोमल बोलली.
" अगं, मग लग्न झाल्यावर सुद्धा त्या गोष्टी होऊ शकतात ना…. ", पप्पा बोलले , त्यावर कोमल काही बोलली नाही.
" OK, मग ठीक आहे. काजल तयार आहेस ना… ", काजल गप्प.
" चला … मग , जर तुमचं कोणावर प्रेम वगैरे असेल तर आताच सांगा. नाहीतर यैन वेळेला गडबड नको.… चालेल ना… ",
"हो… ", कोमल बोलली.
" हो ना… मग सांगा… आहे का कोणी… काजल तू सांग… आहे कोणी , तुला पसंत असा.", मम्मी बोलली. काजल काही बोलली नाही , फक्त चेहऱ्यावर हसू आलं तिच्या. पपांनी पहिलं ते. " काजल … कोण आहे ? नावं सांग… ", काजल बोलणार इतक्यात कोमलच बोलली,
" नाही… पहिलं मी सांगणार… ताईचा कोणी boy-friend असेल तर ते नवलच आहे. मलाही कळू नाही दिलं तिने. लबाड आहे ताई… " हळूच काजलला तिने चिमटा काढला.
" मीच सांगते पहिलं… माझं एका मुलावर प्रेम आहे. तोही मला like करतो. ताई ओळखते त्याला.तुमच्या पण ओळखीचा आहे. ",
"कोण ? ",
"राहुल… ",सगळेच आनंदाने आश्चर्यचकित झाले.
" राहुल… means आपला राहुल अभ्यंकर.… ",
" हो.",
" अरे व्वा !!!… छान, मला वाटायचं फक्त मित्र आहात तुम्ही. " ,
" नाही… तो येणार होता पुढच्या महिन्यात मागणी घालायला.पण आज तुम्ही विचारलं म्हणून मी बोलले. छान ना… ",
" एकदम छान !! ",मम्मी म्हणाली. काजल तर कोमलकडे पाहत होती किती वेळ.
" हेल्लो !!!…. ताई…. काय झालं ? कूठे हरवलीस ?", काजल भानावर आली.
" नाही… कूठे नाही. मलाही वाटलं, तुम्ही फक्त 'friends' आहात. पण असो… congrats… ",
"thanks ताई… आता तुझी पसंत सांग, कोण आहे ते.", तशी कोमल शांत बसली.
" सांग ना , कोण आहे ते. ",
"कोणी नाही गं … ",
" अरे !!! असं कसं… मघाशी हसलीस ती.",
"ते असंच… आणि मी कोणाच्या प्रेमात पडणार… शिवाय माझ्याही कोणी प्रेमात पडलं पाहिजे ना… घरात तर असते नेहमी बसून." कोमलला जरा वाईट वाटलं.
" खरं ना ताई… " ,
" हो गं… अगदी खरं… ",
" मग तुला आम्ही स्थळ बघू का ? ",पप्पा म्हणाले.
" ठीक आहे. पण एवढयात नको. पहिलं कोमलचं लग्न करू. एकीने तरी ऑफिस सांभाळायला पाहिजे ना… कोमल तर तयारच आहे. मला पसंत पडेल असा मुलगा भेटायला वेळच लागेल ना. ", पप्पांना पटलं ते.
" चालेल. तुम्ही दोघी मला सारख्याच आहात.मी राहुलच्या घराच्या बरोबर बोलतो आणि पुढचं ठरवतो." कोमल आनंदात होती.
काजल आज त्यामानाने लवकर झोपली. राहुलला कोमलने call करून सांगितलं. त्याला आनंद झाला. येत्या week end ला सगळ्या ग्रुपमध्ये हि गोष्ट सांगायची,असं दोघांनी ठरवलं.
------------------- क्रमश : ----------------