७
पहिली लढाई
अर्थात
प्रथम भेट!
दोन दिवस गेले. भेटण्याची हुरहुर एकीकडे आणि काय होणार त्याचे टेन्शन दुसरीकडे. काय होणार पेक्षा सारे नीट होणार की नाही याचे टेन्शन! प्रेमने पुस्तकाबद्दल विचारले तर? मी त्याची फक्त प्रस्तावना वाचलेली तिच्या जोरावर काय काय बोलणार? अगदी परिसंवादात विचारल्यासारखे प्रश्न विचारले त्याने तर पुढे काय बोलणार मी? काय करावे नि कसे करावे?
सकाळी स्वामीजींचे नाव घेतले नि म्हटले, आता होऊन जाऊ देत. आॅफिसात पोहोचली तर तिथे तात्या वाटच पाहात होते. मोठे टेबल. समोर दोन खुर्च्या. बाजूला फोन त्यांच्या. त्याच्याकडे पाहात बोलली मी, "तात्या, ते आलेत का?"
अजून त्याला यायला एक तास होता अवकाश. मीच लवकर येऊन बसलेली. तात्यांच्या आॅफिसात त्यांची स्वतःची केबिन. त्यात तात्या बसलेले. समोर मी. प्रेम येण्याची वाट पाहात.
तात्या म्हणाले, "तू त्या नोट्स काढलेल्या म्हणालीस त्या आणल्यास ना?"
"नोटा?"
मी ते तेव्हा सांगितलेले खोटे इतक्या लवकर विसरली की काय? स्वामी म्हणतात ते खरे, सत्य बोलणे सर्वात सोपे. पण सोप्या गोष्टी कोणीही करेल.. हो की नाही? पण मी दचकून जागी झाली. आधी सांगितलेल्या गोष्टी इतक्यात विसरून कसे चालेल. थोडे जास्तच जागरूक राहायला हवे. सावरून म्हणाली मी, "नोट्स ना? त्यांची काय गरज. सारे काही डोक्यात आहे माझ्या!"
हे खोटे नव्हते खरेतर! सारे डोक्यात होते. फक्त त्यातले डिटेल्स वेगळे होते! त्यांचा त्या पुस्तकाशी काहीच संबंध नव्हता एवढेच!
इतक्यात प्रेम आत शिरला केबिनमध्ये.
तसाच होता तो. मी डोळे फाडून एकटक पाहात राहिली त्याच्याकडे. हाच तो क्षण.. हाच ज्याची वाट पाहिली मी! आता पुढचा एखादा तास प्रेम आणि मी! बस, तो फोन वाजला की तात्यांना जावेच लागेल. मग मी हवे ते बोलायला मोकळी!
"या! या! प्रेमानंद. लवकर पोहोचलात?"
"नमस्कार. हो जरा लवकर जायचे एकीकडे म्हणून. तुम्हाला चालेल ना?"
"हो.. हो. ही माझी कन्या. प्रीती.. आणि प्रीती.. हे प्रेमानंद!"
मी बावचळून उभी राहिली. प्रेम इतक्यात म्हणाला, "खरेतर येणार नव्हतो.. फोन करून सांगू म्हटले तर.."
"अहो, फोन डेड आहे! दोन दिवस झाले!"
फोन डेड! माझी आता डेड होण्याची पाळी होती! माझी ती मैत्रीण आणि तिचा नवरा, कालिंदी आणि मिलिंदा.. दोघांनी प्लॅन बनवलेला. ठीक बारा वाजता फोन. तात्यांना. माझे काका राहतात तिकडे डोंबिवलीत त्यांच्याकडून फोन. तब्येत बरी नसल्याचा. तात्या थांबतात कसले. तडक निघतील धडक डोंबिवलीला जायला. आणि इथे मी आणि प्रेम .. प्रेमाच्या मारू गप्पा! म्हणजे मी तसा करीन प्रयत्न. पण फोन गप्प म्हणजे मीही गप्प होणार आता! तात्या समोर असताना पुस्तकाशिवाय दुसरे काय बोलणार बिचारी मी? तरी मनातल्या मनात मी स्वामींचे नाव घेतले. मनाशी म्हणाली, आज नाही तर कधीच नाही. आता पुढे काहीतरी चांगलेच व्हायला पाहिजे. बी पाॅझिटीव्ह!
तात्यांनी सुरूवात केली, "तर प्रेमानंद, तुमचे पुस्तक हिला आवडले खूप. ही सांगेलच. बोल गं."
मी काय बोलणार? एकाएकी मी ठरवले, त्या पुस्तकाबद्दल बोलायचेच नाही त्या! दुसऱ्या पुस्तकाबद्दलच बोलायचे! ते लिहून झाले असो की नसो, मी वाचण्याचा तर प्रश्न नाही! पण प्रेमनेच सुरूवात केली,
"तुम्हाला काय आवडले त्या पुस्तकात?"
हाच तो क्षण! या इथे चुकून चालायचे नाही. त्या पुस्तकात अडकायचे नाही!
मी एकाएकी माझ्या वाचन आणि आकलनशक्तीची परीक्षा आहे समजून बोलली, "आवडले ते सारेच.. पण मुख्य म्हणजे तुमचे पुढचे पुस्तक वाचायला आवडेल मला!"
"नाही, पण त्या शरणकुमार आणि शारदा साठे यांचे .."
कुठे तरी समीक्षेत वाचलेली भाषा आठवली, नि मी म्हणाली,
"ते ठीक आहे.." मी वाक्य तोडत बोलली. "दोघांबद्दल आपण जास्त खोलात आता नको बोलायला.." ह्या दोन पात्रांची नावे वाचलेलीही मला काही आठवेनात.. म्हणून पुढे ती टाळत म्हणाली, "पण तुमच्या भाषेत नि लिखाणात साहित्यिक आणि असाहित्यिक कोंडी फोडण्याची एक ताकद आणि क्षमता आहे. तुमची लेखणी कुणाच्या आवडीनिवडीची मोहताज नाही! मिंधेपणा तिला मंजूर नाही! तिला इतरही आयाम आहेत.. तिच्यात साहित्य निर्मितीची जी ऊर्मी दिसते ती आजकालच्या युवा आणि नवीनतम लेखकांत क्वचितच आढळून येते.. तुमच्या लिखाणातून कुणी स्फूर्ती घेतली असेल तर ती मी!"
पुढे काय स्फूर्ती घेतली विचारले तर? पण मी बिनधास्त होती. इथवर मी कितीतरी काहीतरी समीक्षेच्या भाषेत बोलून टाकलेली! एकूण माझ्या भाषेने प्रेम गार पडलेला दिसत होता! कारण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना होती. कदाचित अशी कोंडीबिंडी फोडण्याचा विचारही नसावा आला मनात त्याच्या. माझ्या बोलण्याने तात्यापण इंप्रेस झाले असावेत. मूळ विषयाबद्दल काही माहिती नसताना डिस्टिंक्शन मिळवल्यासारखे वाटले मला. अर्थात अजून धोका टळला नव्हताच.
"तुम्ही म्हणता ते खरे आहे. म्हणजे शरणकुमारच्या आई नि मामाच्या भूमिकेबद्दल काय वाटते तुम्हाला?"
आली पंचाईत! मुदलात शरणकुमारच माहित नसताना त्याचे मातुल घराणे कुठून माहिती असावे मला? माझ्या समीक्षक भाषेतल्या शब्दांची अस्त्रे संपत आलेली. कोंडी फोडून झाली एकदा.. आता काय फोडू.. एकाएकी आठवले, वाचा! मनातल्या मनात मी युरेक्का ओरडली आणि म्हणाली, "काय आहे विद्रोही लेखकाच्या शब्दाशब्दातून विद्रोह डोकावत असतो. तुम्ही विद्रोहास वाचा फोडण्याचे काम केलेय यातून. पुढच्या पुस्तकात यापुढे काय याची उत्सुकता चाळवण्याचे काम केलेय ह्या पुस्तकाने. तुमच्या पुढच्या पुस्तकाबद्दल सांगा ना.."
मी परत सुटकेचा निश्वास टाकत विषय दुसऱ्या पुस्तकाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तात्या माझ्या बोलण्याने खूश दिसत होते. एकाएकी उठले नि म्हणाले, "मी येतोच.. तुम्ही बसा बोलत!"
मी मनातल्या मनात खूश झाले! आता काही कार्यभाग साधणे शक्य आहे..
"दुसरी माझी कथा आहे ना त्यातही शरणकुमारच असेल. एखाद्या मानसपुत्रासारखे ते पात्र घडवण्याचा विचार आहे माझा. ही कथा शहरी भागात घडेल नि त्याच नायक नि नायिकेच्या मार्गात काटे असतील ते शहरी दुर्बलांच्या समस्यांचे!"
"दुर्बलता शहरी भागात अधिक तीव्रतेने जाणवू शकते! त्यात शहरी भागातील मला काय त्याचे या अलिप्ततेने नवीन कंगोरे फुटू शकतात!"
माझ्या या बोलण्याचे मला चांगलेच नवल वाटले. असे शब्द मला येत असतील हे मलाच ठाऊक नव्हते!
"तुमचे म्हणणे खरेच आहे! मला वाटते माझ्या पुस्तकाचा एकेक भाग लिहून झाला की मी तो तुम्हाला देत जाईन.. तुमच्या वडलांबरोबर पाठवत जाईन. तुमचे मत जाणून घेतल्यावरच.."
"तात्यांबरोबर..? नको नको.. "
मी जवळजवळ ओरडलीच! त्याच्या त्या सूचनेत पुढे भेटी घडण्याची शक्यता होती. पण त्यात तात्या कशाला? ते शेवटी अक्षता टाकायला आले तरी चालेल!
"का हो? म्हणजे तुमच्या कामात अडचण होत असेल तर राहिले.. पण आजकाल असे विचक्षण वाचक मिळतात कुठे?"
विचक्षण! म्हणजे काय असेल. तसा शब्द विलक्षण आहे! पण ही संधी सोडून चालायचे नाही!
"कामात अडचण नाही हो. पण प्रत्यक्ष भेटण्यात लेखकाच्या मनातल्या भावना जाणून घेता येतात. आणि आपण तोंडी बोलतो ते लिहिताना काही निसटून जाते ना चिमटीतल्या वाळूसारखे!"
"असे म्हणता? ठीक आपण इथेच भेटू नंतर .."
"इथे?" मी माझा ओरडण्याचा टोन मुश्किलीने बदलून म्हणाली, "नाही म्हणजे तात्यांच्या आॅफिसच्या कामात आपला खाजगी व्यत्यय कशाला?"
यातला 'खाजगी' शब्द मी विचार करून पेरला होता!
"मला वाटते मला एक महिना तरी लागेल पहिल्या प्रकरणाला! मग ठरवू कुठे भेटायचे ते!"
प्रकरण! हा शब्द अगदी योग्य होताच! माझेही पहिलेच प्रकरण हे! प्रेमला माझा मोबाईल नंबर देण्याची हीच ती वेळ. तात्या परत येण्याच्या आत हे प्रकरण संपवायला हवे! झटकन मी बोलली, "मला माझ्या या नंबरवर फोन करा! नाहीतर मीच करते. आणि अख्खे प्रकरण लिहून होईतोवर कशास थांबायचे? प्रकरण त्याआधीही घडवता येईल .."
"काय? द्या नंबर तुमचा! नाही म्हणजे लिहिण्याच्या आधीच्या स्टेजमध्ये चर्चा करून लिहिले म्हणजे.."
"खरंय तुमचे.."
प्रेमच्या चेहऱ्यावर निरागस भाव होते. खूप वेळाने आठवले मला, हाच तो चेहरा ज्याने उडवली झोप माझी. आज मोठा किल्ला लढवला मी. जिंकेन ही लढाई.. इतक्यात तात्या आत शिरले, म्हणाले, "काय.. प्रेमानंद जगदाळे, आता काय म्हणणे आहे तुमचे?"
"म्हणणे काय.. घरचेच समीक्षक असताना काय!"
घरचेच! प्रेमच्या बोलण्याचा अर्थ तसा नसणार .. खरेतर नसणारच! पण तरीही हवा तो अर्थ काढायला काय हरकत आहे?
"दुसरे पुस्तक देतो तुम्हाला! लिहायला घेतलेय. फक्त तुमच्या प्रीतीची मदत लागेल जरा.."
प्रीती!
प्रेमच्या तोंडून हे शब्द ऐकायला किती छान वाटले! फक्त 'तुमच्या' प्रीतीचे 'माझी' प्रीती झाली की झाले.. परत तेच वाटले, 'समझो हो ही गया!'
आजची लढाई तर जिंकली मी. तात्यांच्याच आॅफिसात बसून त्यांच्या नकळत! त्यांचा जावई समोर बसलाय नि त्यांना पत्ता देखील नाही! आणि प्रेमला तरी कुठे कशाचा पत्ता? तो आपला आपल्याच विद्रोहात दंग झालेला दिसतोय!