४) मी एक अर्धवटराव!
लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. मी पंधरा दिवसांची रजा घेतली होती. त्यावेळी 'हनिमून' वगैरे अशी प्रथा नव्हती... किमान मध्यमवर्गीयांसाठी तर निश्चितच नव्हती. फार तर लग्न झाले की, नवीन जोडपे एखाद्या देवतेच्या त्यातही कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात असत. मी रजेचा अर्ज माझ्या साहेबांसमोर ठेवला. त्यावर सरसरी नजर टाकत साहेबांनी विचारले,
"पंधरा दिवसांची सुट्टी शक्य नाही. आठ दिवस पुरेसे आहेत. खरेच लग्न आहे ना?"
"म्हणजे काय? साहेब, सोबत लग्नपत्रिका जोडली आहे..."
"अहो, अशा पत्रिका शंभर रुपये फेकले की तासाभरात मिळतात. कसे आहे, मी काही असाच या खुर्चीवर बसलो नाही. डोक्यावरचे केस काळे-पांढरे असा प्रवास करून आता तांबडे झाले आहेत. तुम्ही कारकून लोक काही तरी युक्त्या-प्रयुक्त्या करून सुट्टीवर जाण्यासाठी धडपड करता. तुमच्या या सुट्टीची नोंद सेवापुस्तिकेत घेणार आहे. त्यावेळी सुट्टीचे कारण 'लग्न' असे टाकणार आहे म्हणजे तुम्ही पुन्हा लग्नासाठी म्हणून दुसऱ्यांदा रजा घेऊ शकणार नाहीत..." म्हणत साहेब हसू लागले.
"साहेब, केवळ सुट्टी मिळावी म्हणून पत्रिका दिली नाही तर आपणही माझ्या लग्नाला यावे म्हणून पत्रिका दिली आहे. खरेच तुम्ही लग्नाला नक्कीच या."
"आलो असतो हो. मलाही ते आवडले असते पण कसे आहे, पुन्हा तुमचा गैरसमज होईल की, तुम्ही खरेच लग्न करता की नाही हे पाहण्यासाठी साहेब आले होते. अवघड असते हो, खुर्ची आणि सहकारी सांभाळणे. तारेवरची कसरत असते. या तुम्ही. जमले तर येतो..."
ठरलेल्या दिवशी नियोजित वेळी एकदाचे आमचे लग्न लागले. गुरूंनी एकमेकांना हार घालायला सांगितले. नवरीच्या शेजारी आम्ही मुलीला पाहायला गेलो होतो तीच मुलगी उभी होती. मी नवरीला हार घालता घालता हार असलेला माझा हात त्या मुलीच्या दिशेने वळवला ते पाहून लग्न मंडपात जणू बॉम्ब स्फोट झाला. ती मुलगी लाजेने लालेलाल होत पळत पळत निघून गेली. स्वतः गुरूही अवाक झाले. ते म्हणाले,
"अहो... अहो, नवरदेव, हे काय करता? नवरीला हार घाला..."
"अच्छा! अच्छा!!.." असे म्हणत मी नवरीच्या गळ्यात हार घालताना आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात पेटलेल्या विस्तवाचे चटके मला जाणवले. सोबतच 'वेंधळेच आहात...' हे भावही जाणवले. कदाचित भविष्यात आमच्या संसारात एखाद्या गळूप्रमाणे चिकटलेल्या 'त्या' गुणांनी अशारीतीने सलामी दिली होती...
नंतर दिवसभर लग्नाचे एकूणएक कार्यक्रम यथासांग पार पडले. त्याकाळी आजच्यासारखे नातेवाईक, परिचित, मित्रमंडळ, उपस्थित लोक यांच्यासोबत फोटोसेशन नसे. केवळ मुख्य विधींचे तेही पंधरावीस फोटो घेत असत. विषयांवर होतेय पण ह्या फोटोसेशनचा एक किस्सा सांगतो...
झाले काय, आमच्या शेजारी एक राजकारणी कुटुंब राहत होते. त्यांचा मुलगा नगरसेवक होता. परवा त्याचे लग्न झाले. राजकारणी लोकांचा लग्नाचा थाट काय वर्णावा? मुळात लग्न दोन तास उशिरा सुरू झाले. मग सुरू झाला, फोटो काढण्याचा कार्यक्रम! उपस्थित असणारे सर्व जण अगदी रांग लावून फोटो काढून घेत होते. एक तर नवरा-नवरीसोबत फोटोही निघत होते आणि उपस्थितीची नोंदही होत होती. बरे, माझ्यासारखी फोटो काढण्याचा कंटाळा असणारी माणसे व्यासपीठावर जायचे टाळत होती परंतु त्यांचे कुणी ऐकत नव्हते. आम्हाला ओढून नेऊन फोटो काढत होते. जसे मतदानाच्या दिवशी राजकीय कार्यकर्ते घरोघरी जाऊन एक-एक मतदारास ओढून आणतात ना त्याप्रमाणे! उपस्थित असलेल्या जवळपास सर्व लोकांचे फोटो काढून झाले असताना व्यासपीठावरून आवाहन करण्यात आले,
"आपण सारे लग्नाला आलात. वधूवराला आशीर्वाद दिला. आम्हाला खूप खूप आनंद झाला. एक विनंती आहे की, आपण अजूनही नवरा-नवरीसोबत फोटो काढला नसल्यास लवकर काढून घ्या आणि हो बँडवाले, घोडेवाला, पाणीपुरीवाले, पानवाले,आचारी, वाढपी, झाडझुड करणारे, भांडे घासणारे इत्यादी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी स्टेजवर यावे आणि फोटो काढावेत..." ते आवाहन ऐकून माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने त्याच्या शेजारच्या माणसाकडे आश्चर्याने पाहिले. तसा तो माणूस म्हणाला,
"अहो, इथे उपस्थित असलेली बहुतांश माणसे ही या घराण्याची हक्काची मतदार आहेत. त्यांना बोलावले नाही, फोटो काढले नाहीत तर त्याचा राग मनात ठेवून उद्या त्यांनी मतदान केले नाही तर? यांचे राजकारणाचे दुकान कसे चालावे?" ....
माझ्या लग्नाचे सारे विधी आटोपले. सर्वात शेवटी विहीन पंगत का सुनमुखी पंगत बसली. पहिलीच बायको आणि तिच्यासोबत पहिले जेवण. भूक तर सपाटून लागली होती. जेवण सुरू झाले न झाले की, आमच्या भोवती कोंडाळे करून उभ्या असलेल्या वीस-पंचवीस बायकांपैकी कुणीतरी म्हणाले,
"नुसतेच काय जेवता? घास भरवा घास..."
कुणीतरी एक जण म्हणायला अवकाश सर्व बायकांनी तिचीच री ओढली. एक म्हातारी म्हणाली,
"नुसताच घास नाही भरवायचा हं. नाव घ्यायचं आणि जावाईबापू, उखाण्यात नाव घ्या बरे..."
माझ्या बायकोने (ओ येस! किती छान वाटते ना!) आढेवेढे घेत शेवटी जिलेबीचा तुकडा उचलला तशी एक बाई म्हणाली,
"अग, ये पोरी, कमालच करतेस? एवढुसा तुकडा काय मोडतेस? अख्खी जिलेबी घाल की नवऱ्याच्या तोंडात..." ते ऐकून हिने एक अख्खी जिलेबी उचलली. ती जिलेबी गरम होती. स्वतःचा हात भाजू नये म्हणून हिने घाईघाईने ती जिलेबी तशीच माझ्या तोंडात कोंबली. तसे करताना एक साधी गोष्ट माझ्या बायकोच्या लक्षात कशी आली नसावी की, ज्या जिलेबीने तिचा हात भाजतोय तीच जिलेबी तशीच नवऱ्याच्या तोंडात टाकली तर त्याच्या जीभेचे आणि टाळूचे काय होतील? नवऱ्याला वेंधळा, अर्धवट, बावळट अशी नाना विशेषणे लावतात. ती जिलेबी माझ्या तोंडात जाताच माझे तोंड असे भाजले म्हणता. बरे, तोंडातून जिलेबी बाहेर काढताही येत नव्हती कारण शेकडो डोळे माझ्यावर रोखलेले. दुसरे म्हणजे एक विचार मनात आला की, समजा हा घास तोंडातून बाहेर काढून टाकला तर आजीवन ऐकावे लागेल की, 'कित्ती प्रेमाने आयुष्यातील पहिला घास तुम्हाला भरवला होता आणि तो तुम्ही चक्क थुंकून टाकलात.' जिलेबीचा घासाचे चटके सहन करत तो घास तोंडात इकडून तिकडे घोळवत असताना, डोळ्यातील आसवांना आत दाबत मी तशाही परिस्थितीत मनाशीच म्हणालो,'संसाराचे चटके बसायला सुरुवात झाली तर...'
तितक्यात कुणीतरी माझ्या नात्यातील एक बाई माझ्या मदतीला धावून आली. तिने पटकन पाण्याचा प्याला उचलून माझ्या ओठाला लावला. आता माझी पाळी. काही म्हणा पण मी रागावलो होतो, चिडलो होतो, मनोमन बायकोवर दात खात होतो. बायको असली म्हणून काय झाले, तिने अशी फजिती करावी? तोंडाला चटके द्यावेत. पुन्हा एक बाई म्हणाली,
"आता जावाईबापू, तुमची बारी..." ते ऐकून माझी सटकली. मनात निश्चय केला. समोर बायको असली तरीही मागे हटायचे नाही. बदला घ्यायचा. आपण काही तिच्याप्रमाणे हातात बांगड्या भरल्या नाहीत. आता आपली बारी आलीच आहे तर ही संधी सोडायची नाही. मी बायकोच्या ताटाकडे पाहिले. एका पदार्थाने माझे लक्ष वेधले. त्याच पदार्थाला लक्ष करून मी सरसावलो. पण आधी वातावरण निर्मिती करावी या हेतूने जिलेबीकडे हात नेत असताना बायकोची एक पाठराखीण ताबडतोब म्हणाली,
"अहो, भाऊजी, हे काय करता? गरम जिलेबीने तुमचे तोंड पोळले तरीही तुम्ही तिला जिलेबीच खाऊ घालता काय? बदला घेताय? 'दूध का जला, छाँछ भी फुंककर पिता है।' हे माहिती नाही का?'
दुध का जला... हे शब्द तोंडातल्या तोंडात घोळत मी पोळीचा तुकडा मोडला आणि तो तुकडा भाजीला लावतोय असे दाखवत एखाद्या फिरकी गोलंदाजाने गर्रकन चेंडू वळवावा त्याप्रमाणे कुणाच्याही लक्षात यायच्या आधी भाजीशेजारी असलेल्या हिरव्यागार ठेश्यात बुडवला. येईल तेवढा ठेचा घेतला आणि खाली नजर लावून अर्धवट तोंड उघडलेल्या माझ्या बायकोच्या तोंडात अक्षरशः कोंबला... यानंतर काय घडले असेल हे कुणी मला विचारु नये नि मी सांगू नये अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे उखाण्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र मांडवात विशेषतः माझ्या सासरच्या बायकांमध्ये एक चर्चा सुरू झाली,
"काय बाई, जावाई धटिंगण आहे हो. चक्क ठेश्याचा घास भरवला."
"अहो, चुकून झाले असेल. गरमागरम जिलेबीने तोंड पोळल्यामुळे त्यांना काही सुधरत नव्हते. भाजी समजून ठेश्यात पोळी बुडवली."
"पण नीट पाहावे ना, अशी अर्धवट नजर काय कामाची?"
झाले! एक ना अनेक आणि त्यातही 'अर्धवट नजर' हे शब्द जणू लग्नानंतर नवरीने आणलेल्या रुखवताप्रमाणे कायमचे माझ्या जीवनात शिरले. लग्नात ठेचा का? हा प्रश्न नंतर माझ्या नोकरीच्या गावी आल्यावर मी हळूच बायकोला विचारला तर तिने ठसक्यात सांगितले की, तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर त्या परिसरातील लोकांना ठेचा खूप आवडतो. एक वेळ जेवणात भाजी नसेल तर चालेल पण ठेचा हवाच. बायकोला असणारी ठेच्याची आवड आणि लग्नातले 'ठेचा' प्रकरण तिने विसरावे म्हणून मी दुसऱ्या दिवशी चांगल्या दोन किलो हिरव्यागार, कोवळ्या मिरच्या आणल्याचे पाहून बायको त्या मिरच्यांकडे बघत जोराने किंचाळत म्हणाली,
"हे... ह्या मिरच्या कशाला आणल्यात? फ..फेका आधी.."
"अग, पण तुला आवडतो ना ठेचा..."
"चांगली जिरवली हो आवडत्या ठेच्याची. तुमच्या हातचा ठेच्याचा तो शेवटचा घास होता. आता मी त्या मिरच्यांकडे पाहणार नाही, खाणार नाही की, हातसुद्धा लावणार नाही..."
'बायकोचा तो प्रण ऐकून मीही तत्क्षणी एक निर्णय घेतला की, यापुढे जिलेबी खाणे तर सोडा पण जिलेबी असलेल्या हॉटेलमध्ये जायचे नाही, पाहुण्यांकडे जाताना जिलेबी करू नका असे बजावून सांगायचे.' असे ठामपणे ठरवले आणि तसे आजीवन वागलो... दोघेही!
तर मग कशी वाटली, आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात माझ्या तोंड पोळल्यामुळे आणि बायकोचे तोंड भाजण्याने झालेली? तद्वत पहिल्याच घासाने आमच्या संसाराची सुरुवात 'दोघांच्या ही डोळ्यात पाणी' येऊन झाली...
@ नागेश सू. शेवाळकर