DIWALI AAPLYA LAHANPANICHI in Marathi Short Stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | दिवाळी आपल्या लहानपणीची

Featured Books
Categories
Share

दिवाळी आपल्या लहानपणीची

थंडीची चाहूल लागलेली असायची.. आणि मोती साबणाची दूरदर्शन वर जाहिरात दाखवायला सुरुवात... सहामाही परीक्षा संपायला १ ते २ पेपर शिल्लक असायचे...पण तो पर्यँत दिवाळी ची चाहूल लागलेली असायची..शाळेतुन बाजारातुन येताजाता...फटाके,कपडे,पिस्तूल,आकाश कंदील ...दिवाळीच्या आधी वाजणारे एक दोन चुकार फटाके...अक्षरशः माहौल बनायचा... खूप काही दिसायचे.. तेव्हा कधी एकदा हे पेपर संपातायत असे होऊन जायचे.. आणि शेवटचा पेपर लिहून शिक्षकां जवळ दिला कि आमची दिवाळी तिथे वर्गातच चालू...

शेवटचा पेपर आणि पहिली आंघोळ यात साधारणपणे ५ ते ७ दिवसांचा कालावधी असायचा...त्याच पाच दिवसांत आम्ही बच्चे कंपनीचा " दिवाळीचा अभ्यास " संपवायचा हेच एक उद्दिष्ट असायचे आणि आपली वही सर्वांच्या वहीपेक्षा कशी सुंदर दिसेल याचीच तळमळ जास्त असायची...फटाकाच्या माळेवर असणारा " ताजमहाल" चा फोटो दिवाळीच्या वहीत तर हवाच...त्याशिवाय कशी दिवाळीची वही सजणार..आणि अभ्यास लवकर केला मस्ती करायला मोकळे...कपडे घेताना आई-बाबा पण हात मोकळा सोडायचे...स्वतः जुने कपडेच वापरायचे पण आपल्या चिल्या-पिल्याना मात्र नवीन कपडे...आईची मात्र खास तारांबळ उडायची..करंज्या करू कि चकल्या कि चिवडा करू..बेसन चे लाडू आधी वळायचे कि रव्याचे..त्यातही करंज्या लाटायचे वाडीत सर्वांकडे नंबर ठरलेले असायचे.

फेसबुक,ऑर्कुट आणि व्हाट्सअँप यांचा अजून शोध लागला नव्हता... केबल टीव्ही अजून बाल्यअवस्थेत होते.. दूरदर्शननेच खूप करमणूक आम्ही करून घायचो...सांगायचा मुद्दा असा कि तेव्हा खूप मोकळा वेळ असायचा बोलणे आणि आनंद वाटणे फेसबुक वर नाही तर फेस टू फेस असायचे...शुभेच्छा घरी जाऊन द्यायचो तेव्हा फोन करून जा किवां आमंत्रण असेल तर जा असे काहीच प्रकार नसायचे ...आणि आजच्या काळासारखे रेडिमेड "दिवाळी फराळ " नसायचा...घरोघरी फराळ रात्री जागून तयार केला जायचा..बेसन च्या पिठाचा वास, चकली चिवड्या चा वास घरा घरात भरलेला असायचा... उकळत्या तेलातुन बाहेर काढलेली पहिली करंजी थंड होण्याची वाट न बघता कधी खातो असे व्हायचे

दिवाळीच्या आदल्या रात्री झोपच नसायची...सकाळी ४ वाजले कि बाबा उठवायचे...तेव्हा आमची उठायला कुरकुर नसायची..बाबा उटणं लावायचे आणि आंघोळ झाली कि कारेटे फोडायचा कार्यक्रम असायचा...पायाच्या अंगठ्याने फुटता फुटता सरळ पाय देऊन मोकळे व्हायचो...आईचे ओवाळून झाल्यावर.. आधी जाऊन मोकळे आकाश बघायचो...तेव्हा असेच वाटायचे कि आकाशातल्या चांदण्या खाली आल्यात...असे वाटायचे आईने ओट्यावर काढलेली रांगोळी कोणीतरी पुन्हा आभाळात काढतेय... नंतर फटाके फोडताना..माळ वेगवेगळी करून एक एक करून वाजवायचो...आणि लक्ष्मी बार वाजवताना...आधी पाया पडायचो मग फटाका फ़ोडायचो..दिवाळीचे पहिले चार दिवस हवे तसे फटाके फोडायचे..मग मात्र आई वडील सांगायचे..थोडे तुळशीच्या लग्नाला पण ठेवारे..
मग मात्र नाईलाज व्हायचा.. पण त्यावर पण उपाय होता..आजुबाजुच्या मोठयाला ईमारतींमधून सोडले जाणारे रॉकेट..आणि ते फुटल्यावर त्यातुन येणारी नक्षी..तेव्हा वाटायचे अरे यार एक तरी आपल्याकडे हवा होता लावायला.

आणि त्यातल्या त्यात...खासकरून चाळीतली दुपार आणि संध्याकाळ खूप मजेत जायची...इतर दिवशी दुपारी आराम करणारी आई...दुपारी लाल लाल गेरूने पडवीतली मोकळी जागा सारवून रांगोळी काढायला सुरुवात करायची...त्यात आमचा सहभाग फक्त ठिपके काढण्यापुरता असायचा...आई बरोबर चाळीतल्या इतर बायकापण रांगोळी काढत गप्पा गोष्टी रंगवत बसायच्या...आणि त्यात कधी संध्याकाळ होतेय असे होऊन जायचे...एकदा का संध्याकाळ झाली कि..कोणची रांगोळी सुंदर, कोणाची किती रांगोळी मोठी ३० ते ४० ठिपक्यांची .. लहापणीचे सवंगडी आणि फटाके ते पण उदबत्तीने लावण्यात काय मजा यायची...आणि तुळशीचे लग्न ...जो कोणी नवरा म्हणून उभा राहिला असेल त्याला चिडवण्यात पुढचे दिवस जायचे ..

मग पुढचे चार दिवस फक्त आम्ही आणि फटाके...फटाकाच्या दारूने माखलेले हात...रोल आणि केपा पिस्तुलात घालून वाजवण्यात कोण स्वर्गसुख असायचे...सर्वांच्या दारात रात्री लावलेले कंदील ओट्यावरच्या रांगोळ्या....नुसता आनंद.. पण आता कुठेतरी हे सर्व हरवतेय कि फेसबुक आणि व्हाट्सअँप च्या आभासी दुनियेत आपण हरवतोय...