Jayanta - 3 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | जयंता - 3

Featured Books
Categories
Share

जयंता - 3

जयंता

पांडुरंग सदाशिव साने

३. रामकृष्णा

सायंकाळी वेळ होती. महालक्ष्मी स्टेशनात मी होतो. गाड्या भरुन येत होत्या. जागा मिळेना घुसायला, दार धरुन उभे राहायला मला धैर्य होत नव्हते. जेव्हा मोकळी जागा मिळेल तेव्हाच गाडीत बसेन असे ठरवून मी एका बाकावर बसलो होतो. इतक्यात पंधरा-सोळा वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या अंगावर चिंध्या होत्या. त्याची ती उंच देहयष्टी कृश दिसत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा होती. त्याचे ते ओठ थरथरत होते. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो माझ्याक़डे बघत होता. तो माझ्या डोळ्यांत सहानुभूती शोधीत होता. मी त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकता शोधीत होतो.

“दादा...” त्याने शब्द उच्चारला.

“काय पाहिजे तुला ? का डोळ्यांत अश्रू ?”

“मी बेकार आहे. मुंबईत पोटाला मिळावे म्हणून मी आलो. चार दिवस झाले. मी उपाशी आहे. चार आणे द्या. थोडे खाईन.”

“तू कुठला कोण ?”

“मी दूरचा आहे. धामणी माझे गाव. घरी आईबाप आहेत. लहान भावंडे आहेत. परंतु खायला नाही. ना धंदा, ना मालकीची जमीन. नेहमी ‘मुंबईला जा, पोटाला मिळव. उरले तर घरी आम्हाला पाठव !’ असे बाप म्हणायचा. अखेर गाव सोडले नि मी येथे आलो. येथे ना ओळख ना देख. भटकत असतो.”

त्याला बोलवेना. मी चार आणे काढून त्याला दिले.

“अहो, फसवतात हे लोक.” शेजारी उभा असलेला एक गृहस्थ म्हणाला.

“फसवू दे. मोठमोठे कारखानदार फसवीत आहेत. व्यापारी फसवीत आहेत. बडी बडी माणसे फसवीत आहेत. या मुलाने चार आण्यासाठी फसवले तर फसवले.” मी म्हटले.

“अहो, दान सत्पात्री करावे, शास्त्र सांगते.” ते गृहस्थ धर्म सांगू लागले.

त्या मुलाचे डोळे त्या गृहस्थाला उत्तर देत होते. मला खलिल जिब्रानचे शब्द आठवले. ‘ईश्वराने आयुष्याची थोर देणगी द्यायला ज्याला पात्र ठरविले तो तुझ्या दोन दिडक्या घ्यायला पात्र नाही का ? या जगात ज्याचा उपयोग नसेल, त्याला ती विश्वशक्ती येथे राखील तरी कशाला ?’

“तुमचे उपकार...” तो मुलगा म्हणाला.

“उपकार कसले, बाळ ? ज्याच्याजवळ आहे त्याने दुस-याला देणे हा धर्म आहे. सारे विश्व म्हणजे कुटुंब, ही भावना व्हायला हवी. तुझ्यासारखी सुंदर उमदी मुले, त्यांची अशी आबाळ व्हावी याहून अधर्म तो कोणता ? कामाला तयार असणा-यास जेथे काम मिळत नाही तेथे कोठून सुखसौभाग्य येणार ? ही सारी समाजरचना बदलायला हवी. समाजवाद आणायला हवा.” मी बोलत होतो.

“समाजवाद म्हणजे थोतांड !” ते गृहस्थ म्हणाले.

“समाजवाद म्हणजेच सद्धर्म, म्हणजेच खरी संस्कृती, बाकी सारा फापटपसारा आहे.” मी म्हटले.

“येतो, दादा.” असे म्हणून तो तरुण गेला.

दोन-तीन महिने गेले. दुपारची वेळ होती. मी चिंचपोकळी स्टेशनात गेलो. एका बाकावर एक तरुण निजला होता. तोच फाटका सदरा अंगात. तेच करुण मुखमंडळ. मी त्या मुलाला ओळखले. मी त्याच्याजवळ बसलो. त्याला थोपटावे असे वाटले. हा जेवला असेल का, असा मनात विचार आला. आणि जेवला नसेल तर ? मी माझ्या खिशात हात घातला. फक्त दोन आणे खिशात होते. मला वाईट वाटत होते.

इतक्यात एक जाडजूड गृहस्थ आले. तलम धोतर ते नेसले होते. अंगात स्वच्छ लांब कोट-गळपट्टीचा कोट. डोक्यावर एक श्रीमंती टोपी. हातात सिगारेट. बोटातून अंगठ्या झळकत होत्या. पायातील बूट नुकतेच पॉलिश केलेले चकाकत होते. ते गृहस्थ बाकाजवळ आले. त्यांच्या ऐसपैस देहाला बसायला बाकावर जागा नव्हती. कडेला त्यांना बूड टेकता आले असते. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेचा तो अपमान झाला असता.

“उठ, ए सोनेवाला, ऊठ जाव. ही काय झोपायची वेळ आहे का ? खुशाल झोपला आहे. ऊठकर बैठो.” तो रुबाबदार मनुष्य गर्जला.

“निजू दे त्याला. तुम्ही येथे बसा.” मी म्हटले.

“अहो, ही का झोपायची वेळ ? रात्री चो-या करतात नि दिवसा झोपा काढतात. ही बाके जणू यांच्या बापाची इस्टेट !” ते गृहस्थ बसल्या बसल्या बडबडत होते.

तो मुलगा उठून बसला. त्याने माझ्याकडे पाहिले. तो उभा राहिला.

“दादा, बसा तुम्ही.” तो प्रेमाने म्हणाला.

मी त्याच्याजवळ बसलो. त्याचे डोळे भरुन आले होते.

“आज काही खाल्ले आहेस का ?” मी विचारले.

“होय. दादा. मला एका गिरणीत काम मिळाले आहे. रात्री जातो कामाला. हळूहळू तेथे शिकेन. सध्या थोडेफार मिळते. घरीही दहा रुपये पाठवले. ज्या दिवशी मनिऑर्डर पाठविली, त्या दिवशी मला किती आनंद झाला होता सांगू !”

“कुऽठे राहतो, कुऽठे झोपतोस ?”

“असाच कुठेतरी राहतो नि झोपतो. स्टेशन हेच घर. सकाळी एखाद्या सार्वजनिक नळावर अंघोळ करतो, कप़डे वाळवतो. स्टेशनात बाकावर येऊन पडतो. कधी राणीच्या बागेत बसतो. कारण स्टेशनात तरी कोण निजू देतो ? अशी मोठी माणसे येतात. हजारो येणार, त्यांना जागा हवी, या मुलाला रात्रपाळी असेल, झोपायला जागा नसेल, थकून भागून येथे झोपला असेल, असा विचार कोण करणार, दादा ?”

तो मुलगा कसे बोलत होता म्हणून सांगू ! साधे सरळ सत्यकथन ! ना जगावर राग ना रुसवा. स्टेशनात एक केळीविक्या बसला होता. मी पटकन गेलो नि दोन आण्यांची केळी घेऊन आलो.

“घे.” मी त्याला म्हटले.

“कशाला आणलीत ?”

“दुसरे काय देऊ ?”

“तुम्ही त्या दिवशी ते चार आणे दिलेत, तेच लाखांच्या ठिकाणी होते. त्या दिवशी मी गळून गेलो होतो. तुम्ही अन्नदाते भेटलात. तुम्ही सारे काही दिलेत. सहानुभूती दिलीत. खरे ना ? गरिबाबद्दल कुणाला आहे आस्था ? कोण करतो त्यांच्या सुखदुःखाचा विचार ? कधी संपतील हे गरिबांचे हाल ?”

“समाजवाद येईल तेव्हा.”

“कधी येईल ?”

“तुम्ही आणाला तेव्हा. तो का आकाशातून पडणार आहे ? तुझ्यासारख्या तरुण मुलांनी अभ्यास करायला हवा, संघटनेत सामील व्हायला हवे. कधी गावी गेलास तर तेथेही हे विचार न्यायला हवेत. खरे ना ? आपल्यासाठी दुसरा कोण काय करणार ?”

“तुम्ही मला सोपी सोपी पुस्तक द्याल ?”

“तू किती शिकलास ?”

“चार बुके शिकलो. वाचता येते.”

“जनवाणी वाच, साधना वाच.”

“तुम्ही कोठे भेटत जाल ?”

मी त्याला माझा पत्ता दिला. इतक्यात गाडी आली.

“मी जातो. तुझे नाव काय ?”

“रामकृष्णा.”

“जातो, रामकृष्णा. सुखी राहा.”

“तुमचा समाजवाद येईल तेव्हा खरा सुखी होईन. कारण मग सर्वांच्या सुखाचा प्रश्न सुटेल!” तो मजकडे पाहून म्हणाला.

***