Pritichi Premkatha - 6 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | प्रीतीची 'प्रेम'कथा - 6

Featured Books
Categories
Share

प्रीतीची 'प्रेम'कथा - 6

टर्निंग पाॅईंट !?

अर्थात

प्रेम की ओर?

विचार केला मी तर वाटले प्रीतीच्या प्रेमकथेतला हा सगळ्यात मोठा टर्निंग पाॅइंट म्हणावा! खरेतर इतके दिवस मी असेच घालवले. आता पुढे काहीतरी व्हायलाच हवे! तात्या त्याला भेटतील.. माझ्या मुलीला तुमचे पुस्तक इतके आवडले म्हणून सांगतील .. तो आपल्या या कदाचित एकुलत्या एक फॅनी ला भेटायची इच्छा व्यक्त करेल.. मी त्याला मग भेटेन.. इथवर तरी गोष्ट पुढे सरकायला हरकत नाही.. असा विचार करत मी 'प्रीती जगदाळे' अशी सही कशी करायची त्याची प्रॅक्टिस करायला लागले. ते कुठले गाणे आहे ना ते आठवत.. 'समझो हो ही गया!' आता तात्या काय खबर आणतात ते पाहू!

पण हाय! पुढच्या आठवड्याभरात तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांनी बोलावे असे काही नव्हते खरे. पण मला वाटले तसे त्यांनी मला येऊन सांगायला तरी हवे होते की नाही? त्यांच्या आॅफिसच्या कामात मी इतकी मदत केली तर? पण ते काहीच बोलले नाहीत आणि परत एकदा विषय कसा काढावा ते कळले नाही मला. पण शेवटी एकदा म्हटलेच मी त्यांना, "तात्या त्या लेखकांना सांगितलेत का मला पुस्तक आवडल्याचे?"

मुद्दाम मी नाव घेतले नाही त्याचे. परत बहुवचनी उल्लेख! आपल्याकडे नवऱ्याचे नाव घ्यायची पद्धत नाही म्हणे! तो नवरा नसला झाला अजून तरी काय झाले! संस्कार म्हणून काही असतात ना.. ते असे दिसत असतात!

तर तात्या म्हणाले, "सांगितले असते त्याला, पण विद्रोही ना तो. म्हणाला, पुस्तकामुळे कुणाच्या विचारात बदल होईल तर ते खरे. मग मीही पुढे म्हणालो, पुढचे पुस्तक घेतो आम्ही.

त्यावर काही बोलला नाही तो. बघू म्हणे. अगं असा प्रकाशक स्वतःहून कुणाचे पुस्तक प्रकाशित करतो का? ते आमचे एक मालक आहेत.. तरूण होतकरूंना मदत करणारे म्हणून आणि हा बघू म्हणतो!"

"म्हणजे? म्हणजे काय?"

"म्हणजे एवढेच .. थोडा भाव खातोय दिसतोय.."

"पण त्यांना भेटून पुस्तकावर चर्चा करायची म्हणावे मला.. भेटू शकते का मी? त्यात तुमच्याकडे दुसरे पुस्तक द्यायला पण सांगेनच मी.."

प्रत्यक्ष स्वतःच्या वडलांना असे मधाचे बोट लावावे मी! हे प्रेम.. आणि हा प्रेमसुद्धा.. काय काय करायला लावेल कुणास ठाऊक! पण युद्धात नि प्रेमात सारे क्षम्य असते म्हणे. आणि तसेही माझे प्रयत्न त्यांना जावई मिळवून द्यावा म्हणूनच तर होते. त्यामुळे मोठया मनाने मी स्वतःलाच माफ करून टाकली.

"तू म्हणतेस ते ठीक आहे मने. काही लेखक उगाच भाव खातात. तू बोललीस तर मानेलही तो. मी बघतो.."

तात्या इतक्या सहजपणे मानतील अशी अपेक्षा नव्हती माझी. पण त्यांनी मानले आणि एकाच वेळी मी खूशही झाली नि चिंतित ही! त्याने पुस्तकाबद्दल काही विचारले तर मी काय बोलणार होती? आणि त्यात मलातरी कुठे इंटरेस्ट होता? पण नावापुरते तरी बोलावे लागणार होतेच. त्याहूनही मोठे टेन्शन होते ते तात्यांचे. त्यांच्यासमोर झाली भेट तर सगळेच मुसळ केरात. एकवेळ त्या प्रेमला मी माझ्या प्रेमाने करीनही गारद, पण प्रत्यक्ष तात्यांसमोर? माझी झोप उडाली असे नाही म्हणणार मी. कारण सकारात्मक विचार! स्वामी म्हणतात तसे! उगाच इकडतिकडचा विचार कशाला? त्यापेक्षा मस्त झोपावे.. स्वप्न पहावे आणि जे होईल ते ते ही पहावे. आजवरच्या सब्रची फळे तरी गोडच दिसताहेत! सारी कृपा स्वामींचीच!

दोनच दिवसांत तात्यांनी त्यांच्या आॅफिसात प्रेमला बोलावणे धाडले. म्हणजे मला तसे आगाऊ सांगितले, "ये जरा त्याला भेटायला. बघ लेखकराव कसा मानतो की नाही!"

म्हटले तर ही संधी होती, म्हटले तर संकट! संकटात संधी शोधणारेच इतिहास घडवतात म्हणे! पण संकट की संधी.. काही असो, त्यास तोंड देण्याशिवाय दुसरा उपायदेखील नव्हता. दोन दिवस हाताशी होते. काहीतरी उपाय करावा लागेलच. पण तो काय नि कसा? आजवर साऱ्या संकटांत रस्ता मी शोधला होता. खरेतर ह्या सगळ्यांना संकट म्हणणे हेच चुकीचे. पण कोणी मदतीस नसताना निव्वळ नशिबाच्या साथीने आजवर ही मजल मारलेली मी. अजून दिल्ली दूर आहे पण त्यादिशेने थोडीफार मजल तर मारावीच लागणार आहे मला.

आता मी काय करणार?

एकतर त्याला भेटणेच टाळणे. पण याचसाठी केला होता अट्टाहास! नाहीतर भेटण्याची जागा बदलणे .. जेथे तात्या नसतील! हे कसे व्हावे?

काॅलेजात जाण्याचे फायदे काही असतील इतर पण मुख्य म्हणजे आपल्याला हवे ते मित्र मैत्रीणी भेटतात. त्यांच्याशी आपल्याला हवे ते बोलता येते. आता मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली. तिच्या लग्नासाठी आम्ही सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली एका वर्षापूर्वी. आता परतफेड करण्याची वेळ आली समजा! तिच्याशी बोलले काय.. पुढे झाले काय.. आणि काय काय.. सारेच तसे गंमतीदार. म्हणजे आता तसे वाटते. प्रत्यक्ष तसे घडताना ठाऊक नाही कसे वाटायचे ते!