सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, तुझ्या बायकोला सांग मला न्हाऊ घाल असे म्हणाली. देवाला गोडधोड नेवेद्याचे कर, नाही काही म्हणू नको, नेहेमीचे रड काही गाऊ नको.
ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल मी भिक्षा मागून येतो नेवेद्यासाठी असे सांगितले.
आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व गोडधोड स्वयंपाक केला नेवेद्य दाखवला . मुलबाळसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली.
उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले.
ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणू ?
तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटी रोव . तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशीची नाव घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. मग त्याच दूध काढ .
ब्राह्मणाने तसे केले, गाई-म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले.
दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता परत पोचती कर.
ब्राह्मण म्हणाला आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचत्या कशा करू ?
तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल .
म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही.
ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग !
गौरीने सांगितले, तुला येतांना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. भांड्यांवर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक असे केलेस म्हणजे कधी काहीही कमी होणार नाही.
ब्राह्मणाने बरे म्हटले.
ब्राम्हणाच्या बायकोने तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले.
भाद्रपद महिन्यांत तळ्याच्या पाळी जावे. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी गोडधोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी.
तिला आदराने जेवू घालावे. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल. जे संतत टिकेल .
ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईंच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.
ही कहाणी मनोभावे ऐकली जाते .
त्याच दिवशी सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
त्यांना हळदी कुंकू लावून दुध साखर ,फुटाणे ,पेढे प्रसाद म्हणून दिला जातो ,व सुवासिनींना गौर समजून पाया पडतात .
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करायचे असते . त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात.
व या सुताच्या गाठी घरच्या महिला आपल्या गळ्यात बांधतात .
महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात.
नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, कानवला व दहीभात याचा नैवेद्य दाखवतात.
तिसऱ्या दिवशी विसर्जन असल्याने गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते व घरात सर्वाना उदास वाटते.
गौरीसोबत गणपती सोबत काही दिवस उत्साहात व आनंदात पार पडलेले असतात .
गौरीं गणपत्तीला पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.(धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे .
आता थाटामाटात गोरी व गणपतीला निरोप देऊन त्यांची पुढील वर्षीसाठी वाट पाहिली जाते .!!
समाप्त