Jayanta - 1 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | जयंता - 1

Featured Books
Categories
Share

जयंता - 1

जयंता

पांडुरंग सदाशिव साने

१. जयंता

“जयंता, तू पास होशीलच; पुढे काय करणार तू ? तुझा मोठा भाऊ तर चळवळीत गेला. तुझ्या मनात काय आहे ? वडिलांनी विचारले.”

“चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाही. मी लहान मुलगा. कोठे जाणार ? परंतु मला खूप शिकायची इच्छा आहे.”

“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?

“बाबा, मला नादारी मिळेल. मला मार्क्स चांगले मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीही कदाचित मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाही.”

“तुझ्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागणार नाही असे धरले, तरी तुझ्याकडून घरसंसार चालवायला मदत थोडीच होणार आहे ? अरे, मी एकटा किती काम करु ? मी थकून जातो. सरकारी नोकरी, शिवाय सकाळी खाजगी नोकरी ; महिनाअखेर दोन्ही टोके मिळवायला तर हवीत ? घरात तुम्ही पाच-सहा भावंडे. तो मोठा गेला देशसेवेला. बी. ए. होईल, मदत करील, अशी आशा होती. परंतु घरी न सांगता गेला. जाऊ दे, देशासाठी कोणी तरी जायला हवेच. परंतु तुम्हास कसे पोसु ? जयंता, तू नोकरी धर, रेशनिंगमध्ये मिळेल ; मी बोलून ठेवले आहे,” वडील म्हणाले.

“मी पंधरा वर्षांचा ; मला कोण देईल नोकरी ?”

“तेथे वयाची अट नाही. मॅट्रिक पास असलास म्हणजे पुरे. अरे, कोवळ्य़ा मुलीही तेथे काम करतात.”

इतक्यात जयंत्याची बहीण तेथे आली. ती म्हणाली,

“बाबा, मी करु का नोकरी ? जयंताला शिकू दे. तो हुशार आहे. मला द्या ना कोठे मिळवून.”

“अगं, तू मॅट्रिक नापास ; शिवाय तुझी प्रकृती बरी नसते.”

“नोकरी करुन सुधारेल. आपला काही उपयोग होत आहे असे मनात येऊन समाधान वाटेल.”

“नको, गंगू, तू नको नोकरी करु. आम्हां भावांना तू एक बहीण. तू बरी हो. तुझे वजन वाढू दे. मी करीन नोकरी. सकाळी कॉलेजात जाईन. हजारो मुले असे करीत आहेत.”

“परंतु तू अशक्त ; तुला एवढा ताण सहन होईल का ?”

“होईल. मनात असले म्हणजे सारे होते.”

पुढे मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल लागला. जयंता पास झाला. त्याला शेक़डा ७० मार्क मिळाले. कोणत्याही कॉलेजात त्याला शिष्यवृत्ती मिळाली असती. त्याने कॉलेजात नाव घातले. सकाळी कॉलेजात जाणार होता, दुपारी नोकरी करणार होता. पंधरा वर्षांचा जयंता तास न् तास रेशनिंगचे काम करी. तो दमून जाई. शरीराची वाढ होण्याचे ते वय ; परंतु त्याच वेळेस आबाळ होत होती. काय करायचे ?

जयंता घरी आईलाही कामात मदत करी. रविवारी घर सारवी. इतर भावंडांचे कप़डे धुवी. तो क्षणभरही विश्रांती घेत नसे. घरात विजचा दिवा नव्हता, रॉकेल मिळायचे नाही. जयंता एका मित्राच्या घरी रात्री अभ्यासाला जाई.

कॉलेज सुटल्यावर तो आता घरी येत नसे. तिकडेच राईसप्लेट खाऊन नोकरीवर जाई. परंतु जयंता अशक्त होत चालला.

“जयंता, तुला बरे वाटत ?” गंगूने विचारले.

“बरे वाटते तर ? तूच जप. तुला इंजेक्शने घ्यायला हवीत. त्यासाठी मी पैसे साठवून ठेवले आहेत. तू आमची एकुलती एक बहीण. मी देवाकडे गेलो तरी इतर भाऊ आहेत ; परंतु तू गेलीस तर दुसरी बहीण कुठे आहे ?”

“असे नको बोलू. तू शीक. हुशार आहेस. तू मोठा होशील. खरेच जयंता !”

“मला खूप शिकावे असे वाटते.”

“शीक हो ; परंतु प्रकृतीस जप.”

गंगू आता इंजेक्शन घेऊ लागली. जयंताचा शब्द तिला मोडवेना. परंतु जयंता मात्र खंगत चालला.

“जयंता, तुला काय होते ?” आईने विचारले.

“परीक्षा जवळ आली आहे. रात्री अभ्यास करतो. म्हणून तुम्हांला मी असा दिसतो. शरीर थकले तरी मनाला खूप उत्साह आहे. परिक्षा संपली, की तीन महिने मग अभ्यास नाही. प्रकृती सुधारेल. आई, काळजी नको करु.”

“तो तिकडे तुरुंगात ; तुझी ही अशी दशा.”

“आई, सा-या देशातच अशी दशा आहे. त्यातल्या त्यात आपण सुखी नाही का !”

“तू शहाणा आहेस, बाळ.”

आईच्या डोळ्यांत पाणी आले. जयंता पुस्तक घेऊन निघून गेला. परीक्षा जवळ आली होती. गंगू, जयंता दोघे त्या दिवशी फिरायला गेली होती.

“गंगू, तुला आता बरे वाटते ?”

“मला तुझी काळजी वाटते.”

“वेडी आहेस तू ! मला अलीकडे खूप आनंद वाटत असतो. कॉलेजात जातो, त्यामुळे वर्ष फुकट नाही जाणार. नोकरी करतो म्हणून घरीही मदत होते. त्या दिवशी मी आईला लुंगडे आणले, तिली किती आनंद झाला ! बाबांनाही बरे वाटले असेल. लहान वयाची मुले खेड्यापाड्यांतून आईबापास मदत करतात. सात-आठ वर्षांचा मुलगा गुराखी होतो, घरी मदत आणतो. पांढरपेशींची मुले घराला भार असतात. आम्हीही खपले पाहिजे. वर्तमानपत्रे विकावी, दुसरे काही करावे. पांढरपेशा कुटुंबात एक मिळवणारा नि दहा खाणारी ! ही बदलली पाहिजे परिस्थिती.”

“जयंता, तू मला एक हातमशीन घेऊन दे. मी घरी शिवणकाम करीत जाईन.”

“आधी बरी हो. तुझ्या येत्या वाढदिवसाला मी ती भेट देईन.”

दोघे घरी आली. आणि जयंताची परीक्षा आली. त्याने चार दिवसांची रजा घेतली. पेपर चांगले जात होते. आज शेवटचा पेपर, घरी बहीण वाट बघत होती. का बरे नाही अजून जयंता आला ?

जयंता पेपर लिहून उठला. सारी मुले निघाली ; परंतु जयंता एकदम घेरी येऊन पडला. मित्र धावले. त्यांनी त्याला उचलले. एक टॅक्सी करुन ते त्याला घरी घेऊन आले.

“काय झाले ?” गंगूने घाबरुन विचारले.

“घेरी आली होती.” मित्र म्हणाले.

ते मित्र गेले. गंगू भावाजवळ बसली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. वडूल कामावर गेले होते. भावंडे शाळेतून अजून आली नव्हती. आई दळण घेऊन गेली होती. गंगू एकटी होती.

“जयंता, जयंता” तिने हाका मारल्या. तिचे डोळे भरुन आले होते. थोड्या वेळाने आई आली.

“बाळ, जयंता” आईने हाक मारली.

जयंता शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले. तो एकदम उठला. त्याने आईला मिठी मारली.

“मला मृत्यू नेणार नाही.” तो म्हणाला.

“पडून राहा बाळ” आई म्हणाली.

“तुझ्या मांडीवर निजतो.”

“ठेव डोके.”

“आई, डॉक्टरला आणू ?” गंगूने विचारले.

“गंगू, डॉक्टरला कशाला ? गरिबाला डॉक्टर नकोत. ते पैसे घरी उपयोगी पडतील.” जयंता म्हणाला.

“बाळ, डॉक्टरला आणू दे हो” आईने समजूत घातली. गंगू गेली आणि थोड्या वेळाने ती डॉक्टरांना घेऊन आली. त्यांनी तपासले.

“थकवा आहे. मी इंजेक्शन देतो. बरे वाटेल. डोसही देईन, ते चार चार तासांनी घ्या. झोप लागली तर मात्र उठवू नका. विश्रांती हवी आहे. मेंदू थकला आहे.” डॉक्टर म्हणाले.

त्यांनी इंजेक्शन दिले नि ते गेले. त्यांच्या बरोबर गंगू गेली. ती औषध घेऊन आली.

“जयंता, आ कर” ती म्हणाली.

त्याने तोंड उघडले. तिने औषध दिले. तो पडून राहिला. सायंकाळची वेळ झाली. आई देवदर्शनास गेली होती. वडील अजून आले नव्हते. इतर भावंडे खेळायला गेली होती. घरी जयंता आणि गंगू दोघेच होते.

“गंगूताई, माझ्य़ा खिशात पैसे आहेत. तू इंजेक्शन घे. आणि आपल्या आईला अंगठीची हौस होती. तूच केव्हातरी म्हणाली होतीस. त्या अंगठीसाठीही मी पैसे जमवून ठेवले आहेत. तू तिला एक अंगठी घेऊन दे.”

त्याच्याने बोलवेना. तो दमला. डोळे मिटून पडून राहिला. आता सारी घरी आली होती. जयंता बरा आहे असेच सर्वांना वाटत होते. जेवणे झाली.

“तू थोडे दूध घे.” आई म्हणाली.

“दे, तुझ्या हाताने दे.” तो म्हणाला.

भावंडे निजली. वडील, आई नि गंगू बसून होती.

“तुम्ही निजा. मी त्याच्याजवळ बसतो. मग बारा वाजता मी गंगू तुला उठवीन.” वडील म्हणाले.

“आणि दोन वाजल्यावर गंगू तू मला उठव. मग मी बसेन” आई म्हणाली.

“तुम्ही सारे निजा. मला आता बरे वाटत आहे. खरेच बाबा, तुम्ही दिवसभर दमलेले. आणखी जागरण नको. निजा तुम्ही” जयंता म्हणाला.

“जयंता, मला आता सवयच झाली आहे दिवसभर काम करण्याची. बैल घाण्याला न जुंपला तरच आजारी पडायचा. परंतु माझ्याबरोबर लहान वयात तुम्हासही घाण्याला जंपून घ्यावे लागत आहे, याचे वाईट वाटते.”

“तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. कर्तव्य म्हणून सारे आनंदाने करायला हवे. आई किती कष्ट करते! दळणसुद्धा घरी दळते. आणि गंगूताईला बरे नसते तरी ती आईला हात लावते. तुम्ही निजा, सारी निजा.”

“तू बोलू नकोस. पडून राहा.” वडील त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

जयंता शांतपणे डोळे मिटून पडला. आई नि गंगू अंथरुणावर पडल्या. वडील जयंताजवळ बसले होते.

बराच वेळ झाला. बाराचा सुमारा असावा. सिनेमा सुटून मंडळी परत जात असावी. जयंताने डोळे उघडले.

“बाबा, मी नोकरी धरली, किती छान केले नाही? तुमची चिंता थोडी कमी केली. गंगूताईला इंजेक्शने घेता येतील. आता पैसे पुरतील.”

“होय हो बाळ. तू बरा हो म्हणजे झाले.”

“मी बरा नाही झालो तरी गंगूताई बरी होईल. ती मग मदत करील.”

पुन्हा खोलीत शांतता होती आणि गंगू उठली.

“बाबा, तुम्ही पडा” ती म्हणाली.

आणि ते झोपले. बहीण भावाजवळ बसली होती.

“तू आईला नको उठवू.” जयंता म्हणाला.

“बरे हो” ती म्हणाली.

पहाटेची वेळ होती. जयंताने ताईचा हात एकदम घट्ट धरला.

“काय रे?”

“मी जातो आता. सुखी राहा.”

“जयंता?”

तो काही बोलला नाही. पहाट झाली. आई उठली. वडील उठले. भावंडे उठली. परंतु जयंता आता उठणार नव्हता.

थोडे दिवस गेले आणि जयंताच्या परीक्षेचा निकाल लागला होता. परंतु तो पाहण्याचे कोणाच्या मनातही आले नाही. सायंकाळी जयंताचा एक मित्र आला. हातात वृत्तपत्र होते.

“गंगूताई” त्याने हाक मारली.

“काय निळू?”

“जयंता पहिल्या वर्गात पहिला आला.”

“म्हणूनच देवाने नेला.”

मित्र निघून गेला. गंगू खिडकीतून शून्य मनाने कोठे तरी पाहत होती. परंतु काय असेल ते असो. तिचे आजारपण गेले. तिची पाठ दुखेनाशी झाली. जयंता का तिचे आजारपण घेऊन गेला? गंगू आता नोकरी करते. घरी सर्वांना मदत करते.

जयंता जाऊन आज वर्ष झाले होते, गंगूने एक सुरेखशी अंगठी आणली होती.

“आई, तुझ्या बोटात घालू दे.”

“मला कशाला अंगठी? तुम्ही मुले सुखी असा म्हणजे झाले.”

“आई, जयंताची ही शेवटची इच्छा होती.”

“त्याची इच्छा होती? त्याची इच्छा कशी मोडू?” मातेने बोटात अंगठी घातली. डोळ्यांतून पाणी आले. मातेने मुलाचे श्राद्ध केले.

***