बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला लागलं. काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या विचाराने राजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं. काल काहीच आभ्यास झाला नाही. मग सकाळी उठुनच सगळा होमवर्क केला. त्यामुळेच आवरायला उशीर झाला.” राजेशने यावर नुसती मान डोलावली.
नेहमी प्रमाणेच आज देखील कॉलेजमध्ये तारुण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलामुलींच्या गजबजाटामुळे कॉलेजचा परिसर जिवंत भासत होता. राजेश व संदीप वर्गात पोहोचले व त्यांच्या नेहमीच्या बेंचवर बसले. पहिला तास जगदाळे सरांचा होता. जगदाळे सर वर्गात आले. राजेशने पूर्ण वर्गावर नजर फिरवली पण वृषाली त्याला कुठेच दिसली नाही. जगदाळे सरांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी नाव पुकारताच जो तो विद्यार्थी “प्रेसेंट” असं म्हणून स्वतः ची हजेरी लावत होता. ‘वृषाली गंधे’ सरांनी नाव पुकारलं व समोर पाहिलं. पण उत्तर नाही आलं. सरांनी वृषालीच्या नावासमोर अबसेंटीची खूण केली व पुढ्च्या मुलीचं नाव पुकारलं. राजेश मात्र थोडा उदास झाला. “का नाही आली अजून वृषाली?” हा विचार सारखा राजेशच्या मनात येत होता.
जेवणाच्या सुट्टीची बेल झाली व सर्व मुलं-मुली आपापल्या ग्रुपबरोबर टिफिन घेऊन कॅन्टीनमध्ये जेवायला गेले. सुट्टीनंतरचा तास सहस्त्रबुद्धे सरांचा होता. सहस्त्रबुद्धे सरांना थोडादेखील उशीर खपायचा नाही. त्यामुळे जेवणाची सुट्टी संपायच्या पाच मिनिटे आधीच सर्व मुलं-मुली वर्गात येऊन बसली, अर्थात काही टारगट मुलं सोडून. सहस्त्रबुद्धे सर वर्गात आले व पहिली दहा मिनिटे त्यांनी काल दिलेल्या होमवर्कबद्दल मुलांना विचारलं व कुणाला काही प्रश्न असल्यास विचारायला सांगितलं. नेहमीप्रमाणे संदीपने त्याच्या दोन शंका विचारल्या. सरांनी देखील न कंटाळता अतिशय उत्साहात त्याच्या शंकांचं निरसन केलं व आता नेहमीप्रमाणे राजेशही काहीतरी विचारेल या आशेने सरांनी राजेशकडे पाहिलं. पण राजेशने नकारार्थी मान डोलावली. आज त्याने होमवर्कच केला नव्हता मग त्याला प्रश्न पडतीलच कसे! सरांनी शिकवायला सुरुवात केली व पाहता पाहता त्यांचा तास संपला. सहस्त्रबुद्धे सर वर्गातून निघणार तेवढ्यात वृषाली धापा टाकतच वर्गात आली. “ही काय वेळ झाली का यायची? तुम्हा आजकालच्या मुलांना कसली शिस्तच नाही.” वृषाली काही बोलायच्या आत सहस्त्रबुद्धे सर कडाडले. “गाडीचं टायर पंक्चर झालं होतं सर.” वृषाली कसंबसं म्हणाली. अजूनही तिचा श्वास स्थिर झाला नव्हता. “असली कारणं पुन्हा चालणार नाहीत.” सहस्त्रबुद्धे सर पुन्हा कडाडले व तिथून निघून गेले. वृषाली वर्गात आली व कालच्याच बेंचवर बसली. पर्समधून तिने रुमाल काढला व चेहेरा रुमालाने पुसला.
तिला पाहताच राजेशची उदासी मात्र कुठल्याकुठे पाळली होती व त्याच्या चेहेऱ्यावर परत एकदा लाली खुलली होती. त्याने बाजूला बसलेल्या संदीपकडे पाहिलं. कधी नव्हेते संदीपच्या चेहेऱ्यावरसुद्धा स्मितहास्य दिसत होतं. ‘हा वृषालीचा परिणाम तर नसेल ना?’ राजेशच्या मनात शंका आली. पण तो काही बोलला नाही.
घरी आल्यावर आपण होमवर्क करायला कसेकाय विसरलो या प्रश्नाने राजेशला ग्रासलं. त्यामुळे त्याने सलग दोन तास बसून होमवर्क संपवला. राजेश मेसमध्ये जाऊन जेवण करून आला व नेहमीप्रमाणे त्याने कपाटातून एक पुस्तक उचललं व बेडवर आडवा पडून तो वाचू लागला. राजेशला सर्वच प्रकारची पुस्तकं आवडायची पण विज्ञान कथा आणि गूढकथा जास्त आवडायच्या. आता राजेश “द टाइम मशीन” नावाची इंग्रजी कादंबरी वाचत होता. त्यातला नायक एक शास्त्रज्ञ असतो जो एका मशीनचा शोध लावतो. त्या मशीनच्या साहाय्याने तो भविष्यात व भूतकाळात जाऊ शकत असतो. राजेशने आज ती कादंबरी वाचून संपवायचं ठरवलं. कथा शेवटच्या टप्प्यात आली होती. ती कथा वाचताना राजेशला त्याच्या काकांची आठवण येत होती. त्याचे काका इसरोमध्ये शास्त्रज्ञ होते. ते जेव्हा भेटत तेव्हा राजेशबरोबर अंतराळातील विविध गोष्टींबद्दल चर्चा करायचे. त्यांच्या रंजक आणि अकल्पनिय गोष्टी ऐकून राजेशच्या मनात टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स, ब्लॅक होल्स यासारख्या गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं.
पुस्तक वाचून संपलं व राजेशने झोपण्यासाठी दिवा मालवला. रोज झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या घटनांची उजळणी करण्याची राजेशला सवय होती. सकाळी बागेजवळ घडलेला प्रसंग आठवून राजेशला हसू आलं. वृषालीपण माझ्याबद्दल विचार करत असेल का? राजेशच्या मनात विचार आला. पण का करेल ती माझ्याबद्दल विचार? ती मला अजून ओळखत देखील नाही. तिच्याशी ओळख वाढवायला हवी. पण कशी? आज सकाळी ती व्यायामासाठी बागेत आली, म्हणजे उद्यासुद्धा येईल. आज ती सकाळी सहाच्या दरम्यान आली होती, मग मला उद्या थोडं उशिरा जावं लागेल. राजेशने त्याची विचारशृंखला तिथेच थांबवली व झोपण्यासाठी डोळे मिटले.
राजेश सकाळी सहा वाजता बर्वे उद्यानात आला. त्याने जॉगिंग ट्रॅकला एक राऊंड मारला व आजूबाजूला पाहिलं. पण वृषाली अजून आली नव्हती. राजेशने दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली. त्याने निम्मं अंतर पार केलं व त्याची नजर उद्यानाच्या गेटकडे गेली. वृषाली गेटमधून आत येत होती. आत येताच तीने हातातील पाण्याची बाटली व रुमाल एका बाकावर ठेवला व ट्रॅकवरून जॉगिंगला सुरुवात केली. राजेशने दुसरा राऊंड पूर्ण केला व पुढच्या राउंडला सुरुवात केली. थोड्या वेळाने राजेशला समोरून वृषाली येताना दिसली. तिने कानात इयरफोन घातले होते. ती जवळ येताच राजेशने तिच्याकडे पाहिले. वृषालीनेही राजेशकडे पाहिले पण तिच्या नजरेत ओळखीची कोणतीच खूण नव्हती. राजेशने पुढचे दोन राऊंड संपवले व तो बाकावर बसला. राजेशने रुमालाने चेहेऱ्यावरचा घाम पुसला. वृषालीने आपल्याला साधी ओळख देखील दाखवली नाही त्यामुळे तो थोडा नाराज झाला. पण कदाचित तिने आपल्याला वर्गात पाहिलेदेखील नसेल अशी त्याने स्वतः ची समजूत काढली. तसाही पाहताच क्षणी ती आपल्याकडे आकर्षित व्हावी इतके काही आपण आकर्षक दिसत नाही याची राजेशला जाणीव होती. राजेशने मोबाईलवरचं गाणं बदललं व ते गाणं ऐकण्यात तो मग्न झाला. थोड्यावेळाने राजेशने वृषालीला उद्यानाच्या गेटमधून बाहेर जाताना पाहिलं व तो बाकावरून उठला. वृषाली कुठे राहते ते पाहिलं पाहिजे, राजेशने ठरवलं. पण अशा एकट्या मुलीच्या मागे जाणं बरोबर आहे का? राजेशच्या मनात विचार आला. पण ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं’ या बहुश्रुत ओळीला अनुसरून राजेश उद्यानाच्या गेटमधून बाहेर आला व वृषालीच्या मागे चालू लागला. वृषाली ज्या रस्त्यावरून जात होती तो राजेशच्या घराचा रस्ता होता. काही वेळाने वृषाली एका घरापाशी थांबली. तीने गेट उघडलं व पुढे जाऊन दारावरची बेल वाजवली. एका मध्यमवयीन स्त्रीने दार उघडलं. ती स्त्री वृषालीची आई असणार, राजेशने विचार केला. वृषाली आत जाताच राजेश दोनच घरं सोडून पुढे असलेल्या अपार्टमेंटमधल्या तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरात आला. ज्या अर्थी वृषाली रोज सकाळी बर्वे उद्यानात व्यायामासाठी येते त्याअर्थी ती जवळच कुठेतरी राहात असणार याचा अंदाज राजेशला आला होता पण ती आपल्या घराच्या इतक्या जवळ रहाते हे राजेशला आत्ताच कळालं.
क्रमशः