2
सुरूवातीची सुरूवात!
अर्थात
प्रथम तुज पाहता
अनंतराव घोरपडे म्हणजे तात्या.. म्हणजे वडील माझे. अनंतराव घोरपडे. रंगढंग प्रकाशनात तात्या सीनियर मॅनेजर आहेत. तात्यांचा मनुष्य संग्रह दांडगा. मनुष्य संग्रह हा शब्द तात्यांचाच! मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा मनुष्य संग्रह! म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून! आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी! पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळासारखी अलिप्त मी! अगदी बीए झाली मी पण वाचनाची काही आवड नाही मला. आमचे स्वामी .. म्हणजे अरपितानंद स्वामी म्हणतात, आपल्या अंगाला काही लावून घेऊ नका! संसार असार आहे. त्यात सगळीकडे कर्दम पसरला आहे. तेव्हा कर्दमात रुतून राहू नका. आता सगळीकडे पसरला ही असेल हा कर्दम! कर्दम म्हणजे चिखल हे मला खूप उशीरा कळले. तोवर सगळीकडे काय पसरले नि कशात रुतायचे नाही हेच मला कळले नव्हते! तर मुद्दा चिखलाचा नाही नि त्यात रूतण्याचा नाही! तर कसे दैव, नशीब आणि प्राक्तन आपली गंमत करत असतात तो आहे. हे तिन्ही शब्द स्वामींचे! तर तात्या पुस्तकांचा पसारा घेऊन घरी येत असतात नि मी त्यापासून अलिप्त, कमलदलापरी! आणि एके दिवशी त्याच पुस्तकांच्या कमलदलांत भुंग्यासारखी मी अडकेन असे कधी मला वाटले असेल? पण झाले ते असे झाले!
तात्यांची सवय आहे नेहमीची. येताना कोणालाही घेऊन येतात घरी. थेट जेवायला. आईला कधी आधी फोन करतात.. कधी नाही. आई माझी अन्नपूर्णा. ती सर्वांना पोटभर जेवू घालतेच. त्यादिवशी तसेच झाले. तसेच म्हणजे तात्या कुणाला घरी घेऊन आले. पण तसेच नाही झाले.. म्हणजे यावेळी नेहमीप्रमाणे नाही झाले.. कारण त्यांच्याबरोबर आलेला तो तरूण!
कढईतली गरमागरम पुरी.. तट्ट फुगलेली. तिच्यात बोटाने भोक पाडून हवा बाहेर येते.. हवा म्हणजे वाफ. तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा ही दवडलेली बरी! आणि नाहीतर भाजायची जीभ. म्हणजे झाले काय.. त्यादिवशी 'तो' म्हणजे प्रेम आलेला घरी. जेवायला. मी उगाच त्याच्याकडे पाहात बसलेली. प्रथम त्यास पाहता.. अाई गरम पुऱ्या कढईतून डायरेक्ट वाढतेय. तो आणि तात्या जेवताहेत. प्रेम त्या पुरीत बोटाने छेद करतोय.. त्यातून वाफ बाहेर येतेय. माझे लक्ष अर्थातच प्रेमकडे. इकडे आई ओरडतेय.. "वाढ गं पुरी मने.." मी तोंड उघडून बावळटासारखी त्याच्याकडे पाहतेय. पहिल्यांदाच आलेला घरी तो. तात्या घेऊन आलेले तेव्हा त्यांना नसेल ठाऊक आपल्या जावयाला आणलेय घरी! आणि त्या प्रेमला तरी काय ठाऊक आपले सासर आहे हे! हे सारे पहिल्यांदा हे कळलं कोणाला असेल तर ती म्हणजे मी!
काहीतरी म्हणतात ना, पाहताच ती रम्य बाला कलिजा खलास झाला.. तसा 'पाहताच त्या रम्य ब्वा ला.. हार्टाट्याक आला!' तो मला. हार्टाट्याक म्हणजे नेहमीच्या अर्थाने नाही. म्हणजे हार्ट तर तसेच धडधड धडकत होते. थांबले नाही तर धावायला लागले. काहीतरी सिग्नल गेले इकडून तिकडून.. कलिजा खलास फक्त मुलांचाच होतो की काय? माझा पण झाला. लव्ह ॲट फर्स्ट साईट सिनेमात दाखवतात तसे झाले मला. मी त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली काय.. त्याला श्रीखंडाचा आग्रह केला काय.. पण त्याचे लक्ष असेल तर शपथ. त्यात चुकून मी त्याला दह्यात साखरेऐवजी दोन चमचे मीठ वाढले. तो बघत राहिला पण बोलला नाही काही. आईच्या लक्षात आले, तशी ती त्याच्यासमोर म्हणून हळूच ओरडली नि मी निमूटपणे दुसरी वाटी घेतली दह्यासाठी. तो आला नि त्याने पाहिले.. नि तो जिंकला! बस! झाले ते इतकेच. त्याला पाहात बसली मी खरी पण त्या धुंदीत तात्या आणि त्याच्या बोलण्याकडे लक्षच राहिले नाही. त्याचे नाव काय आहे हे ही ऐकले नाही मी.. तो गेल्यावर जाग आल्यासारखे झाले नि तोवर गाडी स्टेशन सोडून गेलीही होती. तो कोण, कुठला नि करतो काय.. कसलाच आगापीछा नाही. मुद्दाम विषय काढू म्हटले तर आई उगाच शंभर शंका काढणार.. मी का एवढे विचारते म्हणून. मी आपली गप्प बसली. कधी न कधी माहिती होईलच.
तो गेला. म्हणजे तात्या त्याच्याबरोबरच गेले त्याला सोडायला. आई कामात मग्न. मी 'स्वप्नात रंगले मी' अशा कुठल्या सिनेमाच्या नायिकेची पोझ घेऊन बसली. स्वप्ने पाहायची सवय पहिल्यापासूनचीच माझी. तशी बसली. झोपली नाही.. नुसतेच डोळे बंद करून पडून राहिली. स्वप्न पडायला झोपावेच लागते काय? मुळीच नाही. मला तर उघड्या डोळ्यानी पण पाहता येतात स्वप्नं. माझ्या प्रेमने आता मोठ्या प्रेमाने पाठवला असेल तो संदेश पण त्याला यातले काय कळते? स्वप्न पहायला झोप म्हणे! मी झोपली आज पण ते त्याचा आदेश समजून! पण मला अशीच बसल्या बसल्या पडतात स्वप्ने! हे त्याला मी अजून सांगितले नाहीए. तसे खूप काही शिकायचे बाकी आहे बिचाऱ्याला. तरी बरे तसा तो माझ्याहून जास्त शिकलेला आहे. तरी पुस्तकी शिक्षण पण काय खरे शिक्षण आहे?