सकाळपासून शंभरवेळा मोबाईल चेक करून झाला, पण प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. ‘लास्ट सीन ऑनलाइन’ पण बंद करून ठेवले होते. मी काही कोणी मनकवडा नव्हतो, पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अश्या वेव्हज मिळत असतातच ना. गाडीवर प्रितीने ‘फिर मोहोब्बत’ च ऐकवलेले गाणे?घरी जाताना ‘मला दुसरी नेहा व्हायचं नाही’ अस प्रीती म्हणाली होती, त्याचा अर्थ काय असू शकत होता? आणि नेहाच्या घरी समशेर म्हणाला होता ते? अनेक वेडे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच चित्र बनवू पाहत होतो. पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता. कदाचित, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ होते.
प्रिती प्लीज.. प्लीज ऑनलाईन ये…
मी अगदी मनापासून याचना करत होतो, जणू काही माझ्या मनाचा आवाज तिला ऐकू जाणार होता.
‘अगर तुम किसी चीज को दिलसे चाहो, तो पुरी कायनात..’ वगैरे सारखे फिल्मी डायलॉग डोक्यात पिंगा घालत होते.
“तरुण, प्लिज कम टू माय केबिन..”, मुरली, माझ्या मॅनेजरचा मेसेज स्क्रिनवर झळकला.
बहुतेक अजुन कुठलातरी कस्टमर इश्यु असणार आणि बहुदा नेमका माझ्याच कोडमधला असणार असले आत्मघातकी विचार घेऊनच मी त्याच्या केबीनमध्ये गेलो.
“हे मुरली…”, चेहर्यावर उसनी हास्य आणत मी म्हणालो..
“हाय तरुण.. प्लिज कम.. प्लिज कम…”, हसतच मुरली म्हणाला..
मॅनेजर हसतोय म्हणजे निदान कस्टमरसंबंधी तरी नक्कीच काही नसावं असा एक सुखद विचार आला पण तो क्षणभरच, कारण मॅनेजरचे हासणे हे सुखद कमी आणि त्रासदायकच अधीक असते ह्याचा वारंवार प्रत्येक आय.टी. मधील प्रत्येकाने एकदा तरी घेतला असणारच
“टेल मी मुरली..”
“तरुण.. आपण ते कॅम्पस इंटर्व्ह्यु केले होते ना.. ७-८ जण सिलेक्ट केले होते..”
“हम्म..”
“अॅक्च्युअली, आपण डिसेंबर मध्ये त्यांच जॉईनिंग प्लॅन केले होते, पण तो प्रोजेक्ट साईन-झालाय आणि लगेच काम सुरु करायचं आहे.. डेट्स प्रि-पोन झाल्यात..”
“ओह.. गुड फॉर अस, आपल्याकडे पण थोडी बेंच स्ट्रेंथ आहे… निदान बिलींग चालू होईल..”
“येस, यु आर राईट.. सो त्यांना ऑन-बोर्ड करायचं आहे, तुला बॅंगलोरला जावं लागेल.. तुला आर्कीटेक्चर चांगलं माहीती आहे.. आणि शिवाय टेक्नीकल नॉलेजपण..”
“मी जाऊ? पण आपण नेहमी ट्रेनीजना बोलावतो ना इकडे?”
“हो.. बट यु नो, वुई आर लो ऑन बजेट.. ट्रॅव्हलींग फ्रिज केलय सगळं, लकीली तुझं अप्रुव्हल मिळालं..”
“पण मुरली.. आय एम ऑलरेडी लोडेड..”
“डोन्ट वरी.. आय विल आस्क विनीत टु टेक केअर ऑफ़ इट..”
“किती दिवस जायचं आहे…?”
“जस्ट ३ डेज.. त्यांना थोडं ब्रिफ कर, थोडे पॉईंटर्स दे, सो दॅट दे कॅन गेट स्टार्टेड, बाकी आपण कॉन्फ कॉलने मॅनेज करु..”
“कधी जायचं आहे..”
“उद्या सकाळी, मी लिनाला फ्लाईट बुक करायला सांगीतली आहे आणि तिकडची अॅडमीन तुझं हॉटेल बुकींग संध्याकाळपर्यंत मेल करेल..”
हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, आणि दुसरा कुठलाच ऑप्शनही माझ्याकडे नव्हता.
डेस्क वर आल्यावर परत मी व्हॉट्स-अॅप चेक केलं..कदाचीत १३५व्यांदा वगैरे.. सगळे ग्रुप मी म्युट करुन टाकले होते. मला आत्ता कुणाचेच मेसेज नको होते फक्त एकीचा सोडला तर.. पण तो ही नव्हता..
प्रितीला सांगावं का बॅंगलोरबद्दल?, एक विचार आला.. पण का? कश्याला? कोण आहे ती माझी आणि मी तिचा? सकाळपासुन एकपण मेसेज नाही. उगाच तिला नको असेल तर आपण कश्याला तिच्यावर लादायचं?
पॅकींगचं कारण सांगुन ऑफीसमधुन लवकरच घरी परतलो..
सकाळी ७.३५ ची फ्लाईट होती. ६.३० ला लगेज चेक-इन करुन लाऊंज मध्ये जाऊन बसलो. बोर्डींगला अजुन ४० मिनीटं तरी होती. प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. मला कसही करुन तिला सांगावंस वाटत होतं मी बॅंगलोरला चाललो आहे, पण नको तितका ईगो आड येत होता. शेवटी एक आयडीया केली.
फेसबुकला चेक-इन अॅट डोमॅस्टीक एअर-पोर्ट करुन टाकले.
घड्याळाचे काटे मंद गतीने फिरत होते. सकाळची गर्दी बहुदा कॉर्पोरेट्स वाल्यांचीच होती. जो-तो आपला लॅपटॉप नाहीतर स्मार्टफोनवर काही तरी करण्यात मग्न होता. प्रचंड कंटाळवाण्या क्षणांनंतर शेवटी बोर्डींग सुरु झाले. मुंगीच्या गतीने रांगेतुन पुढे सरकुन शेवटी काऊंटरला पोहोचलो..
“गुड मॉर्नींग सर..”, काऊंटरच्या पलीकडची कन्यका म्हणाली..
“गुड मॉर्नींग..”
“सर.. विंडो सिट?”
“नो !”
“नो?”
“आय मिन डझंट मॅटर..”
तिने खांदे उडवुन बोर्डींग पास हातात कोंबला आणि पुढच्या ‘गुड मॉर्नींग’च्या तयारीला लागली..
फ़्लाईट जॅम पॅक होती. फ्लाईट-अॅटेंन्डंट्स नेहमीच्या प्रि-फ़्लाईट सेफ्टी इंस्ट्रक्शनच्या व्हिज्युअल्स आणि डेमोसाठी तयार होत होत्या..
मी जागेवर जाऊन बसलो.
पाच-एक मिनीटांमध्ये नेहमीचेच बोअरींग डेमो सुरु झाले. लोकेशन्स ऑफ़ सेफ्टी एक्झीट्स, युज ऑफ़ सिट-बेल्ट्स, ऑक्सिजन मास्क, लोकेशन अॅन्ड युज ऑफ़ लाईफ़-व्हेस्ट्स अॅन्ड लाइफ़ राफ्ट्स..
इतक्यात माझा मोबाईलफोन किणकिणला..
प्रितीचा फोन.... मी जवळ जवळ जागेवरुन उडालोच..
“हाय…”
“तरुण? हे काय? डोमेस्टीक एअरपोर्ट?”
“अंम्म.. अॅक्च्युअली बॅंगलोरला चाललो आहे..”
“कश्याला?”
“ऑफीसचे काम!”
“ओह.. किती दिवस..?”
“तिन..”
“तिन दिवस???” प्रिती जवळ जवळ ओरडतच म्हणाली
“हो.. का?”
“नाही.. म्हणजे तु काही बोलला नाहीस..”
सगळा निरर्थक संताप जागा झाला होता. कुणाला सांगू? निर्जीव व्हॉट्स-अॅपला? का सांगू? कोण तु माझी? आणि मी तरी कोण? पण भावनांना आवर घातला..
“हो म्हणजे.. अचानकच ठरलं काल..”
“सर.. प्लिज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन..”, एक फ्लाईट-अॅटेंडंटने जवळ येउन सुचना केली. एव्हाना डेमो संपले होते आणि “आय एम युअर कॅप्टन सो अॅन्ड सो स्पिकींग..” सुरु होते.. बाहेरचे वातावरण, तापमान, किती वाजले, किती वाजता पोहोचणार वगैरे वगैरे..
“सॉरी.. त्या दिवशी मी अशी अचानकच निघुन गेले..”, प्रिती बोलत होती..
“सर.. प्लिज स्विच ऑफ़..” दुसरी बया टपकली.. फ्लाईट टेक-ऑफ़ साठी साईडची धावपट्टी ओलांडुन मुख्य धावपट्टीवर येत होती..
शिट्ट.. प्रितीला आत्ताच फोन करायचा होता का..?? आणि हे पण अगदी वेळेवर टेक-ऑफ..
“तरुण? काय झालं? काही बोलत का नाहीस..”
“अगं.. फ्लाईट टेक-ऑफ़ होतेय, फोन बंद करावा लागेल…”
“ओह.. ठिक आहे, मग दुपारी बोलु?”
“दुपारी? अगं १० मिनीटात होईल फोन चालु परत..”
“अरे… मी आत्ता घराच्या बाहेर येउन बोलतेय.. घरी कुठे बोलु? आई विचारेल ना, सकाळी सकाळी कुणाशी बोलतेय.. आणि तुझी अजुन ओळख नाही कुणाशी..कोण तरुण? काय करतो वगैरे प्रश्न चालु होतील..”
“ओह…”
“सर.. मे आय रिक्वेस्ट यु.. टु प्लिज..”
“आय एम स्विचींग माय फोन.. जस्ट अ मिनीट…” जवळ जवळ ओरडतच मी म्हणालो..
एक विचीत्र कटाक्ष टाकुन ती हवाई-सुंदरी निघुन गेली
“तरुण.. व्हॉट्स-अॅप चालु असेल का? त्यावर बोलु शकेन मी..”
“कुल.. बेस्ट आयडीया.. चालेल.. फोन ऑन केला की करतो पिंग.. चल बाय.. करतो फोन बंद…”
असला संताप आला होता त्या फ्लाईट-अॅटेंडंण्ट्सचा, पण अर्थात त्यांचाही नाईलाजच होता.
डोक्यावरच्या पट्टीवर सिट-बेल्ट्सची खूण चमकली आणि क्षणार्धात विमानाने वेग पकडला.
१०-१५ मिनीटं बैचैन करणारी होती.
“थॅक्यु फॉर युअर पेशन्स, यु कॅन नाऊ युज युअर फोन्स, लॅपटॉप्स….”
पुढचं ऐकायची गरजच नव्हती. पट्कन मोबाईल-डाटा ऑन केला.
कनेक्टींगचे चक्र बराच वेळ गरगरं फिरत होते आणि शेवटी नेट कनेक्ट झाले..
“हाय..”, पट्कन प्रितीला मेसेज केला..
धडधड वाढवणारी अख्खी दोन मिनीटं गेल्यावर प्रितीचा रिप्लाय आला.. “हाय..”
“हम्म बोल, काय म्हणत होतीस..?”
“बॅंगलोर काय विशेष?”
“नथींग यार, थोडं फ्रेशर्सना ब्रिफींग आहे, तिन दिवस”
“मस्त ना, तेव्हढाच रिफ़्रेशींग चेंज तुला…”
“प्रत्येक चेंज रिफ़्रेशींग असतो का?”
” ”
“बाय द वे, काल दिवसभर कुठे होतीस? ऑनलाईन पण दिसली नाहीस आणि ‘लास्ट-सिन’ पण ऑफ़.. कुणाशी बोलायचं नव्हतं का?”
” बोलायचं नव्हतं नाही, बोलायचं होतं.. खूप सारं.. स्वतःशीच..”
“कश्यासंबंधी?”
“सोड ना, तु सांग? हाऊ इज द साईट आऊटसाईड द विंडो?”
“मस्त.. जस्ट सनराईज होतोय.. थांब तुला फोटो पाठवतो..”
मी पटकन तडमडत कॅमेरा ऑन केला.. विंडो सिट नसल्याने शेजारील सभ्य गृहस्थ्याच्या प्रायव्हसीला फाटा देऊन मोबाईल खिडकीच्या काचेजवळ धरुन फोटो काढला. तो माणुस वैतागुन माझ्याकडे बघत होता. तेथे काऊंटरला शहाणपणा करुन विंडो सिट घेतली नाही आणि आता दुसर्याना त्रास देऊन फोटो काढत होतो म्हणुन..
फोटो अॅटॅच करणार त्या आधीच प्रितीचा मेसेज आला..
“फोटो नको पाठवु.. तु सांग ना.. तुला सनराईज कसा दिसतो ते?”
” बरं, मला ना, बर्याचदा असं वाटतं की आपलं लाइफ़ जसं असतं ना, तसंच आपल्याला जग दिसतं.. म्हणजे बघ ना, मगाशी टेक-ऑफ करताना आकाशात सगळे पावसाळी काळे ढग दाटले होते.. खुप डिप्रेसिंग हवा होती, पण आता.. आता सगळीकडे स्वच्छ सुर्यप्रकाश आहे, काळे ढग तर मागे पडले, तो मस्त गोल्डन सुर्य बघीतला ना…”
“तर काय?”
“नेहाची एक फ्रेंड आहे, मी तिला पहील्यांदा भेटलो होतो ना, तेंव्हा तिने कानामध्ये एक मस्त डायमंड्च्या रिंग्स घातल्या होत्या. सुर्याच्या प्रकाशात इतक्या मस्त ग्लिटर व्हायच्या ना…मला त्याचीच आठवण झाली..”
” ओह.. कोण फ्रेंड रे? मी ओळखते का तिला?”
मी अर्थात प्रितीबद्दलच बोलत होतो, तिचे ते स्पार्कलिंग इअर-रिंग्स मला अजुनही जश्याच्या तश्या आठवत होत्या आणि बहुदा प्रितीला नक्कीच कळलं होतं की मी तिच्याबद्दलच बोलतो आहे.
“अं, ओळखत असावीस, खुप क्युट आहे ती..”
मी क्षणभर थांबलो.. काय बोलुन गेलो मी हे..इतक्यात मी नको होतं का असं बोलायला? असं वाटून गेलं.
” ओह.. मग तर मला भेटलंच पाहीजे.. काय नाव काय तिचं?”
“माहीत नाही गं, पण तिचं नाव, तिच्यासारखंच गोड असणार हे नक्की..”
“सापडेल.. कोण होती ती ते सापडेल.. नेहाला ना, जास्ती क्लोज फ्रेंड्स नव्हत्या.. सो.. सापडली की तिचं नाव सांगेन तुला नक्की.. पाहीजे तर ओळख पण करुन देईन.. ओक्के?”
मला हा इन-डायरेक्टली बोलण्याचा मस्त मार्ग सापडला होता.. मनातले सगळे विचार ह्यामार्गाने काढायचा चान्स मी सोडणार नव्हतो.
“प्लिज.. नक्की.. मला ना, तिच्याशी खूप बोलावसं वाटतं.. काय? कश्यावर? माहीत नाही… ”
” ”
“काय प्रेमात वगैरे पडलास की काय तिच्या..?”
“प्रेम! किती विचीत्र भावना आहे नाही ह्या दोन शब्दात. कधी कधी वाटतं दोन-दोन वर्ष एकत्र राहुनही ज्याला प्रेम म्हणतात ते वाटलंच नाही, आणि दोन मिनीटांच्या भेटीत सुध्दा प्रेमाचा तो सुखद अनुभव मनाला स्पर्शुन जातो.. असं असतं का गं लव्ह अॅट फर्स्ट साईट?”
“मला नाही माहीत… पण तुला तरी असं का वाटतं आहे की तुला जे तिच्याबद्दल वाटतं आहे ते प्रेमच आहे? कश्यावरुन दोन वर्षांनी तुला अजुन दुसरी कोणी भेटेल आणि तु परत तिच्या प्रेमात पडशील?”
“ए प्लिज.. मी काय फ्लर्ट वाटलो का तुला?”
“नाही, तसं नाही पण.. नेहाच्या लग्नाला कसाबसा एक महीना झाला आणि आता तु म्हणतो आहेस…”
“प्रिती.. माझं नेहावर प्रेम नव्हतं..”
“काय? काय बोलतो आहेस तु तरूण? म्हणजे तु नेहाला काय फसवतं होतास का? दहा वेळा आय-लव्ह-यु म्हणायचात ना?”
“आय मीन.. प्रेम होतं पण तसं नव्हतं..”
“तसं? प्रेमाचे पण असे प्रकार असतात का तरुण? यु आर टू मच..”
“अगं म्हणजे..मला असं कधी तिच्याशी लग्न करावं.. तिच्याबरोबर आपलं आयुष्य घालवावं वगैरे असं कधी वाटलंच नाही..”
“कदाचीत त्याला कारण म्हणजे तुम्ही पहील्यापासुनच ते मनात ठेवलं होतं..”
“अनिवेज.. इट्स कॉम्लिकेटेड.. आपंण दुसरं काही तरी बोलुयात का?”
“तरुण हे खुप महत्वाचं आहे.. ”
“आय नो प्रिती.. बट धिस इज नॉट द टाईम.. नॉट ऑन चॅट.. मे बी प्रत्यक्ष भेटलो तर…”
“हम्म..”
काही क्षण शांततेत गेले..
“काय झालं? परत स्वतःशी संवाद वगैरे चालु केलास का?”, ती शांतता मला सहन होईना..
“तो तर चालुच आहे तरुण.. घनगंभीर युध्द चालु आहे.. बर, ते सोड, कधी पोहोचशील?”
“अजुन २० मिनीटं.. डायरेक्ट ऑफीसलाच जाणार आहे आधी…”
“ओह.. चल मी जाते आवरायला, कॉलेज आहे…”
“ऑलराइट, जमलं तर दुपारी भेटू, नाही तर रात्री वेळ असेल तर..”
“शुअर.. मी राहीन ऑनलाईन.., पण फोनवर बोलता येणार नाही रात्री, आय होप यु अंडरस्टॅन्ड..”
“नो प्रॉब्लेम..”
“तरुण.. टेक केअर…”
“आय विल प्रिती.. अॅन्ड यु टु.. जास्ती विचार नको करुस.. ”
” बाय तरुण ..”
“बाय………”
फ्लाईटचा तो दीड तास कधी गेला कळलंच नाही. सगळं काही बदलुन गेल्यासारखं वाटत होतं. प्रिती वॉज अगेन जस्ट अ मेसेज अवे…
एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि बॅंगलोरच्या धावपट्टीवर उतरणार्या विमानात स्वतःशीच पुटपुटलो.. “गुड मॉर्नींग बॅंगलुरु…”
[क्रमशः]