"शुज" आणि गणित....३६ चा आकडा होता म्हणाना...लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥" ...नाही मानतो मी लहानपणीचा काळ सुखाचा होता.. पण केव्हा जेव्हा गणिताचा अभ्यास नसायाचा तेव्हाच...ह्या गणिताने माझे आणि माझ्यासारख्या किती जणांचे बालपणी जगणे नकोसे करून टाकले होते.
साई x साई = ३६ आणि साई x सक्कम = ४२ अशी दोन वेगळी वेगळी उत्तर दिल्यावर धपाटा नेहमीचा होता...घड्याळातले साडे-तीन म्हणजे ३.३० आणि गणितातले साडे-तीन म्हणजे ३. ५० असे का? बर तेही सोडून द्या घड्याळात ३.३० वाजले म्हणजे साडे-तीन पण तेच १. ३० त्याला दीड का ?? साडे१ का नाही ? असे प्रश्न माझ्या बालसुलभ आणि निरागस मनाला पडायचे अजूनही पडतात ..बरे लहानपणी चाचणी...सहामाही...नवमाही...वार्षिक..परीक्षांचे निकाल लागले की शेजारी पाजारी नेमके गणितालातले मार्क विचारायचे...आणि शाळेत ..वर्गात वर्ग-शिक्षक सर्व वर्गासमोर गणिताचा पेपर झेंडा फडकावल्याप्रमाणे दाखवत आणि मार्क घोषणा करून सांगत...आणि कमी मार्कवाल्यांचा टेबलाजवळ बोलवून सत्कार करत...आणि त्यात कधी कधी तर बेंच वर उभं करत तेव्हा बाकीची पोरे.. माकडाला बघितल्याप्रमाणे ... आमच्याकडे पाहून टिवल्या-बावल्या करत .. बर गणितासाठी कोचिंग क्लास लावावा एवढी तेव्हा ऐपत हि नव्हती. त्यावर उपाय काय तर गणिताचे व्यसाय सोडवा..त्यात गणिते तर काय " एक हौद भरायला...ते पूर्व दिशेला येवढा चालला तर दक्षिण दिशेला त्याचे घर कुठे...कुठे का असेना आम्हाला का विचारताय...आणि त्याला मुळात गरजच काय होती चालायची?? बस ना घरी शांतपणे...नाही ते नाही होणार.
त्यात निमकी...पावकी.. का असा अत्याचार?? रोमन अंक...आम्हाला कशाला शिकवताय?? ह्या गणितामुळेच माझ्यावर एकदा कुत्र्यासाखा मार खायची वेळ आली होती...झाले असे मी ३ रीत किंवा ४ थीत असेंन..सहामाही परीक्षा चा निकाल लागला...गणितात जेमतेम १ ते २ मार्कांनी काठावर पास झालो होतो..पण मला त्याचे काहीच वाटत नव्हते...कारण २ दिवस अगोदर बाबांच्या खिशाला भोक पडून त्यावेळी १९८९-९० साली २०० रुपयांचे नवीन कोरे करकरीत " शुज" घेतले होते.. प्रयोजन होते या अस्मादिकांची शाळेतल्या गँदरिंग मध्ये निवड झाली होती.. डायलॉग काही नव्हते फक्त एक शाळकरी मुलगा शाळा सुटल्यानंतर आपल्या आईचा हात धरून बाजारात येतो आणि एक दुकानात जाऊन चॉकलेट घेतो...एन्ट्री घेण्याआधी लिपस्टिक आणि पावडरने आमचे तोंड पांढरे आणि लाल केले गेले होते...कोणाला तेव्हा कल्पना होती..तींन ते चार दिवसांनी ह्या मेकअप ची पण गरज लागणार नव्हती ..
गॅदरिंग झाल्यानंतर कदाचित सोमवार किंवा मंगळवार गणिताचा पेपर दिला गेला आणि नापास आणि काठावर पास झालेल्या मुलांना त्यांच्या पालकांसमोर आणि पूर्ण वर्गासमोर सत्कार करत होते..त्यात मी पण काठावर पास १०० पैकी ३७ ते ३८ गुण..आई तेव्ह काहीच बोलली नाही आणि मी मात्र तेच गुण सर्वाना दाखवत सुटलो होतो...घरी आलो आणि आईने पुन्हा गणिताचा पेपर आणि गुण बघितले..आणि आधी बाबा आणि २ भाऊंना बाहेर उभे राहायाला सांगिंतले ..मला कळेचना आई असे काय करतेय..मी अगदी निरागस होतो तेव्हा... आणि त्या नंतरची १० मिनिटे मी..शुज आणि आई...दणादन दणादन शुज मला कडकडून भेटत होते..कधी हातावर कधी पायावर कधी पाठीवर...आणि दारात सगळी चाळ जमा झाली होती...सगळे फिदी फिदी हसत होते...तेव्हा तर नंतर काही दिवस तरी एवढी लाज वाटत होती ना..काही जण मूद्दामून विचारत होते.. काय रे किती मार्क ... तेव्हा तर वाटायचे तेच " शुज" घेऊन त्यांच्याच टाळक्यात...
तेव्हा त्यानंतर कधीही गणिताच्या अभ्यासाला बसलो की ते शुज माझ्या डोळयांसमोर नेहमी असायचे. पण मी पण काही मागे हटणारा नव्हतो..मी माझ्या निरागस मनात एक "भीष्म प्रतिज्ञा" केली एकदा तरी गणितात पैकी च्या पैकी मार्क मिळवीनच ..पण ते करायला मला १० गाठावी लागली...
पण अजूनही स्वप्न पडते उद्या गणिताचा पेपर आहे आणि काहीच अभ्यास झाला नाही किंवा गणिताचा पेपर आहे आणि एकही गणित सुटत नाही...
वरील घटना सत्यकथेवर आधारीत आहे...हवं तर येऊन आमच्या मातोश्रीनां विचारा....