लग्नाचा वाढदिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस, कारण लग्न म्हणजे कैक कडू गोड अनुभवांचा ठेवा, नविन आयुष्यात पदार्पण केल्याचा सोहळा, अनेक नविन नात्यांची गुंफण प्रेमाने जपणारा धागा, आणि निरस आयुष्याला ही सोनेरी स्वप्नदुनियेत घेऊन जाणारं सुख. या सगळ्या गोष्टींची सतत जाणिव करून देणारा, आठवण करून देणारा दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस.. सगळ्यां दाम्पत्यांना हवाहवासा वाटणारा दिवस.
काल त्यांच्याही लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी पूर्ण दिवस सोबत घालवला.... सोबत जेवण केलं, गप्पा केल्या, हसले, जुने क्षण आठवून त्या गोड आठवणीत हातात हात घेऊन हरवले, मनमोकळ हसले आणि रडले सुद्धा….. त्या जुन्या काही शक्य तेवढ्या स्थळांना ही भेट दिली, जिथे ते आधी जायचे..
रात्री जेव्हा दोघे ही घरी आले...अचानक काय झाले कुणास ठाऊक... सगळं काही आनंदी असतांना कुठल्यातरी विषयावर त्यांचा वाद सुरू झाला...शब्दावरून शब्द वाढत गेला.... वादाचं रूपांतर भांडणात झालं.... दोघे ही जन्मोजन्मीचे वैरी असल्यासारखे भांडत होते... काही वेळात दोघे ही गप्प झाले खरे पण भांडणं काही मिटलं नव्हतं... आणि त्यांनी ती अख्खी रात्र रडत घालवली....
सकाळी दोघांनी ही मुकाट्याने आपापली कामं आवरली आणि एकमेकांशी काहीही न बोलता ऑफिसला निघुन गेले....असे यापूर्वी कधीच झाले नव्हते... असेच अबोल्यात दोन दिवस गेले...
दोघांनाही न बोलुन करमेना, पण माघार कोण घेणार....!!
दोघंही हाच विचार करत होते की वादाला सुरवात नेमकी झालीच कशी... दोघांचंही कामात लक्ष लागेना.... दोघंही मोबाईल हाती घेऊन फोन करू की मेसेज पाठवू या विचारात, पण हिम्मत होईना....
दोन दिवस त्यांचे असेच एकमेकांच्या आठवणीत कुढत गेले..... मग ' ती ' च्या एका विद्यार्थिनीने तिच्या ओंजळीत मोगऱ्याची फुलं ठेवली... एरवी जरासे रुसवे फुगवे झाले तरी तो तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं किंवा गजरा आणायचा. तिला ती मोगऱ्याची फुलं बघून तेच आठवलं आणि तिच्या ओठावर नकळत हसु खुललं....
त्या फुलांचा दरवळ तिच्या थेट मनाशी पोहोचला आणि तिला ' तो ' आठवला....' तो ' च ज्याच्याशी एका छोट्या वादतुन अबोला धरलाय तिने, तो...!!
त्या दरवळीने तिच्या मनातला राग कुठे उडाला तिला कळलंही नाही... तिला आता ओढ लागली होती फक्त त्याला भेटण्याची.... त्या एका मिठीची जिथे तिला शांत ग्लांत होता येईल आणि कुठल्याही शब्दांची गरज पडणार नाही..... त्या मोगऱ्याची, त्याच्या सुगंधाची जो त्यांच्या नात्यात खूप महत्त्वाचा होता..नेहमीच…..
तिने जरा दोन दिवस मागे जाऊन विचार केला, तेव्हा तिला कळलं की किती तो मूर्खपणा होता त्या भांडणात... ! उगाच शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा, त्या खास दिवशी समजूतदारपणा दाखवून एक छोटीशी Sorry बोललो असतो आपण तर तो दिवस अजूनच जास्त खास करता आला असता.... आता तिला अपराधीपणा वाटू लागला...
दिवसभर त्याच भांडणाचा विचार करून करून त्याची ही मनस्थिती काही बरी नव्हती.... त्याला ही राहवत नव्हतं... यापूर्वी कधीच असा अबोला धरला नव्हता दोघांनीही.... पण आता त्याने ही ठरवलं होतं, लवकर घरी जायचं आणि सगळा राग घालवायचा, नात्यात पुन्हा नवे रंग भरायचे….
संध्याकाळी तो ही ऑफिस मधून लवकर निघाला. येताना रस्त्यात ट्रॅफिक सिग्नल वर गजरा विकणाऱ्या मुलीकडून त्याने गजरा विकत घेतला...आणि कधी एकदा घरी पोहोचतो असे त्याला वाटू लागले..
ती ही घरी लवकरच आली होती. छान तयार होऊन त्याची आतुरतेने वाट बघत होती. तो आला. त्याला समोर बघुन तिने घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या नात्यातला गोडवा परत भरून आला. तेवढ्यात त्याने तिच्या केसांत गजरा माळला..... आणि त्यांचं नातं आणि त्या घरातलं वातावरण मोगऱ्यासारखं बहरून गेलं..
दोघं ही एकमेकांना झालेल्या प्रकरणासाठी sorry बोलले आणि नातं परत एकदा रिस्टार्ट केलं...
दोघंही परत खुलले, खळखळुन हसले..... दोन दिवसापासून कोमेजलेल्या त्यांच्या आयुष्यात परत दरवळ पसरली......
ओंजळीतल्या मोगऱ्यासारखी......!!
त्याच मोगऱ्याच्या गजऱ्यातल्या फुलासारखी....!!
सुविधा.....?