Pyar mein.. kadhi kadhi - 7 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-७)

Featured Books
  • ખજાનો - 79

    ડર...ભય... ચિંતા...આતુરતા...ને ઉતાવળ... જેવી લાગણીઓથી ઘેરાયે...

  • ભાગવત રહસ્ય - 111

    ભાગવત રહસ્ય-૧૧૧   પશુ-પક્ષીની યોનિમાં અનેક પ્રકારના દુઃખ ભોગ...

  • વિશ્વની ભયંકર જળહોનારતો

    જ્યારે પણ જળહોનારત અંગે વાત નિકળે ત્યારે લોકોનાં મોઢે માત્ર...

  • ખજાનો - 78

    "રાત્રી નો સમય છે, આંદોલન વિશે સુતેલા અંગ્રેજોને જાણ તો થઈ ગ...

  • જે ભગવાનના થયા.

      ગોવર્ધન ગીરધારી ગોવર્ધન તત્વજ્ઞાનિક અર્થ છે – જીવનમાં પ્રક...

Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-७)

११ सप्टेंबर, नेहाच्या लग्नाच्या इंव्हीटेशन कार्ड वर हीच तर तारीख होती.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेला ह्याच तारखेने रडवले होते ९-११, बहुदा आज माझा दिवस होता.

नेहा रीतसर घरी येउन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती, पण मी मात्र नेमकं त्याच वेळेस ‘बँगलोर’ला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे म्हणून `जमणार नाही’ असं आधीच सांगून टाकलं होत.

नेहाच लग्न ठरलं आहे, किंबहुना तिचा साखरपुडा झाला हा विचारच मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालताना पहाण तर नेक्स्ट-टू-इम्पोसिबल होत.

नेहाने खूप इन्सिस्ट केलं, पण तिच्या लग्नाला जायचं? का नाही? ह्याबद्दल माझ्या मनात कोणतेही दुमत नव्हते.
मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो… फायनल !!


‘त्या’ दिवशी शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टीच होती. इतर सुट्टीच्या दिवशी ८-९ वाजेपर्यंत झोपणारा मी, त्या दिवशी मात्र सकाळी ५ वाजल्यापासूनच जागा होतो. काही केल्या परत झोप लागत नव्हती. सारखं डोळ्यासमोर नवरीच्या पोशाखातील नेहाच येत होती.

सकाळचे विधी सुरु झाले असतील….

डोक्यात विचार येउन गेला.

माझे आणि नेहामधले संबंध आईला माहित नसले तरी, आई नेहाला तशी माझी एक मैत्रीण म्हणून ओळखत होती. बऱ्याच वेळा माझा सेल बंद असला कि घरच्या फोन वर नेहाचा फोन असायचा, एक दोनदा नेहा घरीपण येउन गेली होती. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नाही जात म्हणल्यावर आईने उगाचच प्रश्न विचारले असते, म्हणून मग आवरून ‘नेहाच्या लग्नाला जातो’ सांगून बाहेर पडलो.

नेहाच्या कार्यालयासमोरच एक दुमजली हॉटेल होते. वरच्या मजल्याला एक मोठ्ठी काचेची खिडकी होती तेथून कार्यालयाचा दर्शनी भाग दिसत होता. ११- ११.३० ची वेळ असल्याने हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. त्यातच आठवड्याभराची दाढी आणि चेहऱ्यावर देवदास टाइप्स भाव त्यामुळे फारसे कुणी माझ्याकडे लक्षही दिले नाही. वेटरनेही फारसा विचार न करता सरळ `बारचे’ मेन्यु कार्ड समोर धरले.

“एक ऐण्टीक्विटी…. लार्ज”, मी मेन्यु कार्ड न बघताच ऑर्डर देऊन टाकली
“सर सोडा कि अजून काही?”, वेटर
“नथिंग.. ऑन द रॉक्स प्लीज..”

“ओके सर”, म्हणून वेटर निघून गेला
मी खिडकीतून बाहेर बघू लागलो.


ऑर्किडच्या महागड्या फुलांनी प्रवेशद्वार सजवले होते. चौघडा वाजवणाऱ्याबरोबर, दोन तुतारी वाजवणारेही प्रवेशादारापाशी उभे होते. अनेक मोठ-मोठ्या गाड्या पार्किंगमध्ये दिमाखात उभ्या होत्या.

प्रिती म्हणत होती तेच बरोबर होतं, कदाचित तेंव्हा आम्हा-दोघांना आमच्या ह्या रिलेशनशीपमधील दोष जाणवले नव्हते, पण आता त्याच चुका बाभळीच्या काट्यांसारख्या शरीरात घुसत होत्या. आणि असे असताना, अजुन एका रिलेशनमधुन बाहेर पडलो नव्हतो तर मन आधीच प्रितीकडे आकर्षलं गेलं होतं. आणि त्यात आता भर पडली होती ती प्रिती माझ्याच कास्टची नसल्याची. एकीकडे मनाचे काही बंध अजुनही नेहामध्ये अडकुन पडले होते, तर एकाबाजुने ते प्रितीकडे ओढले जात होते. मनाचा हा विलक्षण तणाव माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेला होता.

वेटरने व्हिस्कीचा पेग टेबलावर आणुन ठेवताच तो बॉटम्स-अप करुन रिकामा त्याच्या हातात रिफील करायला दिला.

एक क्षण त्याने विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि तो पुन्हा ग्लास रिफील करायला निघुन गेला.

व्हिस्कीचा एक जळजळीत ओघळ घश्यातुन पोटापर्यंत तप्त आग पेटवत गेला. मेंदुला विलक्षण झिणझिण्या आल्या.

एव्हाना बाहेर थोडी गडबड उडाली होती. मांडपात अनेक फेटेधारी मान्यवर कुणाच्यातरी स्वागताला जमले होते.

क्षणार्धात एक पांढरी लाल पजेरो दारात येऊन थांबली, पाठोपाठ पांढरीशुभ्र जॅग्वॉर आणि ऑडी धुरळा उडवत आल्या. त्याचबरोबर किल्ली दिल्यासारखे बॅंडपथक ‘राजा की आयेगी बारात..’ गाण वाजवु लागले.

पांढर्‍या जॅग्वॉवर फुलं आणि पैश्याच्या नोटा उधळल्या गेल्या…

नेहाचा नवरा… उगाचच माझ्या चेहर्‍यावर छद्म्मी हास्य येऊन गेलं.
हा काय माझ्या नेहाला सांभाळणार? नेहाला फक्त मीच सांभाळु शकतो. तिचे रुसवे फुगवे, तिचे बालीश लाड, तिचे ओसंडुन वाहणारं प्रेम, तिचे गॉसीप्स, तिची स्वप्न, तिचे आईसक्रिम्स, तिचे बॉलीवुड प्रेम.. तिचे शॉपींग.. तिच्या फेव्हरेट प्लेसेस.. सगळं सगळं..

ह्या लग्नानंतर माझी नेहा नक्कीच कुठेतरी हरवुन जाईल आणि तिची जागा कोणीतरी पोक्त, मॅच्युअर्ड, स्टेट्स सांभाळणारी.. किंवा सांभाळावं लागणारी पाटलीण घेईल..

मी घड्याळात नजर टाकली. सेकंद काटा स्वतःच्याच मग्रुरीमध्ये धावत होता..अजुन ४५ मिनीटं आणि मग.. मग.. तदेव लग्नं..!!

अंगावर एक सरसरुन काटा आला.


पुढचा पेग घ्यायला ग्लास उचलला आणि मोबाईल किणकिणु लागला. मला कुणाचाही.. कसलाही फोन घ्यायची इच्छा नव्हती. मी वाजणार्‍या फोनकडे दुर्लक्ष केले आणि ग्लास ओठाला लावला.

फोन वाजुन.. वाजुन बंद झाला.. आणि परत थोड्यवेळाने वाजु लागला.

काहीसं वैतागुनच मी फोन घेतला..

“हॅल्लो??”
“तरुण.. प्रिती बोलतेय.. कुठे आहेस तु??”
“कुठे आहेस म्हणजे? ऑफकोर्स बॅंगलोरला..”, मी आवाज शक्यतो नॉर्मल करत म्हणालो.. “का? काय झालं?”
“तरुण.. खोटं बोलू नकोस प्लिज.. कुठे आहेस सांग…”
“अरे यार.. मी कश्याला खोटं बोलु? खरंच बॅंगलोरला आहे मी… पण काय झालं काय?”

“ओह वॉव.. व्हॉट अ कोईन्सीडन्स.. तुमच्या ऑफीसबाहेरपण लग्न आहे का कुणाचं? आणि तेथेही.. ‘राजा की आयेगी बारात’ वाजतंय वाट्टतं..”, प्रिती उपहासाच्या सुरात म्हणाली.

“शट्ट..”, मी स्वतःशीच पुटपुटलो..

“ओके..सो आय एम हिअर ओनली.. मग?”
“मग तु लग्नाला का येत नाहीयेस? नेहाने दहा वेळा तरी मला विचारलं असेल की तु खरंच बॅंगलोरला आहेस का? कम-ऑन यार.. डोन्ट बी सो मीन.. तिला खरंच आवडेल तु आलास लग्नाला तर..”, प्रिती समजावयाच्या स्वरात म्हणत होती.

“नाही प्रिती.. इट्स नॉट दॅट इझी फॉर मी.. अ‍ॅन्ड इट वोन्ट बी फॉर हर.. आम्ही दोघंही खरंच अ‍ॅटॅच्ड होतो एकमेकांशी. मला तिथे बघीतल्यावर मला माहीत नाही ती कशी रिअ‍ॅक्ट करेल.. यु नो हर राईट..”

“तरुण मला सांग तु कुठे आहेस.. डोन्ट वरी.. मी नाही सांगणार नेहाला..”
“मी सेव्हन-लव्हज मध्ये आहे.. कार्यालयाच्या समोरच..”
“ओके..”, असं म्हणुन प्रितीने फोन बंद केला..

काही मिनिटांमध्येच मी प्रितीला कार्यालयातुन बाहेर येताना पाहीलं आणि मी खुर्चीतुन उठेपर्यंत ती वरती सुध्दा आली होती.

टीपीकल पंजाबी स्टाईलचा राणी-कलरचा घागरा-चोली तिने घातला होता. सोनेरी रंगांचे हेव्ही वर्क त्या घागर्‍याचे सौदर्य अजुनच खुलवत होते. गालांवर त्याच कलरचा.. पण लाईट-शेडचा मेक-अप होता. ब्लॅक-आयलायनर्सने तिचे आधीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह असणारे डोळे अजुनच अ‍ॅट्रॅक्ट करत होते. पुर्ण मनगटभरुन रंगेबीरंगी बांगड्या तिला टीपीकल गर्ली लुक देत होता..

प्रिती सरळ माझ्या टेबलापाशीच आली.

“प्रिती.. तु.. इथे नको होतंस यायला..”, मी आजुबाजुला बघत म्हणालो..

प्रितीला तिथे बघुन.. अर्धनिद्रेत असलेले, दारु चढलेले ४-५ लोकं एकदम जागे झाले होते आणि माझ्याकडे आणि प्रितीकडे ते आलटुन पालटुन बघत होते.

बहुदा त्यांच्या मते प्रिती समोरच्या लग्नातुन पळुन आलेली नवरीच होती आणि मी तिचा बॉयफ्रेंड.. अर्धवट दारुच्या नशेत असलेला. आता आम्ही एकमेकांचा हात धरुन पळुन जाणार ह्या अपेक्षेने सगळे आमच्याकडेच बघत होते.

प्रितीने खुर्ची पुढे ओढली आणि माझ्या समोरच बसली. ती सरळ माझ्याच डोळ्यात बघत होती.

मी अधीक काळ तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही.. मी नजर खाली वळवली.

“काय हे तरुण?”, प्रिती हळु आवाजात म्हणाली.. “नेहाला अजुनही वाटतं आहे.. तु येशील..”
ती अजुन पुढे काही तरी बोलणार होती.. पण अचानक ती थांबली

माझे डोळे पाण्याने डबडबले होते.

“मला खरंच ते शक्य नाही प्रिती.. खरंच नाही.. मी नाही तिला दुसर्‍याची होताना बघु शकत….”

फॉर नो रिझन, माझा घसा भरुन आला होता. खुप जोरजोरात रडावेसे वाटत होते.

प्रितीने तिचा हात माझ्या हातांवर ठेवला..”तरुण…”

मी माझं डोकं तिच्या हातांवर ठेवलं. डोळ्यातुन गरम अश्रु तिच्या हातांवर टपकु लागले..

आजुबाजुची लोकं अधीक उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती.
मी डोळे पुसले आणि परत सरळ बसलो.

प्रितीने तिचा उजवा हात पुढे केला.. तिच्या हातामध्ये रंगेबीरंगी तांदुळ होते..

“अक्षता है तरुण..”, माझा हात उलटा करुन तळहातावर अक्षता ठेवत ती म्हणाली.. “नेहा डेफ़ीनेटली डिझर्व्हस युअर ब्लेसिंग्ज.. निदान तो हक्क तरी तिच्याकडुन हिरावुन घेऊ नकोस..”

तिने एकदा माझ्याकडे बघीतले आणि तेथुन निघुन गेली.


मी बर्‍याचवेळ त्या अक्षतांकडे झपाटल्यासारखा बघत होतो.

लग्नाचा मुहुर्त येऊन ठेपला होता. शेवटच्या मंगलअष्टका पार पडल्या आणि “तदेवं लग्नं..” सुरु झालं..
काही वेळ.. आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला…

मी आजुबाजुला बघीतलं.. प्रिती गेल्यानंतर सगळ्या लोकांचा उत्साह मावळला होता आणि सगळे परत आपल्या मदीरेकडे वळले होते.

पुन्हा एकदा सर्वांगावरुन काटा आला..
मी काही अक्षता उचलल्या आणि कार्यालयाच्या दिशेने टाकल्या..

“ऑल द बेस्ट नेहा.. हॅव अ हॅपी मॅरीड लाईफ़..”
“फर्गिव्ह अ‍ॅन्ड फर्गेट मी. आय शुड नॉट हॅव पुल्ड यु इन्टू धिस.. आय विश यु अ बेटर लाईफ़.. विदाऊट.. मी..”

उरलेल्या अक्षताही खिडकीतुन उडवुन दिल्या.. “गॉड ब्लेस यु नेहा…”
बाहेर सनई-चौघड्यांना उत आला होता…

मी हताश होऊन खुर्चीत बसलो..समोरचा ग्लास एका घोटात संपवला आणि चेहरा तळहातांमध्ये खुपसुन टेबलावर डोकं ठेवलं.

घसा जाळत पोटात विसावलेली व्हिस्की अधीक तप्त होऊन डोळ्यातुन बाहेर पाझरत होती


[क्रमशः]