Nisarg aani manavta yanchyatil diva saadhnara vaarli jamaticha vivah sanskaar in Marathi Spiritual Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार

Featured Books
Categories
Share

निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार

निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार

वाच. आर्या जोशी

वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख.

वारली समाज हा महाराष्ट्राच्या डहाणू,तलासरी या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिसरात राहतो. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे ८% लोकसंख्या या जमातीची आहे. त्यांची बोलीभाषा मराठी आहे.

मागील अनेक शतकापासून वारली समुदाय हा निसर्गाच्या सान्निध्यातच राहतो आहे. निसर्गाला “माता” मानणे ही या जमातीची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे. त्यांच्या प्रसिद्ध अशा चित्रकलेतून ही शक्ती, सामर्थ्य, एकता, आजारापासून संरक्षण आणि पीडा देणा-या वाईट शक्तीपासून बचाव अशा कल्पनेवर आधारित चित्रे दिसून येतात.

वारली जमातीत “विवाह” हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो. त्यांच्या आयुष्यात या संस्काराला विशेष स्थान आहे. पती आणि पत्नीचे नाते आणि त्यांचे सहजीवन याकडे वारली समुदाय आस्थेने आणि आदराने पाहतो. वधू आणि वर याना परस्पर जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य वारली समुदायात दिले जाते.

युवक आणि युवतीना जोडीदार निवडण्यासाठी महत्वाचे माध्यम या समुदायात आहे आणि ते म्हणजे पारंपरिक लोकनृत्य. तारपा नावाचे पारंपरिक वाद्य वाजविले जाते आणि त्या तालावर युवक आणि युवती नृत्य करतात. जमातीतील वृद्ध महिला पारंपरिक गीते म्हणून नृत्याला साथ देतात. युवक आणि युवतीने एकमेकांची निवड केल्यानंतर त्यांचे पालक एकमेकांना भेटतात. जे त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर ते नजीकच्या काळात विवाह करतात. अन्यथा ते विवाह संस्कार कालांतराने करणार असतील तरीही एकमेकांबरोबर सहजीवन सुरु करतात. या सहजीवनात नैतिक मूल्यांचा आदर केला जातो. एकमेकांची फसवणूक वारली विवाहात केली जात नाही. ज्यावेळी आर्थिक स्थिती अनुकूल असेल त्यावेळी संस्कार केला जातो. या पद्धतीमुळे बरेचदा आई वडील आणि मुले यांचा एकाचवेळी विवाह होतो !

वारली विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे या विवाहाचे पौरोहित्य त्यांच्या जमातीतील विधवा स्त्री करते. तिला धवलारी असे संबोधिले जाते.वारली जमातीच्या विशिष्ट बोलीभाषेतील गीते म्हणून धवलारी विवाहविधी संपन्न करते. आधुनिक जगातही विधवा स्त्रीला धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी शिक्षित गटातूनही विरोष दिसून येतो. असे असताना वारली समाजातील विवाहाचे पौरोहित्य एक विधवा स्त्री करते याचे विशेष महत्व वाटते.

वारली विवाहातील आणखी एक पद्धती म्हणजे विवाहप्रसंगीचे भोजन. सामान्यपणे विवाहाला उपस्थित सर्वाना स्नेहभोजन देण्याची पद्धती पहायला मिळते. वारली विवाहात मात्र वधू- वर आणि त्यांचे भाऊ- बहीण यांनाच वधूकडून भोजन दिले जाते. वधू वरांचे पालकही आपले भोजन स्वत: घेऊन येतात. यामुळे वधूच्या वडिलांना खर्चाची चिंता तुलनेने कमी असते.

वारली विवाहविधी असा-

वारली जमातीच्या आयुष्यात निसर्ग देवतांना आदर दिलेला आहे. त्यामुळे विवाहाच्या सुरुवातीला-

  • हिरवा (गणपती)
  • नारनदेव (जलाची देवता)
  • ब्रह्मनदेव(निर्मितीची देवता)
  • वाघोबा (वाघ)
  • यांची प्रार्थना केले जाते. वारा, पाऊस, सूर्य, चंद्र यांची भीती वाटत असल्याने वारली समुदाय त्यांचीही उपासना करतो.

    ज्यावेळी विवाहविधी सुरु होतो त्यावेळी धवलारी पारंपरिक लोकगीते म्हणायला सुरुवात करते. वर आणि वधू एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि परस्परांचे हात हातात धरतात. धवलारी त्यांच्या हातात तांदूळ देते. धवलारी जी गीते म्हणते त्यामध्ये निसर्गदेवतांची प्रार्थना केलेली असते. या देवतांनी वधू आणि वराला आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना या गाण्यांमध्ये केलेली असते. या देवता अशा-

  • जुगनाथ = विष्णू
  • भर्जा= विष्णूची पत्नी
  • ढगशारदेव= ढग
  • पावशादेव= पाऊस
  • वावदीवारन= वादळ
  • चंद्रासूर्य= चंद्र आणि सूर्य
  • सुकेशारदे= शुक्र
  • वरमादेव= नदी
  • नारनदेव=जलाची देवता
  • ज-ह्यादेव= झरा
  • बत्तीसपोह्या= तलाव
  • याखेरीज पांडव,राम,लक्ष्मण,सीता ,रावण आणि मंदोदरी यांचीही प्रार्थना केली जाते.
  • याजोडीनेच जमातीला संरक्षण देणारे गावाचे मुख्य, हवालदार, आणि सुईण यांना वंदन करून आदर दिला जातो.

    या विवाहाच्या विशिष्ट गाण्यातून निसर्ग आणि मानव यांच्याप्रती आदर देण्यासाठी वधू आणि वरांना शिकविले जाते.

    या गीतानंतर वर वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची माल बांधतो. वधू हिरव्या रंगाची साडी नेसून सासरच्या घरी प्रवेशाला तयार होते. गृहप्रवेशावेळी नववधूला तिच्या नव्या कुटुंबातून विशेष मानाने स्वीकारले जाते. तिला तिच्या नव्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली जाते आणि घरातील धान्याची कणगी,उखळ अशा दैनदिन वापरातील वस्तूंचा परिचय करून दिला जातो. नव्या आयुष्याचा इतक्या वेगळ्या पद्धतीने नववधूला परिचय करून देणे आणि तिच्या मनात नव्या कुटुंबासाठी प्रेम निर्माण करणारी ही पद्धती विशेष अशी म्हणावी लागेल. याचवेळी वराची माता एक सुंदरसे गीत गाते ज्यामध्ये तिचा मुलगा हा चंद्र असून तिची सून ही जणू मोग-याची कळी आहे असे वर्णन केलेले असते.

    या विवाहात यज्ञ, होम हवन असे विधी नसतात तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची पद्धतही या जमातीत नाही.

    वारली समुदाय हा निसर्ग आणि मानवता यांना आदर देणारा आहे. या समुदायात निसर्गाइतकाच महिलांनाही आदर देण्यात येतो. चर्चेमध्ये महिलांचे मत विचारले जाते आणि त्यांच्या मताला महत्व दिले जाते हा या समुदायाचा आणखी एक विशेष सांगता येईल.

    निसर्गाच्या सान्निध्यात जगणा-या या आदिम वनबंधू-भगिनी ! त्यांच्याकडून निसर्ग आणि मानवाप्रती आदर या संकल्पना आधुनिक जगातील समाजांनी शिकण्यासारखा आहे.

    ***