Eka nirbhayache patra in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | एका निर्भयाचे पत्र

Featured Books
Categories
Share

एका निर्भयाचे पत्र





:::::::::::::::::::::::::::एका निर्भयाचे पत्र :::::::::::::::::::
प्रति,
नीच दुष्क्रुत्य करणारांनो,
यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही तुम्हा लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही तुम्हाला सहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही वावर सर्वत्र असतो. तुमची सावध, शोधक नजर एखाद्या पाखराला शोधत असते. तुमचे सुदैव आणि आम्हा निष्पाप निर्भयांचे दुर्दैव असे की, मनी वसे ते समोर दिसे याप्रमाणे आम्ही तुमच्या तावडीत सापडतो. भुकेल्या वाघाने एखाद्या शेळीवर तुटून पडावे तसे तुम्ही आम्हा निर्भयांवर तुटून पडता. तुम्हाला स्थळ, वेळ, काळ यापैकी कशाचेही भान राहात नाही. आपले नीच काम कुणी बघतय यालाही तुमच्या लेखी शून्य किंमत असते. कारण तेव्हा तुमच्यावर वासनेची नशा, मस्तीचा कैफ, मुजोरीचा मोद चढून आंधळे झालेला असता तुम्ही. तुम्हाला दिसते फक्त निष्पाप, कोवळी निर्भया! दिसते तिचे शरीर! तिला होणाऱ्या यातना, त्रास, तिची भिरभिरती- याचनामयी नजर पाहून तुमची 'वासनामेल' तुफान धावत सुटते. मला एक प्रश्न पडतो की, असे का तुमचे आचार-विचार? तुमच्या आई-वडिलांची हिच का शिकवण? हेच सांगतोय का तुमचा धर्म? हिच का आपल्या देशाची संस्कृती? जर असे असेल तर मग तुमच्या बहिणीकडे, मैत्रिणीकडे, नात्यातील कुण्या मुलीकडे दुसऱ्या कुणी त्याच नजरेने पाहिले तर का तुमच्या डोळ्यात अंगार फुलतो? त्याचे डोळे फोडण्यासाठी आणि हायपाय तोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवतात?नरडीचा घोट घेण्यासाठी का तुम्ही त्याच्यावर धावून जाता? दुसरीकडे एखादी निर्भया समोर येताच तुमच्या डोळ्यात फुललेला अंगार वासनेत का बदलतो? तुमचे डोळे आणि आचरण अचानक का हिंस्र होते? समोर जी निष्पाप बालिका दिसतेय ती ही कुणाची तरी मुलगी असेल, बहीण असेल, मैत्रीण-बायको असेल हा विचार तुमच्या डोक्यात का येत नाही? आपण जे राक्षसी क्रुत्य करणार आहोत, करीत आहोत तसेच क्रुत्य दुसरा एखादा नराधम आपल्या जवळच्या, नात्यातील मुलीसोबत करू शकतो हे का तुमच्या डोक्यात शिरत नाही? वासना आंधळी असते हे ऐकलं होतं पण, ती कुणाच्या जीवावर उठणारी, कुणाचा संसार उद्ध्वस्त करणारी असू शकते हे आम्हाला माहिती नव्हते. आश्चर्य याचे वाटते की, घरी सुंदर, सौंदर्यवती, रती असूनही तुम्ही का अतिरिक्त वासनेसाठी हपापलेले असता? अशा प्रकारची दुर्वासना, अतिरिक्त वासना तुमच्या मनात येते कशी? सान्निध्यात आलेल्या युवतीला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक इजा करणारी, तिला जीवनातून उठवणाऱ्या राक्षसी वासनेचा उगम होतो कुठून? ती बिचारी हात जोडते, तुमच्या पाया पडते, विनवणी करते, गयावया करते, तुम्हाला शरण येते परंतु, तुमच्या हवशीपणामध्ये काहीही फरक पडत नाही. उलट तिचे दौर्बल्य, तिचा हताशपणा, तिचे आर्जव पाहून तुम्हाला तिची दया येत नाही, तर तुमचा खुनशीपणा जास्त वाढतो. दुप्पट जोमाने तुम्ही जखमी करता, तिच्या शरीराचे लचके तोडता. हे दुष्टचक्र कधी थांबणार आहे?
तुमच्या राक्षसी कामांना कुणी शिक्षा केली नाही असे ही नाही. जाणीव जिवंत असणाऱ्या अनेकांना समाजाने शिक्षा केली तर कधी कायदेशीर चौकटीत शिक्षेला पात्र ठरले परंतु, तरीही तुमच्यासारख्या लांडग्यांचे डोळे उघडत नाहीत. एखादी निर्भया दिसली की, तुमच्या वासनेला भरती येते. तुमच्या शरीरात हिंसकता भरभरून अवतरते. शेवटी जे व्हायचे तेच होते, एक निर्भया कलंकित होते, प्रसंगी तिचा बळी जातो किंवा मग ती समाजापासून स्वतःला लपवत जीवन जगते, नाही तर मग तसेच रक्ताळलेले, विटाळलेले शरीर घेऊन स्वतःच स्वतःला संपवून टाकते. समाजातील काही तथाकथित शहाणे म्हणवून घेणारे तज्ज्ञ आमचे वागणे, राहणे, बोलणे, चालणे आणि विशेषतः आमच्या पोशाखामुळेच वासनांध बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहित होतात अशी मल्लिनाथी करून मोकळे होतात. खरे तर ही पळवाट आहे, स्वतःचे षंढत्व लपविण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे. युगानुयुगे आम्ही 'काकुबाईच' बनून राहायचे का? आमच्या 'आखूड' वस्त्रांचा दोष आमच्या माथी मारतांना हे पळपुटे हे का विसरतात की, अगदी सोज्वळ असणाऱ्या, अंगभर कपडे घालून वावरणाऱ्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत? आज होत नाहीत? या वासनांधांना हवे असते फक्त शरीर... मग ते सात वर्षाच्या कोवळ्या बालिकेचे असो की साठी ओलांडलेल्या महिलेचे असो. आम्ही स्वतंत्र राहायचे नाही का? मुक्तपणे वावरायचे नाही का? देशाला खरेच स्वातंत्र्य मिळाले आहे का? कायम घुसमट सहन करून, नजर खाली ठेवून, परंपरागत पोशाख करुनच राहायचे का? बदलायला हवी पुरुषांची वासनांकित नजर, बदलायला हवे मानवी किळसवाणे वर्तन. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मूग गिळून बसण्याचा स्वभाव बदलायला हवा. वासनेच्या खेळात कलंकित होणाऱ्या स्त्रीचाच बळी जाणार ही परंपरागत धारणा बदलायला हवी.
आम्हा निर्भयांना तुमच्यासारख्या गुंडांचे आश्चर्य वाटत नाही तर नवल वाटते ते या प्रगत समाजाचे! एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एखादा गुंड एखाद्या निष्पाप बालिकेला सतावत असताना, तिच्यावर अत्याचार करत असताना तिथे असणारे लोक शांत कसे बसू शकतात? त्यांच्या माना का खाली जातात? हातपाय का निष्प्राण होतात? काही लोक उघड्या डोळ्यांनी ते सारे पाहात असताना त्यांच्या डोळ्यात संताप नसतो तर अनेकांच्या डोळ्यात त्या तरुणीचे शरीर पाहण्याची लालसा असते. तिथे उपस्थित असणारी माणसावळ एवढी निर्लज्ज, बेशरम असते की, काही जण समोर घडणाऱ्या घटनेतील धिंडवडे निघणाऱ्या तरूणीच्या शरीराचे स्वतःच्या भ्रमणध्वनीवर चित्रीकरण करण्यात धन्यता मानतात. भावना एवढ्या बोथट , संवेदनाहीन झालेल्या आहेत का? बंद दाराच्या आड अन्यायाविरुद्ध लढण्याची भाषा करणारे, गुंडगिरी खूप माजलीय हे ओरडून सांगताना पोलीस आणि सरकारला दोष देणारी मंडळी प्रत्यक्ष घटना घडताना का पुढे येऊन ते सारे थांबवण्याचा, त्या नराधमाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनास्थळी नराधम बोटावर मोजता येतील अशा संख्येने असतात. दुसरीकडे बघे मात्र शेकड्यांनी असतात. बघ्याच्या झुंडीने ठरविले तर एका क्षणात त्या बदमाशांना त्या प्रकारापासून रोखू शकतात. परंतु, बघे संघटित नसतात. अत्याचार सहन करणारी तरुणी त्यांची कुणीच नसते. महत्त्वाचे म्हणजे जिथे सामाजिक प्रश्न निर्माण होतो तिथे लोक कुणी तरी पुढे येईल याची वाट बघत बसतात. 'पहले आप...पहले आप' ही धारणा बळावलेली असते. गर्दीला कोणताही चेहरा नसतो, कोणत्याही भावना नसतात हेच खरे. उलट एक प्रकारची भीती मनामध्ये घर करून असते. त्यामुळे त्या तरुणीला त्या गुंडापासून वाचविण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. गर्दीच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन बदमाश अधिक अमानुषपणे हल्ला चढवतात.
गर्दीतील मानवांची दुसरी गमतीदार मानसिकता अशी असते की, ज्या घटनेचे लोक साक्षीदार असतात, ती घटना घडून गेल्यानंतर त्या कोवळ्या तरुणीवर अनन्वित अत्याचार करून गुंड तिथून निघून जाताच त्या झुंडीतील एक-एक जण शेर बनतो. पुढे येऊन पोलीस-सरकार यांच्यावर ताशेरे ओढत सुटतो. त्या घटनेच्या , त्या गुंडांच्या विरोधात जेव्हा मोर्चा निघतो, उपोषण-धरणे देण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा हिच बघे मंडळी मोठ्या हिरिरीने भाग घेतात. पोटतिडकीने भाषण देतात. घसा बसेपर्यंत घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडतात. कारण त्यावेळी त्यांच्या अवतीभवती असते पोलिसांचे कवच! घटना घडताना सशाच्या काळजाने ते सारे पाहताना पोलीस समोर येताच अचानक त्यांच्यातील सिंह जागा होतो. डरकाळ्या फोडू लागतो...
हे नराधमांनो, थांबवा आता सारे. लुटू द्या आम्हालाही मनमोकळा आनंद! हेही लक्षात घ्या की, आजची निर्भया बदलत आहे. शिक्षणासोबत ती संरक्षणाचे धडे घेत आहे. असेल अशा निर्भयांची संख्या कमी परंतु, बदल होताना, तो स्वीकारताना निश्चितच वेळ लागतो. मात्र, हे बदल जेव्हा घडून येतात तेव्हा एक क्रांती घडते. अशी क्रांती जशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देते तशीच ती निर्भयांनाही स्वातंत्र्य मिळवून देईन... निश्चितच स्वातंत्र्य मिळवून देईन........
तुझीच,
तुझ्याच अत्याचाराला बळी पडलेली,
एक निर्भया....
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज०१,
क्रांतिवीर नगर लेन ०२,
संचेती शाळेजवळ, थेरगाव पुणे- ३३
९४२३१३९०७१.