Pyar mein... kadhi kadhi - 4 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-४)

Featured Books
Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-४)

“डू आय बिलीव्ह इन लव्ह अ‍ॅट फ़र्स्ट साईट?”, ऑफीसला जात असताना डोक्यात एक विचार चमकुन गेला…
“फ़र्गेट फ़र्स्ट साईट, डू आय बिलीव्ह इन लव्ह?”

“व्हॉट इज लव्ह?”
“मनांशी मन जुळणं?, की जस्ट अ फिजीकल अ‍ॅट्रॅक्शन? का दोन्ही? का अजुन काही तिसरं पण असतं?”
“असणारंच.. कारण दोन भेटींमध्ये प्रितीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोन्हींपैकी कुठल्याही मुद्यावरुन नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या.. आणि खुपच स्ट्रॉग होत्या.. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच..”


सोमवारची सकाळ ही बहुतांश आय.टी. वाल्यांची अजातशत्रु असते, आणि तो आय.टी. इंजीनीअर माझ्यासारखा.. नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी नकोसं करुन सोडते.

नशिबाने ४ जुलै असल्याने अमेरीकेतील बहुसंख्य कलीग्स सुट्टीच्या मुड मध्ये असल्याने काम जास्ती आलं नव्हतं. सकाळच्या एक-दोन किरकोळ सिंक-अप मिटीग्ज उरकल्या, आठवड्याभराच्या कामाची आखणी केली आणि इतर इ-मेल्सना प्रत्युत्तर देऊन टाकल्यावर थोडा मोकळा वेळ मिळाला.

प्रितीचा विचार मनाच्या कोपर्‍यात होताच, जरा मोकळा वेळ मिळताच, पुन्हा त्याने मनाचा कब्जा घेतला.

मी घड्याळात नजर टाकली. १२:३० होऊन गेले होते. नेहाचं कॉलेज केंव्हाच सुटलं होतं. त्यामुळे कॉलेजपाशी जाऊन प्रितीला अनपेक्षीत भेटण्याची शक्यता नव्हती.. पण.. कदाचीत….

मी पट्कन माझा कलीग.. ’दिनेशला’ पिंग केले

“हाय दिनेश”
“हाय तरुण.. व्हॉट्स अप..”

“अरे.. मी जरा लंच टाईममध्ये सिटी लायब्ररीमध्ये जाऊन येतोय.. थोडा उशीर झाला तर आपली २ ची मिटींग चालु कर, मी आलो की लगेच जॉईन करतो..”
“नो प्रॉब्लेम.. आय विल हॅन्डल…”

मी पट्कन बाहेर पडलो.

प्रिती दुपारची बर्‍याचदा ‘सिटी लायब्ररी’मध्ये जाते.. किंबहुना जात असावी असा एक अंदाज होता. त्यामुळे मी माझा मोर्चा सिटी लायब्ररीकडे वळवला होता. मनामध्ये एकच धावा करत होतो.. “प्लिज प्लिज गॉड प्लिज… प्रिती असु देत लायब्ररी मध्ये.. आणि प्लिज प्लिज.. प्रिती असो.. किंवा नसो.. तेथे नेहा नसु देत…”


सिटी लायब्ररी, नेहमीप्रमाणेच गर्दीने भरलेली होती. ‘विक’डे बहुतांश गर्दी ही एकतर कॉलेज गोईंग स्टूडंन्ट्स किंवा पेन्शनर आणि गृहीणींची होती.

मी लायब्ररीच्या प्रवेश द्वारातुन सगळीकडे नजर टाकत आत शिरलो.

खालच्या मजल्यावर विवीध प्रकारची छोटी छोटी दालनं केलेली होती. “स्टोरी बुक्स”, “टेक्नीकल पब्लीकेशन्स”, “सायन्स-फिक्शन्स”, “कुकिंग-रेसेपिज”, “बॉलीवुड-हॉलीवुड गॉसिप मॅगझीन्स”.

“कुठे असेल प्रिती?”

पुढची जवळ जवळ १५ मिनीटं मी सगळे सेक्शन पालथे घालण्यात घालवले, पण ती कुठेच दिसत नव्हती. मन निराशेने भरुन जात होते.

शेवटचा सेक्शन.. रेसेपीज..

मी आतमध्ये गेलो.

आतमध्ये बहुतांश नवविवाहीत मुली निरनिराळी पुस्तक चाळण्यात मग्न होत्या. ऑफकोर्स प्रिती इथेही नव्हती.

मी निराश होऊन मागे वळणारच होतो एवढ्यात तो मधाळ-साखरेत घोळलेला गोड आवाज कानवर पडला..

“मे आय हेल्प यु तरुण?”

मी खाड्कन मागे वळलो.

मागे प्रिती उभी होती. पर्ल व्हाईट रंगाचा कुर्ता आणि लेगिंज्स, व्हाईट रंगाचीच छोट्टीशी बिंदी, हातात निळ्या, गुलाबी, लाल, जांभळ्या रंगाच्या बांगड्या, थोडेश्शे थिक़ सोलचे सॅन्ड्ल्स आणि चेहर्‍यावर तेच ते.. हृदयाला भेगा पाडणारे मिलीयन डॉलर्स स्माईल..

“ओह हाय प्रिती…”, मी योगायोग दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणालो..

“काय शोधतो आहेस?”, प्रिती..
“अं.. अ‍ॅक्च्युअली, दुपारी एक अर्जंट मिटींग आहे, त्यासंबंधी काही नोट्स काढायच्या होत्या. म्हणलं इथं लेटेस्ट पब्लीकेशन्स मिळतील म्हणुन बघत होतो..”

“ओह.. मग मिळाली का?”, प्रिती
“नाही ना.. जे पाहीजे होतं ते नाहीच सापडलं..”, मी उगाचच चेहर्‍यावर निराशा आणत म्हणालो..

“नाहीच सापडणार.. “, प्रिती ने सेक्शनच्या हेडींगकडे बोट दाखवलं आणि म्हणाली.. “तु चुकीच्या सेक्शनमध्ये बघतो आहेस.. रेसेपिज मध्ये टेक्नीकल्स कसं मिळेल…”

“ओह.. खरंच की .. मी बघीतलंच नाही.. बट एनीवेज.. हाऊ कम यु आर हिअर? बुक्स बदलायला?”, मी
“नो.. आय वर्क हिअर…”, प्रिती

“यु व्हॉट??”, क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना..
“आय वर्क हिअर.. मी इथे दुपारी पार्ट टाईम काम करते..”, प्रिती

“पण का?”
“का?.. कारण मला बुक्स खुप आवडतात, ह्या असंख्य पुस्तकांमध्ये माझी दुपार मस्त जाते.. दुपारी उगाच घरी लोळत पडण्यापेक्षा इथे मला छान वाटतं.. शिवाय.. सेल्फ एस्टीम.. स्वाभीमान.. पॉकेटमनीसाठी घरी पैसे पण नाही मागावे लागत..”, प्रिती हसत हसत म्हणाली..

मी काही तरी बोलणार एव्हढ्यात एक खत्रुड म्हातारी ‘हृदयरोग आणि त्यावरील उपचार’ असलं काही तरी पुस्तक कुठे आहे विचारायला आली.

“ऑलराईट..” तिला घेउन जाता जाता प्रिती म्हणाली.. “भेटु नंतर.. थोडं बिझी आहे.. इफ़ यु वॉन्ट अनीथींग, लेट मी नो.. मी सेकंड फ्लोवर वर आहे.. बाय..”, असं म्हणुन ती निघुन गेली.

“आय वॉन्ट अ डेट विथ यु.. कॅन आय?” मी मनातल्या मनातच म्हणालो


प्रितीची भेट नक्कीच मनाला सुखावणारी होतीच, पण दुसरी सुखावणारी गोष्ट होती ती म्हणजे ‘प्रिती सिटी लायब्ररीमध्ये दुपारी पार्ट टाईम करते” ही होती. म्हणजे दुपारी कधीही तिला भेटावंसं वाटलंच तरी ती कुठे भेटेल हे नक्की होतं

आता प्रश्न होता की आजच्या प्रितीच्या भेटीबद्दल नेहाला सांगावं का? जर आज सांगीतलं तर पुढे प्रत्येक वेळी मी केंव्हा केंव्हा सिटी-लायब्ररीला गेलो आणि प्रितीशी भेट झाली हे सांगणं आलं असतं. त्यामुळे सध्यातरी काहीच न बोलावं असं ठरवलं. अगदीच प्रितीने सांगीतलं असतं तर काहीतरी सारवासारवं करता आली असती.

पुढचे दोन-तिन दिवस मी नेहाच्या संपर्कात होतो, पण तिने कधीही प्रितीचा किंवा मी सिटी-लायब्ररीला तिला भेटण्याचा विषय काढला नाही. थोडक्यात ह्याबद्दल प्रितीनेही तिला काहीच सांगीतलं नव्हतं हे नक्की…

खरं तर, मला पुर्ण खात्री होती की प्रिती नेहाला नक्की सांगेल आणि त्यासाठी द्यायच्या उत्तराचीही मी तयारी करुन ठेवली होती. पण प्रिती नेहाला काहीच बोलली नाही हे अनपेक्षीतच होतं.

“का केलं असेल प्रितीने असं? विसरली असेल? का मुद्दामच सांगीतलं नसेल?”
“मी सिटी-लायब्ररीमध्ये येणं.. तिला भेटणं.. तिला आवडलं असेल का?”

मी पुन्हा एक चान्स घ्यायचा ठरवला. शुक्रवारी तसंही दुपारनंतर ऑफीस रिकामंच व्हायला लागतं. जवळपासच्या गावी.. मुंबई, सांगली, कोल्हापुर वगैरेला रहाणारी मंडळी, दुपारनंतरच कल्टी मारुन एकदम सोमवारी सकाळी ऑफीसला उगवत. त्यामुळे दुपारनंतर वर्कलोड कमी होता. मी लगेच संधी साधुन सिटी-लायब्ररीला पोहोचलो.

प्रिती खालच्या मजल्यावरच्या काऊंटरवरच होती. मला येताना पहाताच तिने लांबुनच हाय केलं.. मी लगेचच टेक्नीकल्स सेक्शनला जाऊन पुस्तक चाळु लागलो. पण माझं लक्ष पुस्तकांत कमी आणि प्रितीकडेच होतं. डेस्कवरच्या संगणकावर ती कसलीतरी लिस्ट अपडेट करत होती.

मी सर्वकाही विसरुन तिच्याकडेच पहात होतो. किती वेळ?? कुणास ठाऊक. आजुबाजुने अनेकजण येत-जात होते, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी जणु काही कुठल्यातरी दुसर्‍याच जगात होतो. आणि अचानक प्रितीने वर पाहीलं.. आमची नजरानजर झाली.

मी पटकन दचकुन दुसरीकडे पाहीलं. प्रितीने मला तिच्याकडे पहाताना नक्कीच बघीतलं होतं…

“ओह गॉड.. हर आईज.. यु विल किल मी वन डे स्टुपीड विथ दॅट लुक..”, मी स्वतःशीच प्रितीला म्हणालो..

हृदय धाड-धाड उडत होतं. इतक्या गोंगाटातही, मला त्याची धडधड कानांत ऐकु येत होती. शेवटी कुठलंतरी एक पुस्तक उचललं आणि माघारी वळलो.
प्रिती डेस्कवर नव्हती. मी आजुबाजुला तिला शोधायचा प्रयत्न केला, पण ती कुठेच दिसली नाही.

माझा नंबर येताच, पुस्तकाचं कार्ड काउंटरला रजिस्टर केलं आणि तेथुन बाहेर पडलो.


मी काही दिवसांतच सिटी-लायब्ररीची अ‍ॅन्युअल मेंबरशीप घेऊन टाकली. लवकरच माझ्या सिटी-लायब्ररीच्या चकरा वाढल्या. तसं माझं आणि प्रितीचं फारसं बोलणं व्हायचं नाही. बर्‍याचवेळेला ती कामातच असायची आणि उगाचच तिल कामात डिस्टर्ब करायची माझी इच्छा नव्हती. बहुतांश वेळ फक्त ‘हाय’ किंवा ‘बाय’ ह्यावरच असायचं. पण हे ही नसे थोडकं. बर्‍याचवेळा आमची नजरानजरही व्हायची. त्या नजरेत कोणतेच भाव नसायचे. खरं तर मला कळत नव्हतं की ति पण माझ्याकडे बघते आहे? का मी तिच्याकडे बघतो आहे हे बघायला ती माझ्याकडे बघते आहे.

पण काहीही असलं तर तेव्हढी एक नजरही पुरेशी होती मला. त्यानंतर दिवसभर मला प्रितीचा हॅगओव्हर असायचा. कधी नेहाशी फोनवर बोलताना चुकुन मी नेहाला ‘प्रिती’ म्हणुनच हाक मारेन अशी भिती वाटायची. जणु काही माझ्याच मल्टीपल पर्सनालिटी झाल्या होत्या. एक नेहासाठी आणि एक प्रितीसाठी. एकाची गोष्ट दुसर्‍याला कळता कामा नये. मानवी मन कित्ती विचीत्र असतं. माझ्या मनाने आता एक नविनच खेळ चालु केला होता.

‘गिल्ट कॉन्शीयस..’

प्रितीला भेटलो की नेहाचा चेहरा समोर यायचा. नेहाला मी फसवतो आहे असला काहीसा विवेकी की अविवेकी विचार डोक्यात पिंगा घालायला लागायचा. शेवटी नेहाचं आणि माझं अजुन ब्रेक-अप झालं नव्हतं. आम्ही अजुनही ‘कपल्स’च होतो. लग्न करणार नसलो, तरी ह्याचा अर्थ कदापी असा नव्हता की ती असतानाच मी दुसरीबरोबर फ्लर्ट करावं.. या उलट नेहाशी बोलताना मनामध्ये फक्त आणि फक्त प्रिती असायची. नेहाशी मी पहील्या इतका एकरुप होऊच शकत नव्हतो.

सारखी मनामध्ये एक प्रकारची भिती असायची –

“प्रिती ने नेहाला मी जवळ जवळ रोज सिटी-लायब्ररीमध्ये भेटतो सांगीतलं तर?”
“नेहाला कधी चुकुन प्रिती म्हणुन हाक मारली तर?”
“प्रितीला माझ्या विचीत्र वागण्याचा संशय आला आणि तिने मला भेटणं सोडुन दिलं तर?”
“माझ्यामुळे प्रिती आणि नेहाची मैत्री तुटली तर?”
“काहीतरी अघटीत घडुन नेहा आणि प्रिती दोघींनीही माझ्याशी बोलणं टाकलं तर?”

एक ना अनेक.. खरंच म्हणतात ना.. “मन चिंती ते वैरी ना चिंती..”


मोठं मोठी लोकं सांगुन गेली आहेत..‘थिंक पॉझीटीव्ह.. अ‍ॅन्ड पॉझीटीव्ह थिंग्स विल हॅपन..” माझ्या मनात तर निगेटीव्ह थिंकींग ने थैमान घातला होता आणि नेमका एक दिवशी नेहाचा फोन आला..

“हॅलो..”
“तरुण.. संध्याकाळी ७.३० ला भेट मॅक-डीला..”

विनाकारण नेहाचा आवाज मला थोडासा चिडका.. थोडासा टेन्स्ड वाटत होता..

“काय झालं असेल? तिला प्रिती बोलली असेल का काही?”

“हॅल्ल्लो तरुण.. ऐकु आलं नं… ७.३० शार्प…”
“अगं पण, आज लेट होईल थोडं ऑफीसला… उद्या नाही का चालणार..”, मी थोडा वेळ काढायला बघत होतो..
“नो तरुण.. आजच.. ७.३० शार्प..”

मला बोलायची संधी न देताच नेहाने फोन ठेवुन दिला.

रोनाल्ड मॅक्डोनाल्ड.. आता तुच वाचवं रे बाबा म्हणतं मी कोपरापासुन हात जोडले.

काय होणार होतं आज संध्याकाळी?? त्या नियतीलाच ठाऊक.

कसाबसा संध्याकाळी ६.४५ पर्यंत ऑफीसमध्ये वेळ काढला आणि मग मॅक-डी ला जायला बाहेर पडलो…


[क्रमशः]