॥॥॥॥॥॥॥ पोस्टमनकाकांना पत्र ! ॥॥॥॥॥॥
प्रिय पोस्टमनकाका,
स. न. वि. वि.
आम्हा नागरिकांच्या मनात तुमचे काय स्थान आहे हे शब्दात नाही सांगता येणार. पण एक मात्र नक्की, देव जर खरेच असला ना तर त्यानंतर तुमचीच जागा आमच्या ह्रदयात असणार. आमच्या परिसरात तुमचे आगमन होताच, तुमच्याकडे सारे आशाळभूत नजरेने पाहतात. कुणी कितीही घाई-गडबडीत असला तरीही 'आपले काही पत्र ' आले तर नाही ना या आशेने तुमच्या समोरून जातांना रेंगाळतात. काही जण विचारतातही, 'साहेब, माझे काही आहे का?' ज्यांचे काही येणार आहे असे विद्यार्थी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, कामानिमित्ताने दूर गेलेल्या व्यक्तींंच्या घरातील लोक, सीमेवर शत्रूसोबत तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या जवानांचे आई-वडील, पत्नी इत्यादी सारे त्यांना येणाऱ्या पत्राची चौकशी तुमच्याकडे करतात. तुमचे आगमन झाले म्हणजे त्यांना आपली 'ती ' व्यक्ती आल्याचा भास होतो. 'इच्छा भोजनाप्रमाणे' हवे ते आणि हव्या त्या व्यक्तीचे पत्र आले की, ते पत्र पाहून होणारा आनंद अवर्णनीय! एखादा मोठा खजिना सापडल्याप्रमाणे प्रत्येक जण आनंदित होतो. तुमच्याबद्दल त्याला झालेला आनंद तो लपवू शकत नाही. समोरील व्यक्ती आनंदी झालेली पाहून तुमचा ही चेहरा आनंदतो. एक वेगळे समाधान तुमच्या चेहऱ्यावर पसरते. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना झालेले कष्ट तुम्ही विसरून जाता.
शहर, खेडे, वस्ती जिथे कुठे मानवप्राणी राहत असेल तिथे अनंत अडचणींवर मात करत, उन-पाऊस-थंडी-वारा अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पोहोचणारी व्यक्ती म्हणजे पोस्टमनकाका! काका, दूरवर तुमची सायकल दिसली ना की,अनेकांच्या आशेचा दीप प्रज्वलीत होतो. तुमच्या हातातून मिळणारी राखी असेल, भावाने ओवाळणी म्हणून पाठविलेली मनिआँर्डर असेल, आलेले पत्र असेल किंवा अजून काही असेल ते सारे अनेकांचे जीवन सुखी करतात, आनंदी क्षण पेरतात. यामागे असतात तुमचे कष्ट! तळपत्या उन्हात सायकल चालवताना, चढ चढताना तुमची होणारी स्थिती, धपापणारा उर,वर होणारा श्वास सारे काही आम्हाला दिसते , 'कळते पण वळत नाही' याप्रमाणे आम्ही फार काही करू शकत नाही. फार तर एखादा ग्लास पाणी, अर्धा कप चहा कुणी तरी देते. चहा-पाणी घेतांना तुमच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद, विनम्रता बरेच काही सांगून जाते.
दूरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा सध्याची संपर्काची साधने येईपर्यंत आम्ही नागरिक दळणवळणाचे साधन म्हणून पोस्ट खाते आणि पोस्टमनकाका तुमच्यावर अवलंबून राहत असू. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कबुतरांकरवी निरोप पोहचवणे, खास दूत रवाना करून संपर्क साधणे हे आजच्या पिढीला माहिती नाही. परंतु पोस्टमनकाका मात्र सर्वांना माहिती आहे. सार्वकालिक असा हा आमचा पोस्टमनकाका आहे. भविष्यात कितीही साधने आली, स्पर्धात्मक व्यवस्था आली तरी पोस्ट आणि पोस्टमनकाका राहणारच! 'जब तक सूरज-चाँद रहेगा, पोस्टमनकाका रहेगा!' असे कुणी म्हटले तर ते अतिशोक्तीचे ठरू नये. पोस्टमनकाका, डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहणारी माणसं काल होती, आज आहेत, उद्याही राहणारच....
ज्याला स्वतःचे अक्षर स्वतःच वाचताना नाकीनऊ येतात तशा अक्षरात लिहिलेला पत्ता शोधून ज्याचे पत्र त्याला नेऊन देता, अर्धवट पत्ता असलेली व्यक्तीही बरोबर शोधून काढता खरेच फार मोठे काम तुम्ही करता. एवढेच काय पण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना 'महात्मा गांधी, भारत ' अशा पत्त्यावर थेट परदेशातून आलेले पत्र त्यांना हमखास मिळत असे. गांधीजींची महती निराळी असली तरीही असे अर्धवट पत्ता असलेले शेकडो पत्रं रोज तुम्ही वाटप करताच की हे कसे विसरता येईल? पोस्टमनकाका, हे कसे काय जमते हो तुम्हाला? तुमच्या स्मरणशक्तीला सलाम! एवढा मोठा पत्रांचा गठ्ठा हातात असताना दुसऱ्या गल्लीत राहणारी एखादी व्यक्ती समोर आली आणि तिने विचारले की, ' काका, माझे पत्र येणार होते, आले का हो?' दुसऱ्या क्षणी तुमचा हात गळ्यातील पिशवीत जाणार आणि फार तर दुसऱ्या प्रयत्नात तुमच्या हाती संबंधिताचे पत्र येणार. त्यावेळी ती पिशवी समोरच्या माणसाला जादूची पिशवी वाटली नाही तर नवलच! समजा, विचारणाऱ्या माणसाचे काही आले नसेल तर त्याने नांव सांगितल्या बरोबर तुम्ही 'नाही हो. अजून तरी काही आले नाही. येईल दोन-चार दिवसांत. आले की, घरपोच आणून देतो. काळजी करू नका.' असे सांगून एखादी व्यक्ती फारच गयावया करु लागली किंवा हातघाईवर आली तर त्याच्या समाधानासाठी हातातले, पिशवीतले सारे गठ्ठे तपासून त्याचे समाधान करणार.
आजची सारी संपर्काची साधनसंपत्ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी अचानक घडलेली सुखद, दु:खदायी घटना दूरवर असणाऱ्या आपल्या स्वकीयापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव व्यवस्था म्हणजे टपाल खात्याची तार (टेलिग्राम) व्यवस्था! दारात आलेल्या पोस्टमनकाकाने 'तार' असा आवाज दिला की, ते घर जणू निष्प्राण होई. धडधडत्या अंतःकरणाने, थरथरत्या हाताने ती तार हातात घेऊन ती वाचेपर्यंत सर्वांच्याच काळजाचे पाणी-पाणी होत असे. आपल्याकडे निरक्षरता हा फार मोठा शाप होता. काही प्रमाणात आजही आहे. त्या काळात आलेली पत्रं, तार वाचता येणारी फार कमी माणसं गावात असायची. आलेले टपाल , विशेषतः तार वाचून दाखवणारे एकमेव हक्काचे माणूस म्हणजे पोस्टमनकाका! हे कामही तुम्ही त्याच इमानदारीने पार पाडत असत ज्या प्रामाणिकपणे तुम्ही पत्रं पोहोचविण्याचे काम करीत असत.
पोस्टमनकाका, तंत्रज्ञान बदलेल, व्यवस्था बदलेल परंतु पोस्टमनकाका, बदलणार नाहीत ते तुम्ही आणि तुमचा तो चिरपरिचित आवाज....'पोस्टमँन!'