Pyar mein.. kadhi kadhi - 3 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-३)

Featured Books
Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-३)

मला फक्त आणि फक्त तिच दिसत होती. अगदी आपण इंन्स्टाग्राम मध्ये बाकीच्या गोष्टी धुसर करुन टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस रहाण्यासाठी.. अगदी तस्संच. मी कुठे होतो? माहीत नाही! ती कुठे होती??.. काय फरक पडतो.. ती ‘होती’, ह्यातच सर्वकाही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्पार्कलिंग डोळे, क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावर येत असुनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं ह्यासाठी मन आक्रंदत होतं. पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल? काय करु म्हणजे माझं अस्तीत्व तिला जाणवेल?

मला तिच्या समोर जायचं होतं, पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमीनीमध्ये घट्ट रुतुन बसले होते. तिच्याशी बोलायचं होतं, पण कंठातला आवाज कुठेतरी गायब झाला होता. हृदयाची धडधड एखाद्या जेसीबीने खडकाळ जमीन खोदावी तश्या आवाजात मला ऐकु येत होती.. परंतु तिला.. प्रितीला ह्याची तिळमात्र कल्पना नव्हती.

आणि अगदी बेसावधपणे तो क्षण आला. अचानक तिने नजर वर करुन माझ्याकडे पाहीलं. हृदयामध्ये बाण घुसणं म्हणजे नक्की काय असतं हे मी त्या क्षणी अनुभवलं.

ह्र्दयाच्या आतमध्ये कुठेतरी एक तिव्र कळं उमटली आणि मी धाड्कन अंथरुणात उठुन बसलो.

सर्वत्र विचीत्र अंधार होता. जणु शुटींग चालु असतानाच दिग्दर्शकाने ‘पॅक-अप’ म्हणावं आणि सर्व शुटींग लाईट्स ऑफ व्हावेत तसं.

मी घड्याळात वेळ बघीतली.. फक्त २ वाजुन ५० मिनीटं झाली होती.

ह्रुदय अजुनही धडधडत होतं. टेबलावरची पाण्याची बॉटल तोंडाला लावुन गटागटा पाणि प्यायलो आणि पुन्हा अंथरुणात आडवं झालो. बर्‍याच वेळ तगमग चालु होती. झोप येत नव्हती आणि तिचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता अशी विलक्षण आणि असहनीय अवस्था झाली होती.

मी झोप आणण्याचे प्रयत्न सोडुन दिले आणि कल्पनाविलास मध्ये रममाण झालो. प्रिती पुन्हा भेटली तर काय बोलायचे, ती काय म्हणेल, आपण काय म्हणु असले टीनएजर्सचे खेळ खेळत.. मेंदुला त्याच्या सुखासीन अवस्थेत आणुन सोडले. सावकाश कधीतरी नंतर झोप लागली.


ऑफीसमधले निळे, फ्लोरोसंट हिरवे रंग आज खुप्पच फिक्के वाटत होते. जणु काही कोणी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रंगाची तिव्रता कमी केली असावी. मेल्स सुध्दा चेक कराव्याश्या वाटत नव्हत्या. रिलीज झाल्यामुळे वर्कलोडही तसा कमीच होता. पण टीम-लिड नात्याने काही कर्तव्य पार पाडणं जरुरी होतं. रिसोर्सेसना वर्क अलोकेशन कसं बसं करुन टाकलं, पण मन थार्‍यावर नव्हतंच.

डेस्कवर आलो तेंव्हा मोबाईलचा व्हॉट्स-अ‍ॅपचा दिवा लुकलुकत होता.

“जानू, हाऊ आर यु? इफ़ नॉट बिझी, कॉल मी.. लव्ह यु.. नेहा…”

क्षणार्धात नसा-नसांमधील रक्त दुप्पट वेगानं वाहु लागलं. कश्यासाठी नेहाने फोन करायला सांगीतला असेल? प्रितीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल का? प्रितीने कधी भेटायचं ह्याची वेळ सांगीतली असेल का? एक ना दोन.. अनेक प्रश्न मनामध्ये झरझर अवतरले, पण सर्व प्रितीसंबंधीतच केंद्रीत होते.

मी पट्कन नेहाला फोन लावला.

“हाय डिअर..”, पलिकडुन नेहाचा नेहमीचा तो ‘डिअर’ वाला टोन..
“काय गं? काय झालं? कश्याला फोन करायला सांगीतलास?”, मी एका दमातच सर्व प्रश्न विचारले
“हॅल्लोsss..कुल डाऊन.. बिझी आहेस का?”, नेहा
“नाही.. बोल पट्कन..”

“अरे काही विशेष नाही.. अस्संच…”, नेहा
“….”
“बरं.. सांगु?”
“ह्म्म.. बोल..”

“ए.. तुझे आज पाय खुप दुखतं असतील ना रे?”, नेहा खिदळत म्हणाली
“माझे पाय? नाही.. का बरं?”
“काल तु माझ्या स्वप्नात आला होतास. म्हणलं एवढ्या लांब तु आला होतास.. तर म्हणलं विचारावं…”

तोंडामध्ये इतक्या शिव्या आल्या होत्या ना.. पण आवरतं घेतलं
“बरं ऐक ना, आत्ताचं लेक्चर झालं की, लास्ट लेक्चर ऑफ आहे.. भेटुयात? ऑफकोर्स तु बिझी नसशील तर…”

खरं तर अगदी तोंडात आलं होतं, बिझी आहे म्हणुन सांगावं, पण मग सुपीक डोक्यात एक कल्पना आली.

“ऑलराईट.. मी येतो कॉलेजपाशीच..”
“कॉलेजपाशी.. नको त्यापेक्षा डेक्कन ला भेटु ना सिसीडी मध्ये..”
“आपण जाऊ सिसीडीला, पण मी करतो तुला कॉलेजला पिक-अप..”

“ऑलराईट देन.. वेटींग फॉर यु.. डोन्ट बी लेट”, असं म्हणुन नेहाने फोन बंद केला

नेहाला कॉलेजपाशी भेटण्याचं मुख्य कारण अर्थातच प्रिती होतं. मे बी..प्रिती तिच्याबरोबरच असली तर भेटली असती.

मी पट्कन दोन-तिन मेल्स ड्राफ्ट करुन पाठवुन दिल्या आणि बाहेर पडलो. सॉफ्टवेअर-इंजीनीअर असल्याचा आणि त्याहुनही सर्विस बेस्ड कंपनीत असल्याचा एक फायदा असतो.. दिवसभर कधीही बघा, क्लायंट व्हिजीटच्या भितीने का होईना आम्ही अगदी टाप-टीप असतो. फॉर्मल्स, पॉलीश्ड शुज, हेअर-जेल, पर्फ्युम. त्यामुळे बाहेर पडताना आरश्यात बघायची सुध्दा गरज पडली नाही.

वेळेच्या पाच मिनीटं आधीच कॉलेजपाशी पोहोचलो.

थोड्याच वेळात नेहा बाहेर आली.. एकटीच…

“हाय डार्लिंग…”, नेहा सरळ बाईकवर बसतच म्हणाली.
“काय गं! आज एकटीच?”
“हो मग?”

“म्हणजे बाकीचा तुमचा ग्रुप कुठे गेला?”
“आहेत सगळ्या आत.. काही तरी फालतु रोझ एक्झीबीशनला जायचा प्लॅन चालला आहे..”

मी हळुच वळुन गेटकडे बघीतलं, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. थोडावेळ टंगळमंगळही करुन पाहीली, पण उगाच नेहाला नसता संशय येऊन चालणार नव्हतं म्हणुन मग नाईलाजानेच तेथुन निघुन गेलो.

“बरं ऐक, आपण शनिवारी लॉग-राईडला चाललो आहे ओके? कुणी विचारलं तर लक्षात ठेव”, नेहा मध्येच बाईकवर म्हणाली
“मला कश्याला कोण विचारायला येतंय..”, मी अजुनही वैतागलेल्याच मुड मध्ये होतो..
“अरे नाही..अ‍ॅक्च्युअली, प्रिती म्हणत होती, शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला भेटायचं का? तुमचं ते डिस्कशन पेंडीग होतं ना..”

मी जोरदार ब्रेक मारण्याच्याच तयारीत होतो..

“आणि हे तु मला आत्ता सांगते आहेस…”
“म्हणजे.. अरे आत्ताच तर भेटलो आपण दहा मिनीटांपुर्वी..”
“मग भेटु ना ब्रेकफास्टला…”

“जाऊ दे.. काय आपलं तें तेच बोलायचं. आम्ही हजार वेळा बोललो आहे ह्यावर.. तिला पटत नाही तर कश्याला.. नाही तर नाही.. आपल्याला काय फरक पडतो? असे कित्तेक आले आणि गेले.. सब अपनी जुती के निचे..”, नेहा एकदम रिबेलिअन वगैरे होऊन बोलत होती.
“तसं नाही, पण उगाच रॉंग इंप्रेशन नको पडायला ना.. म्हणुन म्हणालो..”

“ए काय रे.. कित्ती मस्त पावसाळी हवा आहे.. आपण लॉग राईडला पण गेलो नाही इतक्यात अजुन..”, सिसीडीमध्ये शिरताना नेहा म्हणाली.

मी दोघांना कॉफी ऑर्डर केली आणि मग खिश्यातला मोबाईल काढुन तिच्यासमोर धरला…

“हे बघ..”
“काय आहे हे?”, नेहा..
“वेदर प्रेडीक्शन आहे.. शनिवारी बघ ‘हॉट अ‍ॅन्ड ह्युमीड’ आहे. एक्स्पेक्टेड टेंपरेचर ३६..”

“हॅ.. हे काय खरं असतं का? उलट मग तर नक्की पाऊस पडेल त्या दिवशी..”
“छॅया.. हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज नाहीत. अमेरीकेच्या सॅटेलाईटवरुन घेतलेला डेटा अ‍ॅनलाईझ करुन दिलेले प्रेडीक्शन आहे हे. ते नाही चुकत..”

“ए काय रे..”, छोट्ट्स्स तोंड करत नेहा म्हणाली.
“मला काही नाही जायला.. बघ.. तुच काळी होशील…” शेवटचं शस्त्र मी बाहेर काढलं. नेहाला काय ते आपल्या गोरेपणाचं कौतुक होतं कुणास ठाऊक, पण हा वार वर्मी लागला.

“बरं.. मग काय? सांगु का तिला भेटुयात शनिवारी म्हणुन?”
“चालेल.. माझी काही हरकत नाही.. तु म्हणशील तसं..”
“ठिके पण एका अटीवर.. आपण नॅचरल्समध्ये भेटायचं आणि तु मला ते ‘कोकोनट डिलाईट’ देणार.. कबुल??”
“जो हुक्म मेरे आका..”, मनामध्ये फुटणार्‍या आनंदाच्या उकळ्या थोपवत मी म्हणालो..


शनिवारची सकाळ कित्तेक वर्षांनी उजाडणार असल्यासारखी भासत होती. मधल्या रात्री, ऑफीसमधले कंटाळवाणे काम, मंद भासणार्‍या संध्याकाळ जणु कधी सरणारच नाहीत अश्या वाटत होत्या. सहनशक्तीचा अंत पाहील्यावर शेवटी तो शनिवार उजाडला.

प्रितीला पहील्यांदा भेटुन तीन दिवस उलटले होते, पण ती भेट मनामध्ये अजुनही फ्रेश होती. त्यावेळचा प्रत्येक क्षण नुकताच घडुन गेल्यासारखा वाटत होता. आज पुन्हा तिला भेटायचं ह्या विचारानेच पुन्हा धडधडायला लागलं होतं…

शेवटचं वळणं घेऊन मी नॅचरल्सपाशी आलो. समोरच्या झाडाखालीच प्रिती उभी होती..

धक़ धक़.. धक धक.. धक धक…

झाडांच्या फांद्यांना हुलकावणी देऊन सुर्याची काही किरणं तिच्यापर्यंत पोहोचली होती. गोल्डन हाईलाइट्स केलेले तिचे केस अधीकच सोनेरी भासत होते. आकाशी-मरुन रंगाच्या पट्य़ांचे तिचे सॅन्डल्स आणि त्यावर बदामी रंगाचे छोटेसे फुल..

नेहा कुठल्या रंगाचे सॅन्डल्स वापरते? हु केअर्स, नेव्हर बॉदर्ड टु चेक दॅट.

मी गाडी पार्क केली तेंव्हा प्रितीचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्याकडे बघुन तिने एक मस्त स्माईल केलं आणि ती मी थांबलो होतो तेथे यायला लागली..

धक़ धक़.. धक धक.. धक धक…

“हाय..गुड मॉर्नींग…”, मी
“हाय…व्हेरी गुड मॉर्नींग..”, प्रिती..

“आय होप.. माझ्यामुळे तुम्हाला तुमचा काही प्लॅन कॅन्सल नाही करावा लागला..”, प्रिती
“नो.. नॉट अ‍ॅट ऑल…”, मी

काही क्षण शांततेत गेले.

पाच एक मिनिटांमध्ये नेहा पण आली आणि आम्ही आतमध्ये आईसक्रिमची ऑर्डर देऊन कोपर्‍यातल्या टेबलवर बसलो.

“सो.. यु वॉन्ट द अ‍ॅन्सर टू युअर क्वेश्चन..”, मी
“अ हं..”, प्रिती

पुढची १०-१५ मिनीटं मी तिला माझ्या परीने माझी आणि नेहाची बाजु पटवुन देत होतो. ह्या काळात नेहाने पहीलं आईसक्रिम संपवुन त्यानंतरची दोन आईसक्रिम्स पण संपवली होती. माझ्या दृष्टीने ते फायद्याचंच होतं. मला माझं पुर्ण लक्ष प्रितीवर द्यायचं होतं.

“हे बघ तरुण, तु म्हणतो आहेस ते तुझ्या दृष्टीने बरोबर आहे.. पण अरे.. प्रेम असं असतं का? म्हणजे जो पर्यंत एकत्र आहोत तो पर्यंत.. उद्या तु तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने..”, प्रिती

तिच्या तोंडुन माझं नाव ऐकताना अंगावरुन मोरपिस फिरल्यासारखं वाटत होतं.

“का? काय हरकत आहे?”, मी
“माझी हरकत अशी काहीच नाही. तु आणि नेहाने.. किंबहुना कुणीही.. कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण बिईंग अ सायकॉलॉजी स्टूडंट मला थोडं हे विचीत्र वाटलं.. आणि मनाला पटलं नाही म्हणुन..”

“…..”
“तु मला सांग, उद्या तुमची लग्न झाल्यावर, एकमेकांना विसरु शकाल?”
“कश्याला विसरायचं? अफ़्टरऑल फ़्रेंड्सना कोणी असं लग्नानंतर विसरतो का आपण?”

नेहाने एव्हाना आपला आईसक्रिम्सचा कोटा संपवला होता आणि ती आमचा डिबेट ऐकत होती.

“फ्रेंड्स??”, आपले टपोरे डोळे अजुन मोठ्ठे करत प्रिती म्हणाली.. “आपल्या कल्चरमध्ये कधीपासुन फ़्रेंड्सबरोबर सेक्स करु लागले??”
“ओह कमॉन.. वुई नेव्हर डीड सेक्स…”, मी नेहाकडे बघत म्हणालो..

“नो??”, प्रितीने नेहाकडे बघीतले..

“आय मीन अनलेस यु आर टॉकींग अबाऊट फ़ॉंन्डलींग.. नो वुई नेव्हर डीड..”, खांदे उडवत मी म्हणालो..

नेहा एखाद्या लहान मुलीसारखी खिदळत होती. मला खरं तर तिचा प्रचंड राग आला होता.. निदान ह्या इंटेंन्स गोष्टी तरी तिने प्रितीला सांगायला नको होत्या.

प्रितीने एकदा घड्याळात बघीतलं आणि मग उठुन उभं रहात म्हणाली.. “एनीवेज, मला नाही वाटतं मी कन्व्हींन्स होईन.. सो लेट्स स्टॉप हीअर..”

“ऑलराईट, आपण दुसर्‍या विषयावर बोलु..”, मी
“नको.. मला जायला हवं.. उशीर झालायं..”, प्रिती..
“ओह.. सिटी लायब्ररी? तु नाही गेलीस तर ती बंद होईल ना..”, थोड्याश्या कुत्सीत स्वरात मी म्हणालो..

तिने दोन क्षण माझ्याकडे बघीतले, अ‍ॅज इफ़, ती माझ्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. काय? मला नाही माहीत..

प्रिती गेली आणि नेहमीप्रमाणे वातावरणातला सगळा रंगच निघुन गेला.

“सो? आज काय प्लॅन आहे?”, नेहाने विचारलं.

माझं वाईट्ट डोकं सटकलं होतं तिच्यावर.. त्यामुळे दिवसभर उगाचच तिच्याबरोबर कुठेही फिरण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मला शांतता हवी होती. मला प्रितीबरोबर घालवलेला हा तास-दीड तास पुन्हा नजरेसमोर आणायचा होता. तिच्याशी झालेल्या नजरानजरीच्या प्रत्येक क्षणी हृदयात उमटलेली ती कळ मला पुन्हा अनुभवायची होती. तिच्या त्या चंदेरी बांगड्यांची किणकिण मला ऐकायची होती, सारखे सारखे चेहर्‍यावर येणारे तिचे केस आणि त्यांना सांभाळताना तिची होणारी तारांबळ मला डोळे मिटून पहायची होती. तिच्या केवळ ओढणीच्या स्पर्शाने अंगावर उमटलेला शहारा मला पुन्हा पुन्हा जगायचा होता…

“आज थोडं पि.सी. बॅकपचं काम आहे, डिस्कला थोडे बॅड सेक्टर आलेत, सो डेटा कॉपी करुन, सगळं फॉरमॅट करायचं आहे.. व्हॉट अबाऊट यु?”, मी
“मला पण आज जरनल कंम्प्लीट करायचं आहे, मागच्या आठवड्यात काहीच झालं नाही रे, आज बसुन करावं लागेल सगळं..”, नेहा

“ठिक आहे, चल मी सोडतो तुला घरी..”, गाडीला किक मारत मी म्हणालो…


नेहाला सोडुन घरी येताना मनामध्ये प्रश्नांचे अनेक तरंग उमटत होते.

केवळ एक दोन भेटीतच प्रिती एव्हढी का आवडावी?
नेहा सुध्दा मला पहील्या भेटीतच आवडली होती. पण आज.. आज ती कदाचीत मला तेव्हढी नाही आवडत जेव्हढी इतके वर्ष आवडत होती.. का?
मी.. माझं मन.. एव्हढं थिल्लर आहे का? कश्यावरुन काही वर्षांनंतर प्रितीच्या बाबतीत पण असंच नाही होणार?
कदाचीत हे प्रितीबद्दलचे क्षणभंगुर अ‍ॅट्रअ‍ॅक्शनही असेल. कदाचीत २-४ दिवसांनी मला नेहा पुर्वीइतकीच आवडेल..
कदाचीत प्रितीचा कोणी बॉयफ़्रेंड असेलही. असेल कश्याला.. असणारच…

अनेक प्रश्न भाजायला ठेवलेल्या पॉपकॉर्न्ससारखे मनात उसळत होते ज्याची उत्तर शोधणं गरजेचं होतं.. शक्य तितक्या लवकर…


[क्रमशः]