पावसाचा पहिला दिवस आणि त्यात दिवस भर मिटिंग. बाहेर पावसाळी वातावरण होते तरी पाऊस पडला नव्हता. दिक्षाचा मूड सकाळ पासूनच रोमँटिक होता. त्यात पहिला पाऊस...पहिलं प्रेम ... आणि मिटिंग मध्ये विनय सुद्धा होताच कि...
" propose तरी करणार आहेस का कधी " , दिक्षा विनयकडे पाहत मनातल्या मनात बोलली. त्याच क्षणाला विनयने चमकून दिक्षाकडे पाहिलं. बापरे !! याला ऐकायला गेले कि काय ... सहज तिच्या मनात विचार आला. हट्ट !! असं असते का कुठे, त्याला कस जाईल ऐकायला ..... येडू कुठली... दिक्षा स्वतःशीच हसली. एका मोठ्या मीटिंग रूम मध्ये, या दोघांसोबत आणखी खूप जण होते. कसलेसे presentation होते. दिक्षा एका कोपऱ्यात तर विनय दुसऱ्या. कधीपासून एकमेकांना चोरून बघणे सुरु होते. फोनवर तर कसा चटपट बोलतो, चॅटिंग वर मेसेज किती पटापट type करतो... मग समोर आली कि काय होते हल्ली याला कळत नाही. एक -दोन शब्द सोडले कि "ततपप " सुरु होते साहेबांचे.
विनय सुद्धा मधेच एक चोरटा कटाक्ष टाकत होता. " काय सुरु आहे नक्की मनात माझ्या, काहीच उमगत नाही. बघूया का तिच्याकडे पुन्हा... नको ... आताच तर बघितले ना... पण ... माझ्या कडे बघत असेल का ती.. " त्याने पुन्हा तिरक्या नजरेने पाहिलं. शेवटी झालीच नजरानजर. मग काय, उगाचच इथे-तिथे पाहू लागला विनय. दिक्षाच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच " सुंदर smile " आली. मिटिंग मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक झाला. सगळे बाहेर आले आणि हातात चहाचे कप घेऊन गप्पा मारत उभे राहिले. विनयने एक कोपरा पकडला, हातात चहाचा कप... दिक्षा बरोबर समोर तरी दुसऱ्या टोकाला तिच्या मैत्रिणी सोबत. आता इतक्या दुरून कसे बोलणार, तरी एक साधन होते ना... डोळे... मग काय, नजरेची भाषा सुरु झाली.
" चहा घेणार का माझ्यासोबत ? " विनयने नजरेने विचारलं आणि हातातला कप जरा वर करून दाखवला.
" हो ... चालेल ना " दिक्षाने सुद्धा तसेच केले.
" काही बोलायचे आहे का तुला.. " विनयने पहिला प्रश्न केला.
" तुला वाटते का काही असं .. " दिक्षाचा डोळ्यांनीच रिप्लाय.
" हो... म्हणून तर विचारलं ",
" काही नाही... सहजच " ,
" पण मी काही ऐकलं मघाशी .. " विनयच्या त्या नजरेच्या वाक्यावर दिक्षा चहाचा घोट घेत घेत थांबली.
" खरंच ऐकलं तू ? " ,
" हो तर .. " हसला विनय.
" चल झूठा ... काहीच ऐकल नाही तू.. " दिक्षाही हसू लागली.
" बोल आणखी काही.. मनातलं " विनय पुढे "बोलला ".
" तुझ्यावर कोणाचा हक्क आहे का... नाहीतर मीच हक्क मागितला असता तुझा. तू आल्यापासून खूप आनंदी राहायला लागली आहे, अशी नव्हती कधी पहिली मी. तो आनंद हवाहवासा वाटतो. म्हणून तुला माझ्याकडेच ठेवलं असत कायमचं. आता तुझेच विचार असतात डोळ्यात, नजरेत.. आधी प्रेमावर विश्वास नव्हता... आता वाटते प्रेमात पडावं कोणाच्या तरी.. " दिक्षाच्या नजरेतून खूप काही कळलं.
" मग ... कोणाच्या प्रेमात पडणार आहेस " विनय चहाचा घोट घेत म्हणाला.
" तू कधी propose करणार आहेस.. " दिक्षाच्या या वाक्यावर विनय हातातली चहा सोडून तिच्याकडेच पाहू लागला.
============================================================
मिटिंगमध्ये अनुजा नव्हती. ती घरी होती. तिची तब्येत ठीक नव्हती. तरी तिला मिटिंगमधली सगळी माहिती मिळत होती. मिटिंग संपली. सगळे निघाले घरी. विनय - दिक्षा शेवटी निघाले. गप्पा मारत मारत खाली आले. आणि अचानक पाऊस सुरु झाला. पहिला पाऊस... जणू काही यांचीच वाट बघत असावा तो.. विनयला तसा आवडायचा नाही पाऊस... कवी असून सुद्धा. पण दिक्षा .. ती तर कधी पासून वाट बघत होती पावसाची. मातीचा सुंगंध आला... सोबत विनय... जवळचे सामान तिने एका कोपऱ्यात ठेवले आणि गेली भिजायला. नाचत होती ती पावसात. प्रेम सुद्धा नवीनच होते ना तिचे. आनंद झालेला. विनय तिला तसं काही करताना पहिल्यांदा बघत होता. त्यालाही छान वाटलं, अशातच त्यालाही वाटलं ... जाऊया पावसात .. तिच्या सोबतीला.... तो पुढे जाणार , आणि त्याचा मोबाईल वाजला. अनुजाचा कॉल होता.
" हॅलो विनय... " ,
" हो... गं .... मीच आहे .... मला कॉल केला तर मीच असणार ना ... " ,
" आगाऊ ..... ते सोड.. बघ किती छान पाऊस पडतो आहे... मला पण एका कविता सुचली... म्हणून लगेच तुला कॉल केला... बोलू का पट्कन , विसरून जाईन नाहीतर... " ,
" बोल बोल .... मी ऐकतो.. " विनय शांतपणे ऐकू लागला.
" बघ ना आज परत अवेळी पाऊस पडतोय
मी खिडकीजवळ उभं राहून बघतेय
ते पावसाचे थेंब,तो पावसाचा आवाज
आणि पुन्हा तुझ्या आठवणी;न संपणाऱ्या
पाऊस मला आवडतच नव्हता कधी
पण पहिल्यांदा झालेली आपली ती भेट
तो कोसळणारा पाऊस पाहून वाटत होत
किती आतुर होता तो धरतीला भेटायला
सगळं अजून तसंच आहे डोळ्यासमोर
तुझ्यामुळेच तर पाऊस आवडायला लागला
तुझं आयुष्यात येणं पण पावसासारखंच होत
आयुष्याच्या वाळवंटाच हिरवं रान केलंस
खूप साऱ्या आठवणींची शिदोरी दिलीस
प्रेमाची नवी परिभाषा शिकवलीस मला
आता आयुष्यात काहीच नसलं तरी पुरेल
इतकं प्रेम भरलय मनात;तुझ्या येण्यानं
हा पाऊस ना आपल्यातला दुवा झालाय आता
तुझं माझ्या सोबत असण्याचा पुरावा आहे तो
अतृप्त धरणीला स्वतःच्या प्रत्येक थेंबाने
तृप्त करणारा ,बेभान असा पाऊस....."
संध्याकाळ होतं होती. त्यात थोडी कुंद हवा.... थोडीशी थंड हवा... त्या हवेत पावसाचा ओलसर पणा भरलेला. विनयच्या कानात अनुजाची कविता आणि समोर स्वतःला विसरून भिजणारी दिक्षा... विनयच्या मनात कससं झालं. शहारून गेला तो.
=====================================================
चंदनचे observation बरोबर होते. विनय हल्ली जरा उशिरानेच यायचा. आजारी वाटायचा. तो फरक अविला सुद्धा जाणवला. एक दिवस, विनयच्या बॅग मधून एक कागदाचे पाकीट खाली पडलं. चंदनने खूप वेळाने ते बघितलं. तोपर्यंत विनय निघून गेलेला घरी. चंदनने ते स्वतः जवळच ठेवलं. तरी कुतूहलाने त्याने ते पुन्हा बघितलं. हॉस्पिटलचे रिपोर्ट !!! विनय कशाला जातो हॉस्पिटल मध्ये... हेमंतला सुद्धा तो हॉस्पिटल मधेच भेटतो वरचेवर.... काय भानगड आहे नक्की.... त्याने ते पाकीट उघडलं आणि त्यातले रिपोर्ट वाचले. जरा confused झाला. कारण एक नावं त्याने पहिल्यांदा वाचले होते. काहीच कळलं नाही त्याला. म्हणून ते त्याने गूगल वर search केलं. घाम फुटला त्याला. tension मध्ये आला. पुढच्या दिवशी, त्याला विचारू... काय आहे हे.. असं ठरवून चंदन घरी निघाला.
पुढच्या दिवशी , विनय आला तसा चंदन त्याला मिटिंग रूम मध्ये घेऊन आला.
" काय झालं चंदन .... आणि असा का वागतोस.... " विनय घाबरला.
" तू आधी आत चल.. बाहेर तमाशा नाही करायचा. " चंदनने दरवाजा लावून घेतला.
" हे काय आहे विनय .... " चंदनने तेच रिपोर्ट विनयसमोर धरले. विनयला काय बोलावे ते कळेना.
" तू आजारी आहेस आणि तो रोग एव्हडा भयानक आहे... सांगावे वाटलं नाही कधी... काय नावं त्याचे... हा... cystic fibrosis... बोल ... का सांगितलं नाहीस .. आहे ना खरं... बोल बोल... " विनयने शांतपणे ऐकून घेतलं. बसला खाली खुर्चीवर.
" होय ... मला आहे... श्वास घेताना त्रास होतो त्याने.... आणि आणखी काही प्रॉब्लेम होतात शारीरिक... त्याचीच treatment घेण्यासाठी मुंबईत आलो. " विनय सांगत होता.
" का सांगितल नाही कोणाला... तुला त्रास होतो ते ... " चंदनचा गळा दाटून आलेला.
" हो ... त्रास होतो, पण सगळ्यांना सांगून तरी काय फायदा होणार होता.... फक्त सहानुभूती तेवढी मिळाली असती.. ते नको होते मला... जाऊ दे.... तुला कळलं ना ... बाकी कोणाला सांगू नकोस.. सगळे कसे छान हसत आहात ना.. नको दुःखी करू कोणाला... तसही मी आता सोडतो आहे ऑफिस ... जमत नाही प्रवास आता... " ,
" आणि दिक्षा ... अनुजाला काय सांगू.... " ,
" काहीही सांग ... " विनय उठला , ते रिपोर्ट्स घेतले आणि निघून गेला. चंदन तसाच राहिला बसून.
विनय दुपार पर्यंत गप्पच होता. कामातच लक्ष. चंदनशी एका शब्दाने काही बोलला नाही. दुपार झाली तसा निघून गेला घरी. फक्त विनयला निघताना तेवढं सांगून गेला. बाकी कोणाला नाही. चंदनला सुद्धा करमत नव्हतं. मनात घाबरलेला सुद्धा. त्यात बाहेर पावसाने सुरुवात केलेली. ढगाळलेले वातावरण. जोराचा वारा. चंदन चहाचा कप घेऊन ऑफिसमधल्या एका खिडकी पाशी उभा राहून बाहेरचा पाऊस बघत होता. मनात विचारांचे काहूर माजलेले.
" Hi ... " मागून आवाज आला. अनुजा होती मागे.
" Hi ... " चंदनने उसनी smile आणली चेहऱ्यावर.
" मस्त पाऊस आहे ना.. त्यात हा गरमा गरम चहा... मस्त वाटते ना... " ,
" हम्म " चंदन त्याच्याच विचारात.
" कसा अचानक येतो ना हा पाऊस... मन कस प्रसन्न करतो. विनय सुद्धा असाच आला ना आपल्या life मध्ये. बघ ना.. बघता बघता सगळं बदलून टाकलं त्याने.... " अनुजा मनापासून बोलत होती. चंदन फक्त ऐकत होता ते.
" किती आगाऊ वागतो ना कधी कधी.... मस्ती करतो.... चिडवतो... रागावली कि लगेच हसवतो. कसली तरी विचित्र स्वप्न पडतात त्याला समुद्र , रातराणीचे झाडं... पांढरी वाळू .. सगळं कस विचित्र.... तोही जरा विचित्र आहे तरी आवडतो... मस्त वाटते त्याच्या सोबत.... नेहमीच त्याची सोबत आवडते, पण आता वाटते कि... त्यालाही मी आवडू लागले आहे... मला सुद्धा आवडू लागला आहे तो... कदाचित.... सांगू का त्याला... " चंदनने ते ऐकलं आणि मोठ्याने वीज चमकली.
" सांग ना... चंदन... सांगू का त्याला... तो मला आवडतो ते ... " अनुजाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. चंदनला काय बोलावे तेच कळत नव्हतं. काहीतरी बोलावं ... म्हणून बोलणार इतक्यात अनुजाला कॉल आला. तशी ती निघून गेली. बाहेर तुफान पाऊस..... काय बोलावं. आधी दिक्षा आणि आता हि अनुजा... विनयला काय झालं आहे नक्की ... ते सुद्धा माहित नाही. कोणाला काय बोलू... चंदन तसाच उभा विचार करत.
आणखी २ आठवडे गेले. विनयच्या सुट्ट्या वाढल्या होत्या. आला कि नेहमी सारखा वागत असे... दिक्षा , अनुजा सोबत तिचं मस्करी.... अवि सोबत भंकस... हेमंत सोबत गप्पा. नॉर्मल सगळं. फक्त चंदनला माहित होते, त्याच्यात काय सुरु आहे ते... पावसाने सुद्धा चांगला जोर पकडला होता या आठवड्यात. दिक्षा ,अनुजा आणखी प्रेमात विनयच्या... पण चंदन आणखी tension मध्ये असायचा.
-------------------------- क्रमश: ------------------